राक्षसबुद्धीचा ‘प्रताप’

    15-Jan-2024
Total Views |
 123
 
२२ जानेवारीच्या पवित्र अभिजित मुहूर्तावर राम मंदिरात रामललांची प्रतिष्ठापना होणार, यावर शिक्कामोर्तब झाल्यापासून काहींच्या बुद्धीला अक्षरशः राक्षसी ग्रहण लागलेले दिसते. त्यातच आता या ऐतिहासिक सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना, उलटसुलट विधाने करून काहींना हिंदूद्वेषाच्या उकळ्या फुटत आहेत. असेच काल-परवा बरळलेले तीन महाभाग म्हणजे लालूपुत्र तेजप्रताप यादव, तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय आणि विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी. लालूपुत्र आणि स्वतःच्या तथाकथित आध्यात्मिक प्रतिमेचाही बागुलबुवा उभे करणारे, तेजप्रताप यादव यांच्या म्हणे राम स्वप्नात आले. म्हणजे, राम तेजप्रतापसारख्या ढोंगी दुर्जनांना का होईना स्वप्नातही दर्शन देतात, हाच खरं तर राममहिमा! बरं, प्रभू श्रीराम तेजप्रतापच्या स्वप्नात येऊन काय म्हणाले, तर म्हणे ‘राम मंदिराचा हा सोहळा वगैरे सगळे ढोंग आहे. हे सगळे नाटक करीत आहेत. मी त्या दिवशी अयोध्येला येणार नाही.’ आता तेजप्रतापांना असे स्वप्नात देवदर्शनाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही म्हणे स्वयं भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नांत येऊन विश्वरूप दर्शन देऊन गेले होते. म्हणजे, तेजप्रतापच्या स्वप्नांचा मार्ग हा इतका प्रशस्त की, साक्षात रामकृष्णही तिथेच जाऊन, त्यांच्या इच्छा कानात कुजबुजतात. अहो धन्य ते तेजप्रताप! पण, या लालूंच्या तेजपुंज तार्‍याची प्रकाशकीर्ती इतकीच सीमित नाही बरं का... देव तर देव, रामभक्तांवर गोळीबाराचे आदेश देणारे मुलायमसिंह यादवही म्हणे मृत्यूनंतर तेजबाबूंच्या स्वप्नात रुंजी घालून गेले होते. स्वप्नांच्या पलीकडे म्हणतात ना, ते हेच...अगदी हेच... पण तेजबाबू, तुम्ही खरंच बुद्धीने तितकेच तेजस्वी आणि सच्चे रामकृष्णाचे भक्त म्हणवता, तर तुम्हीच नाही का भगवान रामाला गळ घालायची की, नाही प्रभू, कोणाच्याही हस्ते मंदिराचे लोकार्पण होऊ दे; पण तुम्हाला आम्हा भक्तांसाठी अयोध्यानगरीत आता विराजमान व्हावेच लागेल. आता ज्यांच्या स्वप्नात साक्षात राम येतोय, ज्यांचे एवढे थेट रामाशीच ‘स्पेशल कनेक्शन’ आहे, तर मग रामानेही आपल्या परम स्वप्नभक्ताची इच्छा का बरं पूर्ण केली नसती? असो. ‘तेजा’च्या या अनाठायी स्वप्नातील ‘प्रतापा’वर विश्वास ठेवणार तरी कोण म्हणा? मुखी देवाचे नाम, ललाटी गंध-टिळा अन् स्वप्नातही असे रामदर्शनाचे ढोंग रचणारे असे हे कलियुगीन चाराखाऊ कुळबुडवे!
 
‘तृण’बुद्धीचे दारिद्य्र

एकीकडे रामनामावरून तेजप्रतापचा स्वप्नछल, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांनी राम नेमका कुठल्या आर्थिक वर्गात मोडतो, असे उपहासात्मक विधान करून आपल्या बुद्धी दारिद्य्राचेच दर्शन घडविले. या खासदारबाई उद्दामपणे म्हणाल्या की, “भाजपवाले म्हणतात की, त्यांनी रामाला घर दिले. म्हणजे राम हा नक्कीच दारिद्य्र रेषेखालील असावा. दारिद्य्र रेषेखालील लोकांना जशी घरे दिली जातात, तसेच घर आता भाजपवाले रामाला देत आहेत.” एवढेच नाही तर रामालाच नाही, तर “रामाच्या लव-कुश या पुत्रांनाही घर द्या, म्हणजे काम पूर्ण होईल,” अशी दर्पोक्तीही या खासदारबाईंनी केली. त्यामुळे राजकीय टीकाटिप्पणीच्या चिखलात आपण साक्षात भगवंतावर शिंतोडे उडवित आहोत, याचे भानही या खासदारबाईंना नाही. खरं तर एखादा हिंदू कितीही श्रीमंत असो अथवा गरीब, त्याच्या घरी छोटेखानी का होईना देवघर असते. एवढेच नाही तर खुद्द रामललाही कित्येक वर्षे झोपडीसदृश घरातच विराजमान होते. आता त्यांच्या भव्य मंदिराची, त्यांच्याच घरी ते विराजमान होण्याची प्रतीक्षा संपुष्टात येत असताना, अशाप्रकारे विधाने करणे हीच मुळी बौद्धिक दिवाळखोरी. राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत तर साक्षात प्रभू श्रीरामाचेच भव्य मंदिर भाजपच्याच प्रयत्नांनी आकारास येत आहे. तेव्हा त्याचे स्वागत करता येत नसेल, तर किमान त्याची अशी हेटाळणी करून, या नेत्यांनी मनाचा कोतेपणा दाखवू नये. पण, ममता बॅनर्जी असो, महुआ मोईत्रा आणि आता शताब्दी रॉय, तृणमूल काँग्रेसच्या या महिलांची वक्तव्ये, वर्तन हे सर्वस्वी लाज आणणारेच. त्यात तृणमूल काँग्रेसचा रामद्वेष, हिंदूविरोध आणि अल्पसंख्याकांचे तुष्टीकरणाचे राजकारण सर्वश्रुतच. तीच गत कुमार सप्तर्षींची. “बिन शिखराच्या मंदिराचे उद्घाटन करणे धर्मशास्त्रात बसत नसेल, तर भाजपकडून झालेले हे हिंदू धर्माचे अवमूल्यन नाही का? फक्त निवडणुकांसाठी रामाचा वापर केला जात आहे,” असे त्यांनी मांडलेले विचारही तितकेच अनाकलनीय. मुळात राम मंदिर हे बिनशिखराचे आहे, या दाव्यात तथ्य ते काय? शिवाय भाजपने राम मंदिराचा मुद्दा निवडणुका असो अथवा नसो, कायमच जोरकसपणे मांडला; कारण प्रश्न मतांचा, निवडणुकांचा नव्हता, प्रश्न होता संस्कृतीचा आणि भावनांचा. पुरोगाम्यांना म्हणा, त्याचे मोल ते काय?
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.