ई. डब्ल्यू. : बदलते युद्धतंत्र

Total Views |
Article on Electronic warfare

विज्ञान-तंत्रानाच्या संगणकीय क्रांतीमुळे युद्धतंत्र अधिक व्यापक, अधिक घातक, अधिक मारक बनलं असून त्यास इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ किंवा ‘ई. डब्ल्यू.’ म्हटले जाते. त्याचाच आविष्कार ड्रोन प्रणाली. ही प्रणाली येत्या काळात अधिक विकसित होाणर असून त्याचा घेतलेला हा आढावा...

राम-रावणाचं युद्ध दिव्य अशा शस्त्रास्त्रांनी झालं. महाभारतातलं कौरव-पांडव युद्धदेखील अत्यंत भीषण अशा दिव्य शस्त्रास्त्रांनी झालं. पण, या झाल्या अनुक्रमे त्रेता आणि द्वापार युगातल्या गोष्टी. भगवान श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीसरशी द्वापार युग संपलं आणि कलियुग सुरू झालं. द्वारका समुद्रात बुडाली. यादव वंशीय पुरूष आपापसात युद्ध करून मेले. म्हणूनच अशा युद्धाला ’यादवी युद्ध’ म्हणतात. शिल्लक राहिलेल्या यादव स्त्रियांना घेऊन, महारथी अर्जुन इंद्रप्रस्थाला यायला निघाला, तेव्हा त्याच्यावर दरोडेखोरांनी हल्ला चढवला. चकीत झालेल्या अर्जुनाने दिव्य अस्त्रांचे मंत्र जपून धनुष्यावर बाण चढवला. तेव्हा या मंत्रांच्या देवता मनुष्यरूप धारण करून, अर्जुनासमोर प्रकट झाला आणि त्याला म्हणाल्या की, “हे वीर अर्जुना, आता युग बदललं आहे. या युगात आमची शक्ती लागू पडणार नाही.”

या कथेचा अन्वयार्थ आधुनिक परिभाषेत कसा मांडायचा, हा एक प्रश्न आहे. पण, प्रॅक्टिकल अर्थ असा की, हिंदू वीरांची मंत्रशक्तीवर चालणारी दिव्य अस्त्र कलियुगात निकामी ठरली. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट इथे नमूद करून ठेवतो. यादवी युद्धात सगळे यादव किंवा यदू वंशीय पुरूष मेले. असं जरी महाभारतकारांनी म्हटलं असलं, तरी ते लाक्षणिक अर्थाने घ्यावं, असं वाटतं. कारण, भारताच्या पश्चिम किनार्‍यावर असणारी द्वारका नाहीशी झाल्यावर, अनेक यदुवंशीय लोक रत्नाकर किंवा पश्चिम समुद्र म्हणजे आताचा अरबी समुद्र ओलांडून पलीकडे अरेबियन द्वीपकल्पात गेले. तिथून ते मध्यपूर्वेत आणि युरोप खंडातही पसरले असावेत. यदू-यहुदी-ज्यू या लोकांना ग्रीक तत्त्ववेता अ‍ॅरिस्टॉटल याने विचारलं की, “तुम्ही मूळचे कुठचे?” तेव्हा यांनी सांगितलं की, ”आम्ही मूळचे भारतातले.” अ‍ॅरिस्टॉटल हा इसवी सन पूर्व चौथ्या शतकात होऊन गेला. अ‍ॅरिस्टॉटलचा गुरू प्लेटो आणि प्लेटोचा गुरू सॉक्रेटिस. आजर्‍या युरोप खंडाची सगळी संस्कृती, सगळा इतिहास, सगळा वैचारिक वारसा हा ग्रीक संस्कृती आणि सॉक्रेटिस-प्लेटो-अ‍ॅरिस्टॉटल यांच्या विचारांवर आधारलेला आहे.

असो. तर कलियुगात हिंदूंची मंत्राधारित शस्त्रास्त्रं निकामी ठरली असली, तरी त्यांचं क्षात्रतेज जराही कमी झालेलं नव्हतं. कलियुगातल्या हिंदूंच्या क्षात्रतेजाचा पहिला पुरावा पुन्हा अ‍ॅरिस्टॉटलशीच जोडला जातो. अ‍ॅरिस्टॉटलचा शिष्य मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर याने इ. स. पूर्व ३२५च्या सुमारास भारतावर आक्रमण केलं. सिंधू नदीवर झालेलं राजा पुरू किंवा पोरसाबरोबरचं युद्ध अलेक्झांडरने जिंकलं, असं एवढ्यावरूनच म्हटलं जातं की, पुरूला ग्रीकांनी कैद केलं आणि त्यामुळे पुरूने ग्रीकांचं मांडलिकत्व मान्य केलं; पण सिंध आणि पंचनद प्रदेशापलीकडे मगधाचे प्रबळ साम्राज्य होतं. त्याला घाबरून अलेक्झांडर सिंधू नदीवरूनच परत फिरला. म्हणजेच हिंदूंचे धनुष्यबाण, भाले, तलवारी मंत्रशक्तीविनाही शत्रूला पाणी पाजण्याइतके तिखट होते.
इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकापासून इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत धनुष्यबाण, तलवारी, भाले यांनीच हिंदू आणि त्यांचे शत्रूदेखील लढत होते. अठराव्या शतकापासून मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. तोफा आणि बंदुका ही लांब पल्ल्याची, अधिक मारक, अधिक घातक ज्यांच्यामुळे लहान-मोठा स्फोट होत होता, अशी शस्त्र प्रचारात आली. यामुळेच त्यांना नाव मिळालं-’फायर आर्म्स.’ आपल्या मराठी ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांच्यासाठी वापरलेला शब्द ’उडती हत्यारं.’
 
उडत्या हत्यारांचं सर्वोच्च शिखर पहिल्या महायुद्धात गाठलं गेलं. मशीनगन, रणगाडा, विमानं आणि ७५ मैल किंवा साधारण १२० किमी अंतरावर मारा करू शकणार्‍या, सर्वाधिक लांब पल्ल्याच्या महाभयंकर तोफा ही १९१४ सालची म्हणजेच विसाव्या शतकाची जगाला देणगी होती. आता यालाही १०० वर्षं उलटून गेल्यामुळे आणि विज्ञान-तंत्रानाच्या संगणकीय क्रांतीमुळे साहजिकच युद्धतंत्र अधिक व्यापक, अधिक घातक, अधिक मारक बनलं आहे. आता त्याला नाव मिळाले आहे- ’इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ किंवा ई. डब्ल्यू. आणि या ई. डब्ल्यू. चा अगदी ताजा आविष्कार म्हणजेच ड्रोन प्रणाली.

अन्मॅन्ड एरियल व्हेईकल किंवा ’युएव्ही’ किंवा ड्रोन या गिधाडाएवढ्या छोट्या विमानांनी रणांगणावर आणि रणांगणामागे देखील किती उत्कृष्ट कामगिरी चालवलेली आहे, हे आपण गेल्या आठवड्यातल्या स्तंभात पाहिलंच होतं. अफगाणिस्तानात किंवा अन्यत्रसुद्धा छोट्या-छोट्या गटांमध्ये विभागून अतिरेकी कारवाया करणार्‍या इस्लामी गटांना ड्रोन्सद्वारे हेरण्यात आलं आणि मग ड्रोन्सद्वारेच बॉम्ब टाकून, त्यांचा निकाल लावण्यात चांगलंच यश मिळाले.
 
आता युक्रेन-रशिया युद्धात दोन्ही बाजूंनी या ई. डब्ल्यू.चा वापर वाढत आहे. फेब्रुवारी २०२२ पासून हे युद्ध सुरू आहे. एकीकडे विमानं, रणगाडे, तोफा, सैन्यांच्या समोरासमोर चकमकी, युद्धनौकांच्या चकमकी इत्यादी पारंपरिक पद्धतीने युद्ध चालूच आहे. दुसरीकडे ड्रोन्सद्वारे छोटे-छोटे घातपाती हल्ले चढवून, एकमेकांना चावे घेत, राहण्याचं गनिमी युद्धतंत्रदेखील दोन्ही बाजू वापरत आहेत.

सोबतच्या चित्रात दाखवलेलं चिलखती वाहन पाहा. या वाहनाच्या टपावर ज्या एंटेना दिसत आहेत, ती साधारण दहा किमी परिसरात लागू पडणारी ड्रोन प्रणाली आहे. म्हणजे या एंटेनांद्वारे आजूबाजूच्या दहा किमी परिसरातील शत्रूच्या ठाण्यांचा, वाहनांचा ताफ्यांचा ठावठिकाणा शोधणं, त्यांची चित्रं घेणं आणि त्यांच्यावर हल्ला करणं यांपैकी कोणतंही काम ड्रोन्स करू शकतात. गेल्या काही महिन्यांत युक्रेनी सैन्याने विपुल प्रमाणात स्वस्त किमतीची ड्रोन्स बनवून, ती वापरात आणली आहेत. ती स्वस्त असल्यामुळे, त्यांच्यावरचे कॅमेरे कमी शक्तिशाली असतात आणि यांचा मारा कमी अचूक असतो. पण, युके्रनी लष्कराला तेवढं चालणारं आहे.

आता यावर किंवा एकंदरीतच ई. डब्ल्यू प्रणालीत रशियाने काढलेली प्रतिखेळी फारच गमतीदार आहे. समजा, युक्रेनी ड्रोन प्रणालीच्या एंटेनाने एखाद्या रशियन लष्करी ताफ्याचा ठावठिकाणा पकडला. आता पुढे काय होईल? युक्रेनी ड्रोन हाताळणारा ऑपरेटर तो ठावठिकाणा संगणकात भरून, ड्रोनला त्या ठिकाणावर हल्ला करण्याची आज्ञा देईल. समजा हा वाहन ताफा चालता असेल, तर त्या वाहनांच्या वेगाचा अंदाज घेऊन, ड्रोन नेमकं त्या ताफ्याला कुठे गाठेल, या सगळ्याचा हिशेब संगणकच करेल आणि त्यानुसार ड्रोनला सूचना देईल. आता या सूचना किंवा एकंदरीतच हे सगळे इलेक्ट्रॉनिक नेटवर्क कोणत्या आधारावर काम करतं, तर इलेक्ट्रॉनिक सिग्नलस आणि ते सिग्नल्स टिपणारे ड्रोनवरचे सेन्सर्स किंवा संवेदक. आता रशियन ड्रोन प्रणालीचा ऑपरेटर काय करेल, तर तो युक्रेनी ड्रोन प्रणालीची गुप्त आज्ञावली भेदून, तिच्याकडून प्रसारित केले जाणारे सिग्नलस् करप्ट करेल. त्यामुळे या प्रणालीच्या मार्गदर्शनानुसार, चालणारी ड्रोन्स मार्ग चुकून भलतीकडेच जाऊन बॉम्ब टाकतील किंवा युक्रेनी ऑपरेटरकडून युक्रेनी ड्रोन्सकडे जाणारे सिग्नलस तो ’जॅम’ करेल, यामुळे ती ड्रोन्स दिशाहीन होऊन भरकटतील आणि कुठेही जाऊन आपटतील, अशारितीने युक्रेनी ड्रोन प्रणालीचं संगणकीय नेटवर्क भेदण्यासाठी तिच्याहून प्रभावी संगणकीय प्रणाली हवी. म्हणजेच जसे तज्ज्ञ इंजिनिअर्स, ऑपरेटर्स हवेत, साधनसामग्री हवी. तशी ती रशियाने सुसज्ज केलेली आहे आणि तशा चिलखती गाड्या रशिया-युक्रेन सीमेवर सर्वत्र फिरत्या ठेवलेल्या आहेत. साहजिकच युद्धाच्या ताज्या परिस्थितीनुसार, रशिया हळू गतीने पण निश्चितपणे सर्वत्र पुढे सरकतो आहे.

आता रशियाच्या संगणक तंत्र प्रणालीइतकीच प्रभावी प्रणाली अमेरिकेकडे अर्थातच आहे. पण, ती युक्रेनला देण्याबाबत अमेरिका उदासीन आहे. कारण, एकदा का ती रणांगणावर वापरली गेली की, रशियाला ती समजणारच आणि रशियाकडून ती चीनकडे जाणारच. हे अमेरिकेला नको आहे. एकप्रकारे लांब पल्ल्याच्या बंदुका, तोफा, अग्निबाण, क्षेपणास्त्र वगैरेबाबत जी रास्त स्पर्धा चालू होती, तीच आता संगणकीय शस्त्र प्रणालीबाबत चालू झाली आहे. तू शेर, तर मी सव्वा शेर!

ड्रूझ इस्रायली

सगळे अरब मुसलमान आहेत, असं आपल्याला वाटतं; पण तो गैरसमज आहे. अल्प प्रमाणात का होईना; पण मुसलमान न झालेले अरबही आहेत. ते ख्रिश्चन आहेत, ज्यू आहेत आणि ड्रूझ आहेत. मुसलमानी धर्मशास्त्रानुसार, मुसलमानांचे दोन मुख्य पंथ म्हणजे शिया आणि सुन्नी. शिया पंथात पुन्हा इस्माईली हा एक उपपंथ आहे आणि ड्रूझ हा इस्माईलींचा आणखी एक उपपंथ आहे. पण, स्वतः ड्रूझ लोक आपल्याला इस्लामी मानत नाहीत. ते पैगंबरांना मानतात; पण कुराण मानत नाहीत. त्यांचा धर्मग्रंथ, त्यांची उपासना पद्धती हे सगळे गुप्त आहे. ते बाहेरच्या माणसाला आपल्या पंथात घेत नाहीत. मात्र, ते एकेश्वरी असून आपल्या उपासनेत इस्लाम, ख्रिश्चानिटी, बौद्ध, हिंदू, झरतुष्ट्र अशा सगळ्या धर्मतत्त्वांचा समावेश आहे, असे म्हणतात. ते सगळे मिळून आठ ते दहा लाख आहेत. त्यांपैकी बहुसंख्य लेबेनॉन, सीरिया, इस्रायल आणि अगदी थोडेसे जॉर्डनमध्ये आहेत.

इस्रायलमध्ये त्यांची संख्या साधारण दीड लाख आहे. विशेष म्हणजे, हे ड्रूझ लोक उत्तम लढवय्ये असून, त्यांच्यापैकी अनेक जण इस्रायली सैन्यात कमांडो पथकांमध्ये आहेत. दि. ७ ऑक्टोबर २०१३ रोजी ‘हमास’ या अतिरेकी संघटनेने गाझा पट्टीत इस्रायली नागरिकांवर घातपाती हल्ला चढवला. तेव्हापासून गेले तीन महिने गाझामध्ये प्रचंड रणकंदन चालू आहे. इस्रायली सेना ‘हमास’ची ससेहोलपट करीत आहे. पण, युद्ध हरल्यावर त्यात इस्रायली सैनिकीही मरत आहेत. यात आतापर्यंत किमान सहा ड्रूझ जमातीचे अधिकारीही आहेत.ते पाहा इस्रायलच्या गॅलिली भागातलं पेकिइन हे गाव. या गावान ड्रूझ जमातीचीच वस्ती आहे. गावाच्या मुख्य चौकात एका ड्रूझ वीरपुरुषाचा मोठमोठ्या मिशा असलेला भव्य पुतळा आहे. आज तो चौक गर्दीने फुलून गेला आहे. कारण, गाझा पट्टीत ठार झालेल्या, एका इस्रायली-ड्रूझ अधिकार्‍याची शव पेटी तिथे ठेवण्यात आली आहे. अख्खा गाव त्या योद्ध्याला अखेरची मानवंदना देत आहे. अवघ्या २३ वर्षांच्या या इस्रायली-ड्रूझ हुतात्म्याचं नाव आहे-मेजर जमाल अब्बास. जे देशासाठी लढले, ते वीर हुतात्मे झाले!
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.