दणदणत्या तोफा ऑगस्टच्या : बलुच शैलीत...

Total Views |
Article On History Of Balochistan

आता बलुचिस्तान हा सगळाच प्रांत इंग्रजांनी नव्याने निर्माण होणार्‍या पाकिस्तानला दिलेला होता. खरान, लास बेला आणि मकरान या संस्थानांनी पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला. पण, कलातचे अधिपती खान मीर अहमद यारखान यांना स्वतंत्र राहायचं होतं. यांनी काय करावं? इंग्रज व्हाईसरॉयसमोर म्हणजे माऊंटबॅटनसमोर आपली बाजू मांडण्याचं वकीलपत्र यांनी चक्क महंमद अली जिनांनाच दिलं. बोकडाने आपली मानच नव्हे, अख्खं शरीरच लांडग्याच्या तोंडात दिलं.

बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक प्रांत आहे, हे आपल्याला माहीतच आहे. दि. १२ ऑगस्ट २०२३ या दिवशी रात्री ठीक ८ वाजता बलुचिस्तानच्या पंजगुर जिल्ह्यातल्या गिच या शहराजवळच्या कहन या लष्करी छावणीवर ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या गनिमी सैनिकांचा पहिला हल्ला झाला, यात गनिमांनी रॉकेट्सचा मारा केला. त्याच रात्री १०.३० वाजता केच जिल्ह्यातल्या शेपुक गावाजवळच्या बराग या डोंगराळ भागातल्या सैन्य छावणीवर असाच हल्ला झाला. यात रॉकेट्ससहित स्टेन गन्स, मशीन गन्स यांचा सर्रास वापर झाला.

दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ७, ८, ९ आणि १० वाजता म्हणजे तासातासाच्या अंतराने अवारान जिल्ह्याच्या चार वेगवेगळ्या सैनिकी छावण्यांवर कजाखी हल्ले चढवण्यात आले. यापैकी मश्के या गावाजवळच्या मलिशबंद सैनिकी छावणीवरच्या हल्ल्यात फारच घनचक्कर लढाई झाली. बलुच गनीम आणि पाकिस्तानी सैनिक यांच्यात कित्येक तास बेबंद गोळीबारी चालू होती. परंतु, बलुच गनिमांनी खरा डाव साधला, तो दि. १३ ऑगस्टच्या सकाळी. ग्वादर विमानतळावरून ग्वादर बंदराकडे जाणार्‍या चिनी इंजिनिअर्सच्या वाहन ताफ्यावर त्यांनी आत्मघाती हल्ला चढवला. २० उच्च चिनी अभियंते प्रवास करीत असलेल्या, या वाहन ताफ्याच्या संरक्षणासाठी पाक लष्कराची आणि पाक पोलिसांची आठ चिलखती वाहनं तैनात होती. पण, कशालाही न जुमानता बलुची आत्मघाती हल्लेखोरांनी चढवलेल्या हल्ल्यात चार उच्च चिनी अभियंते आणि नऊ पाकी सुरक्षाकर्मी ठार झाले. दि. १४ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी पाकिस्तानात सर्वत्र सुरू असतानाच दि. १३ ऑगस्टला बलुची गनिमांनी हा धडाका उडवून दिला. ‘बलुचिस्तान नॅशनल मुव्हमेंट’ या स्वतंत्र बलुचिस्तानसाठी कार्यरत असणार्‍या संघटनेेचे ज्येष्ठ संयुक्त सचिव कमाल बलोच यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं, “त्यांनी त्यांच्या पैदाशीचा उत्सव आमच्या भूमीवर का म्हणून साजरा करावा? पाकिस्तानने स्वतंत्र बलुचिस्तानवर ताबा मिळवून सगळ्या करारांची पायमल्ली केलेली आहे. आम्ही हे कधीच विसरणार नाही आणि त्यांनाही विसरू देणार नाही.”

दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रज सरकार अधिकृतपणे भारताला स्वातंत्र्य प्रदान करणार, हे नक्की ठरलं. अत्यंत हट्टी आणि अहंकारी महंमद अली जिनांनी ‘आम्हाला एक दिवस आधीच म्हणजे दि. १४ ऑगस्ट रोजीच पाकिस्तान हा आमचा स्वतंत्र देश निर्माण झालेला हवा,’ अशी मागणी केली. ती अर्थातच मान्य झाली. मुसलमान म्हणजे इंग्रजांची लाडकी बायको ना! अर्धा बंगाल, अर्धा पंजाब, संपूर्ण सिंध, संपूर्ण वायव्य सरहद्द प्रांत यांच्या नागरी प्रशासकीय हस्तांतरणाची तयारी सुरू झाली. बलुचिस्तान हा प्रांत चार खानतींमध्ये विभागला गेला होता. खानत म्हणजे खान या दर्जाच्या अधिपतींचं राज्य बादशहाची बादशाहत, सुलतानाची ती सल्लनत, तशी खानाची ती ‘खानत’ किंवा इंग्रजीत ‘खानेट’ तर बलुचिस्तानात कलात, खरान, लास बेला आणि मकरान अशा चार खानती होत्या. यात कलातची खानत सर्वांत मोठी होती. इंग्रजांनी सगळ्याच संस्थानिकांना असा पर्याय दिला की, आम्ही तर आता चाललो, या उपर तुमचं संस्थान भारतात किंवा पाकिस्तानात विलीन करायचं की स्वतंत्र राहायचं, याचा निर्णय तुमचा तुम्ही घ्या. तुमचं संस्थान इंग्रज सरकारचं मांडलिक असल्याचा जो तह, तुमचे पूर्वीचे सत्ताधीश आणि आमचे तत्कालीन व्हॉईसरॉय यांच्यादरम्यान झाला होता, त्यातून आम्ही तुम्हाला मोकळं करीत आहोत.

आता बलुचिस्तान हा सगळाच प्रांत इंग्रजांनी नव्याने निर्माण होणार्‍या पाकिस्तानला दिलेला होता. खरान, लास बेला आणि मकरान या संस्थानांनी पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला. पण, कलातचे अधिपती खान मीर अहमद यारखान यांना स्वतंत्र राहायचं होतं. यांनी काय करावं? इंग्रज व्हाईसरॉयसमोर म्हणजे माऊंटबॅटनसमोर आपली बाजू मांडण्याचं वकीलपत्र यांनी चक्क महंमद अली जिनांनाच दिलं. बोकडाने आपली मानच नव्हे, अख्खं शरीरच लांडग्याच्या तोंडात दिलं.

दि. ४ ऑगस्ट १९४७ या दिवशी दिल्लीत बैठक झाली. तिच्यात लॉर्ड माऊंटबॅटनसह मीर अहमद यारखान, त्यांच्या संस्थानचे पंतप्रधान, जिना आणि नेहरू एवढे लोक सामील होते. कलात हे संस्थान स्वतंत्र राहिलं पाहिजे, इतकंच नव्हे, तर खरान, मकरान आणि लास बेला या संस्थानांचा मुलुखही कलातला जोडला जावा, अशी जोरदार वकिली जिनांनी केली आणि माऊंटबॅटनने ती मान्य केली. यानुसार दि. ५ ऑगस्ट १९४७ या दिवसापासून कलात, मकरान, खरान आणि लास बेलासह स्वतंत्र बलुचिस्तान अस्तित्वात आल्याची घोषणा करण्यात आली. दि. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी कलातमधल्या आपल्या हवेलीवर अहमद यारखानांनी स्वतंत्र बलुचिस्तानचा ध्वज फडकावला आणि मशिदीत आपल्या नावाचा खुत्बा पढवला.

मुसलमान राज्यकर्त्यांच्या दृष्टीने हे खुत्बा पढवला जाणं, ही एक फारच आवश्यक धार्मिक क्रिया असते. राज्यातला जो सर्वोच्च इस्लामी धर्मगुरू, मग तो इमाम असेल, मुफ्ती असेल, त्याने नव्या राजाच्या नावाने प्रार्थना केली, म्हणजे त्या राजाला इस्लामची मान्यता मिळाली, असा या खुत्बा पढण्याचा अर्थ असतो. म्हणून पाहा, अलाउद्दिन खिलजी ते औरंगजेब सगळे लोक आपला बाप, भाऊ, सासरा, काके, मामे वगैरे लोकांविरुद्ध बंड पुकारून त्यांना ठार मारल्यावर पहिली गोष्ट कोणती करताना दिसतात, तर दिल्लीच्या जामा मशिदीत जाऊन तिथल्या शाही इमामाकडून स्वतःच्या नावाचा खुत्बा पढवणे, ही गोष्ट. बाकी मग ठार केलेल्या भावांच्या बायका पळवणं, त्यांच्या छोट्या मुलांना घोड्याच्या शेपटीला बांधून फरपटावणं वगैरे लीला करण्यासाठी खूप वेळ असतोच.

असो. तर अहमद यारखान स्वतंत्र अधिपती झाले खरे. पण, राज्य करण्यासाठी मुलुख कुठाय? जिना आणि इंग्रज दोघांनीही अहमद यारखान यांना साफ बनवलं. इंग्रजांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही स्वतंत्र राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी घेण्यास असमर्थ आहात. जिनांनी तर सांगितले की, आता सरळ मुकाट्याने पाकिस्तानात विलीन व्हा. त्यांनी नकार दिला तेव्हा जिनांनी दि. १८ मार्च १९४८ रोजी एका वटहुकुमाद्वारे खरान, लास बेला आणि मकरान या संस्थानांचा मुलुख त्यांच्याकडून काढून घेतला. दि, २६ मार्च १९४८ रोजी पाकी सैन्य त्यांच्या पानसी, जीवानी, तुरबत या भागात घुसलं. अहमद यारखानांचा सैन्यप्रमुख ब्रिगेडिअर जनरल पर्व्हीस (जो स्वतः इंग्रज होता) याच्यामार्फत त्यांनी लंडनकडे सैन्यसामग्रीची मागणी केली. तिथून फारच नमुनेदार उत्तर मिळालं. पाकिस्तानने संमती दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसलीही युद्धसामग्री पाठवू शकत नाही. अहमद यारखानांसमोर पाकिस्तानात विलीन होण्याखेरीज पर्यायच नव्हता, अशा तर्‍हेने कलान संस्थान म्हणजेच एका परीने संपूर्ण बलुचिस्तान पाकिस्तानात विलीन झाला. बलुचिस्तानचं स्वतंत्रपण आणि अहमद यारखानांचं राष्ट्रप्रमुखपद इंग्रज आणि जिना यांच्या लबाडीसमोर जेमतेम दोनशे-सव्वादोनशे दिवस टिकलं कसंबसं!

पुढच्या काळात पाकिस्तानमधल्या पंजाब सोडून इतर सर्व प्रांतांच्या आणि भाषकांच्या नशिबी जे आलं, तेच बलुचिस्तानच्याही नशिबी आलं. सर्व क्षेत्रांमधली सत्ता हडपून बसलेल्या पंजाबी मुसलमानांची भांडी घासणं. बंगाली मुसलमान भांडण करून स्वतंत्र झाले. होऊ शकले. कारण, पूर्व पाकिस्तानच्या विधानसभेत बंगाली भाषकांच्या ’अवामी लीग’ या पक्षाचं बहुमत होतं. त्यातून १९७१चं बांगलादेश युद्ध उद्भवलं. त्यात भारत ओढला गेला आणि अखेर बंगाली मुसलमानांचा वेगळा देश बनला. पण, इकडे सिंधी आणि बलुची मुसलमानांचं त्यांच्या-त्यांच्या राज्यात बहुमत नाही. यामुळे गेली कित्येक वर्षं तिथे फुटीर गनिमी चळवळी सुरू आहेत. त्यातही सिंध्यांपेक्षा बलुची हे अधिक लढाऊ असल्यामुळे बलुचिस्तानात सतत घातपाती कारवाया सुरूच असतात. १९४८ सालापासून हे सतत सुरूच आहे.

बलुचींचा असंतोष वाढत जायला नवं निमित्त झालं, ते ग्वादर बंदर या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं. बलुचिस्तानच्या किनारपट्टीवरचं ग्वादर हे बंदर ओमानच्या सुलतानाच्या मालकीचं होतं. पाकिस्तानने ते विकत घेऊन तिथे एक बर्‍यापैकी आधुनिक बंदर १९९३ साली उभारलं. तोवर चीनला ‘२१व्या शतकातील नाविक रेशीम मार्ग’ उभा करण्याची स्वप्नं पडू लागली. पूर्व चीन समुद्रापासून हिंदी महासागर ते अटलांटिक समुद्र मार्गावर जहाजी वाहतुकीचं एक मोठं जाळं उभं करायचं आणि त्यावर स्वतःचं वर्चस्व ठेवायचं, असं चीनचं स्वप्न होतं, आहे. त्यासाठी हिंदी महासागरातलं ग्वादर हे बंदर चीनला योग्य वाटलं. २००१ साली चीनच्या फार मोठ्या गुंतवणुकीतून ‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ उर्फ ‘सीपेक’ प्रकल्प सुरू झाला. ग्वादर बंदर एकदम अद्ययावत करण्यासाठी चीनहून पैसा आणि कुशल माणसं येऊ लागली.

अर्थातच, या प्रकल्पातला लोण्याचा गोळा इस्लामाबादमध्ये बसलेले पंजाबी राज्यकर्ते मटकावणार होते. बलुचिस्तान प्रांत आणि बलुची लोक दोघांनाही ठेंगाच दाखवला जाणार होता. त्यामुळे बलुची गनीम आता पाकिस्तानी सेना, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह चिन्यांच्याही मागे लागले आहेत. आतापर्यंत अनेक चिनी अभियंते त्यांच्या हल्ल्यांना बळी पडलेले आहेत. पाकिस्तानकडे बलुचींचं समाधान करण्याची कसलीही योजना नाही. केव्हा होती म्हणा? विरोधकांना ठार मारणं, हाच तिथल्या सत्ताधार्‍यांना सर्वोत्तम तोडगा वाटतो आणि आजचे विरोधक उद्या सत्ताधारी बनले, तर तेच करणार, अशी दरोबस्त खुनाखुनी चालू आहे.विरोधकांचं ऐकून घेणं, तोडगा काढण्याचा विचार करणं, यासाठी मुळात लोकशाही प्रक्रिया मनात मुरावी लागते. ती तशी मुरलेली नाही आणि मुरावी, असं कुणालाच वाटतही नाही.

असो. या लेखाचा मथळा हा पहिल्या महायुद्धावरच्या एका अत्यंत गाजलेल्या पुस्तकांचा आहे. १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या त्या पुस्तकाचं नाव होतं ‘गन्स ऑफ ऑगस्ट’ आणि त्याची लेखिका होती-अमेरिकन इतिहास अभ्यासक महिला बार्बारा टकमन. विशेष म्हणजे, बार्बारा ही गृहिणी होती. स्त्रीमुक्ती, पुरूष जमातीचा उच्छेद वगैरे आगखाऊ विषयांकडे न वळता घरच्या, कुटुंबाच्या, मुलांच्या जबाबदार्‍या आनंदाने पार पाडत बार्बारा टकमनने चक्क युद्धशास्त्राचा अभ्यास केला आणि वरीलप्रमाणे दर्जेदार ग्रंथ निर्माण केले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.