नव्या वर्षात मुंबई-गोवा महामार्ग होणार

मंत्री रवींद्र चव्हाणांच्या सातत्याची यशोगाथा

    25-Sep-2023   
Total Views |
Maharashtra Cabinet Minister Ravindra Chavan Interview

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण झाली असून नव्या वर्षात या महामार्गावरून सुसाट प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे हा महामार्ग अखेर पूर्णत्वास जात आहे. कोकणच्या समृद्धीचा महामार्ग अशी ओळख असलेल्या या महामार्गाचा इतिहास-वर्तमान, कोकणाची भावी वाटचाल आणि कोकणच्या प्रगतीत महामार्गाची भूमिका यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला हा संवाद!

मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्याचे आव्हान तुम्ही स्वीकारले आणि त्यावर काही अशी मात केलीत. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची एक लेन सुरू करण्याचे आश्वासन तुम्ही पूर्ण केले आहे. आज काय भावना आहेत ?

मुळात मुंबई गोवा महामार्गाच्या कामात असलेल्या अडचणी फार मोठ्या नव्हत्या असे माझे मत आहे. जेव्हा केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकर आले. तेव्हा, पहिल्यांदा कोकणवासीयांच्या मनात हा महामार्ग पूर्ण व्हावा, अशी भावना होती. मात्र, त्यावेळी राज्यात असलेले सरकार याबाबत असमर्थता दाखवत होते. कालांतराने नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक मंत्रालयाची जाबाबदारी आली आणि त्यांनी तत्काळ या प्रश्नी कारवाईला सुरुवात केली. कोकणाची भौगोलिक स्थिती कमालीची वेगळी असल्याने इथे काम करणे मोठे आव्हान होते.भूसंपादनासह सततचा पाऊस आणि या सर्व बाबींचा महामार्गाच्या बांधणीवर मोठा परिणाम होत होता. काही ठिकाणी पठार तर काही ठिकाणी सह्याद्रीच्या रांगा या भागात बांधकाम करणे हे मोठे आव्हान होते. ’समृद्धी’ महामार्गाचे काम तुलनेने सोपे होते. कारण तिथे संपूर्ण महामार्ग नव्याने बांधला जाणार होता. परंतु, कोकणाची भौगोलिक -पर्यावरणीय-राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने हा महामार्ग पूर्ण होण्यास अडचणी आल्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा दूरदृष्टी असलेले आमचे नेते देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात हे काम पूर्ण करण्यात आम्हाला यश आले. लक्षावधी चाकरमान्यांसह कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी आपल्या घरी सोयीने जाता आले याचे मनापासून समाधान आहे.

मुंबई गोवा महामार्ग इतकी वर्षे रखडला त्याची कारणे शोधण्यासाठी ऑडिट करण्याची घोषणा आपण केली होती. त्या ऑडिटची सद्यस्थिती काय आहे?

महामार्गाच्या कामात निर्माण झालेले अनेक वाद आता न्यायालयात आहेत. न्यायालयातील वादाकडे लक्ष द्यायचे की, अपूर्ण असलेले महामार्गाचे काम पूर्णत्वास न्यायाचे असे दोन पर्याय आमच्यासमोर होते. त्यात आम्ही महामार्गाच्या कामाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आणि गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची एक मार्गिका खुली करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. महामार्गाचे काम सुरू झाले. तेव्हापासून आजपर्यंत याबाबत जे काही झाले त्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ऑडिट करावे आणि योग्य निर्णय घ्यावा. आर्थिक उलाढाली-उपलब्ध करून देण्यात आलेलं कर्ज आणि याबाबींचा आढावा घ्यावा. महामार्गाच्या पूर्ततेचा नवा अध्याय सुरू करताना मागील कामांचे ऑडिट हा विषय वेगळा असावा आणि काम वेगळे असावे, असा आमचा दृष्टिकोन आहे. आम्ही पूर्णपणे रस्त्याच्या पूर्ततेसाठी प्रामाणिकपणे काम करत आहोत.

महामार्गाबाबत होणारे आरोप प्रत्यारोप, विरोधाची भूमिका घेतलेल्या मनसेला उद्देशून तुम्ही लिहिलेले पत्र आणि एक मार्गिका खुली झाल्यानंतरही होणारे राजकारण याकडे कसे पाहता?

महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी मला सर्वपक्षीयांच्या सहकार्याची आवश्यकता आहे हे मी यापूर्वीच नमूद केले होते, तसे आवाहनही मी सर्वांना केले होते. राजकीय इच्छाशक्तीशिवाय, सर्वपक्षीयांच्या सहभागाशिवाय हे काम होऊ शकत नाही. प्रत्येक पाहणी दौर्‍यात मी सर्वांना सामावून घेत लहान मोठ्या सर्वच अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. कंत्राटदारांकडे असलेली संसाधने- देशात उपलब्ध असलेली प्रगत तंत्रज्ञनाचा वापर करून हे काम करण्यास आम्ही सुरुवात केली. प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर राजकीय आंदोलन सुरू झाले आणि काही कार्यालयांची तोडफोड झाली. त्यावेळी आम्ही सामंजस्याची भूमिका घेत लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नये, अशी माझी भूमिका नव्हती आणि आजही नाही. त्यांच्या आरोपांमागील कारण काय हे त्यांनाच माहीत असेल. आमचे लक्ष केवळ महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे हे आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असून तो पूर्ण झाला पाहिजे, अशी माझी भावना आहे, माझी ती जबाबदारी आहे. मी कोकणचा रहिवासी आहे, त्यामुळे या प्रकल्पाकडे लक्ष द्यावे हे काम पूर्ण करावे हे माझे उद्दिष्ट आहे आणि कोकणवासीयांना समाधान मिळेल ही माझी निरपेक्ष भावना आहे.

पर्यावरण, औद्योगिकीकरण आणि अशा अनेक संकटांपेक्षा कोकणासमोर सर्वांत भीषण संकट रोजगाराचं आहे. तुम्हाला त्याबाबत काय वाटतं ? या महामार्गामुळे रोजगारासह कृषी - कृषी आधारित इतर उद्योग आणि पर्यटन यावर कसा फरक पडेल?

हा महामार्ग झाल्यामुळे मुंबई आणि कोकणाचे अंतर कमी होईल, जेणेकरून निसर्ग संपन्न कोकणच्या पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. महामार्गासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याने कोकणच्या सर्वांगीण विकासाला मोठा हातभार लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करताना कोकणातील युवकांचे होणारे स्थलांतरण रोखणे हे आमच्यासमोर असलेले मोठे आव्हान आहे. त्यास्तव काही प्रकल्पांची उभारणी होणे, नाणार-बारसू हे प्रकल्प कोकणात उभे करण्यामागे आमच्या सरकारचे हेच धोरण होते. औद्योगिक वाढीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून त्या अधिक व्यापकतेने निर्माण व्हाव्यात, यासाठी महामार्गासारखे पायाभूत प्रकल्प मोलाची भूमिका बजावू शकतात. आता व्यापकतेने विचार करण्याची आवश्यक निर्माण झाली असून कृषी संबंधित उत्पादनांचा वापर व्यवसायासाठी अधिक उपयुक्ततेने कसा करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मसाला उत्पादने हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जर पितांबरीचा उद्योग कोकणात जाऊन मोठा होऊ शकतो, तर इतर बाबींना काय अडचण आहे. त्यामुळे आपल्या गावाची ओळख एका वेगळ्या उत्पादनामुळे व्हावी यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, जेणेकरून कोकणाचा विकास होण्यास हातभार लागेल.

एका बाजूला मुंबई - नवी मुंबईसारखी दोन मोठी महानगरे आणि दुसर्‍या बाजूला गोव्यासह कर्नाटक असे मोठे प्रगत प्रदेश कोकणाला लागून असतानाही कोकण स्थानिक माणसाला रोजगार देण्याच्या बाबतीत मागे का पडला ? याबाबत तुमचं आकलन काय आहे?

आपल्या रोजगाराची संधी आपणच आपल्याच गावात निर्माण करू शकतो ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे. आपण आत्मनिर्भर होऊ शकतो हा आत्मविश्वास कोकणवासीयांच्या मनात निर्माण होणे सर्वप्रथम आवश्यक आहे. तुटपुंज्या पगारावर काम करण्यासाठी इथला स्थानिक युवक परराज्यात किंवा परजिल्ह्यात जाताना दिसतो. परंपरागत व्यवसाय आणि कामांवर अवलंबून न राहता नवनवीन पर्याय शोधणे, त्यावर काम करणे ही आजची गरज आहे. आंबा, काजू यासारख्या उत्पादनांवर कायमस्वरूपी अवलंबून न राहता वार्षिक उत्पन्नासाठी काय करता येईल? लगतच्या मोठ्या शहरांना आपण काय पुरवू शकतो याचा विचार करून काम करण्याची आज गरज आहे.

येत्या पाच वर्षांत १५ वर्षांत कोकणात अशा कोणत्या गोष्टी आकाराला येतील आणि कोकणात नवीन काय घडेल असा तुमचा अंदाज आहे?

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा गाडा व्यवस्थितपणे मार्गाला लागल्याने आता उर्वरित काम पूर्ण होण्यास काहीही अडचण येणार नाही. गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका खुली करण्याचे आश्वासन मी सरकारच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो आहे. डिसेंबर महिन्यात या मार्गातील दुसरी मार्गिका पूर्ण होईल, त्यातील काही पुलांच्या कामांचा अपवाद वगळता दुसरा टप्पादेखील निश्चितपणे पूर्ण होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दूरदृष्टीने काम करणारे आमचे नेते देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही कोकणच्या समृद्धतेसाठी जे आवश्यक आहे ते करण्यासाठी कटिबद्ध आहोत. नाणार-बारसूसारखे प्रकल्प फडणवीसांच्या काळात आणण्याचा प्रयत्न झाला, त्यात अनेक अडचणी आल्या अन पुढे त्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच. कोकणात पर्यटन वाढीसाठी शक्तीपीठ महामार्गासह ‘कोस्टल रोड’ची बांधणी करणे, ७२० किमीच्या समृद्ध समुद्र किनार्‍याचा पुरेपूर वापर करणे, पायाभूत सुविधा उभारणी करणे, महाविद्यालयांसारख्या संस्थांची निर्मिती करणे असे विविध प्रयत्न आम्ही कोकणसाठी करत आहोत. या सर्व गोष्टी उपलब्ध करून विकासाच्या बाबतीत पिछाडीवर राहिलेल्या कोकणाची वाटचाल आता संपन्नतेच्या दिशेने होत आहे. दि. ४ डिसेंबर रोजी नौदलाच्या सहकार्यातून कोकणात नौदल दिवस साजरा केला जात असून त्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमालाही निश्चितच मोठा परिणाम कोकणावर होईल, असा मला विश्वास आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.