अश्वविद्या, अक्षविद्या, जुगार वगैरे

Total Views |
Article On UK King Henry VIII Started English Derby

माणसाने आता अश्वविद्या आणि अक्षविद्या यांचा मिलाफ घडवून जुगाराचा एक नवा प्रकार जन्माला घातला आहे. साजुक भाषेत त्याला म्हणतात ‘अश्वशर्यती’ तर सामान्य माणसांच्या रोखठोक भाषेत म्हणतात - ‘घोडा लावणे’.
 
आपल्या पूर्वजांनी इतक्या असंख्य विद्या आत्मसातकरून त्यांच्यात प्रावीण्य मिळवलं होतं की त्यांचे नुसते उल्लेख वाचूनही थक्क व्हायला होतं. रामायणात राम-लक्ष्मणांना आपल्या आश्रमाकडे घेऊन निघालेले विश्वामित्र ऋषी यांना बला आणि अतिबला नावाच्या विद्या शिकवतात. या विद्यांच्या प्रभावाने राम-लक्ष्मणांची शरीरं प्रतिकूल हवामान आणि कीटकांचे दंश यांच्या भयापासून मुक्त होतात. लक्षात येतय का तुमच्या? त्रिकालदर्शी विश्वामित्र ऋषी जणू राम-लक्ष्मणांची पुढील काळातल्या दंडकारण्य निवासाची तयारीच करून घेतायत. बला आणि अतिबला विद्यांमुळे राम-लक्ष्मणांना प्रतिकूल हवामानामुळे ताप येणं, सर्दी-खोकला होणं आणि विषारी कीटक दंशांमुळे शरीराला कसलाही छोटा-मोठा अपाय होणं यापासून ’इम्युनिटी’ मिळाली.
 
ज्यांना आगामी काळात १४ वर्षे घनघोर दंडकारण्यात काढायची आहेत, यांच्यासाठी हे एक प्रकारचं ’कमांडो’ प्रशिक्षणच होतं. १९३९ ते १९४५ च्या दुसर्‍या महायुद्ध काळात जपानी सेना ईशान्य भारतावर आक्रमण करणार असा रंग दिसू लागला. तेव्हा इंग्रज सरकारने जिम कॉर्बेट या प्रख्यात शिकार्‍याला पाचारण केलं. कॉर्बेटने इंग्रजांच्या भारतीय सैन्याला जंगल युद्धतंत्र शिकवलं. यात जंगल प्रदेशातील हवामानात स्वतःची प्रकृती नीट राखणं, विविध वृक्षांची पानं, फळं, कंद, मुळं ही अन्न म्हणून वापरणं, नाग, साप, घोरपडी, सायाळी, मुंगुसं इत्यादी प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करणं, ते गरज पडल्यास त्यांचं मांस खाणं इत्यादी असंख्य प्रकार होते. बला आणि अतिबला या विद्यांमध्ये हे सर्वच येत असेल का? माहीत नाही, संशोधनास प्रचंड वाव आहे.

रामायणातच आणखी एक कुतूहलजनक उल्लेख आहे. जाबुवंत, अंगद, हनुमंत इत्यादी वानर समुद्राच्या तीरावर येऊन ठेपतात. जवळच एका पर्वत शिखरावर संपाती हा गरुड पक्षी बसलेला असतो. हे वानर सीताशोधार्थ निघाले आहेत, असं समजल्यावर संपाती त्यांना म्हणतो, ‘’मला चक्षुस्मृती विद्या अवगत आहे. त्यामुळे मला कितीही दूर अंतरावरचं दृष्य दिसू शकतं. हा समुद्र १०० योजनं पसरलेला आहे. त्याच्या पलीकडे लंका नगरी आहे आणि तिच्यात एका वनात राक्षसींच्या वेढ्यात बसलेली सीता मला येथून दिसत आहे.” काय बरं असेल ही चक्षुस्मृती विद्या? अति लांब पल्ल्याची दुर्बीण? अयोध्येत बाबरी ढांचा उद्ध्वस्त होत असताना भारतीय लष्करी अधिकार्‍यांनी किमान पाच किमी दूरवरच्या एका मचाणावरून हायटेक टेलिस्कोपिक कॅमेर्‍याने त्या घटनेचं चित्रण केलं होतं, असं म्हणतात.

महाभारतात युधिष्ठिर आणि यक्ष यांचा संवाद फारच प्रसिद्ध आहे. यक्षाला न जुमानता, त्याच्या प्रश्नांना उत्तर न देता भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे भाऊ एका तळ्याचं पाणी प्यायला जातात आणि मरून पडतात. धर्मराज युधिष्ठिर मात्र ’यक्षप्रश्नांना’ समर्पक उत्तरं देतो. प्रसन्न झालेला यक्ष चारही पांडवांना जीवंत तर करतोच, पण धर्मराजाला ’प्रतिस्मृति’ नावाची विद्या देतो. या विद्येच्या प्रभावाने धर्मराज कोणत्याही क्षेत्रातलं संपूर्ण ज्ञान अल्पावधीत आत्मसात करू शकतो. आपण संगणकाच्या हार्डडिस्कवरून पेनड्राईव्हवर किंवा उलट असा डेटा ट्रान्सफर करू लागलो की, पूर्वी पडद्यावर एक चित्र यायचं - डेटा फाईल्स एका ठिकाणावरून उडून जात दुसर्‍या ठिकाणी संग्रहित होत आहेत. तसंच असेल का प्रतिस्मृति विद्येचं? म्हणाल ते ज्ञान अपलोड करत जा. अल्पावधीत आलं ते तुमच्या संगणकात.

महाभारतातच नल-दमयंती कथा आहे नि तिच्यात अश्वविद्या आणि अक्षविद्या यांचे उल्लेख आहेत. निषध देशाचा राजा नल याचा भाऊ पुष्कर हा द्युतामध्ये त्याचा पराभव करून त्याला पत्नी दमयंतीसह हद्दपार करतो. भुकेने व्याकूळ झालेला नल दमयंतीचाही त्याग करतो. ती आपल्या माहेरी म्हणजे विदर्भ देशात कुंडिनपूर येथे जाते. जंगलात फिरणार्‍या राजा नलाला कर्कोटक नावाचा नाग दंश करतो. यामुळे याचा देह काळाठिक्कर पडतो.

नंतर राजा नल अयोध्येचा राजा ऋतूपर्ण याच्या अश्वशाळेला प्रमुख बनतो. इकडे दमयंतीचा पिता विदर्भराज भीम ऋतुपर्ण राजाला निरोप पाठवतो की, दमयंतीचं पुन्हा स्वयंवर ठरवलं असून त्यासाठी तुम्ही उद्याच यावे. आता उत्तर भारतातल्या अयोध्येहून दक्षिण भारतातल्या विदर्भ देशातल्या कुंडिनपुरात (आजचं वर्ध्या नजीकच्या आर्वी जवळचं कुंडलपूर) एका दिवसात कसं पोहोचणार? पण, अश्वशाळाप्रमुख बाहुक (म्हणजेच नल) हे आव्हान स्वीकारतो. अत्यंत वेगवान असे घोडे रथाला जोडून, स्वतः सारथ्य करीत तो ऋतुपर्णाला एका दिवसात कुंडिनपुरात पोहोचवतो. तिथे सगळा उलगडा होतो. नल-दमयंती पुन्हा एकत्र येतात. तेव्हा राजा ऋतुपर्ण नलाला म्हणतो, ‘’तू मला अश्वविद्या (म्हणजे घोड्यांबद्दल सर्व काही) शिकव. मी तुला अक्षविद्या शिकवतो.” अक्ष म्हणजे फासे. मग अक्षविद्येत निपुणता मिळवलेला नल निषध देशाला (आजचं मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर जवळचं नरवर हे स्थान) येऊन पुष्कराला द्युताचं आव्हान देतो, हरवतो आणि आपलं राज्य परत मिळवतो.
 
आता धर्मराजाला या दोन्ही विद्या माहीत असल्याच पाहिजेत. कारण, चौथा पांडव नकुल हा अश्वविद्येत अत्यंत निपुण होता आणि गांधारराज शकुनी मामाच्या अक्षविद्येने, जुगाराच्या फाशांनीच तर धर्मराजाला वनवासी करून सोडलं होतं. त्या वनवास काळातच बृहदश्व नावाच्या ऋषींनी ही नल-दमयंतीची प्राचीन कथा धर्मराजाला ऐकवली. जुगाराच्या फाशांनी धर्मराजाला वनवासाच्या दुःखात लोटलं, पण हे दुःख किरकोळ वाटावं, इतक्या भयंकर संकटात नल-दमयंती कसे सापडले, हे धर्मराजाला समजावं म्हणून ऋषींनी ही कथा सांगितलेली आहे.

पण, या झाल्या त्रेता आणि द्वापार युगातल्या गोष्टी. सध्याच्या कलियुगातला मानव हा भलताच हुशार झालेला आहे. शकुनि मामा काहीच नव्हे, असे नव्हे असे नवीनवे जुगार प्रकार त्याने शोधून काढलेले आहेत. गरिबांची ’तीन पत्ती’ मध्यमवर्गीयांची ’रमी’ ते अति श्रीमंतांचा ’कॅसिनो’पर्यंत असंख्य जुगार प्रकार त्याच्या प्रतिभेने प्रसवले आहेत. अमेरिकेतली ’लास वेगास ’ ही नगरी तर ‘जागतिक जुगार नगरी’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. माणसाने आता अश्वविद्या आणि अक्षविद्या यांचा मिलाफ घडवून जुगाराचा एक नवा प्रकार जन्माला घातला आहे. साजुक भाषेत त्याला म्हणतात ’अश्वशर्यती’ तर सामान्य माणसांच्या रोखठोक भाषेत म्हणतात - ’घोडा लावणे’.

आधुनिक युगात अश्वशर्यत म्हणजे केवळ दोन चपळ घोड्यांची न राहता, या घोड्यांवर पैज लावून या क्रीडाप्रकारला जुगार बनवणं, हा उद्योग, म्हणजे पुन्हा ’घोड्यांना धंद्याला लावणे’ हे कुणी सुरू केलं? तर आपल्या स्वनामधन्य इंग्रजांनी. सेंट बीड किंवा ज्याचा उल्लेख नेहमी ’व्हेेनरेबल बीड’ - ‘आदरणीय बीड’ अशा शब्दांत केला जातो, तो बीड इसवी सनाच्या आठव्या शतकातल्या एक विद्वान इंग्रज पाद्री होता. तो म्हणतो की, इसवी सन ६२१ पासून इंग्रजांनी घोड्यांचा जुगार खेळायला सुरुवात केली. मात्र, अश्वशर्यतींचे पद्धतशीर उल्लेख मिळतात ते आठवा हेन्री याच्यापासून.

आठवा हेन्री हा इंग्लंडचा एक ख्यातनाम राजा. सन १५०९ ते१५४७ हा त्याचा राज्यकाल. तो शूरही होता नि क्रूरही होता. एका बायकोचा कंटाळा आला की तिला ठार मारायचं नि दुसरी बायको करायची, असं तो लीलया करीत असे. अशा त्याच्या एकूण सहा बायका झाल्या. असो. तर शर्यतीसाठी वेगवेगळे जातीवंत घोडे आणणं, नव्या घोड्यांची पैदास करणं, जोपासना करणं वगैरे उद्योगांसाठी त्याने खास माणसे नेमली. अश्वशर्यतींच्या जगात ’इंग्लिश डर्बी’ ही फारच प्रख्यात टूर्नामेंट आहे. ती सन १५१९ साली हेन्रीने सुरू केली. गेली ५०० वर्षं ही शर्यत दरवर्षीच्या मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात असतेच असते.
 
नंतर सन १६०५ साली जेम्स पहिला या राजाने अश्वशर्यती आणि एकंदरीत अश्वविद्या या विषयासाठी न्यूमार्केट हे नवीन गावच वसवलं. इसवी सन १६६० साली चार्ल्स दुसरा हा राजा झाला. हा आपल्या शिवरायांच्या समकालीन होय. यालाच पोर्तुगीजांनी आपली राजकन्या दिली नि बरोबर आंदण म्हणून ब्राझील आणि मुंबई बेट दिलं. हा अत्यंत आळशी, ऐदी, लंपट आणि अट्टल जुगारी होता. त्याच्या राज्यात न्यूमार्केटमधल्या अश्वशर्यतींना भलतीच प्रसिद्धी मिळाली. आजही न्यूमार्केट हे केंब्रिज विद्यापीठाजवळचं ठिकाण ही ब्रिटनमधल्या अश्वशर्यत जुगाराची मुख्य नगरी आहे.

आता क्रिकेट, हॉकी, गोल्फ हे खेळ जसे इंग्रजांमुळे भारतात आले, तसाच घोड्यांची शर्यत आणि त्यावरचा जुगार हे ही इंग्रजांमुळे भारतात आले. डामारला वेंकटपती नायक या एका छोट्या राजाने एगमोर आणि कौम या नद्यांच्या मुखाजवळचा मद्रासपटनम् या मच्छीमार खेड्याचा भूप्रदेश इंग्रजांना फुकट देऊन टाकला. ही गोष्ट १६३९-४० सालची. इंग्रजांनी तिथे चांगला मजबूत किल्ला उभारला. हळूहळू याच्या भोवती शहर उभं राहील. तेच मद्रास म्हणजे आजचं चेन्नई. इथेच भारतातलं पहिल्यां अश्वशर्यत मैदान किंवा रेसकोर्स सन १७७७ साली सुरू झालं. यानंतर सन १८०० साली मुंबईत आणि सन १८४७ साली कोलकात्याला रेसकोर्स मैदानं सुरू झाली. नंतर बंगळुरु, म्हैसूर, उटी, पुणे, हैदराबाद, दिल्ली अशा अनेक शहरांमध्ये रेसकोर्स किंवा टर्फ क्लब उभे राहिले. अनेक संस्थानिक, अतिश्रीमंत व्यापारी यांनी आपापले स्वतःचे तबेले उभे करून जातीवंत घोड्यांची पैदास केली.

आज घोड्यांच्या जुगाराची वर्षाची उलाढाल साधारण २०० कोटी रुपयांची आहे. कोणत्याही जुगारात नेहमीच बर्बाद होणार्‍यांची संख्या जास्त असते, तशीच ती इथेही आहे. क्षणार्धात रावाचे रंक होणारे इथे कोट्यवधी आहेत. क्षणार्धात रंकाचे राव होणारे फारच कमी. त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे राजेंद्र कृष्ण दुग्गल. १०० हून अधिक हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद आणि गाणी लिहिणारा प्रतिभावंत गीतकार राजेंद्र कृष्ण हा घोड्यांच्या जुगाराचा भयंकर शौकीन होता. १९७२-७३ च्या सुमारास एका शर्यतीत त्याला तब्बल ४६ लाख रुपयांचा घसघशीत जॅकपॉट लागला होता. साहित्य आणि कविता या शब्दविद्येबरोबरच अश्वविद्या आणि अक्षविद्येचा मिलाफ असलेली अश्वशर्यत जुगार विद्या त्याला प्राप्त झाली होती, असं म्हटलं पाहिजे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.