भोपाळ : भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी इंडी आघाडी एकत्र आली आहे. मात्र, पहिल्या तीन बैठकांमध्ये इंडि आघाडीतील सहकार्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. केवळ मोदी विरोधासाठी तयार झालेल्या इंडी आघाडीची पहिलीवहिली सभादेखील रद्द करण्यात आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही सभा होणार होती. रविवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ यांनी ही सभा रद्द झाल्याचे प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत भोपाळमध्ये आघाडीची पहिली सभा घेण्याचा निर्णय झाला होता. दिल्लीतील बैठकीनंतर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली होती. ऑक्टोबरमध्ये भोपाळ येथे इंडी आघाडीची पहिली सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता ती रद्द करण्यात आल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. या मेळाव्याची तयारी करण्यास आणि लोकांची गर्दी जमवण्यास प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने केंद्रीय नेतृत्वाकडे असमर्थता दर्शवल्याची चर्चा आहे.