मुंबई : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या 'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. धर्मवीर चित्रपटाच्या यशानंतर आता धर्मवीर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेत निर्माते मंगेश देसाई यांनी केली आहे.
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या यशानंतर 'धर्मवीर २' येणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर ही चर्चा सत्यात उतरी आहे. साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे मंगेश देसाई या चित्रपटाची निर्मिती करत असून प्रवीण तरडेच धर्मवीर २ चित्रपटाच्या दिग्दर्शन व लेखनाची धुरा सांभाळणार आहेत.
धर्मवीर २ चित्रपटाच्या पोस्टरवर ‘धर्मवीर २’ "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..." अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. चित्रपटात कलाकार कोण असणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.