‘चांद्रयान’ ते ‘मिशन समुद्रयान’

    07-Aug-2023
Total Views |
Editorial On Samudrayaan Mission India's second ocean mission

भारताला लाभलेली विस्तीर्ण किनारपट्टी, तसेच तीन दिशांना असलेले तीन महासागर ‘मिशन समुद्रयान’ राबवण्यास प्रवृत्त करणारे ठरले, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. ‘ऑपरेशन ब्ल्यू’च्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर आता याचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला असून, ‘मत्स्य ६०००’ ही पाणबुडी सहा हजार मीटर खोलवर तिघांना आपल्यासोबत घेऊन प्रवास करेल.

भारताला एकूण ७ हजार, ५१६.६ किमी लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली असून, ती जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी किनारपट्टी आहे. मुख्य भूभागाची किनारपट्टी जी ५ हजार, ४२२ किलोमीटर, अंदमान आणि निकोबार बेटांची किनारपट्टी १ हजार, ६८० किलोमीटर, तर लक्षद्वीप बेटांची किनारपट्टी ४१६.६ किलोमीटर इतकी आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर, तर दक्षिणेला हिंदी महासागर. खारफुटीची जंगले, प्रवाळयुक्त खडक तसेच वालुकामय किनारे यांनी ती समृद्ध आहे. डॉल्फिन, व्हेल आणि समुद्री कासवांसह विविध प्रकारचे वन्यजीव सुखनैव या किनारपट्टीवर राहत आहेत. मासेमारी, वाहतूक तसेच पर्यटनासाठी किनारपट्टीचा होणारा वापर देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची हातभार लावत असतो. समुद्रकिनारे हे पर्यटकांसाठी नेहमीच पहिल्या क्रमांकाची आवड असते.

भारताच्या सभोवतालचे असलेले तीन महासागर म्हणूनच संशोधकांना साद घालणारे ठरले आहेत. या महासागरांच्या तळाशी नेमके काय काय लपले आहे, याचा शोध घेण्यासाठी २०१९ मध्ये ‘ऑपरेशन ब्ल्यू’ ही मोहीम आयोजित करण्यात आली. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी’ने (एनआयओटी) ही मोहीम यशस्वीपणे राबवली. त्यात पाण्याखालील नियंत्रित पद्धतीने वापरल्या जाणार्‍या वाहनाचा ‘सागर’चा वापर केला गेला. खोल समुद्रातील खाणकामाची क्षमता शोधणे, हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश होता. खोल समुद्रात सहा किमी अंतरापर्यंत समुद्रतळातील गाळ तसेच खडकांचे नमुने गोळा करण्यात आले. त्यांचे खनिज सामग्री तसेच संभाव्य आर्थिक मूल्य करण्यासाठी विश्लेषणही केले गेले. हे वाहन खूप खोलवर जाण्यास तसेच उच्च गुणवत्तेची माहिती गोळा करण्यास सक्षम होते. त्याच माहितीचा वापर करून, अशा वाहनाची गुणवत्ता सुधारणे. तसेच, खाणकामासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, यासाठी केला गेला जात आहे.

‘ऑपरेशन ब्ल्यू’ची यशस्वी पूर्तता हा भारताच्या या क्षेत्रातील क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वाची ठरली. खोल समुद्रातील शोध तसेच खाण उपक्रमांसाठीचा मार्ग त्याने मोकळा करून दिला आहे. भारताच्या वैज्ञानिक तसेच तांत्रिक क्षमतांना चालना देणारी ही मोहीम हिंद महासागराबद्दल नवनवीन माहिती देणारी ठरली. तसेच, खोल समुद्रातील खाणकामातून देशाला नव्या आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ती उपयुक्त आहे. समुद्रातील खाणकामाच्या आर्थिक क्रियाकलापांमध्ये अब्जावधी डॉलर दडलेले आहेत. भारत स्वतःचा खाण उद्योग विकसित करून देशाला चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतो. महासागराच्या पोटात दडलेली रहस्ये उलगडण्यासाठी देशातील संशोधकांना या मोहिमेचा फायदा होईल. महासागर तसेच त्यांच्या संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संधी त्याने उपलब्ध करून दिल्या आहेत.

हे तंत्रज्ञान वैद्यकीय तसेच रोबोटिक्स यांसारख्या अन्य क्षेत्रात वापरले जाईल. यापूर्वी अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स, चीन या देशांकडेच यासाठीचे तंत्रज्ञान आहे. आकाशाला यशस्वी गवसणी घातल्यानंतर भारताने समुद्रात संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यातील यशानंतर आता नियंत्रित वाहनाच्या ऐवजी (सागर) ‘मत्स्य ६०००’ ही पाणबुडी निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. ‘मत्स्य ६०००’ हा ‘ऑपरेशन ब्ल्यू’ची पुढील पायरी आहे. ही पाणबुडी ‘एनआयओटी’द्वारे विकसित केली जात असून, ती सहा हजार मीटर खोल अंतरापर्यंत काम करू शकेल, अशी तिची रचना केली जात आहे. हिंद महासागरातील पुढील समुद्री मोहिमांसाठी तिचा वापर केला जाईल. ‘सागर’ला असलेल्या मर्यादा या पाणबुडीला असणार नाहीत. हा प्रकल्प २०२६ मध्ये पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. यात तीन कर्मचारी पाण्याखाली काम करू शकतील. ही संपूर्ण मोहीम ‘समुद्रयान’ या नावाने ओळखली जात आहे. तसेच, ती पाण्यात आपत्कालीन परिस्थितीत ९६ तास काम करेल. सागरी अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. त्याचाच हा भाग मानला जातो.
 
‘समुद्रयाना’ची किंमत ४ हजार, ७७ कोटी रुपये असून, प्रस्तावित खर्च २ हजार, ८३४ कोटी रुपये इतका आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्याअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. खोल समुद्रातील खनन तसेच पाणबुडीसाठीचे तंत्रज्ञान विकसित करणे, जैवविविधतेच्या शोध आणि संवर्धनासाठी नवीन तांत्रिक राबवणे, सर्वेक्षण आणि संशोधन, जैवविज्ञानासाठी आधुनिक स्थानक उभे करणे आदी हेतू यामागे आहेत. खोलवर समुद्रात खनन करण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे, ते व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध नाही. म्हणूनच देशांतर्गत संस्था तसेच खासगी उद्योगांच्या सहकार्याने ते विकसित केले जात आहे. खनिजे, जैवविविधता, ऊर्जा, गोड्या पाण्याचे साठे आदी शक्यतांचा शोध या मोहिमेच्या वेळी घेतला जाणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हिंद महासागर खोर्‍यात ७५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात तांबे, निकेल, कोबाल्ट, मॅगनीजचा समावेश असलेले ३८० दशलक्ष मेट्रिक टन साठे उपलब्ध आहेत. त्यांचे मूल्य सुमारे ११० अब्ज डॉलर इतके आहे. चेन्नईजवळच्या किनार्‍यावर ‘समुद्रयाना’च्या मूलभूत आवृत्तीची चाचणीही घेण्यात आली. यासाठी ५०० मीटर खोल अंतरावर प्रतिकृतीला पाठवण्यात आले. ‘इस्रो’ सारखी संस्थाही यात आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करत आहे.
 
‘मत्स्य ६०००’ हे नाव संस्कृत शब्द ‘मत्स्य’वरून घेण्यात आले आहे. हिंदू धर्मातील समुद्र आणि महासागरांशी संबंधित परंपरांचे ते प्रतिबिंब मानले जाते. २.१ मीटर व्यास आणि ८० मिमी जाडी, सहा हजार मीटर खोलवर समुद्रात जाण्याची क्षमता, तीन प्रवासी, ९६ तास पाण्यात राहण्याची सुविधा ही याची काही वैशिष्ट्ये. भारताला सागरी संशोधनात आघाडीवर राहण्यासाठी हा प्रकल्प कळीची भूमिका बजावणारा ठरेल. समुद्रातील पर्यावरण, जैवविविधता यांचाही अभ्यास, हे ‘समुद्रयान’ करणार आहे. सर्वच क्षेत्रात भारत प्रगतीचे नवनवे मापदंड प्रस्थापित करत आहे. कमीतकमी खर्चात पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान उतरवणारा देश म्हणून जगात भारताने आपला लौकिक यापूर्वीच स्थापन केला आहे. आता समुद्राच्या अंतरंगाचा शोध घेण्यासाठी भारत सरकारने आखलेली ‘समुद्रयान मोहीम’ भारतासाठी कोणते नवे रत्न बाहेर आणते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.