ठाकरेंची केविलवाणी फरफट!

    30-Aug-2023   
Total Views |
Uddhav Thackeray's condition in India alliance

आजपासून मुंबईत होणार्‍या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला मोठे महत्त्व प्राप्त करून देण्याचा ठाकरे गट आणि मंडळींचा खटाटोप दिसून येतो. या प्रयत्नांमधून विरोधी आघाडी किती मजबूत आणि शक्तिशाली असून, २०२४ लोकसभेत भाजपला टक्कर देण्यासाठी सक्षम असल्याचे भासवण्याचा हा प्रयत्न. भाजप आणि भाजपच्या कथित देशविरोधी भूमिकेला विरोध करणारे सर्वच पक्ष आता एकवटत असल्याचा दावा करणार्‍या मंडळींना बैठकीपूर्वी दोन धक्के बसले. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी ‘इंडिया’ आघाडीसोबत न जाण्याचे जाहीर करत उत्तर प्रदेशात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे मुंबईतील बैठकीला न बोलावल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरदेखील या आघाडीपासून दूर-दूर आहेत. यामुळे जर आंबेडकर खरोखरच नाराज झाले, तर त्याचा ठाकरेंना नक्कीच मोठा फटका बसू शकतो. वंचित या बैठकीसाठी का नाही, असा प्रश्न विचारल्यावर ठाकरेंनी उत्तर दिले की, “आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेसमुळे आम्ही या बैठकीला अनुपस्थित असून, आम्ही त्यांच्याशी सोबत येण्याबाबत वारंवार चर्चा केली,” असे आंबेडकरांनी म्हटले. पण, काँग्रेसचा प्रतिसाद नसल्याने आम्ही आघाडीत नाहीत, असे त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवले. काँग्रेस असो किंवा इतर पक्ष ‘वंचित’ला सोबत न घेतल्याने त्यांना एकतर नुकसान होणार नाही आणि जर झालेच तर ते नुकसान झेलण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेस आंबेडकरांना जवळ करत नाही. या सगळ्यात फरफट होते ती ठाकरेंची. ठाकरेंकडे बैठकीचे संयोजकपद दिले खरं; पण कुण्या एका नव्या जोडीदाराला बैठकीसाठी बोलावण्याची ताकदही ठाकरेंकडे नाही. उद्धव हे सुरुवातीपासून ‘वंचित’ला सोबत घेण्यासाठी आग्रही असले, तरी त्याला काँग्रेस आणि पवारांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे आंबेडकर प्रत्यक्षात आघाडीपासून कित्येक मैल दूर आहेत. ठाकरेंकडे या बैठकीचे संयोजकपद दिले असले, तरी त्यांची झालेली बिकट अवस्था, पक्षप्रमुखपदावरून गटप्रमुखपदावर झालेली अधोगती आणि राजकीय वातावरणात ठाकरेंवर ओढवलेली नामुष्की यामुळे कधी काँग्रेस तर कधी वंचित, अशी ठाकरेंची केविलवाणी फरफट सुरूच आहे!


राऊतांची अनाठायी बडबड


‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचे यजनमानपद मिळाल्यापासून उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत भलतेच उत्साहात आहेत. मुंबईत होणार्‍या बैठकीनंतर जणूकाही उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याच्या आविर्भावात राऊत दिसत असून, या अतिउत्साहात ते काही बाही बरळू लागलेत, हे विसरून चालणार नाही. मुळातच राऊतांना बरळण्यासाठी आणि स्फोटक विधाने करण्यासाठी कुठलेही निमित्त लागत नाहीच. माध्यमांचा बूम समोर दिसला की, त्यांचा बाब्या होतो आणि ‘बाबा लगीन’ सारखं मोदी विरोधाची एकच टेप लावत ते बरळू लागतात. नुकतंच राऊतांनी राममंदिराच्या संदर्भात एक विधान करून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला हात घातला. राम मंदिराच्या उद्घाटनाच्यावेळी रेल्वेवर हल्ला होऊ शकतो, दगडफेक होऊ शकते, हिंसा होऊ शकते, अशा आशयाची विधाने कुठलाही आधार न देता राऊतांनी केली. त्यांच्या या विधानांतून त्यांना भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो, हे सांगायचं होतं. पण, झालं उलटंच. ‘इंडिया’ आघाडीची बैठक काही तासांवर येऊन ठेपलेली असताना, अशी विधाने करून राऊतांना कुठला अजेंडा पुढे रेटायचा आहे, हे न समजण्याइतकी आता जनताही दुतखुळी नाही. राऊत भाजपला हिंसाचारी आणि हिंसेला प्रोत्साहन देणारा पक्ष म्हणत आहेत; पण राऊतांच्या गटाचे प्रमुख मुख्यमंत्री असताना राज्यात काय घडलं, यावर नजर टाकणंही आवश्यक.‘कोविड’ काळात हिंदू साधूंची पालघरमध्ये ठेचून झालेली निर्घृण हत्या, वारकर्‍यांना झालेली अटक, बंडातात्या कराडकर यांच्या सारख्या ज्येष्ठ महंताला डांबून ठेवणे यांसारखे प्रकार ठाकरेंच्या काळात झाले आणि त्यातून राज्याचे वातावरण किती गढूळ झाले होते, हे राऊत कदाचित विसरले असावेत. हिंसेची परिसीमा राज्याने तेव्हा गाठली, जेव्हा जगविख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठाकरेंच्या सरकारमधील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी स्फोटके ठेवतो आणि ठाकरे त्याचे त्याचे छातीठोकपणे समर्थनही करतात. अनेक राजकीय घडामोडीनंतर आता महाराष्ट्रात स्थैर्य आणि शांतता नांदायला सुरुवात झाली आहे. अशातच राऊतांसारख्या संसद सदस्याने अशी बेजबाबदार आणि खुशमस्करी करण्यासाठीची विधाने करणे हे सर्वस्वी लाजिरवाणेच!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.