डेंग्यू लसनिर्मितीसाठी भारत सज्ज

    30-Aug-2023
Total Views |
Dengue vaccine

‘कोविड’ महामारीच्या काळात भारताने ‘कोविड’ प्रतिबंधक लसनिर्मिती करून जागतिक आरोग्य क्षेत्रात मोठा मानदंड प्रस्थापित केला. आता देशांतर्गतच डेंग्यू प्रतिबंधक लसनिर्मिती सुरू असून २०२६ पर्यंत ती लस बाजारात आणण्याचा हैदराबाद स्थित ‘आयआयएल’ या लस उत्पादन कंपनीचा मानस आहे. तेव्हा डेंग्यूवरील लस निर्मितीची ही वाटचाल भारतीयांचे जीवनमान आमूलाग्र बदलणार आहे. त्याचे हे आकलन...
 
'डेग्यू’ किंवा ‘डेंगी’ हा शब्द स्वाहिली भाषेतल्या ’का-डिंगा-पेपो’ या शब्दावरून तयार झाला. याचा अर्थ होतो-पिळवटून टाकणारे दुखणे. डेंग्यूला ‘बोनब्रेक फिवर’ अर्थात हाडे मोडून काढणारा ताप, असेही म्हटले जाते. या तापामुळे रुग्णांची हाडे आणि स्नायूत प्रचंड वेदना होतात. डेंग्यूचे निदान ‘एनएस१’, ‘आयजीएम’ आणि ’आयजीजी’या रक्ताच्या तीन चाचण्या करून केले जाते.डेंग्यू हा रक्त शोषणार्‍या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार. ‘एडिस इजिप्ती’ या डासांची प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या माहितीनुसार, डासाने चावा घेतल्यानंतर चार ते दहा दिवसांत डेंग्यूची लक्षणे दिसू लागतात, ती दोन ते सात दिवसांपर्यंत असतात. ’एडिस इजिप्ती’चे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळे घरातील एसी, फ्रिजखाली साचलेले पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यांच्या साठलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होते. डेंग्यूचे डास सामान्यतः दिवसाच चावतात.

डेंग्यूच्या तापाचे डेंग्यू फिव्हर (डीएफ) आणि सक्तस्रावी ताप (डीएचएफ) असे दोन प्रकार आहेत. पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडे आणि सांध्यांमध्ये असहय्य वेदना होणेे, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणे, अशी लक्षणे दिसतात.दुसर्‍या प्रकारात (डीएचएफ) तापासोबतच रक्तस्राव होऊन रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला ताप आणि अंगदुखी होतेच, त्याशिवाय शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणे, सतत तहान लागणे आणि अशक्तपणा, अशी लक्षणे दिसतात.
 
‘एनडीसीए‘च्या मते, २०२० ते २०२१ या काळात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ३३ टक्के तर २०२१ ते २०२२ या वर्षात २१ टक्के वाढ झाली आहे. दि. १ जानेवारी ते दि. ३१ जुलै २०२३ या कालावधीत ३१ हजार, ४६४ डेंग्यू प्रकरणे आणि ३६ संबंधित मृत्यूंची नोंद झाली आहे. ’नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बोर्न डिसिजेस कंट्रोल’च्या म्हणण्यानुसार, ‘कोविड’ काळात त्याचा प्रसार कमी झाला असला, तरी २०२० ते २०२१ पर्यंत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ३३ टक्के वाढ झाली आणि २०२१ ते २०२२ दरम्यान प्रकरणांमध्ये २१ टक्के वाढ झाली.या गंभीर आजाराला मुळासकट नष्ट करण्यासाठी देशातील लस उत्पादक कंपनी ‘इंडियन इम्युनोलॉजिकल लि.’ जानेवारी २०२६ पर्यंत डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात उतरवणार आहे. ‘कोविड’नंतर भारताने ‘कोविड प्रतिबंधक लस’ निर्मिती करून जगातील अनेक देशांत तिची निर्यात करून आरोग्य क्षेत्रात देश अग्रेसर असल्याचे अधोरेखित केले. आता डेंग्यू प्रतिबंधक लस विकसित करून देश याच लस निर्मिती क्षेत्रात अग्रेसर होताना दिसत आहे.
 
‘आयआयएल’चे व्यवस्थापकीय संचालक के. आनंद कुमार सांगतात की, “१८ ते ५० वर्षं वयोगटातील सुमारे ९० व्यक्तींवर या लसीच्या प्रारंभिक टप्प्यातील चाचण्यांमध्ये कोणतेही प्रतिकूल परिणाम दिसले नाहीत. प्रथम कंपनी ‘फेज-१’ चाचण्या पूर्ण करणार असून, त्यानंतर पुढील स्तर गाठून निर्मिती प्रक्रिया गतिमान करणार आहोत. या सर्व गोष्टींसाठी भारतीयांना किमान दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे,”हैदराबाद स्थित ‘आयआयएल’ या औषध व लस निर्माण कंपनी व्यतिरिक्त देशातील ‘कोविड प्रतिबंध लस’ विकसित करणार्‍या ‘सीरम इन्स्ट्यिट्यूट आणि ‘पॅनासिया बायोटेक’याही डेंग्यूची लस विकसित करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
 
भारतासारख्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात डेंग्यू लस निर्मितीनंतर लोकांच्या आयुर्मानात आणि एकूणच जीवनशैलीत प्रचंड बदल दिसून येतील. कारण, डेंग्यूने मृत्युमुखी पडणार्‍या जगातील देशांच्या यादीत भारताचे नाव अग्रभागी आहे. यासह डेंग्यू आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रचंड प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ वापरून त्याचा प्रतिबंध करणे क्रमप्राप्तच असते. साहजिकच प्रत्येक पावसाळ्यात आणि इतरवेळीही डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी पैसा, वेळ, मनुष्यबळी खर्ची पडते. आता २०२६ नंतर डेंग्यू प्रतिबंधक लस विकसित झाल्यानंतर भारतीयांच्या जीवनमानात, आरोग्य व्यवस्थेत मोठे स्थित्यंतर दृष्टीपथास दिसत आहे.
 
 
‘कोविड’ लसीप्रमाणेच डेंग्यू प्रतिबंधक लस सर्व नागरिकांना मोफत मिळणार नसली, तरीही त्याची निर्मिती देशातच होत असल्याने ती टोचून घेण्याचा खर्च नागरिकांच्या आवाक्याबाहेर नसेल. ‘आयआयएल’च्या लसनिर्मितीनंतर अधिकाधिक कंपन्या लसीच्या निर्मितीत उतरून त्याचे दरही अत्यल्पच राहतील, ही अपेक्षा.एकूणच भारत लसनिर्मितीतही विश्वगुरू होण्याकडे आगेकूच करताना दिसत आहे, हेच खरे!
 
-नील कुलकर्णी