ठाणे : भाजपा व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात प्रथमच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत महिलांनी जल्लोष केला. राज्याच्या विविध भागातील महिलांचे २५ हून अधिक गट सहभागी झाले होते. प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते, व्याख्यात्या धनश्री लेले आणि अभिनेत्री दिपाली चौगुले यांनी महिलांचे कौतुक करीत कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल आयोजक भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले व वृषाली वाघुले-भोसले यांचे कौतुक केले.
या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल आठ तास रंगलेल्या या कार्यक्रमात तरुणींपासून पन्नाशीतील महिलांनी पारंपरिक खेळ, फुगडी, उखाणे आदींबरोबरच पारंपरिक गीते व नवी गाणी सादर करीत सामाजिक संदेश देऊन जनजागृतीही केली. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना व मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधण्यात आले.
मंगळागौरी हा महिलांना कनेक्ट करणारा खेळ आहे. सध्याच्या शहरी वातावरणात महिला दबून जात असताना, मंगळागौरीच्या माध्यमातून महिलांना नवी ऊर्जा मिळत आहे. मंगळागौरीतील विविध खेळ म्हणजे एक जीमच आहे. हा आनंद जीममध्येही मिळत नाही, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी संवाद साधला. तसेच `बाईपण भारी देवा' चित्रपटातील काही किस्सेही सांगितले.
यावेळी प्रसिद्ध व्याख्यात्या व प्रवचनकार धनश्री लेले, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, भाजपाच्या माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, नंदा पाटील, दीपा गावंड, स्नेहा पाटील यांची उपस्थिती होती. माजी नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, परिवहन सदस्य विकास पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक टीजेएसबी बॅंक व पितांबरी समूह होते. भक्ती भिडे व श्रुती नाख्ये यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. तर सुनिता खरे यांनी सूत्रसंचालन केले.
चंद्रयान - ३ चा लक्षवेधी उखाणा!
विश्वास सामाजिक संस्थेची मंगळागौर स्पर्धा उखाणी व नवनवीन खेळांनी लक्षवेधी ठरली. चंद्रयान-३ ने दक्षिण ध्रुवावर रोवले पाय, इस्त्रोच्या महिला शास्त्रज्ञांनी वाढविली भारताची शान, हा उखाणा लक्षवेधी ठरला. या उखाण्याला गडकरी रंगायतनमधील शेकडो महिलांनी टाळ्यांचा कडकडाट करून पसंती दर्शवली.
ऐरोलीचा रुचिरा ग्रुप जेता
मंगळागौर स्पर्धेत ऐरोली येथील रुचिरा ग्रुप जेता ठरला. रुचिरा ग्रूपने ३१ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस पटकावले. तर अंबरनाथ येथील जागर मंचने २१ हजारांचे द्वीतीय, ठाणे येथील सृजन संस्थेने १६ हजार रुपयांचे तृतीय, ठाण्यातील मैत्रिणी ग्रूपने ११ हजारांचे चतुर्थ आणि किसननगर येथील अष्टभूजा सखी परिवारने पाच हजारांचे पाचव्या क्रमांकांचे बक्षीस मिळविले.