भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार ; चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या काही मैलावर
23-Aug-2023
Total Views |
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताची चांद्रयान ३ मोहिम सॉफ्ट लँडिंग करण्याच्या अंतिम टप्प्यात असून भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी नव्या इतिहासाची नोंद केली जाणार आहे. इस्त्रोने २००८ साली चांद्रयान मोहिमेचा शुभारंभ करून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानंतर २०१९ साली चांद्रयान २ च्या माध्यमातून विक्रम लँडरचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला होता. परंतु, या मोहिमेत पाठविलेले ऑर्बिटर अद्याप चंद्राच्या कक्षेत फिरत असून त्याचा वापर या चांद्रयान ३ मोहिमेत भारतीय शास्त्रज्ञांना होत आहे.
इस्त्रोने दि. १४ जुलै रोजी चांद्रयान ३ ने अवकाश चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती.त्यानंतर महिन्याभरातील अनेक टप्पे पार करत अखेर चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या काही अंतरावर आहे. सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटे हीच ती वेळ जेव्हा भारताचे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. भारताची अतिशय महत्त्वाकांक्षी मोहिम ज्या माध्यमातून चंद्राच्या अनेक रहस्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल संध्याकाळपासून सुरू असून लँडर प्रॉप्युलशन मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून संपर्क करण्याची तयारी झाली आहे. सद्यस्थितीस चांद्रयान-३ चंद्रापासून अवघ्या १५ मैलावर असून लँडिंगची तयारी सुरू झाली आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात होईल आणि चांद्रयानाचं सॉफ्ट लॅण्डिंग होईल.
या मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले असून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील १००० हून अधिक शास्त्रज्ञ याक्षणी अँक्शन मोडवर आहेत. कारण याच क्षणी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे.