मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांच्या निधनामुळे संपुर्ण चित्रपसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देसाई यांना आदरांजली वाहली असून हरहुन्नरी कलावंत असा अचनाक निघून जाईल अशी कल्पना नव्हती अशा शब्दांत शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, २००५ साली नितीन देसाई यांनी कर्जत येथे एन.डी स्टुडिओ उभारला होता. या स्टुडिओत अनेक चित्रपटांचे चित्रिकरण झाले होते.
काय आहे फडणवीसांची पोस्ट?
“प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सिनेमा आणि कला क्षेत्रात अतिशय बहुमूल्य योगदान त्यांनी दिले आणि त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. मुख्यमंत्री असताना मरीन लाईन्स येथे आयोजित 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' कार्यक्रम व्यवस्थेचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. हा हरहुन्नरी कलावंत असा अचानक आपल्याला सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद प्राप्त होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापुर्वी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. '१९४२ अ लव्ह स्टोरी' या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' ‘किक’, ‘जोधा अकबर (हिंदी मालिका), ‘राजा शिवछत्रपती’ (मराठी मालिका), ‘बालगंधर्व’ (मराठी, चित्रपट), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ’स्लमडॉग मिलेनियर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘प्रेम रतन धन पायो’, या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते. दरम्यान, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या राजा शिवछत्रपती या मालिकेच्या सेटच उभारण्यासोबतच त्यांनी या मालिकेची निर्मिती देखील केली होती. तब्बल वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला होता.