मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाई यांचे वेगळे ऋणानुबंध होते असे म्हणत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे आज निधन झाले. ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. मराठी, हिंदी कलासृष्टीत आपल्या कलेच्या माध्यमातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या देसाई यांचे जाणे चटका लावणारे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हणतात, टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाई यांचे वेगळे ऋणानुबंध होते. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांनी कायम जपली होती. येथील नवरात्रोत्सव त्यांच्यामुळे कायम अविस्मरणीय झाला. त्यांच्या हातून घडलेली कलाकृती पाहण्याची कायम उत्सुकता असे. इतका उमदा माणूस आणि मित्र आज आपण गमावल्याचे वृत्त वेदनादायी आहे. वैयक्तिक माझी आणि कलाक्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खद आहे. त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतो.”
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापुर्वी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. '१९४२ अ लव्ह स्टोरी' या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' ‘किक’, ‘जोधा अकबर (हिंदी मालिका), ‘राजा शिवछत्रपती’ (मराठी मालिका), ‘बालगंधर्व’ (मराठी, चित्रपट), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ’स्लमडॉग मिलेनियर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘प्रेम रतन धन पायो’, या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते. दरम्यान, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या राजा शिवछत्रपती या मालिकेच्या सेटच उभारण्यासोबतच त्यांनी या मालिकेची निर्मिती देखील केली होती. तब्बल वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला होता.