.....आता वाजले की बारा!

Total Views |
Article On Rebecca Struthers Founder Of Struthers Watchmakers

रिबेका आणि तिचा नवरा ग्रेग यांनी ‘स्ट्रदर्स वॉचमेकर्स’ अशी कंपनीच स्थापन केली असून, यांची अशी ख्याती आहे की, उत्कृष्ट प्रतीची यांत्रिक घड्याळं आजदेखील लोक पसंत करतात.

गेल्या आठवड्यातल्या ’विश्वसंचार’ स्तंभात मी, डॉ. हेडगेवार आणि नागपुरातले एक तरुण उत्साही वकील यांच्यात ’हिंदू कोणास म्हणावे’ यावरून घडलेला प्रसंग सांगितला होता. मुळात तो प्रसंग मी महाराष्ट्रातले एक प्रचारक माननीय शिवरायजी तेलंग यांच्याकडून ऐकला होता. इतरही अनेकांनी ऐकला असेल, शिवरायजींकडे अशा असंख्य आठवणींचा खजिनाच होता.

याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळा’चे साफ बारा वाजवून अजितदादा पवार बाहेर पडले. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. लेख, अग्रलेख, चर्चा, गप्पा, अफवा, टीका, टिप्पण्या, शेरेबाजी, कोपरखळ्या, टोमणे, फिरक्या इत्यादींना अक्षरशः उधाणाची भरती आली. समाजमाध्यमं नाना प्रकारच्या चित्रांनी, मिम्सनी भरभरून वाहू लागली. अजूनही ते कवित्व सुरूच आहे. या धुळवडीत सामान्य हिंदुत्वप्रेमी नागरिक, संघ कार्यकर्ता (नेहमीप्रमाणे) बावचळून, भांबावून गेल्यासारखा भासतो आहे. या सामान्य हिंदुत्वप्रेमी नागरिकाचं, कार्यकर्त्याचं हिंदुत्वावर प्रेम आहे, निष्ठा आहे. पण, त्यामुळेच तो खूप सरळ आहे, साधा आहे, काहीसा भाबडासुद्धा आहे. जेव्हा तुम्ही धुळवडीत उतरता किंवा धुळवड खेळणारेच तुमच्यावर चालून येतात, तेव्हा तुमच्याकडे विचारांवरची निष्ठा आणि प्रेम तर हवंच; पण चातुर्यदेखील हवं.
 
१९७५ची कुप्रसिद्ध आणीबाणी १९७७च्या मार्चमध्ये संपली. इंदिराजींचा पराभव करून जनता पक्ष सत्तेवर आला. संघावरची बंदी उठली. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची सुटका झाली. ताबडतोब देशभरातील शाखाही सुरू झाल्या आणि सरसंघचालकांसह सर्व प्रवासी कार्यकर्त्यांचे प्रवास सुुरू झाले. डाव्या मंडळींच्या, विशेषतः समाजवाद्यांच्या त्यामुळे फारच पोटात दुखू लागलं. यांच्या ’राष्ट्र सेवा दला’च्या शाखा अशा चालू होऊ शकत नव्हत्या. कारण, शाखा चालवायला कार्यकर्तेच नव्हते, होते ते सगळे नेतेच! मग काहीतरी खुसपटं काढण्याची संधी ते शोधत राहिले. काही काळानंतर वृत्तपत्रात एक बातमी छापून आली. कोणत्यातरी सभेत बोलताना म्हणे, सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी असे उद्गार काढले की, “येत्या दहा वर्षांत संघ सरकार ’टेक ओव्हर’ करेल.”

झालं!!! सगळीकडून टीकेची प्रचंड राळ उडू लागली. संघ हा लोकशाहीविरोधी, फॅसिस्ट वगैरे असल्याचे नेहमीचे आरोप होऊ लागले. लोकल गाडीत, बसमध्ये, कँटीनमध्ये, कार्यालयांमध्ये टवाळखोर लोक कार्यकर्त्यांना विचारू लागले, ’‘काय मग? दहा वर्षांत तुम्ही ’टेक ओव्हर’ करणार?” कार्यकर्ते उगीचच बचावात्मक पवित्र्यात जाऊन, ‘’छे, छे! सरसंघचालक असं बोलणंच शक्य नाही,” वगैरे समर्थन करू लागले. टवाळखोर आणखीनच आक्रमक झाले. लोकांना अशा वेळी सत्य-बित्य समजून घ्यायचंच नसतं. यांना फक्त चघळायला खमंग विषय आणि टिंगल उडवायला गिर्‍हाईक हवं असतं. अशावेळी बचाव आणि समर्थन न करत बसता आक्रमक पवित्रा घेणं, याला म्हणतात चतुरपणा! आक्रमक पवित्रा कसा असतो, याचा आदर्श मुंबईच्या एका कार्यकर्त्याने घालून दिला. त्याने बेधडक असं सांगायला सुरुवात केली, ‘’खरं तर दहा वर्षांनी कशाला, आम्ही आतासुद्धा ‘टेक ओव्हर’ करू शकतो; पण आम्हाला तसं करायचं नाही.” टवाळांच्या टवाळक्या आणि कुचाळक्या ताबडतोब बंद पडल्या.

आता इथे पुन्हा माननीय शिवरायजी तेलंगांनी सांगितलेली संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गुरुजी यांची एक आठवण. एकदा प्रवासात गुरुजी एका प्रभात शाखेवर गेले. शाखा संपल्यावर उपस्थित स्वयंसेवकांचा परिचय कार्यक्रम झाला. एक पहिल्यांदाच शाखेत आलेला इसम म्हणाला, ‘’मी गेला महिनाभर या मैदानाच्या बाजूला उभा राहून हे सगळे कार्यक्रम बघत होतो. मध्ये एकदा या लोकांनी दोन खुर्च्या आणून त्यावर दोन फोटो ठेवून काहीतरी भाषण केलं होतं. त्यातला एक फोटो तुमचा होता आणि आज तुम्ही इथे दिसलात. म्हणजे तुम्ही या लोकांचे मुख्य गुरू महाराज असणार, म्हणून आज मी आत येण्याची हिंमत केली, तर महाराज, मी रोज इथे येऊ शकतो का? मला खूप आवडली ही शाखा.”

त्यावर पू. गुरुजी म्हणाले, ‘’मी कुणी गुरू, महाराज वगैरे नाही; पण ते जाऊ द्या. तुम्हाला आवडली ना शाखा, मग रोज येत जा.” तेव्हा जरा अडखळत, संकोचून तो म्हणाला, ‘’पण महाराज, मी एक व्यावसायिक चोर आहे. चोरी करणं, हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. मग चालेल तुम्हाला?” यावर गुरुजींनी अतिशय स्नेहार्द्र नजरेने या इसमाकडे एकदा न्याहाळून पाहिलं आणि म्हणाले, ‘’अवश्य या.” आणि मग इतर सर्व स्वयंसेवकांकडे पाहात मिश्किलपणे हसत, त्या इसमासमोरच म्हणाले, ’‘उद्यापासून हे शाखेवर येणार आहेत, तेव्हा सर्वांनी आपापले खिसापाकीट सांभाळून ठेवावे.” हास्यकल्लोळ उडाला. त्यात तो इसमही सामील झाला.

असे प्रसंग, आठवणी ऐकून-वाचून नुसतंच भारावून वगैरे जायचं नसतं. आपल्या समोर जेव्हा असे प्रश्न, समस्या येतात, तेव्हा त्या आठवणीमधलं तत्त्व तिथे लागू करायचं असतं. आपण ज्या कार्यक्षेत्रात कार्यरत असू, त्या कार्यक्षेत्राला साजेल असं, या तत्त्वाचं प्रत्यक्ष ’अ‍ॅप्लिकेशन ’तिथे करायचं असतं. प्रभू रामचंद्राची कथा ऐकून शिवरायांनी वानरांची टोळी घेऊन सुलतानांवर हल्ला नाही चढवला, त्यांनी हनुमंत-जाबुवंत-अंगद-नल-नीलांसारखेच पराक्रमी मावळे जमवून त्यांचं सैन्य बनवलं. काळानुसार, कार्यक्षेत्रानुसार मूळ तत्त्वाचं योग्य ते ’अ‍ॅप्लिकेशन’ करता येणं म्हणजे चातुर्य !

पण, मी इथे तुम्हाला राष्ट्रवादीच्या बारा वाजलेल्या घड्याळाची कथा सांगण्यासाठी बसलेलो नाही. ती सगळी रडकथा तुम्हाला वृत्तपत्रं, वाहिन्या, समाजमाध्यमं यावरून मनसोक्त ऐकायला, बघायला, वाचायला मिळेलच. इंग्रजांनी महंमद अली जिनांना पुढे करून भारताचे तुकडे केले होते. इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र करून पाकिस्तानचे तुकडे उडवले; पण मुळातच ते सगळं उसनं अवसान होतं. त्यामागे राष्ट्रीय धारणा नव्हती. त्यामुळे भारताला राजनैतिक फायदा होण्याऐवजी बांगलादेश ही एक नवी डोकेदुखी झाली. इथे ज्या राष्ट्रीय आणि प्रांतीय नेत्यांनी ‘धनुष्यबाण’ आणि ‘घड्याळा’चे तुकडे उडवलेत, त्यांच्या राष्ट्रीय धारणा एकदम पक्क्या आहेत, हे लक्षात ठेवून आपण ती सगळी कथा न्याहाळावी. इथे मरण तुम्हाला खर्‍याखुर्‍या आणि ते ‘घड्याळ’ बनवणार्‍या एका महिलेची कथा सांगायची आहे. या महिलेचं नाव आहे रिबेका स्ट्रदर्स.

पाश्चिमात्यांचे सगळे ज्ञान आणि विज्ञान हे ग्रीक आणि आता रोमन संस्कृतीपासून सुरू होतं. म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्य आणि चार हजार वर्षांपूर्वीची ग्रीक गणराज्य यांच्या आधी जगात माणसं राहात होती नि त्यांनासुद्धा अक्कल होती, हे मान्य करायचीच त्यांची फारशी तयारी नसते. पण, त्या उत्खननांमधून अनेक संस्कृती उजेडात आल्या नि खूप प्रगत होत्या, हे सिद्ध झाल्यामुळे हे पश्चिमी विद्वान नाईलाजाने इजिप्शियन आणि चिनी लोक खूप प्रगत होते, असे मान्य करतात. पण, भारताबद्दल? अंहं! भारताला ते खिजगणतीतही धरीत नाहीत.

‘अहोरात्र’ हा संस्कृत शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. ’अह:’ म्हणजे दिवस आणि रात्र म्हणजे सूर्यास्त. सूर्योदय ते सूर्यास्त हा काळ, म्हणणेच ‘अहोरात्र’ या शब्दाचा अर्थ दिवस आणि रात्र मिळून होणारा २४ तासांचा काळ. २४ तासांची विभागणी ही पाश्चिमात्य संकल्पना आहे, तर आठ प्रहरांची विभागणी ही हिंदू संकल्पना आहे. ‘अहोरात्र’मधला ’होरा’ यावरूनच ‘एच-ओ-यू-आर’ ’अवर’ म्हणजे तास हा शब्द निघालेला आहे. यावरूनच ’होरोलॉजी ’म्हणजे समयमापनाची अभ्यास करणारं शास्त्र हा शब्द निर्माण झालेला आहे. ‘होरोलॉजी’ शब्दाचा समयमापनाची यंत्र म्हणजेच घड्याळ बनवणं, असादेखील एक अर्थ आहे.

आपल्याला मिर्झा राजा जयसिंग हा आपल्या शिवरायांवर स्वारी करून आलेला मुघल सरदार चांगलाच माहिती असेल. मुळात तो जयपूरचा राजा होता. त्याला मुलगा रामसिंग, नातू बिशनसिंग आणि पणतू जयसिंग दुसरा किंवा सवाई जयसिंग हा आपल्या बाजीराव पेशव्यांचा समकालीन. याने दिली, उज्जैन, जयपूर, मथुरा आणि वाराणसी या स्थानांवर इ. स. १७२४ ते १७३४ या काळात उभारलेल्या वेधशाळा किंवा जंतर-मंतर म्हणजे प्राचीन हिंदू समयमापन विज्ञानाचे प्रत्यक्ष पुरावे दिल्लीच्या जंतर-मंतरमधील सम्राट यंत्र म्हणजेच पाश्चात्यांच्या लाडक्या ग्रीक लोकांची ’सन डायल’!

‘सन डायल’ म्हणजे सूर्याच्या उगवत्या-ढळत्या प्रकाशकिरणांनुसार वेळ दाखवणारं घड्याळ. पश्चिमेत पहिली ‘सन डायल’ कुणी नि केव्हा बनवली, ते माहीत नाही. पण, प्राचीन ग्रीक, प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत तसे काही अवशेष आढळलेले आहेत. परंतु, ‘पेंडुलम’ म्हणजे तराजूसारखा एक दांडा आणि त्याच्या हालचालींवर सरकणारे एक दांतेरी चक्र यांच्या साहाय्याने तयार केलेली घड्याळं साधारण १४व्या शतकात जर्मनीत बनले. त्यावेळी जर्मनी हा देश नव्हता. त्यामुळे असं म्हणूया की, बव्हेरिया नामक जर्मन भाषिक संस्थानातल्या न्यूरेंबर्ग आणि ऑग्सबर्ग या शहरातल्या कुशल कारागिरांनी अशी घड्याळं बनवली. यांना अर्थातच राजमहाल, सरदारांच्या हवेल्या असा जागी स्थान मिळाले. मात्र, सर्वसामान्यांसाठी चर्चच्या टॉवरवर घड्याळं आली. यांच्या टोल्यांमुळे लोकांना वेळ कळू लागली. आपण घड्याळात काय वेळ झाली, असं न विचारता ’किती वाजले’ असं विचारतो, ते या टोल्यांच्या वाजण्यामुळेच!

पुढच्या शतकांमध्ये जर्मनीबरोबरच फ्रान्स आणि स्वित्झर्लंडमधले कारागीर उत्तम घड्याळ निर्मितीसाठी प्रसिद्धी पावले. आणखी पुढे इंग्लंडसह अमेरिकेतही उत्तमोत्तम घड्याळ निर्मिती होऊ लागली. मात्र, ही सर्व घड्याळं भिंतीवरची, टेबलावरची किंवा खिशात ठेवायची होती. घड्याळं पुरुषांच्या मनगटावर (रिस्ट वॉच) आलं ते पहिल्या महायुद्धात १९१७ साली. यानंतर घड्याळ निर्मिती व्यवसायाने घोडदौड केली. क्वार्टझची घड्याळं, इलेक्ट्रिक घड्याळं, इलेक्ट्रॉनिक घड्याळं ते आजची डिजिटल घड्याळं असा प्रवास फक्त गेल्या १०० वर्षांत झाला.

रिबेका स्ट्रदर्स ही जेमतेम चाळिशीची ब्रिटिश महिला स्वतः उत्तम घड्याळ बनवते; पण म्हणजे जी नुसतीच कुशल ’वॉच मेकर’ नसून, ती ’होरॉलॉजिस्ट’ आहे. या शास्त्रात तिने ‘डॉक्टरेट’ केलेली आहे. डिजिटल घड्याळांमुळे एकूणच यांत्रिक घड्याळांचा व्यवसाय थोडा साधारण आहे. रिबेका आणि तिचा नवरा ग्रेग यांनी ’स्ट्रदर्स वॉचमेकर्स‘ अशी कंपनीच स्थापन केली असून, यांची अशी ख्याती आहे की, उत्कृष्ट प्रतीची यांत्रिक घड्याळं आजदेखील लोक पसंत करतात. ’होरोलॉजी’ आणि एकंदरीतच घड्याळ निर्मिती या इतिहास यावर रिबेकाने स्वतःच एक पुस्तक लिहिलं आहे. आता जून २०२३ मध्ये ते प्रकाशित झालं. त्याचं नाव आहे - ‘हॅन्ड्स ऑफ टाईम.’
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.