नरेंद्र मोदी : जनमानसशास्त्राचे तज्ज्ञ

    07-Jul-2023   
Total Views |
Article On PM Narendra Modi And Public Psychology

विजयाचे आकडेशास्त्र विरोधक सांगतात. पण, आकडेशास्त्राने निवडणुका जिंकता येत नाहीत. त्याला रसायनशास्त्राची जोड लागते आणि त्या रसायनशास्त्रालासुद्धा जनमानसशास्त्राची जोड लागते. हे नेते जातींची जोड करण्यात, पगडी-पागोट्याची भाषा करण्यात, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांना जवळ करण्यात तज्ज्ञ आहेत. त्यांना मतदानाची ‘केमिस्ट्री’ आणि ‘पॅथोलॉजी’ जमणे अशक्य आहे. त्यांना खरोखरच मोदींना पर्याय द्यायचा असेल, तर दुसरा मोदी शोधावा लागेल.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय देण्यासाठी पाटण्यामध्ये १७ विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले, त्यांनी बैठक केली. त्या बैठकीत पुढची बैठक शिमला येथे करण्याचे ठरले आणि नंतर स्थान बदलण्यात आले. आता ही बैठक दि. १७ जुलैला बंगळुरू येथे होईल. विरोधी पक्ष एकत्र राहू शकतात का? विरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रयत्न यापूर्वी झाले, ते अयशस्वी का झाले? (आणीबाणीचा अपवाद वगळून) आता अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे की, ज्यामुळे विरोधी ऐक्य आवश्यक झाले आहे? या प्रश्नांची चर्चा प्रसिद्धी माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारे होत असते. अनेक नामवंत समीक्षकांनी याबद्दलची आपली मते मांडलेली आहेत.
नरेंद्र मोदी हे भाजपचे अत्यंत शक्तिशाली नेते आहेत. त्यांच्या शक्तीचा उगम नामवंत घराणे अथवा वेगवेगळ्या राजकीय उचापती करण्याची क्षमता किंवा जातींचे पाठबळ यात नाही. त्यांच्या शक्तीचा उगम भारतीय जनता आहे. भारतीय जनतेला नरेंद्र मोदी नको आहेत, असे देशातील वातावरण आहे का? त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. मग देशातील विरोधी पक्षांना मोदी का नकोत?
मोदी का नकोत? याची विरोधी पक्षांची कारणे अशी आहेत. ती पुढीलप्रमाणे-

१) मोदी लोकशाहीला धोका आहेत.
२) राज्यघटना संकटात आली आहे.
३) नरेंद्र मोदी हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत. ते विरोधी पक्षांना संपविण्याच्या मागे लागले आहेत.
४) मोदींमुळे बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे, देशाच्या विकासाला खिळ पडली आहे.
५) मोदींनी देशाचे विभाजन बहुसंख्य हिंदू आणि अल्पसंख्य अन्य धर्मीय असे करून टाकले आहे.
या पाचही मुद्द्यांना शून्य अर्थ आहे. भारतापुरता विचार करायचा तर, भारतीय जनतेनेच जर ठरविले की, आम्हाला लोकशाही मुळीच नको, जसं चीन आणि रशियातील जनतेने ते ठरवून ठेवलं आहे, तर भारतातील लोकशाही संपेल. मात्र, भारतीय जनतेच्या ‘डीएनए’मध्ये लोकशाही आहे. म्हणून भारतीय जनता लोकशाही संपवण्याचा विचार झोपेतही करू शकत नाही. नरेंद्र मोदी भारतीय जनमानसाचे प्रतिनिधी आहेत. भारतीय जनमानस आणि मोदी हे अभिन्न आहेत. म्हणून ‘मोदी लोकशाही संपवतील’ यासारखे हास्यास्पद वाक्य असूच शकत नाही. महागाई आणि बेरोजगारी हे विषय आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या कोणत्या निवडणुकीत नव्हते? याचा शोध या नेत्यांनी करायला पाहिजे.

राज्यघटना संकटात आली आहे, हे वाक्य अनुसूचित जातींना समोर ठेवून उच्चारले जाते. पू. बाबासाहेब हे त्यांचे दैवत आहेत आणि राज्यघटनेला कलमबद्ध करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. परंतु, अनुसूचित जातीतील जनता ही चांगली सुशिक्षित आहे, राजकीयदृष्ट्या जागृत आहेत. राज्यघटनेला धोका कोणापासून आहे, हे त्यांना नीट समजतं. लोकशाही आणि राज्यघटनेला धोका घराणेशाहीच्या राजकारणापासून आहे. व्यक्तिपूजेपासून आहे. बाबासाहेबांनी याबद्दलची आपली परखड मते मांडली आहेत. राज्यघटनेला धोका हिंसाचारापासून आहे. हिंसाचार दोन गट करतात, एक नक्षलवादी आणि दुसरे इस्लामी दहशतवादी. या दोघांनाही पदराखाली घेणारे अनेक नेते त्या १७ जणांमध्ये आहेत. त्यांच्यापासून राज्यघटनेला भयंकर धोका आहे.

नरेंद्र मोदी यांनी बहुसंख्य हिंदू आणि अल्पसंख्य अन्य धर्मगट असे विभाजन केले, असे बडबडून आपण सांप्रदायिक राजकारण करीत आहोत, हे या अतिशहाण्या नेत्यांच्या लक्षात येत नाही. सत्तेवर येताच मोदींनी घोषणा केली की, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास.’ ते नेहमी म्हणतात की, ‘मी १४० कोटी भारतीयांचे प्रतिनिधीत्व करतो.’ ‘मी हिंदूंचे प्रतिनिधीत्व करतो,’ असे ते म्हणत नाहीत. ते म्हणतात की, ‘आम्ही कोणाचेही तुष्टीकरण करणार नाही, सर्वांना न्याय देऊ.’ सर्वांच्या न्यायासाठी त्यांनी समान नागरी कायद्याचा विषय पुढे आणला आहे. मुसलमान, ख्रिश्चन बांधवांची सहभागीता वाढावी, त्यांचा विकास व्हावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. धार्मिक फुट पाडण्याचे काम हे १७ जणच करीत असतात. कधी ते औरंगजेबाचा उदोउदो करतील, तर कधी टिपू आणि अफझलखानाचे ताईत गळ्यात घालतील. ‘कलम ३७०’ वेगळ्या प्रकारे कसे आणता येईल, अशा बाता करतील. हिंदू श्रद्धांचा आदर करणार नाहीत. चुकूनही कुंभाला जाणार नाहीत. पवित्र श्रावण महिन्यातील सण-उत्सवांत सहभागी होणार नाहीत. असे करणे म्हणजे ‘सेक्युलॅरिझम’. ही त्यांची ‘सेक्युलॅरिझम’ची व्याख्या आहे.

नरेंद्र मोदी हटवण्याचे त्यांचे कथानक पोकळ भोपळ्यासारखे आहे. जनतेमध्ये त्याला काहीही किंमत नाही. त्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण येते, जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीविरुद्ध लढा दिला. सर्व विरोधी पक्षांना त्यांनी एकत्र केले, सर्वांना एकत्र करून त्यांनी जनता पक्ष तयार केला. सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांचे ऐकले. राजकारणातील हा महान चमत्कार आहे. जयप्रकाश नारायण यांचे सर्वांनी का ऐकले? याचा विचार ही सत्ताडोकी करू शकतात का? ती करू शकत नाहीत. महात्मा गांधीजींप्रमाणे जयप्रकाश नारायण हे नि:स्पृह होते. सत्तेच्या कोणत्याही पदाचा त्यांना मोह नव्हता. ते निर्मोही होते. इंदिरा गांधी नकोत, मग काय हवे? हे त्यांनी समग्र क्रांतीचा विषय मांडून सांगितले. आपल्याला अहिंसक क्रांती करायचे आहे, असे त्यांनी आग्रहाने सांगितले. त्याग, तपस्या, निस्पृहता यांचे ते प्रतीक झाले. म्हणून सर्व विरोधी राजकीय नेते त्यांच्यापुढे झुकले. विरोधी पक्षाकडे असा ‘जयप्रकाश’ कोण आहे?

शरद पवार जयप्रकाश होतील का? त्यांचे वस्त्रहरण त्यांच्या पुतण्यानेच केले आहे आणि ते इतके दारुण आहे की, कितीही नवीन वस्त्रे घातली, तरी ‘राजा नग्न आहे’ हे लोकं विसरू शकणार नाहीत. नितीश कुमार यांची ख्याती काय सांगावी? गेल्या २० वर्षांत त्यांनी किती जणांशी सोयरीक केली असेल, याचा हिशोब नाही. मुंगळा जसा गुळाला चिकटून राहातो, तसे सत्तेला चिकटून राहणारा हा बिहारी मुंगळा आहे. लालू प्रसाद हे त्यांचे मुंगळा बंधू आहेत. वाचकांनी ‘मुंगळा- मुंगळा’ हे गाणं आठवायला हरकत नाही. केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्याबद्दल न लिहिलेले बरे!

मोदींना पर्याय देण्याची क्षमता कोणामध्येच नाही आणि ते मोदींना हटवण्यास निघाले आहेत. नको ते धाडस केले असता काय होते, हे एका जातककथेत फार सुंदररित्या आलेले आहे., तिचा सारांश असा की, एकदा कोल्ह्याने हत्तीची शिकार करायचे ठरविले. सिंहाशी त्याची दोस्ती होते. सिंह त्याला म्हणाला, ’असल्या भानगडी तू करू नकोस’; पण कोल्ह्याने ऐकले नाही. त्याने हत्तीवर उडी मारली. ती उडी हत्तीच्या पायाजवळ येऊन पडली. हत्तीने आपला पाय उचला, कोल्ह्यावर ठेवला. कोल्ह्याची पोळी झाली.

मोदींविरुद्ध जनता नाही. मोदींविरुद्ध घराणेशाहीसोबत चालणारे पक्ष आहेत. भ्रष्टाचार आणि अनाचारात बुडालेले नेते आहेत. मोदींनी घराणेशाही आणि भ्रष्टाचार यांविरुद्ध युद्ध पुकारलेले आहे. या युद्धात घराणेशाहीवादी पक्ष एकएकटे लढू शकत नाहीत. आपली घराणेशाही वाचवण्यासाठी ते हातात हात घालून उभे आहेत. विजयाचे आकडेशास्त्र ते सांगतात. पण, आकडेशास्त्राने निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला रसायनशास्त्राची जोड लागते आणि त्या रसायनशास्त्रालासुद्धा जनमानसशास्त्राची जोड लागते. हे नेते जातींची जोड करण्यात, पगडी-पागोट्याची भाषा करण्यात, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांना जवळ करण्यात तज्ज्ञ आहेत. त्यांना मतदानाची ’केमिस्ट्री’ आणि ’पॅथोलॉजी’ जमणे अशक्य आहे. त्यांना खरोखरच मोदींना पर्याय द्यायचा असेल, तर दुसरा मोदी शोधावा लागेल. तो आता क्षितिजावरदेखील दिसत नाही. हे वास्तव आहे.

९८६९२०६१०१

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.