नवी दिल्ली : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दि. ३० जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात ४४ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्लामिक राजकीय पक्ष जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) च्या परिषदेत हा स्फोट झाला. या बॉम्बस्फोटाचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजलचा नेता कार्यक्रमाला संबोधित करत असताना लोक जिंदाबादच्या घोषणा देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग मोठा आवाज होतो. यानंतर तेथे गोंधळाचे वातावरण आहे. बाजौर आदिवासी जिल्ह्यातील खार येथे दुपारी चारच्या सुमारास आत्मघातकी हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला.
पाकिस्तानात आत्मघाती स्फोट
पाकिस्तानी माध्यामांनुसार , स्फोटाच्या वेळी कॉन्फरन्सच्या ठिकाणी ५०० हून अधिक लोक उपस्थित होते. पोलिस डीआयजी (मलकंद रेंज) नासिर मेहमूद सत्ती यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हा आत्मघाती स्फोट असल्याचे समोर आले आहे. स्फोटाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत.
JUI-F नेत्यांनी चौकशीची मागणी केली
त्यांनी सांगितले की, परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. जेयूआय-एफचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि प्रांताचे काळजीवाहू मुख्यमंत्री आझम खान यांच्याकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांनी रुग्णालयात पोहोचून रक्तदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पोलिसांनी सांगितले की, जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी बहुतेकांची प्रकृती चिंताजनक आहे. जेयूआय-एफचे नेते हाफिज हमदुल्ला म्हणाले की, मी या स्फोटाचा तीव्र निषेध करतो आणि यामागे जे लोक आहेत त्यांना हा संदेश देऊ इच्छितो की हा जिहाद नसून दहशतवाद आहे. हा मानवतेवर आणि बाजारावरचा हल्ला आहे.दरम्यान स्फोटात जेयूआय-एफचे प्रमुख नेते मौलाना झियाउल्लाह जान यांचाही मृत्यू झाला आहे.