नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिनची 'लव्हस्टोरी' सध्या चर्चेत आहे. आता उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात, एक वर्षापूर्वी बांगलादेशातील जुली नावाची मुस्लिम महिला आपल्या ११ वर्षाच्या मुलीसह भारतात आली होती. हिंदू झाल्यानंतर मुरादाबादच्या अजयशी तिने लग्न केले. त्यानंतर ती अजयला बांगलादेशला घेऊन गेली. आता ती रक्ताने माखलेले अजयचे फोटो त्याच्या आईला पाठवते. अजय त्याच्या आईला कॉल करतो आणि तिला सांगतो की, जुली त्याला मारहाण करते. तो तिथे अडकला आहे. यानंतर दि. १५ जुलै रोजी अजयच्या कुटुंबीयांनी त्याला वाचवण्याची विनंती प्रशासनाला केली.
हे प्रकरण मुरादाबादच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या सुनीता नावाच्या महिलेने मीडियाला सांगितले की, तिच्या ५ मुलांपैकी मोठा मुलगा अजय टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. २ वर्षांपूर्वी त्याचे बांगलादेशातील जुली या मुस्लिम तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून संभाषण झाले होते. जुली ही बांगलादेशातील गाझीपूरची रहिवासी आहे. अजय आणि जुलीने फेसबुकवरच मोबाईल नंबर शेअर केले आणि दोघेही बोलू लागले.
अजयची आई सुनीता यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे एक वर्षापूर्वी जुली पहिल्यांदा त्यांच्या मुरादाबादच्या घरी आली होती. तेव्हा तिची ११ वर्षाची मुलगी ही सोबत आली होती. जुलीचा पासपोर्ट आणि व्हिसा वैध होता. ती १५ दिवस मुरादाबाद येथे अजयच्या घरी राहिली. यादरम्यान तिने हिंदू धर्म स्विकारला आणि अजयशी लग्न केले. तिच्या पतीचा मृत्यू झाल्याचे ही तिने अजयला सांगितले. त्यानंतर ती बांगलादेशात परतली आणि साडेतीन महिन्यांपूर्वी बांगलादेशातून पुन्हा मुरादाबादला आली. यावेळी ती सुमारे २० दिवस अजयच्या घरी राहिली. त्यानंतर व्हिसा नूतनीकरणाची मागणी करत अजयला बांगलादेश सीमेपर्यंत सोडण्यास सांगितले.
सुनीताच्या म्हणण्यानुसार, घरातून बाहेर पडल्यानंतर सुमारे तीन दिवसांनी अजयचा फोन आला. त्याने सांगितले की चुकून तोही सीमा ओलांडून बांगलादेशात गेला. त्यावेळी त्याने काही जुगाड करून दहा ते पंधरा दिवसांत घरी परतणार असल्याचे आईला सांगितले होते. सुनीताच्या म्हणण्यानुसार, ५ दिवसांपूर्वी अजयने तिला फोन करून बांगलादेशात अडकल्याचे सांगून पैसे पाठवण्यास सांगितले होते. यानंतर जुलीने सुनीताला तिच्याच नंबरवरून काही फोटो पाठवले. यामध्ये अजयच्या डोक्यातून आणि चेहऱ्यावरून रक्त वाहत होते.
अजयची आई सुनीता हिने आपल्या मुलासोबत अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त करत मुरादाबाद प्रशासनाला त्याला परत आणण्याची विनंती केली आहे. मुरादाबाद पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गुप्तचर विभागाला देण्यात आले आहेत.