अपना बेगाना कौन, जाना अनजाना कौन?

Total Views |
Pakistan Cricket Board Chairmen Najam Sethi

‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’चे अध्यक्ष नजम सेठी यांनी कोणतंही कारण दिलेलं नाही; पण ते स्पष्टच आहे. अहमदाबाद आणि मुंबईतली राज्य सरकारं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ‘बेगानी’ वाटतात, तर चेन्नई, बंगळुरू आणि कोलकातामधली सरकारं ‘आपली’ वाटतात. आता समजा ‘आयसीसी’कडून ‘बीसीसीआय’ला सूचना आली की, पाकिस्तानी क्रिकेट संघाचे सामने त्यांना हव्या त्या ठिकाणी खेळवा; तर ‘बीसीसीआय’ ती सूचना स्वीकारणार का?

माननीय शिवरायजी तेलंग हे रा. स्व. संघाचे मुंबई, कोकण भागातले एक ज्येष्ठ प्रचारक होते. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार आणि संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या संबंधातल्या असंख्य, छोट्या-मोठ्या घटना, किस्से, प्रसंग यांचा फार मोठा साठा त्यांच्याकडे होता. शिवरायजींचा बौद्धिक वर्ग म्हणजे अशा प्रसंगांची मेजवानी असे. डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना करून हिंदू समाजाच्या प्रत्यक्ष संघटनेला सुरुवात केली. डॉक्टर फार ‘प्रॅक्टिकल’ होते. बौद्धिक, वैचारिक वादविवाद वगैरे करत न बसता हिंदू संघटन प्रत्यक्षात उतरवणं, त्यांना पसंत असे. त्यामुळे ‘हिंदू’ या शब्दाची शास्त्रीय व्याख्या करणं इत्यादी बौद्धिक काथ्याकूट करीत न राहता त्यांनी थेेट हिंदूंचे संघटन सुरू केलं.

एकदा नागपूरमधले एक तरुण वकील डॉक्टरांकडे आले आणि म्हणाले, “आपण संघटनेला सुरुवात केली, हे चांगलंच आहे; पण आपला वैचारिक पाया भक्कम हवा. त्यासाठी आपण हिंदुत्वाची व्याख्या करायला हवी.“ त्यावर डॉक्टर म्हणाले, “आपलं संघटन लोकांना आवडतं आहे. नागपूर खेरीज वर्‍हाड प्रांतात अन्यत्र काम वाढले आहे. पुण्या-मुंबईला शाखा सुरू झाल्या आहेत. उत्तर भारतातही काम सुरू झालं आहे. ते लोकांना आवडतं आहे. तेव्हा वैचारिक जंजाळात कशाला गुंतायचं?” वकील म्हणाले, “याआधी लोकमान्य टिळकांनी, वीर सावरकरांनी, महर्षी दयानंद सरस्वतींनी, इतकंच कशाला आपले लोकनायक अणे यांनीदेखील हिंदुत्वाची व्याख्या केली आहे. मग आपणही तशी व्याख्या करायला हवी किंवा या लोकांपैकी कुणाची तरी व्याख्या आपल्याला मान्य आहे, असं जाहीर करायला हवं. याशिवाय आपल्याला हिंदूंचं म्हणजे नेमकं कुणाचं संघटन करायचं आहे, याबद्दल वैचारिक स्पष्टता येणार नाही.”

एवढा संवाद झाल्यावर डॉक्टरांनी सरळ विषय बदलला. ते नागपूर शहरातल्या प्रांतातल्या, देशातल्या, विदेशातल्या विविध तत्कालीन विषयांवर गप्पा मारू लागले. वकीलही पक्के होते. ते दर दहा मिनिटांनी मूळ मुद्दा पकडून महणायचे, ”हे सगळं ठीकच आहे, डॉक्टर साहेब; पण तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू कोणास म्हणावे?” असं होता होता जेवणाची वेळ झाली. डॉक्टरांनी आग्रहपूर्वक वकिलांना स्वतःबरोबर जेवायला बसवलं. भाकरी आणि बटाट्याची भाजी असा अगदी साधा बेत होता. जेवताना डॉक्टर म्हणाले, ”आपण नागपूरवाले हा जो बटाटा खातो, तो छिंदवाडा बटाटा असतो. पुण्या-मुंबईचे लोक खातात, तो महाबळेश्वर बटाटा किंवा तळेगाव बटाटा.” असं म्हणत म्हणत डॉक्टरांनी देशभरातल्या बटाट्यांच्या असंख्य वाणांची आणि कोणत्या भागातले लोक कोणाला वाणाचं पीक घेतात आणि ते कुठे खाल्लं जातं, याबद्दलची भरभरून माहिती सांगितली.

वकील हे शेवटी वकीलच होते. ते म्हणाले, ”डॉक्टर साहेब, तुम्हाला वैद्यकशास्त्राबरोबरच राजकारण, समाजकारण, क्रांतिकार्य, खगोलशास्त्र यांचीही उत्तम माहिती आहे, असं मी ऐकून होतो; पण तुम्हाला शेती शास्त्राचंही अफाट ज्ञान आहे, हे मला आता कळलं. तरी माझी शंका कायमच आहे, बरं का! तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू कोणास म्हणावे?” आता यावर हसत-हसत; पण किंचित तीव्र स्वरात डॉक्टर म्हणाले, ”अहो, मला कशाला विचारताय हा प्रश्न? तिकडे मोमीनपुर्‍यात जा आणि विचारा, हिंदू कोणास म्हणावे? मिळेल तुम्हाला उत्तर.“ हा एवढा किस्सा सांगून शिवरायजी पुढे सांगायचे, मोमीनपुरा हा तत्कालिन नागपूरमधील एका विशिष्ट समाजाच्या वस्तीचा भाग होता. शिवरायजींच्या समोर बसलेल्या श्रोत्यांना योग्य तो बोध झालेला असायचा. सभागृहात हास्याची खसखस पिकायची; पण काही (माझ्यासारखे) चश्मिष्ट ’शंकासूर’ असायचेच. ते प्रश्नोत्तराच्या वेळी शंका काढायचेच,”म्हणजे शिवरायजी, डॉक्टराचं हे म्हणणं नकारात्मक-(नेगेटिव्ह) आहे, असं वाटतं. यातून असा अर्थ ध्वनित होती की, जो मुसलमान नाही, तो हिंदू. मग डॉक्टरांना किंवा आपल्याला, अशा नकारात्मक धारणेतून हिंदू संघटन करायचं आहे का?”

शिवरायजींना हा प्रश्न अपेक्षितच असायचा. ते सांगायचे. “ आपल्या या अफाट पसरलेल्या देशातल्या अमर्याद हिंदू समाजात कमालीची विविधता आणि वैचित्र्य आहे. कितीही काळजीपूर्वक सर्वसमावेशक व्याख्या करून गेलात, तरी कुठला तरी गट त्या व्याख्येबाहेर राहतोच आणि प्रत्यक्षात तो गट तर अगदी निष्ठावंत हिंदू असतो. तेव्हा व्याख्या कशाला करीत बसायचं? एक ओळख म्हणून तुम्हाला हवीच असेल, तर देशविरोधी, राष्ट्रघातकी असे समाज ज्यांचा तिरस्कार करतात, ज्यांना पराभूत करू इच्छितात, ते हिंदू. या राष्ट्रघातकी लोकांना मनोमन हे निश्चित ठाऊक आहे की, या देशात ते अराष्ट्रीय आहेत आणि आम्ही राष्ट्रीय आहोत. परंतु, काही शतकांच्या गुलामगिरीमुळे आम्हालाच आमच्या राष्ट्रीय असण्याचा विसर पडला आहे. आमच्या शत्रूंना मात्र त्यांच्या अराष्ट्रीयत्वाचा अजिबात विसर पडलेला नाही, म्हणून त्यांच्याचकडून आम्हाला पटकन समजेल की, हिंदू कोणास म्हणावे?”

शिवरायजी तेलंग आणि त्यांच्या संदर्भाने डॉक्टर हेडगेवारांचा हा किस्सा आठवण्याचं कारण आहे ‘बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ उर्फ ‘बीसीसीआय’. या संस्थेतर्फे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा. एक सर्वसामान्य क्रिकेट शौकीन म्हणून आपल्याला हे माहीत असेलच की, विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या दर पाच वर्षांनी भरवल्या जातात. ‘इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल’ उर्फ ‘आयसीसी’ ही क्रिकेट खेळाची सर्वोच्च संस्था या स्पर्धा आयोजित करते. आपल्याला हेही आठवत असेल की, १९८३ साली कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये झालेली विश्वचषक स्पर्धा जिंकून प्रथमच विश्वचषक भारतात आणला होता. त्या घटनेला ४० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या वेळचे सगळे खेळाडू आता जून २०२३ मध्ये एकत्र जमले होते.

त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स समाज माध्यमांवरून फिरत होत्या, तर आता ’आयसीसी’ आयोजित तेरावी विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवण्याचं यजमानपद ‘बीसीसीआय’ने स्वीकारलं आहे. खरं म्हणजे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्येच ती व्हायची होती; पण आता ती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. भारतातल्या विविध शहरांमध्ये हे सामने होतील आणि बहुधा उपान्त्य सामना आणि अंतिम सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. ‘गुजरात क्रिकेट असोसिएशन’च्या मालकीच्या या स्टेडियममध्ये तब्बल १ लाख, ३२ हजार आसनांची व्यवस्था आहे. निदान आज, तरी सर्वाधिक आसन संख्येचं हे जगातलं सर्वात मोठं स्टेडियम आहे. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार्‍या दहा संघांमध्ये अर्थातच पाकिस्तानी क्रिकेट संघही आहेच. ‘पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डा’ने नुकतेच ‘आयसीसी’ला कळवलं आहे की, आम्ही अंतिम सामन्यात पोहोचलो, तरच आम्ही अहमदाबादमध्ये खेळू, अन्यथा प्राथमिक फेर्‍यांमधले सामने अहमदाबाद आणि मुंबई या केंद्रामध्ये खेळण्याची आमची इच्छा नाही. म्हणून आमचे सुरुवातीचे सामने चेन्नई, बंगळुरू किंवा कोलकाता या केंद्रांमध्ये ठेवावेत.

आता गंमत पाहा हं! स्पर्धा होणार भारतात. भारताचं क्रिकेट बोर्ड त्यांचं यजमानपद करणार; पण मुख्य आयोजक कोण, तर ‘आयसीसी.’ तिचा चेअरमन ग्रेग बार्कले हा न्यूझीलंडचा. सीईओ जेफ अ‍ॅरल्डाईस हा ऑस्ट्रेलियाचा आणि जनरल मॅनेजर वासीम गुलजार खान हा काश्मिरी, ब्रिटिश. पण, २०१९ ते २०२१ या काळात ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’चा प्रमुख असणारा इसम.

म्हणजे भारतात आम्ही खेळू. पण, आमच्या पसंतीच्या शहरातच खेळू. अहमदाबाद आणि मुंबई आम्हाला नापसंत आहेत. चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता आम्हाला पसंत आहेत. असं का? ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’चे अध्यक्ष नजम सेठी यांनी कोणतंही कारण दिलेलं नाही; पण ते स्पष्टच आहे. अहमदाबाद आणि मुंबईतली राज्य सरकारं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ‘बेगानी’ वाटतात, तर चेन्नई, बंगळुरू आणि कोलकातामधली सरकारं ‘आपली’ वाटतात. आता समजा ‘आयसीसी’कडून ‘बीसीसीआय’ला सूचना आली की, पाकिस्तानी क्रिकेट संघाचे सामने त्यांना हव्या त्या ठिकाणी खेळवा; तर ‘बीसीसीआय’ ती सूचना स्वीकारणार का? ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष रॉजर बिन्नी हा आपल्याला एक लोकप्रिय अष्टपैलू खेळाडू म्हणून माहीत आहे. उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे राज्यसभेत काँग्रेसचे खासदार आहेत, तर कार्यवाह जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव आणि गुजरातमधील यशस्वी उद्योजक आहेत. आता ‘आयसीसी’ने पाकिस्तानला अनुकूल भूमिका घेतल्यास ‘बीसीसीआय’च्या निर्णयात राजकारण येणार हे नक्की.

मूळात ‘पाकिस्तान बोर्डा’ने हे जे पसंती-नापसंतीचं नाटक सुरू केलं आहे, त्यामागे आमचे-तुमचे या भावनेबरोबरच प्रचंड पैसा, हे कारण आहे. लक्षात घ्या, २०२२ या वर्षी ‘आयसीसी’चं एकूण उत्पन्न १ हजार, ५३६ दशलक्ष डॉलर्स एवढं होतं. यातला मोठा हिस्सा ‘बीसीसीआय’चा होता. म्हणजे इंग्लंड या क्रिकेटच्या जन्मभूमीपेक्षा आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या वसाहतींपेक्षा अधिक उत्पन्न एकटा भारत देश मिळवून देतो. भारत आजही इंग्लंडसाठी ‘कामधेनू’ आहे. अशा स्थितीत येत्या ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ मध्ये आशिया चषक स्पर्धा होऊ घातल्या आहेत. यातले काही सामने पाकिस्तानात, तर काही श्रीलंकेत होणार आहेत, तर ‘बीसीसीआय’चे कार्यवाह जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितलं की, भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये जो काही तणाव आहे, तो लक्षात घेता, आमचा संघ पाकिस्तानात येणार नाही. आता भारत येणारच नसेल, तर तुमचा खेळ बघायला स्टेडियममध्ये येणार कोण? म्हणजेच ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’चं कित्येक कोटींचं उत्पन्न बुडालं की! तेव्हा याचा एकप्रकारे सूड म्हणून नजम सेठी हे नाटक करीत आहेत.

या सगळ्याच नाटकांवरचा उतारा हा आहे की, प्रेक्षकांनी यांच्याकडे साफ पाठ फिरवणं आणि ते होणारच आहे. कारण, क्र्रिकेट या खेळाचे आणि त्याच्याशी संबंधित मंडळींचे आपल्याकडे अतिलाड चाललेत. सर्वसामान्य माणूस आता या ‘फाईव्ह स्टार’ खेळाला कंटाळला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.