जनसेवा करणाऱ्या फडणवीस शिंदेंनाच मिळणार जनतेचा कौल

    28-Jun-2023   
Total Views |
Narendra Patil On Maharashtra State Development

मुंबई
: ''अडीच वर्षे महाराष्ट्रावर शासन केलेल्या ठाकरे सरकारवर राज्यातील जनतेची नाराजी आहे हे सत्य आहे. वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस शिंदे सरकारने जनतेची नाडी ओळखून आवश्यक त्या प्रकल्पांना मान्यता देत दिवसरात्र जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. महामंडळांसह विकास कामांकडे झालेले ठाकरे सरकारचे दुर्लक्ष विरुद्ध जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने काम करणारे फडणवीस शिंदे सरकार यात जनता जनसेवा करणाऱ्या फडणवीस शिंदेंनाच येत्या निवडणुकीत कौल देऊन विजयी करेल,' असा विश्वास भाजपचे नेते तथा स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

फडणवीस शिंदे सरकारची वर्षपूर्ती, राज्यातील सध्याची राजकीय स्थिती, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारी ठाकरे गटाची कुचंबणा आणि स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने वर्षभरात केलेली कामे यासह विविध मुद्द्यांवर नरेंद्र पाटील यांनी 'मुंबई तरुण भारत'शी मुक्त संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

प्रश्न :फडणवीस शिंदे सरकारच्या वर्षभराच्या कार्यकाळाचे मूल्यमापन कसे कराल ?

उत्तर : फडणवीस शिंदे सरकारने हिंदुत्वाची भूमिका घेत चालवलेले हे सरकार नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. मविआ सरकारच्या कार्यकाळात मुख्य प्रवाहापासून काहीसा दुरावलेला आणि दुखावलेला हिंदू समाज फडणवीस शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून पुन्हा एकदा स्वाभिमानाने उभा राहिला असून हिंदू अत्याचाराच्या विरोधात प्रखरपणे भूमिका विद्यमान सरकार घेत आहे. अनेक महत्त्वाचे परंतु मविआ काळात रखडलेले प्रकल्प होते त्यांना गती देण्यासोबतच नव्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवून ते पूर्ण करून महाराष्ट्र गतिमान करण्याचे काम फडणवीस शिंदे सरकारने वर्षभरात केले आहे.

प्रश्न : तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने केलेली उल्लेखनीय कामे कोणती ?
 
उत्तर : राज्यातील मराठा समाज स्वावलंबी झाला पाहिजे असा विचार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मांडला होता आणि त्या अनुषंगाने सरकार उत्तमप्रकारे काम करत आहे. फडणवीसांनी या महामंडळाची व्याख्या बदलून त्यात नवे सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण बदल करून मराठा युवकांना पायांवर उभे राहण्यासाठी मोठी मदत गेल्या वर्षभरात केली आहे. गेल्या ८ महिन्यात सुमारे ६५ हजार युवकांना औद्योगिकदृष्ट्या सक्षम करण्यात यश मिळविले आहे. युवकांना सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून साडे चार हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून देऊन व्यवसाय उभे करण्यास सरकारने आणि महामंडळाने भरीव मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सुरु करण्यात आलेली परंतु दुर्दैवाने अजित पवारांनी उपमुख्यमंत्री असताना बंद केलेली ट्रॅक्टरची योजना आम्ही पुन्हा नव्याने सुरु केली आहे. व्याज परतव्यासह महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची मर्यादा वाढवण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतले आहेत. मराठा समाजातील एक लाख युवकांना उद्योजक बनवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आम्ही २०२४ पूर्वी निश्चितपणे पूर्ण करणार हा आम्हाला विश्वास आहे.

प्रश्न : सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची स्थिती कशी आहे ?

उत्तर : काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला सातारा जिल्हा आता काँग्रेसच्या मक्तेदारीतून बाहेर पडला आहे. आताची युवा पिढी नवे पर्याय शोधत असून ते प्रस्थापितांच्या राजकारणाला पर्याय म्हणून भाजप शिवसेनेकडे आशेने पाहत आहेत. कोल्हापूर आणि साताऱ्यात काही मंडळींना सोबत घेतल्याने आम्हाला नक्कीच मोठे यश मिळाले, मात्र साताऱ्यात २०१९ साली भाजपचा खासदार निवडून येऊ शकला नाही याची खंत आमच्या मनात आहे. भाजपने सोबतीला घेतलेल्या या नेत्यांच्या सहकार्याने आणि सद्यस्थितीपेक्षा अधिक जोमाने काम केल्यास भाजप सातारा जिल्ह्यात मजबूत स्थान निर्माण करेन यात दुमत असण्याचे कारण नाही. देवेंद्र फडणवीसांसह भाजपाची दिग्गज नेतेमंडळी साताऱ्यात दौरे करत असून त्यांच्या नेतृत्वात आम्ही साताऱ्यात परिवर्तन करणार हे निश्चित आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.