बालेकिल्लाही खालसा होणार

    21-Jun-2023   
Total Views |
Maharashtra Politics Shivsena UBT And Shinde Shivsena

हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी शिवसेनेचे दोन तुकडे होऊन आता वर्ष पूर्ण झाले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याने आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि अख्खी शिवसेना उद्धव यांच्या हातून निसटली; पण या सगळ्या घटनाक्रमांतून उद्धव ठाकरेंनी काहीही धडा घेतला हेच सत्य. ठाकरेंचे युवराज आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळीतही असाच प्रकार घडण्याची दाट शक्यता असून, आमदार सुनील शिंदे ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे बोलले जाते. आदित्यचे राजकीय बस्तान बसविण्यासाठी सुनील शिंदे यांच्या मेहनतीतून उभा केलेला वरळी मतदारसंघ वापरण्यात आला आणि सुनील शिंदेंची बोळवण विधान परिषदेवर करण्यात आली. सोबतच शिंदेंना प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांनाही पक्षात घेऊन परिषदेवर धाडण्यात आले. तिथूनच ‘शिंदे विरूद्ध अहिर’ वाद सुरू झाला. सद्य:स्थितीत अहिर यांच्यावर ‘मातोश्री’चा वरदहस्त असून, ते वरळीत हवा तसा कारभार करत असल्याचा आरोप काही शिवसैनिक करतात. निष्ठावंत सुनील शिंदेंसह कडवट शिवसैनिकांना बाजूला सारून अहिरांसारख्या नवख्या शिवसैनिकाच्या हाती पक्षाची धुरा देणे, अनेकांना रुचलेले नाही अन् त्यातून आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापर्यंत काही जण तयारीत आहेत. आदित्य ठाकरे २०१९साली सहजगत्या निवडून आले खरे, पण त्यांचा हा बालेकिल्ला आता ढासळू लागला आहे. स्थानिक मतदारांमध्ये मूलभूत प्रश्नांवरून ठाकरेंवर असलेली नाराजी जगजाहीर आहे. बीडीडी पुनर्वसन आणि कोस्टल रोडचे घोंगडे भिजत ठेवल्याने हक्काचा मतदार आणि मच्छिमार समाज ठाकरेंपासून दुरावला. एकाच मतदारसंघात दिलेल्या दोन विधान परिषदेच्या आमदारांमधील विसंवाद आणि स्पर्धा ठाकरे गटाला कमकुवत करण्यासोबतच आदित्य ठाकरेंच्या पुढील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वात मोठा अडथळा ठरू शकते. त्यामुळे कधीकाळी ठाकरेंचा हक्काचा राहिलेला आणि आदित्य यांचा मतदारसंघ असलेला बालेकिल्ला आता खालसा होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे किमान वरळी हातात ठेवून आपली उरलीसुरली अब्रू वाचवणं, हाच आता ठाकरेंसमोरचा एकमेव पर्याय असणार आहे.

पराभवाची चाहूल लागली !

जेव्हा एखादा खेळाडू किंवा संघ मैदानात प्रतिस्पर्ध्यांचा सामना करू शकत नाही किंवा जेव्हा त्याला आपल्या पराभवाची जाणीव होते, तेव्हा तो इतर मार्गाने पळ काढतो किंवा प्रतिस्पर्ध्याला बदनाम करण्याचे हर एक प्रयत्न करतो. याच रणनीतीचा अवलंब उद्धव ठाकरे आणि गट करत असून, मुंबई महापालिकेचा गड आपल्या हातून निसटल्याचे ठाकरेंच्या पुरते लक्षात आले आहे. शिवसेना भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. मुळातच गेल्या वर्षभरातील घटनाक्रम आणि फडणवीस-शिंदेंचे बळकट होणे, या सगळ्या घटनांमुळे मुंबई महापालिकेची निवडणूक लढण्याआधीच आपण हरलो आहोत, अशी मानसिकता उद्धव ठाकरेंची झाली आहे. महापालिकेच्या पैशांचा गैरवापर आणि भ्रष्टाचार होत असून, त्यापासून जनतेची मुक्तता करण्यासाठी आपण मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. मात्र, गेल्या २५ वर्षांत किती वेळा ठाकरेंनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पालिकेला जाब विचारला किंवा पालिकेवर मोर्चा काढला आहे, हा प्रश्न उद्भवतो. मुळात मुंबईच्या मूलभूत आणि खर्‍याखुर्‍या प्रश्नांची जाणीव, तरी उद्धव ठाकरेंना आहे का? याचे उत्तर ठाकरेंच्या समर्थक आणि नेत्यांनी दिले पाहिजे. ठाकरेंच्या काळात मुंबई महापालिकेत हजारो कोटींच्या गैरव्यवहाराची आणि कथित भ्रष्टाचाराची ‘एसआयटी’मार्फत चौकशी होणार, हे स्पष्ट झाल्यापासून ठाकरे गटाचे धाबे दणाणले आहेत. युवराज आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरे आता फडणवीस-शिंदेंच्या धुवाँधार बॅटिंगसमोर टिकाव धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नाही म्हटलं, तरी वर्षभरापूर्वी आदित्य ठाकरेंच्या मोजक्या सभांना प्रतिसाद मिळालादेखील होता; पण ती सहानुभूती आता राहिलेली नाही. निवडणुकांचे रण जिंकायचे असेल, तर त्यासाठी शिलेदार आणि तोफगोळा लागतो. दुर्दैवाने ठाकरेंकडे या दोन्हींचा मोठा अभाव. त्यामुळे महापालिकेत होणार्‍या संभाव्य पराभवाची चाहूल लागल्यामुळेच ठाकरेंकडून मोर्चाची घोषणा करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही, हे तितकेच खरे!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.