मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे...

Total Views |
South American country of Ecuador Babahoyo Case

समर्थ रामदासांचा मनोबोध किंवा मनाच्या श्लोकांपैकी ’मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे’ हा श्लोक फारच प्रसिद्ध आहे. कारण, अनेकांच्या अगदी नित्य म्हणण्यातल्या असा तो श्लोक आहे. पण, ’मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात पहिला पुनर्जीवित होत आहे’ (समर्थांची क्षमा मागून) असाही विस्मयकारक प्रकार कधीकधी घडत असतो.

मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे, याबाबत सर्वच संत मंडळींनी भरभरून लिहून ठेवलं आहे. समर्थ रामदासांचा मनोबोध किंवा मनाच्या श्लोकांपैकी ’मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे’ हा श्लोक फारच प्रसिद्ध आहे. कारण, अनेकांच्या अगदी नित्य म्हणण्यातल्या असा तो श्लोक आहे. पण, ’मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात पहिला पुनर्जीवित होत आहे’ (समर्थांची क्षमा मागून) असाही विस्मयकारक प्रकार कधीकधी घडत असतो. तसा प्रकार अगदी नुकताच दक्षिण अमेरिकेतल्या एक्वाडोर या देशातल्या बाबाहोयो नामक शहरात घडला. बेला मोंटोयो नावाची एक महिला मरण पावली. तिचं वय ७६ होतं. ती सेवानिवृत्त परिचारिका होती. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिचा मृतदेह तपासून मृत्यूचा दाखला दिला. ख्रिश्चन धर्मीय परंपरेनुसार तिचा मुलगा गिल्बर्टी याने तिचा मृतदेह ’अंडरटेकर’च्या स्वाधीन केला, हे ’अंडरटेकर’ लोक मृतदेहाला स्वच्छ करून नवे कपडे घालून, शवपेटीत ठेवून नातेवाईकांच्या स्वाधीन करतात.

मग ती शवपेटी त्या कुटुंबाच्या चर्चमध्ये नेण्यात येते. पाद्री त्या मृतासाठी खास प्रार्थना करतात. नातेवाईक, मित्र त्या प्रार्थनेत नटून-थटून सामील होतात. असा सगळा एक मोठा समारंभच असतो. तो कित्येक तास किंवा मृत व्यक्ती फार प्रसिद्ध किंवा लोकप्रिय वगैरे असेल, तर कित्येक दिवससुद्धा चालतो. ‘अंडरटेकर’ लोक मृतदेह स्वच्छ करताना विशेष रसायनांचा वापर करतात. त्यामुळे तो खराब होऊन दुर्गंधी येणे इत्यादी घडत नाही. असा दरोबस्त सोहळा करून मग एकदाची ती शवपेटी जमिनीतल्या खड्डयात ठेवून वर माती लोटतात.

तर बेला मोंटोयोचा मृतदेह तिचा मुलगा गिल्बर्टो याने ‘अंडरटेकर’कडून पुन्हा स्वतःच्या ताब्यात घेतला आणि चर्चकडे चालवला आणि काय चमत्कार! गिल्बर्टोला शवपेटीच्या आतून टकटक आवाज येऊ लागला. पहिल्यांदा तर तो घाबरलाच, मग धीर करून त्याने शवपेटीचं झाकण उघडलं. बघतो, तर काय त्याची आई जीवंत आहे. तिने डोळे उघडले आहेत आणि एक हात वर करून ती शवपेटीचं झाकण आतून खटखटावत आहे. प्रथम भय, मग विस्मय आणि अखेर आनंद अशा भावनांनी गिल्बर्टो भारावून गेला. सर्वात आधी त्याने सध्याच्या प्रथेप्रमाणे या प्रसंगाची एक व्हिडिओ क्लिप बनवली आणि समाजमाध्यमांवर सोडून दिली. क्षणार्धात ती जगभर व्हायरल झाली, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, हौशे-नवशे-गवशे पत्रकार सगळ्यांनी हे खरं आहे का, म्हणून प्रत्यक्ष बघण्यासाठी बाबाहोयो शहरातल्या त्या विशिष्ट चर्चकडे धाव घेतली. बघतात तर खरंच! बेला मोंटोयो म्हातारी चांगली टुणटुणीत जीवंत आहे. अगदी या जून २०२३ मध्येच ही घटना घडली आहे.

बाबाहोयो या शहराच्या नावावरून कदाचित कुणाला ते मालवणजवळ कुठेतरी असेल, असे वाटेल. पण, ते दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर म्हणजेच पॅसिफिक महासागरावरच्या एक्वाडोर या देशात आहे. हा देश पेरू आणि कोलंबिया या देशांदरम्यान अँण्डीज पर्वताच्या दर्‍याखोर्‍याला नि किनारपट्टीवर वसलेला एक छोटासा देश आहे. प्रचंड आकाराच्या कासवांसाठी प्रसिद्ध असलेलं गॅलॅपगॉस हे बेट याच देशाच्या मालकीचं असून, ते त्याच्या मुख्य भूमीपासून थोडं दूरवर महासागरात आहे. इथले नागरिक मूळचे ’इंका’ या अतिशय प्रसिद्ध जमातीचे. पण, १५३३ मध्ये स्पेनने हा देश जिंकून संपूर्ण बाटवला. त्यामुळे आज तिथले ९५ टक्के लोक रोमन कॅथलिक ख्रिश्चन आहेत.

आता रोमन कॅथलिक म्हटले की, ते स्वतःच्या धर्मापुरते जरी अत्यंत श्रद्धाळू असतात. कारण, खुद्द त्यांचा देवपुत्र येशू नव्हे का, असाच मृत होता पुनरुज्जीवित झाला? येशूला रोमन सैनिकांनी जेरुसलेम शहराबाहेरच्या एका टेकडीवर नेऊन देहांत शासन दिलं. म्हणजे एका लाकडी क्रूसावर त्याला बांधून त्याचे हात, पाय, छाती आणि कपाळ यांच्यात मोठमोठे खिळे ठोकले. येशूचं शरीर निष्प्राण झाल्याची खात्री पटल्यावर ते निथून निघून गेले. मग येशूच्या शिष्यांनी त्याचं मृत शरीर क्रूसावरून खाली उतरवून एका शवपेटीत ठेवलं आणि जवळच ती शवपेटी पुरून टाकली. दोन दिवस उलटले. तिसर्‍या दिवशी सकाळी येशूची महिला शिष्या मेरी मॅग्दालेन त्या दफनस्थानी गेली. बघते तर येशूची शवपेटी उघडलेली आहे. तिच्यात मृतदेह नाही. उलट एक देवदूत म्हणजे पंख असलेल्या गोंडस छोटा मुलगा तिथे बसलाय.

तो मेरीला म्हणाला, “येशू पुनर्जीवित-री सरेक्ट- झालाय.“ असे सांगून देवदूत नाहीसा झाला. मग मेरी आणि अन्य शिष्यांनी येशूचा शोध घेतला. तेव्हा तो चांगला ठणठणीत जीवंत असून, जेरुसलेमच्या गरीब वस्त्यांमध्ये भ्रमण करतोय, असं त्यांना दिसलं. येशूला क्रूसावर चढवलं, तो दिवस शुक्रवार होता. म्हणून खरं म्हणजे पूर्वी त्याला ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणत असत. पण, कालांतराने त्याला ‘गुड फ्रायडे‘ म्हणू लागले, म्हणून त्यानंतर येणार्‍या रविवारला ’ईस्टर संडे’ किंवा ’डे ऑफ री सरेक्शन ’असं म्हणतात. ज्यांना योगमार्गाची थोडीफार माहिती आहे, यांना यात काहीच विशेष वाटणार नाही. येशू हा योग अभ्यासक होता, विशिष्ट योग क्रियेने त्याने आपले प्राण सहस्रार चक्रामध्ये नेऊन ठेवले. यामुळे रोमन सैनिकांना त्याचा देह निष्प्राण भासला. मग योग्य वेळी त्याने ते प्राण पुन्हा शरीरात आणले. शरीर नुसतं सजीव झालं, एवढंच नव्हे, तर त्याच्यावरच्या खिळ्यांच्या जखमाही नाहीशा झाल्या. ख्रिश्चन परंपरेनुसार हे सगळे इ.स.३३ या वर्षी घडलं.

पण, यापेक्षाही चित्तचक्षुचमत्कारिक अशी कथा आपल्या हिंदू परंपरेत घडलेली नमूद आहे. इसवी सन पूर्व ४५० या काळात वररुचि नावाचा एक महान व्याकरणकार होऊन गेला. वररुचि, इंद्रदत्त आणि व्याडी असे तिघे मित्र वर्ष नावाच्या गुरुकडे व्याकरण शिकले. विद्या पूर्ण झाली की, एखाद्या राजाकडे जायचं, त्याच्या सभेतल्या पंडितांसमोर परीक्षा देऊन राजाकडून दक्षिणा किंवा नेमणूक मिळवायची. मग राजाकडे राहायचं किंवा देशपर्यटन करून आवडेल तिथे स्वतःचं विद्यालय, गुरुकुल सुरू करायचं, अशी यावेळी पद्धत होती. त्यानुसार हे तिघे मित्र मगध सम्राट योगानंद याच्या राजधानी पाटलीपुत्र नगरीत पोहोचले. पण दुर्दैव त्यांचं! राजा योगानंद त्याच दिवशी मरण पावला होता. राजधानी शोकमग्न होती. राजवाड्यात राजाच्या अंतिम यात्रेची तयारी सुरू होती.

तिघे मित्र खिन्न होऊन एका उपवनात बसले. पण, इंद्रदत्त मोठा योगाभ्यासकही होता. त्याने एक योजना आखली. तो म्हणाला, “मला योगक्रियेने प्राण या शरीरातून काढून दुसर्‍या मृत शरीरात प्रवेश करता येतो. मी त्या रीतीने राजाच्या मृत शरीरात प्रवेश करतो. वररुचि तू माझ्याकडे यायचंस, मी तुला एक घसघशीत रक्कम देईन. तोपर्यंत व्याडी तू माझ्या मृतदेहाचं रक्षण करीत इथेच बसायचंस. वररुचि, तू ती रक्कम घेऊन पुन्हा इथे आलास की, मी माझे प्राण या मूळ शरीरात आणेन. मग ती रक्कम आपण वाटून घेऊ आणि आपापल्या मार्गाने जाऊ.”

बेत सुरू झाला. राजा योगानंदाच्या मृत शरीरात एकाएकी चैतन्य आलं. शोकमग्न राजवाड्यात एकदम विस्मय आणि आनंद परतला. पण, राजाचा प्रधान शाकटाल हा मोग मुरब्बी माणूस होता. तांत्रिक योगप्रक्रियांबद्दल त्यानेही ऐकलेलं होतं. वररुचि राजवाड्यात आला. त्याचं, इतर पंडितांचं आणि राजाच्या शरीरात प्रवेशलेल्या इंद्रदत्ताचं बोलणं सुरू झालं. शाकटालाने आपले चतुर हेर राजधानीत सर्वत्र पाठवले आणि त्यांना सक्त आदेश दिला. कुठेही एखादा पुरूष मृतदेह, काहीही कारण नसता, अग्नि न देता उगीचच ठेवलेला आढळला, तर ताबडतोब त्याला अग्नी द्या. हेरांना नगराबाहेरच एका उपवनात तसा देह आढळला, याचं रक्षण करीत बसलेल्या व्याडीला कोणतंही पटणारं कारण देता येईना. वररुचि मोठ्या रकमेची थैली घेऊन उपवनात पोहोचला, तर काय इंद्रदत्ताचे शरीर चितेवर जळतंय आणि व्याडी कपाळाला हात लावून बसलाय!

आता इंद्रदत्ताची पंचाईत झाली. त्याचं मूळ शरीर नष्ट झालं आणि प्राण राजा योगानंदाच्या शरीरात अडकून पडले. त्याचा खूप तडफडाट झाला. पण, आता काहीच इलाज नव्हता. मग त्याने हळूहळू राजा या नात्याने आपली कामं करायला सुरुवात केली. योगानंदाला ‘महापद्मनंद’ असंही नाव होतं. त्याच्या अंमलाखालचं नंद साम्राज्य हे तत्कालीन भारतातलं एक प्रबळ आणि समृद्ध साम्राज्य होतं. उपलब्ध इतिहासानुसार, सिंधू नदीपर्यंत येऊन सिंधू नरेश राजा पुरू याचा पराभव केल्यावर सुद्धा अलेक्झांडर माघारी फिरला. कारण, दुर्दैवाने राजा पुरुचा पराभव झालेला असला, तरी त्याच्या सैन्याने हाणलेल्या जबर तडाख्यांनी अलेक्झांडरचं सैन्य हादरलं होतं. त्यातच त्यांना कळलं की, आता यापुढे मगधाच्या नंद साम्राज्याशी गाठ पडणार आहे, नि ने सैन्य तर अधिकच कडवं आहे. तेव्हा त्यांनी हाय खाऊन बंड पुकारलं. त्यामुळे जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर भारताच्या सीमेवरूनच माघारी पळत सुटला.

परंतु, पुढे हा महापद्मनंद उर्फ योगानंद किंवा त्याच्या देहातला इंद्रदत्त फार धनलोभी बनला. संपत्तीच्या अनिवार लोभाने त्याने प्रजेवर नाना प्रकारचे कर लावून अमाप धन जमवलं. म्हणून लोक त्याला म्हणू लागले- धनानंद. संपत्ती आणि सत्ता यांच्या मदाने धनानंद हळूहळू अधिकाधिक उन्मत्त होत गेला. या अहंकारानेच त्याने राजसमेत आलेल्या तक्षशीला विद्यापीठातले श्रेष्ठ आचार्य चाणक्य यांचा घोर अपमान केला. पुढची कथा मी सांगायला नको. आचार्य चाणक्यांनी राज्यक्रांती घडवली आणि आपला शिष्य चंद्रगुप्त याच्या तलवारीने धनानंदाचा शिरच्छेद करवला. म्हणजेच इंद्रदत्ताचे प्राण एकदाचे मोकळे झाले.

आता अगदी २०१४ मध्ये घडलेल्या घटनेने या लेखाचा समारोप करतो. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद शहरात राहणारा श्रीकेश कुमार हा एक साधा इलेक्ट्रिशियन आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये एका रात्री तो घराकडे परतत असताना एका मोटर बाईकवाल्याने त्याला उडवलं. डॉक्टरांना तो मृतावस्थेत आढळला. रात्र बरीच झाली होती. म्हणून शवागारातल्या डॉक्टरांनी ठरवलं की, उद्या सकाळी शवविच्छेदन, पंचनामा इत्यादी सोपस्कार रीतसर करून देह नातेवाईकांना देऊ. रात्री सुमारे १ ते सकाळी ८ असा सात तास तो देह शवागाराच्या बर्फाळ पेटीत पडलेला होता. सकाळी ८ वाजता श्रीकेश कुमारला शवविच्छेदनासाठी टेबलवर घ्यायला म्हणून गेले, तर त्याच्या देहाची हालचाल होत होती. भय, विस्मय आणि नातेवाईकांमध्ये आनंदी आनंद होऊन श्रीकेशला घरी पाठवण्यात आलं. देव तारी, त्याला कोण मारी?

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.