तुमसे ना हो पाएगा!

    15-Jun-2023   
Total Views |
Maharashtra Politics BJP-Shiv Sena alliance

भाजप-शिवसेना युती सरकारच्या कामगिरी आणि येत्या निवडणुकांमध्ये होणार्‍या संभाव्य विजयाचे संकेत देणारे एक सर्वेक्षण नुकतेच प्रसिद्ध झाले. या सर्वेक्षणातून राज्यातील जनतेचा कौल भाजप-शिवसेनेला असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, हे सर्वेक्षण खोटे आणि तथ्यहीन असल्याचा सांगत ‘मविआ’ने आपणच ताकदवर असल्याचा दावा केला आहे. त्यासोबतच काँग्रेस पक्षानेही एक अंतर्गत सर्वेक्षण केले असून, त्यात काँग्रेस लोकसभेच्या २८ जागा लढण्यास सक्षम असल्याचे दाखवण्यात आले आहे. मुळातच काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणात, मोदींच्या झंझावातासमोर आणि फडणवीसांच्या करिष्म्यासमोर लढण्याच्या स्थितीत आहे का? हा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. २०१२ पासून काँग्रेसच्या अधःपतनाला देशभरात सुरुवात झाली आणि २०१४च्या निवडणुकीत एक, तर २०१९ मध्ये पक्षाचा एकमेव खासदार निवडणूक जिंकू शकला, हा इतिहास आहे. २०१४च्या तुलनेत २०१९ मध्ये देशात भाजपच्या बाजूने असणारी लाट अधिक प्रभावशाली होती, तर मोदींच्या नावाचे गारूड केवळ देशावरच नाही, तर जगावर राज्य करत होते. २०१९ नंतर आज चार वर्षांपश्चातही राजकारणाची दिशा भाजपच्या बाजूने असून, काँग्रेसच्या अवस्थेत फारसे सकारात्मक बदल घडवण्यात नेतृत्वाला यश आलेले नाही. आज महाविकास आघाडीच्या कडबोळ्यात काँग्रेसची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ याहून वेगळी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमणकारी पद्धतीने काँग्रेस आणि ठाकरे गटाला संपवण्याच्या हेतूने शांतपणे आणि रणनीती आखून लोकसभा-विधानसभेसाठी वाढीव जागांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजप-शिवसेना विकासकामांच्या जोरावर जनतेसमोर जात आहेत. पण, काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या आणि नेत्यांमधील परस्परांविषयीची असूया संघटन असूनही पक्षाला मुख्य प्रवाहापासून दूर लोटताना दिसते. नाही म्हटलं, तरी नाना पटोले काँग्रेससाठी इतर पक्षांशी भांडत असल्याचे चित्र आहे, पण केवळ भांडण केले म्हणून संघटना बळकट होत नाही, हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. भाजप-शिवसेनेच्या बाजूने समोर आलेले सर्वेक्षण खोटे असल्याचा कांगावा करणार्‍या काँग्रेसने आपल्या अंतर्गत सर्वेक्षणारून २८ जागांची मागणी केली, तर काँग्रेसला ’तुम से ना हो पाएगा’ इतकंच सांगणं सध्या तरी पुरेसं!

मुंबई काँग्रेसवर ‘वर्षा’दृष्टी

महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये मुंबईत मागील आठवड्यात एक महत्त्वपूर्ण घटना घडली. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसकडून संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून, मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली. काँग्रेसमध्ये अजूनही थेट नेमणुकीचीच परंपरा आहे. नाना पटोले आणि इतर काँग्रेस नेत्यांमधील संघर्षात खालच्या नेत्यांचा ‘गेम’ होतो, तसाच प्रकार माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या बाबतीत झाला. त्यांच्या जागी प्रस्थापित असलेल्या गायकवाड कुटुंबातील वर्षा एकनाथ गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली. महिला, सुशिक्षित चेहरा, मंत्रिपदाचा अनुभव, धारावीसारख्या भागाच्या लोकप्रतिनिधी आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठता या निकषांवर त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याचे बोलले जाते. असे असले तरी त्यांच्या या निकषांचा मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला कितपत फायदा होणार, हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा. मुंबई काँग्रेसने वर्षभरापासून महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या घोषणा केलेल्या असताना वर्षा गायकवाड ठाकरेंशी जुळवून घेणार की स्वबळावर कायम राहणार? हा प्रश्न जनतेपेक्षा काँग्रेससाठी अधिक महत्त्वाचा. मुंबईचे बदलते राजकारण, भाजपची वाढती आक्रमकता, शिंदेंच्या शिवसेनेला मिळत असलेला पाठिंबा आणि ‘मविआ’ची अस्थिरता या सगळ्या द्वंद्वात काँग्रेसची नौका कुठपर्यंत तग धरणार? याचे उत्तर वर्षा गायकवाड यांना कामातून द्यावे लागणार आहे. वर्षा गायकवाड आणि त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी अनेक वर्षांपासून धारावीचे प्रतिनिधित्व आणि काँग्रेसच्या संघटनेवर पकड कायम ठेवलेली आहे. वर्षा गायकवाड यांचा धारावीत काहीसा प्रभाव असला, तरी मुंबईतील संपूर्ण सहा लोकसभा आणि ३६ विधानसभांमध्ये त्यांचे नेतृत्व पूर्णपणे स्वीकारले जाईल का? याचे उत्तर स्वतः गायकवाडही देऊ शकणार नाहीत. धारावीचा पुनर्विकासाचा वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडवण्यात गायकवाड सपशेल अपयश ठरल्या. त्यामुळे ज्यांना मतदारसंघाचे प्रश्न सोडवता आले नाहीत, ते मुंबईकरांच्या समस्या काय सोडवणार, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताना दिसतो.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.