हिमंता बिस्व सरमा: बदलत्या आसामचे दमदार नेतृत्व

    09-May-2023   
Total Views |
Himanta Biswa Sarma


आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे कोणताही गंड न बाळगता, हिंदू राष्ट्रवादाची भूमिका मांडत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली केवळ आसामच नव्हे, तर संपूर्ण ईशान्य भारतातील फुटीरतावादाचा अंत होण्यास प्रारंभ झाला आहे. ईशान्य भारतास विकासाची अष्टलक्ष्मी बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयास सरमा यांनी बळ दिले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दोन वर्षांमध्ये सरमा यांनी आसाममध्ये शांतता प्रस्थापित करून राज्याला विकासाच्या मार्गावर आणण्यामध्ये यश प्राप्त केले आहे. त्यानिमित्ताने...

ईशान्य भारताच्या राजकीय इतिहासाचा विचार करायचा झाल्यास, त्यामध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. मुख्यमंत्री सरमा यांची गणना अशा मोजक्या व्यक्तिमत्त्वांमध्ये केली जाईल, ज्यांनी या प्रदेशाचे भाग्य घडवण्यात आणि त्याला दुर्दशेतून बाहेर काढण्यात मोठी भूमिका बजावली. ‘ऑल आसाम स्टुडंट युनियन’पासून (आसु) त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली. या पक्षाने एक प्रदीर्घ चळवळ सुरू केली. ज्याने इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन पंतप्रधानांसमोर सर्वांत मोठे राजकीय आणि प्रशासकीय संकट उभे केले होते. त्यानंतर हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, काँग्रेस पक्षात केवळ घराणेशाहीस दिले जाणारे महत्त्व आणि गांधी कुटुंबीयांचा आसामसह ईशान्य भारतविषयक नकारात्मक दृष्टिकोन पाहून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपले नाणे खणखणीत असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले आहे.

Himanta Biswa Sarma

 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे केवळ आसाम आणि ईशान्य भारतातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात आपल्या प्रखर हिंदू राष्ट्रवादी भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या चाहत्यांची एक फळी देशभरात उभी राहिली. ज्या ईशान्य भारतामध्ये भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षास जनाधार प्राप्त होणार नाही, तेथे हिंदुत्वाचा मुद्दा चालणार नाही, येथील वनवासी समुदाय भाजपला स्वीकारणार नाही, अशा अनेक गैरसमजांना खोडून काढून भाजपने आज तेथे भक्कम जनाधार प्राप्त केला आहे. आसामसारख्या महत्त्वाच्या राज्यामध्ये सलग दुसर्‍यांदा सत्ता प्राप्त केली आहे, त्यामध्ये हिमंता बिस्व सरमा यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा असल्याचे नाकारता येणार नाही. केवळ आसामच नव्हे, तर अन्य राज्यांमध्येही आता प्रचारामध्ये सरमा हे आघाडीवर असतात. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही हिमंता बिस्व सरमा यांच्या सभा, रोड शो आणि चर्चासत्रांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. सरमा यांनी विविध पक्षांमध्ये काम केले असले तरीही त्यांची क्षमता भाजपनेच योग्यप्रकारे ओळखली. जनतेची नाडी ओळखण्याची कला, संघटनात्मक क्षमता, कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याची क्षमता, सहकार्‍यांसोबत घेण्याची सवय आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा दुर्मीळ गुण हिमंता बिस्व सरमा यांना एक करिष्माई नेता बनवतात.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) या दोन्हींची धोरणे अतिशय कमी वेळात आत्मसात करून त्यानुसार काम करणेही सरमा यांनी साध्य केले आहे. परिणामी, भाजपच्या पुढच्या पिढीतील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये हिमंता बिस्व सरमा यांचा समावेश होण्यास प्रारंभ झाला आहे.हिमंता बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाखाली आसाममधील बंडखोरीचा अंत होण्यास प्रारंभ झाला आहे. नुकत्याच म्हणजे शनिवार, दि. २९ एप्रिल रोजी ‘दिमासा’ गटासोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील वनवासी समुदायातील बंडखोरीचा अंत झाला आहे. या करारानंतर ‘दिमासा’ समुदायदेखील आसाम आणि भारताच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी सज्ज होणार आहे. या करारांतर्गत १६८ हून अधिक बंडखोरांनी हिंसेचा मार्ग सोडला आहे, शस्त्रास्त्रे आसाम सरकारकडे सुपूर्द केली आहेत, त्यांच्या संघटनांचे विसर्जन करून जंगलात असलेले त्यांचे कॅम्प सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शांतता करारांतर्गत आसाम सरकार ‘दिमासा कल्याण परिषदे’ची स्थापना करणार आहे. या परिषदेंतर्गत ‘दिमासा’ समुदायाच्या राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आकांक्षांचे रक्षण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे घटनेच्या सहाव्या परिशिष्टातील ‘कलम १४’ अंतर्गत स्वायत्त परिषदेमध्ये अतिरिक्त गावांचा समावेश करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. शस्त्रे सोडलेल्यांचे पुनर्वसन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेजही दिले जाणार आहे.


Himanta Biswa Sarma


याशिवाय सरमा मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर दि. ४ सप्टेंबर, २०२१ रोजी आसाममधील कार्बी आंग्लॉन्ग प्रदेशातील अनेक दशके जुन्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ‘करबी’ गटांच्या प्रतिनिधींसोबत एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यानंतर एक हजारांहून अधिक सशस्त्र कार्यकर्त्यांनी शस्त्रे सोडली. त्याचप्रमाणे आसाममधील वनवासी आणि चहाच्या बागेत कामगारांचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी दि. १५ सप्टेंबर, २०२२ रोजी आठ वनवासी गटांच्या प्रतिनिधींसोबत सामंजस्य करार करण्यात आला, त्यानंतर १ हजार, १८२ बंडखोर मुख्य प्रवाहात सामील झाले. बंडखोरांसह आसामने अन्य राज्यांसोबतचे सीमावाद सोडविण्यातही यश आले आहे. त्यामध्ये दि. २९ मार्च, २०२२ रोजी आसाम आणि मेघालय राज्यांमधील आंतरराज्य सीमा विवादाच्या एकूण १२ क्षेत्रांपैकी सहा क्षेत्रांच्या तोडग्यासाठी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली, त्याचप्रमाणे आसाम आणि अरुणाचल प्रदेश राज्यांनी दि. १५ जुलै, २०२२ रोजी अरुणाचल प्रदेशातील नामसाई येथील १२३ गावांच्या संदर्भात आंतरराज्य सीमा विवाद सोडविण्यासाठी सहमती दर्शवली. त्यामुळे आसामला हिंसेच्या मार्गावरून शांतता, स्थैर्य आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी हिमंता बिस्व सरमा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केवळ आसामच नव्हे, तर संपूर्ण ईशान्य भारतातील सीमावाद असो किंवा बंडखोरांचे वाद असो, ते सोडविण्यासाठी हिमंता बिस्व सरमा हे मध्यस्थाची भूमिका अतिशय यशस्वीपणे पार पाडत आहेत.


Himanta Biswa Sarma
 
हिमंता बिस्व सरमा हे कोणताही गंड न बाळगता हिंदू राष्ट्रवादाची भूमिका मांडत असतात. आसाममधील बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात त्यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावर धार्मिक तेढ पसरविण्याचेही आरोप झाले. मात्र, त्यांनी त्याकडे लक्ष न देता राष्ट्रीय सुरक्षेस प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे राज्यात असलेल्या मदरशांना बंद करण्याचा त्यांचा निर्णयही अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. मदरशांमध्ये जुनाट विचारांचे आणि कट्टरतावादाचे शिक्षण दिले जाते. परिणामी, फुटीरतावादास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे सरमा यांच्या सरकारने राज्यातील तब्बल ६०० मदरसे बंद केले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात होणार्‍या बालविवाहांविरोधातही त्यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चोख होण्यास प्रारंभ झाला आहे. राज्यामध्ये नवे उद्योग आणि गुंतवणूक येत आहे, पायाभूत सुविधांचा विकास होत आहे. त्यामुळे अशांत आसाम ते शांत आसाम असा प्रवास यशस्वीपणे होत आहे.

भाजप नेतृत्वाने हिमंता बिस्व सरमा यांच्याकडे भाजपच्या नेतृत्वाखालील ईशान्य विकास आघाडीची (एनईडीए) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या बिगर-काँग्रेस आघाडीत त्या पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना ‘एनडीए’मध्ये सामील न होता, केंद्र सरकार आणि भाजपशी जुळवून घ्यायचे आहे. ‘एनईडीए’नेही भाजपच्या ‘काँग्रेस मुक्त भारत अभियाना’वर भर दिला. ईशान्येतून काँग्रेसचा सफाया झाला आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्डमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवामुळे ‘एनईडीए’ आणि सरमा यांच्या राजकीय चातुर्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. ईशान्य भारतात भाजपचा विस्तार आता बळकट करण्यास प्रारंभ झाला आहे. ईशान्य भारतामधील प्रादेशिक अस्मिता आणि त्यामुळे निर्माण झालेली बंडखोरीदेखील शेवटच्या टप्प्यात असल्याचे दिसते. ईशान्य भारतातील प्रादेशिक अस्मितेस राष्ट्रवादाची जोड देण्यामध्ये आणि ईशान्य भारतास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील विकासाची अष्टलक्ष्मी हे रूप देण्यामध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंताबिस्व सरमा यांची भूमिका भविष्यातदेखील महत्त्वाची ठरणार आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.