लोकशाहीला तिलांजलीच!

    03-May-2023   
Total Views |
NCP Presidency and Democracy


काही केल्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपल्या नावाची चर्चा झालीच पाहिजे, आपण त्या राजकीय चित्राच्या केंद्रस्थानी दिसलोच पाहिजेत, असा काहींचा निर्धार असतो. त्यात महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी आहेत. मंगळवारी शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण पायउतार होत असल्याची घोषणा केली. ‘राजकारणातील प्रदीर्घ कारकिर्दीनंतर आता थांबण्याचा निर्णय मी घेतला आहे. सत्ता किंवा कशाचाही अधिक मोह असू नये,’ असे म्हणत पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची वल्गना करणारे पवार हेच अध्यक्षपद पुन्हा एकदा आपल्याच घरात ठेवण्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांना सूचना दिल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. थोडक्यात काय तर सुप्रिया सुळे असोत किंवा अजित पवार, या दोघांना अध्यक्ष करण्यासाठी पवारांनी सूचना दिल्या असून त्यांच्यापैकी कुणीही अध्यक्ष झाला, तर त्यास पवारांची सहमतीच असणार आहे. थोडक्यात काय तर, लोकशाही संवर्धन आणि संविधान वाचवण्याच्या गमजा मारणार्‍या पवारांच्या पक्षाचे अध्यक्षपद पक्षासाठी आयुष्य वाया घालवणार्‍या कार्यकर्त्यांना देण्याऐवजी आपल्याच घरात देऊन लोकशाहीला शेवटी तिलांजलीच देण्याचा निर्णय राष्ट्रवादी आणि थोरले पवार घेणार हे आता जवळपास निश्चित आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पवारांनी लोकशाहीला तिलांजली देण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही रोहित पवारांना आधी ‘बारामती अ‍ॅग्रो’, मग स्थानिक राजकारण, मग कर्जत- जामखेडची आमदारकी आणि आता विधिमंडळातील महत्त्वपूर्ण समितीचे अध्यक्ष पद देताना लोकशाहीची नेमकी कुठली मूल्ये पवारांनी पाळली होती, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी अद्याप दिलेले नाही. जर यावेळीही पवारांच्या घराबाहेर हे अध्यक्ष पद दिले नाही, तर पवार हे घराणेशाहीचेच प्रतीक आहेत, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल. शरद पवार कुटुंबकलह आणि पक्षासमोरील अडचणी अशा दुहेरी द्वंद्वात अडकले आहेत. त्यात त्यांनी गृहकलह शांत करण्याला प्राधान्य देत ‘सुप्रिया विरुद्ध अजित’ हा संघर्ष तूर्त तरी टाळण्याचा निर्णय घेतला आहे. पवार काहीअंशी त्यात यशस्वी झाले असले तरी हा संघर्ष अटळ आहे, हे निश्चित!


वादळातील नावेचा नावाड्या?

भावी पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (सध्यातरी) असलेल्या शरद पवारांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ करत या निर्णयाला कडवा विरोध केला. मात्र, पवार सध्यातरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. पवारांच्या या कथित धक्कादायक निर्णयानंतर पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार, हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल ही चार नावे सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत. यापैकी सुप्रिया सुळे आणि त्यांच्यापेक्षाही अधिक प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याच्या शक्यता सर्वाधिक असल्याचे राष्ट्रवादीतील नेत्यांनी म्हटले आहे. कन्याप्रेमाला आवर घालून धर्मकर्म संयोगाने जरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष झालेच, तरी अध्यक्षपदाची सूत्रे ‘सिल्व्हर ओक’वरूनच हलणार, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. पटेल स्वतःच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून पवारांच्या सोबत आहेत. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रवादीच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर पक्षाची भूमिका काय असावी आणि दिल्लीत पक्षाचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, हे ठरवण्यात पटेलांची भूमिका निर्णायक राहिली आहे. भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका असो किंवा अगदी परवा पवारांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांना खडसावून वातावरण निवळण्यासाठी घेतलेली आक्रमक भूमिका असो, पवारांसाठी पटेल कायमच ‘संकटमोचक’ म्हणून पुढे आलेले दिसतात. पटेलांना जनाधार नसला तरी पक्षाचे ‘थिंक टँक’ म्हणून ते कायम कार्यरत राहिले. आजच्या स्थितीत पक्षात अजित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यात निर्माण झालेला संघर्ष आणि इतर नेत्यांची सत्तेविषयीची अतिमहत्त्वाकांक्षा, हे मुद्दे निकाली काढण्यात अध्यक्ष म्हणून पटेल कितपत यशस्वी ठरतील? हा एक मुद्दा आहेच. राष्ट्रवादी काँग्रेस हा नेत्यांचा नाही, तर सुभेदारांचा पक्ष आहे आणि त्या सुभेदारांना सावरण्यासाठी पवारांसारख्या सरदाराचीच गरज आहे. पटेल हे काही तसे जमिनीवर काम करणारे किंवा रस्त्यावर उतरून काम करणारे नेते नाहीत. त्यामुळे या ‘ग्रासरूट’वरील नेत्यांना आवरणे पटेलांनास कितपत जमेल? अंतर्विरोध, गटबाजी, असुरी महत्त्वाकांक्षा आणि राजकीय वर्चस्वाच्या वादळात अडकलेल्या नावेचे नावाडी पटेल होणार का? याचं उत्तर लवकरच मिळणार आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.