परिस्थितीचे शिल्पकार आपणच

    28-May-2023   
Total Views |
Coalition politics indian Political National parties

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना युती हवी आहे. जनतेच्या इच्छांशी त्यांना काही पडलेले नाही. त्यांची इच्छा केंद्रातील मोदींचे सरकार घालविले पाहिजे आणि आपण केंद्रात सत्तेवर गेले पाहिजे. केजरीवाल यांना वाटते मीच पंतप्रधान व्हावे. नितीश कुमार यांनादेखील तसेच वाटते. शरदराव पवार यांचीही तशीच इच्छा आहे.

राष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीचा विषय हा रोज चर्चेत असतो. या कामी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोघेही फार सक्रिय झालेले आहेत. दोघेही देशभर फिरतात. विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेतात. वेगवेगळ्या वेळी ते महाराष्ट्रात येऊन गेले. उद्धव ठाकरेंना भेटून गेले. २०२४च्या निवडणुकीत आपण सर्वांनी बरोबर का असले पाहिजे, हे त्यांनी सांगितले. मोदींचे शासन राहिले, तर लोकशाही धोक्यात येईल, असे तिघांचे एकमत झाले. संविधान धोक्यात आहे. एवढे मात्र ते म्हणाले नाहीत. संविधानचे फारसे ज्ञान नसल्यामुळे कदाचित असे झाले असावे.

कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला फार मोठे यश मिळाले. त्यामुळे केजरीवाल आणि नितीश कुमार, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव इत्यादी नेत्यांना खूप आनंद झालेला आहे. दुसर्‍याच्या घरात मूल झाल्याबद्दल इतर वेळी भांडणार्‍या शेजार्‍याने आपल्या घरात बारसे करावे, असा प्रकार झाला. कर्नाटकात मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी देशातील सगळ्या विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले. ओडिशाचे नवीन पटनाईक, तेलगणचे के. सी. राव मात्र आले नाहीत आणि ममतादीदींनी आपला प्रतिनिधी पाठवून दिला. हातात हात घालून ऐक्याचे प्रमोशन करणारे फोटोसेशन झाले म्हणजे फोटोत एकी झाली.

आता थोडं देशातील विरोधी पक्षांच्या प्रयत्नांच्या इतिहासाकडे जाऊया. विरोधी पक्षांचे ऐक्य हा विषय भारताच्या राजनीतीला नवा नाही. १९६७साली इंदिरा गांधी यांच्या विरूद्ध विरोधी पक्षांनी आघाडी उभी केली. तिचे नाव होते, ‘संयुक्त विधायक दल’. ही आघाडी टिकली नाही, नंतर तिच्यात फाटाफूट झाली. १९७१साली विरोधी पक्षांनी पुन्हा ऐक्याची मोट बांधली. तीदेखील टिकली नाही. आणीबाणीनंतर १९७७साली सर्व विरोधी पक्षांनी आपापले पक्ष विसर्जित करून जनता पार्टीची स्थापना केली. जनता पार्टी सत्तेवर आली. साडेतीन वर्षे ती सत्तेवर राहिली. जनता पार्टीत एकत्र आलेले पक्ष आपापसात भांडू लागले. पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा तीन-चार नेत्यांच्या मनात खूप प्रबळ झाली. त्यानंतर पक्ष फुटला. आज जनता पार्टी अस्तित्त्वात नाही. राजीव गांधींच्या काळात जनता दल या पक्षाचा जन्म झाला, त्याची सत्ता आली. दोन एक वर्षांत तो पक्षदेखील फुटला. त्या पक्षाचे आता वेगवेगळे गट निर्माण झालेले आहेत. विरोधी पक्ष एकजुटीचा हा अगदी थोडक्यात आढावा आहे.

विरोधी पक्षांच्या एकजुटीचे तर्कशास्त्र काय असते? विरोधी पक्षांचे ऐक्य का टिकत नाही? प्रथम त्यांच्या तर्कशास्त्राचा विचार करू. त्यांचे तर्कशास्त्र अंकगणितीय असते. सत्तेवर येणार्‍या पक्षाला ३७ ते ४१ टक्के मते मिळतात. म्हणजे जवळजवळ ६० टक्के मते विरोधी असतात. ही विरोधी मते एकत्र केली, तर सत्ताधारी पक्षाची सत्ता सहजपणे जाऊ शकते, असे हे सोपे अंकगणित आहे. हे अंकगणित यशस्वी होत नाही, याचे कारण राजकारण हा अंकगणिताचा खेळ नाही. कागदावरील आकडेवारी आणि फोटोसेशनमधील युती याला व्यावहारिक राजकारणात काहीही किंमत नसते. ही गोष्ट राजकारणात हयात घालविणार्‍या राजकारण धुरंधराना समजू नये, हे केवढे आश्चर्य आहे.

राजकारणातील विविध पक्षांच्या युतींचा विषय प्राणीजीवनातील काही प्राण्यांची नावे घेऊन करता येतो. सिंह, वाघ, कोल्हा, हरिण, लांडगा, रानडुक्कर, या सर्वांची कधी युती होऊ शकते का? तर ती होऊ शकत नाही. यातील प्रत्येकजण मांसाहारी आहे, स्वतःचे भक्ष्य तो दुसर्‍याला देणार नाही. यातील जो दुर्बळ आहे त्याला सबळ शांतपणे खाऊ देणार नाही. प्रसंगी तो त्यालाच मारून खाईल. राजकारणातदेखील असे सिंह, वाघ, लांडगे, रानडुक्कर असे पक्ष असतात. त्या प्रत्येकाचे लक्ष्य राज्यसत्तेचा जास्तीत जास्त वाटा आपल्याला मिळायला पाहिजे हे असते. यातील जे सबळ आहेत, ते दुसर्‍याला सबळ होऊ देणार नाहीत. माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच अशा प्रकारे ते वागतील. विरोधी पक्षांची युती झाली की असेच ते वागतात. राजकीय पक्षांत सत्तेसाठी जीवघेणी स्पर्धा असते. आपले अस्तित्त्व कायम राखून दुसर्‍याकडून जास्तीत जास्त कसे मिळवायचे याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करीत राहतो.

विरोधी पक्षांची एकजूट जनतेला हवी आहे का? त्याचे उत्तर जनतेला अशी युती नको आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना युती हवी आहे. जनतेच्या इच्छांशी त्यांना काही पडलेले नाही. त्यांची इच्छा केंद्रातील मोदींचे सरकार घालविले पाहिजे आणि आपण केंद्रात सत्तेवर गेले पाहिजे. केजरीवाल यांना वाटते मीच पंतप्रधान व्हावे. नितीश कुमार यांनादेखील तसेच वाटते. शरदराव पवार यांचीही तशीच इच्छा आहे. के. सी. राव आणि अखिलेश यादव, राहुल गांधी, प्रियांका गांधी, यांनादेखील वाटते की आपण पंतप्रधान व्हावे. स्वतःच्या शक्तीवर पंतप्रधान होता येत नाही. विरोधी पक्षांची एकजूट केली, तर कागदावर तरी पंतप्रधान होता येते. कागदावर म्हणजे विरोधी ६० टक्के मतांची विभागणी टाळून विजय मिळविता येऊ शकतो.
  • या सर्व विरोधी पक्षांचा नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोध का आहे?
  • भारतीय जनता पार्टीने बोफोर्ससारखा भ्रष्टाचार केला आहे का?
  • नरेंद्र मोदी आणि भाजपाने जनहिताची कामे केलेली नाहीत का?
  • नरेंद्र मोदी आणि भाजपने भारताची प्रतिमा जगात मोठी केली की नाही?
  • नरेंद्र मोदी आणि शासनाने पायाभूत सुविधा प्रचंड प्रमाणात केल्या की नाही?
  • नरेंद्र मोदी आणि शासनाने तांत्रिक प्रगतीत देश अव्वल केला की नाही?
  • नरेंद्र मोदी आणि शासनाने देशाची संरक्षणसिद्धता प्रचंड प्रमाणात वाढविली की नाही?
  • कृषी, औद्योगिक आणि व्यापार या क्षेत्रात भारताने फार मोठी उडी मारली आहे की नाही?
  • दुर्बल आणि वंचित घटकांतील लोकांचे जीवनमान उंचावले गेलेले आहे की नाही?

या प्रश्नांची नकारात्मक उत्तरे जो देईल त्याला एकतर घोर अज्ञानी म्हटले पाहिजे किंवा मोदीद्वेषाची लागण झालेला रोगी समजला पाहिजे. नरेंद्र मोदींच्या विरोधात वाटेल ते बोलणारे राजनेते हे नरेंद्र मोदीविरोधी रोगाची लागण झालेले महारोगी आहेत. त्यांच्या डोळ्यापुढे देश नाही. देशाची प्राचीन परंपरा नाही. जागतिक परिस्थितीचे त्यांना फारसे आकलन नाही. हे सगळे उत्तर पेशवाईतील पेशवे आहेत. ज्या पेशव्यांना जगात काय चालले आहे हे समजत नव्हतं. जगाची तांत्रिक प्रगती कुठे चालली आहे याचे आकलन नव्हतं. परकीय सत्ता आपल्यावर कसं संकट आणतील याच काही ज्ञान नव्हतं. त्याचा परिणाम मराठेशाही बुडण्यात झाला.

मोदीद्वेषाची लागण झालेल्यांना जनतेने जर चुकून यश दिले, तर आपण आपल्या दरवाजावर असंख्य प्रकारची संकटे आणून उभी करू याचे भान ठेवले पाहिजे. मोदीविरोधी ऐक्याची भाषा करणारे राजनेते कोण आहेत, त्यांचा इतिहास काय, त्यांची संपत्ती किती, ती त्यांनी कशी मिळविली, देश, काल, परिस्थितीचे आणि जागतिक परिस्थिीतीचे त्यांना आकलन किती, नेत्याकडे असणारे सचोटी, प्रामाणिकपणा, विचारनिष्ठा, समाजनिष्ठा, याबाबतीत ते नेमके कोठे आहेत, याचे परीक्षण ज्याचे त्याने करावे. घराणेशाहीच्या पारंपरिक दोषपूर्ण प्रेमात पडू नये. शेवटी लक्षात ठेवावे की, आपणच आपल्या चांगल्या अथवा वाईट भवितव्याचे शिल्पकार असतो.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.