स्वादुपिंडाच्या कर्करोगावर लसीचा दिलासा

    15-May-2023   
Total Views |
vaccine

कर्करोग हा अद्याप असाध्य रोगांपैकी एक मानला जातो. शरीराच्या जवळपास सर्वच अवयवांना कर्करोग होऊ शकतो. प्रत्येकवेळी कर्करोगाची लक्षणे ही लगेचच लक्षात येणारी नसतात. त्यामुळे बहुतांशी वेळा कर्करोग तिसर्‍या अथवा अखेरच्या टप्प्यात लक्षात येतो आणि त्यावेळी त्यावर उपचार तर करता येतात, मात्र तो बरा होईल याची फारशी खात्री नसते. अर्थात, कर्करोग वेळेत म्हणजे प्राथमिक अथवा पहिल्या-दुसर्‍या टप्प्यात लक्षात आल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता ही अधिक असते. सध्या अनेक आजारांवर लसी उपलब्ध आहेत. मात्र, कर्करोगाविषयी त्यामध्ये फार प्रगती असल्याचे दिसत नाही. मात्र, त्यातही आता आशेचा किरण दिसू लागला आहे.

स्वादुपिंडाचा कर्करोग हा सर्वात प्राणघातक रोगांपैकी एक असून तो ८८ टक्के रूग्णांमध्ये प्राणघातक ठरतो. या कर्करोगावर उपचार करणे देखील सर्वात कठीण आहे. कारण, या कर्करोगाची गाठ म्हणजेच ’ट्यूमर’ शस्त्रक्रियेने काढले जाऊ शकतात. मात्र, ९० टक्के रुग्णांमध्ये सात ते नऊ महिन्यांतच पुन्हा कर्करोगाच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. केमोथेरपी उपचार रूग्णाचे आयुष्य वाढवण्यास मदत करू शकतात. मात्र, कर्करोग त्यामुळे देखील क्वचितच बरा होतो. ’रेडिएशन’, ’इम्युनोथेरपी’ आणि लक्ष्यित थेरपीदेखील हा कर्करोग पूर्णपणे बरा करू शकत नाही. त्यामुळेच या प्रकारच्या कर्करोगाची घातकता अधिक आहे. मात्र, या कर्करोगाविरोधात ’मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर’च्या संशोधकांनी ’एमआरएनए’ तंत्रज्ञानाद्वारे लस संशोधन आणि निर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे. या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी नुकतीच घेण्यात आली असून, त्यातील निष्कर्ष ’नेचर’ या नियतकालिकामध्ये नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये १६ रूग्णांना लस देण्यात आली होती. त्यापैकी आठ रूग्णांमध्ये कर्करोगाच्या पेशींविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे दिसले आहे. या कर्करोगग्रस्त रुग्णांवर लस घेतल्यानंतर १८ महिने लक्ष ठेवण्यात आले होते. या काळात कर्करोगाच्या पेशी पुन्हा सक्रिय झाल्या नाहीत. म्हणजेच, त्यांचा कर्करोग लसीमुळे बरा झाला. यावरून ’एमआरएएनए’ तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक रुग्णाच्या कर्करोगासाठी विशिष्ट लसी तयार करणे शक्य आहे.

त्याचप्रमाणे अशा लसींची निर्मिती अतिशय कमी वेळात करणे शक्य आहे, असे मत ’जॉन्स हॉपकिन्स कॅन्सर सेंटर’च्या कर्करोगतज्ज्ञ डॉ. नीहा झैदी यांनी म्हटले आहे. अर्थात, पहिल्या टप्प्यातील चाचण्या या लस प्रभावी ठरतील की नाही, हे तपासण्यासाठी करण्यात आल्या नव्हत्या. या चाचणीचा प्रमुख उद्देश हा उपचाराची ही पद्धती सुरक्षित आणि व्यवहार्य आहे की नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते की नाही, हे तपासण्याचा होता. मात्र, या पहिल्या चाचणीमध्येच संबंधित लसीमुळे अतिशय उत्साहवर्धक निकाल पुढे आला आहे. ही पहिल्या टप्प्यातील चाचणी ही केवळ १६ जणांवर घेण्यात आली होती. त्यामुळे पुढील चाचण्यांमध्ये जास्त संख्येने रुग्णांचा समावेश करून त्याचे निष्कर्षही तपासले जाणार आहेत.

अशी होती प्रक्रिया...

ही लस स्वादुपिंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांना त्यांच्या ट्यूमर शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर आणि त्यांना केमोथेरपी झाल्यानंतर दिली जाते. लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये डॉक्टरांनी रुग्णांच्या गाठी शस्त्रक्रियेने काढून टाकल्या आणि त्यातील ऊती जर्मनीतील प्रयोगशाळेत पाठविल्या होत्या. प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी कर्करोग गाठ आणि रुग्णांच्या रक्तातील अनुवांशिक घटकांचा क्रम तपासला आणि कर्करोगाच्या पेशींमध्ये बदललेल्या जनुकांच्या संचाचा तुलनात्मक अभ्यास केला.
त्यानंतर झालेल्या बदलानुसार वैयक्तिक ’एमआरएएनए’ लसीची निर्मिती केली. ही लस कोरोना लसीप्रमाणे स्नायूंमध्ये इंजेक्शन देऊन रक्तप्रवाहामध्ये मिसळण्यात आली. याद्वारे रोगप्रतिकारक शक्तीस उत्तेजित करण्याचा प्रयत्न होता. त्याविषयी बोलताना संशोधक डॉ. बालचंद्रन म्हणाले की, ”या रोगासाठी रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचा प्रकार अन्य व्हायरसविरुद्ध करण्याच्या प्रतिरक्षा प्रतिसादापेक्षा थोडा वेगळा आहे. अन्य लसींमध्ये बहुतांशी प्रतिपिंड प्रतिसाद असतो. मात्र, कर्करोगासाठी ’टी-सेल’ प्रतिसाद अधिक गरजेचा असतो.” या लसीद्वारे ते साध्य करणे शक्य झाल्याचे डॉ. बालचंद्रन यांनी सांगितले आहे.

स्वादुपिंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेनंतरही कर्करोगकारक पेशी या स्वादुपिंडामध्ये खोलवर लपलेल्या असतातच. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरही रूग्णांना धोका कायम असतो आणि शस्त्रक्रियेच्या यशाविषयीदेखील नेहमीच साशंकता असते. त्याचप्रमाणे केमोथेरपीचे उपचार झाल्यानंतरदेखील केवळ ५० टक्के रुग्णच बरे होतात. मात्र, अशा रुग्णांना शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीनंतर लस दिली गेली, तर त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊन कर्करोगाच्या पेशी पुन्हा सक्रिय होण्यास प्रतिबंध निर्माण होणार आहे.

लसीप्रमाणेच ’कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात, ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चाही (एआय) स्वादुपिंड कर्करोग ओळखण्यासाठी वापर होऊ शकतो, याविषयी संशोधन सुरू आहे. त्याविषयीचे संशोधनदेखील ’नेचर’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये स्वादुपिंड कर्करोगग्रस्तांचा डेटा एकत्रित केला जात असून, त्याचा अभ्यास करून या कर्करोगाचे संभाव्य रुग्ण ओळखता येऊ शकतात. अर्थात, हे संशोधन अद्याप अतिशय प्राथमिक टप्प्यात असून, त्याविषयीचा अधिक अभ्यास होणे अद्याप बाकी आहे. मात्र, एकूणच आगामी काळात कर्करोगाविषयी ठोस उपचार निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.