इमरान खान ते टेरर खान...

    14-May-2023   
Total Views |
imran khan

एकेकाळी इमरान खान क्रिकेटहिरो इमरान खान होते. नंतर त्यांचे परिवर्तन बदल घडवून आणणारा इमरान खान असे झाले आणि चार वर्षांच्या राजवटीत त्यांना विशेषण लावण्यात आले, ‘टेरर खान’. त्यांच्या चार वर्षांच्या काळात दहशतवादी गटांकडून लष्करावर ४०० हून अधिक हल्ले झाले. त्याविषयी घेतलेला आढावा.

एप्रिल महिन्यापासून पाकिस्तान हा दूरचित्रवाहिन्याच्या अनेक वाहिन्यांवरील बातम्यांचा महत्त्वाचा विषय राहिला आहे. २४ तास बातम्या चालविणार्‍या वाहिन्यांना बातम्यांचा सतत पुरवठा लागतो. पाकिस्तान हा बातमीचा चांगला विषय आहे. भारतातील काही मुसलमान सोडले आणि मणिशंकर अय्यरसारखे सेक्युलॅरिस्ट सोडले, तर पाकिस्तानबद्दल कुणाला प्रेम वाटत नाही. पाकिस्तान नष्ट व्हावा, अशी बहुतेकांची इच्छा असते. ही इच्छा लक्षात घेऊन या वाहिन्या आपल्या बातम्यांची शीर्षके अतिशय भडक बनवितात. पाकिस्तान नष्ट होणार, पाकिस्तानात अराजक, पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी सैन्य सत्ता ताब्यात घेणार, वगैरे वगैरे. अभ्यासकाच्या दृष्टीने या सर्व बातम्या मनोरंजन करणार्‍या असतात. वाचकांनीदेखील अशा बातम्या वाचून आणि पाहून अजिबात उत्तेजित होता कामा नये, वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे.

पाकिस्तानची वस्तुस्थिती अशी आहे की, इमरान खान यांच्या शासनाविरूद्ध पाकिस्तानच्या लोकसभेत दि. १० एप्रिलला अविश्वासाचा ठराव संमत झाला. इमरान खान यांना सत्ता सोडावी लागली. लोकशाहीत घटनात्मकराजकारणात असे होते. परंतु, पाकिस्तान हा जगातील एक अजब देश आहे. या देशाची राज्यघटना आहे. पाकिस्तानला ‘संघराज्यात्मक संसदीय प्रजासत्ताक’ असे म्हणतात. पाकिस्तानातील राज्ये स्वायत्त आहेत. काही अधिकार केंद्राकडे आहेत आणि उर्वरित सर्व अधिकार राज्यांकडे आहेत. पंतप्रधान हा भारताप्रमाणे संसदीय पद्धतीने निवडला जातो. तो पाकिस्तानच्या लोकसभेला जबाबदार असतो. राष्ट्रपती अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. राष्ट्रपती राज्याचे प्रमुख असतात. अरिफ अलवी हे आताचे राष्ट्राध्यक्ष आहेत.

लष्करी राजवट असताना राष्ट्राध्यक्षाकडे अमर्याद अधिकार असत. २०१०साली हे अधिकार काढून घेण्यात आले. राष्ट्राध्यक्ष नामधारी राष्ट्राध्यक्ष झाले. लोकशाहीत सत्तेचे त्रिभाजन केले जाते. १) कार्यकारी मंडळ, २) कायदेमंडळ, ३) न्यायपालिका. तसे पाकिस्तानातदेखील आहे. पाकिस्तानात राज्यघटना आहे. संसद आहे. सत्तेचे त्रिभाजन आहे. याचा अर्थ पाकिस्तानात लोकशाही आहे, असा जर कुणाचा समज झाला, तर त्याला बावळट म्हणावे लागेल.

पाकिस्तानातील सर्व सत्ता लष्कराच्या हातात असते. हे लष्कर कधी स्वतःच सत्ताधीश होतं, तर इतर वेळेला दुसर्‍यांना सत्तेवर बसवतं. पाकिस्तानातील लोकशाहीतील सर्व संस्था लष्कर सांगेल त्याप्रमाणे वागत असतात. पाकिस्तानचा इतिहास असा आहे की, कोणताही पंतप्रधान आपला पाच वर्षांचा कालखंड पूर्ण करू शकत नाही. मध्येच त्याची हाकालपट्टी होते. नवाज शरीफ यांना परवेज मुशर्रफ यांनी हाकलले आणि सत्ता आपल्या हातात घेतली. त्यापूर्वी झुल्फिकार अली भुट्टो यांना झिया उल हक यांनी हाकलले आणि फासावर चढविले आणि पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. माजी पंतप्रधान बेगम भुट्टो यांनादेखील ठार करण्यात आले. पाकिस्तानच्या लोकशाहीचा हा खेळ असतो. इमरान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्याचे आदेश निघाले. इमरान खान म्हणू लागले, माझीही हत्या केली जाणार आहे. तेव्हा या वाक्याचा अर्थ पाकिस्तानाच्या इतिहासात शोधावा लागतो.

इमरान खान हे कोणत्याही राजकीय घराण्यात जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म एका धनिक कुटुंबात झाला. तरुण वयात ते उत्तम क्रिकेटपटू झाले. ८० ते ९२ या काळात त्यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. १९९२साली त्यांनी पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. भारताप्रमाणे पाकिस्तानी जनताही क्रिकेटवेडी जनता आहे. इमरानचे नाव पाकिस्तानातील घरोघरी पोहोचले. इमरान या नावाभोवती एक वलय निर्माण झाले. या वलयांकित प्लॅटफॉर्मचा उपयोग करून १९९६साली इमरान खान यांनी राजकारणात उडी घेतली. अण्णा हजारे यांच्या वलयाचा उपयोग करून आपल्याकडे केजरीवाल यांनी हेच केले.

दोघांच्याही राजकीय शैलीत खूप साम्य आहे. दोघेही लोकानुरंजन करणारे नेते आहेत. आश्वासने देण्यात ते पटाईत आहेत. लोकांना झुलविण्यात ते मातब्बर आहेत. २०१३साली इमरान खान यांच्या ‘तहरीक ए इन्साफ’ या पक्षाला पाकिस्तानच्या निवडणुकीत बर्‍यापैकी यश मिळाले. राजकीय सत्ताखेळातील ते दखलपात्र नेता झाले. नवाज शरीफ लष्कराला नको झाले. मुशर्रफ हाकलले गेले होते. झरदारी भ्रष्टाचाराच्या पिंपात बुडाले. पाकिस्तानला नवीन चेहर्‍याची गरज होती. लष्करप्रमुख बाजवा आणि ‘आयएसआय’ प्रमुख असीम मुनीर यांना असे वाटले की, इमरान खानवर जुगार खेळायला हरकत नाही. त्यांनी इमरान खानच्या मागे शक्ती उभी केली. म्हणजे काय केले? लष्करी ठाण्यातून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना फोन जात, इमरानला पाठिंबा द्या, त्याच्या पक्षात प्रवेश करा, म्हटले तर सूचना, म्हटले तर आदेश दिले जात आणि पाकिस्तानच्या लोकशाही संकेताप्रमाणे त्याचे पालन केले जाई. २०१८ साली इमरान निवडून आले, पंतप्रधान झाले. पण, केजरीवालला जे थोडेफार जमले ते इमरान खानला जमले नाही.

इमरानने जनतेला सांगितले की, मला निवडून दिल्यास पाकिस्तान हे इस्लामी लोककल्याणकारी राज्य केले जाईल. भ्रष्टाचार्‍यांना अटक केली जाईल. भ्रष्टाचार करू दिला जाणार नाही. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर मोठा भर दिला जाईल. आपल्याला पाकिस्तान इस्लामी स्वर्ग करायचा आहे. यातील एकही गोष्ट इमरान यांना प्रत्यक्षात करता आलेली नाही. पाकिस्तान परकीय कर्जाचे हफ्ते फेडू शकत नाही. आयात केलेल्या वस्तूंचे मूल्य परकीय चलनात देऊ शकत नाही. त्याची परकीय गंगाजळी आटत चालली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाच अब्ज डॉलरचे कर्ज त्याने मागितलेले आहे, असे कर्ज फुकट मिळत नाही. ‘आयएमएस’ असे कर्ज देताना खूप जाचक अटी लावते. त्याने राष्ट्रीय सार्वभौमत्वावर अनेक बंधने येतात. पाकिस्तानला ती मुकाट्याने स्वीकारावी लागतील.

लष्कराने इमरान खान यांचे सरकार चार वर्षे चालू दिले. सत्ता हाती येताच इमरान खान यांनी लष्कराला नांगी मारण्याचे काम सुरू केले. ते इमरान खान यांना भारी पडले. पाकिस्तानविषयी असे म्हटले जाते की, अमेरिका, आर्मी, अल्ला असे तीन ए पाकिस्तान चालवितात. इमरान खान यांना असे वाटले की, यातील एक ‘ए’ला म्हणजे अल्लाला धरून ठेवले, तर अमेरिका आणि आर्मीवर कुरघोडी करता येईल. या अल्लाविषयीचे चित्रपटाचे गाणे आहे, ‘आसमान पर है खुदा और जमी पर है हम... आजकल वो इस तरफ देखता है कम’ आकाशातील अल्ला इमरानकडे लक्ष देत नाही. इमरानवर आणलेला अविश्वासाचा ठराव संमत केला जातो.

इमरानच्या पक्षातील अनेकजण फुटतात ते विरोधी पक्षाला जाऊन मिळतात. त्यांनी तसे करावे असे आदेश लष्करी मुख्यालयातून येतात. ते हुकूमाचे धनी असल्यामुळे या आदेशाचे पालन करतात. लोकशाही संकेताप्रमाणे बहुमत जातं आणि शासनाला राजीनामा द्यावा लागतो. लोकशाही संकेतांचेही पालन झाले आणि लष्कराची सत्ता अबाधित राहिली. जिंदाबाद पाकिस्तानी लोकशाही. इमरानच्या पक्षात कुणी उद्धव किंवा संजय राऊत नसल्यामुळे त्यांनी खोक्याची भाषा केली नाही किंवा डुक्कर, कुत्रा, मांजर, वगैरे प्राणीदेखील चर्चेत आणले नाहीत, अशी चर्चा करणे पाकिस्तानच्या लोकशाहीत बसत नाही. पाकिस्तानची लोकशाही म्हणजे लोकांनी रस्त्यावर उतरायचे असते, आणि ज्याला जमेल तसा त्याने हिंसाचार करायचा असतो. इमरानच्या समर्थनार्थ त्याचे समर्थक रस्त्यावर उतरले, त्यांनी जाळपोळ केली आणि गोळीबारात हा लेख लिहिपर्यंत २२ लोक ठार झाले होते. या वेळच्या हिंसाचाराचे लक्ष्य लष्कर आणि लष्कराची छावणी होती. पाकिस्तानच्या ७५ वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडत होते.

लष्कर आपले तारणहार आहे, या समजुतीला फार मोठा धक्का यावेळी बसलेला आहे. लष्कराविषयीची अप्रिती खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लष्कराला ते धोकादायक आहे, लोकशाहीला आश्वासक आहे, आणि भारताच्या हिताचे आहे. कोणतीही एक परिस्थिती कायम राहत नाही. परिस्थितीत परिवर्तन होत जाते. पाकिस्तानात घडणारे हे परिवर्तन आपल्याला फार काळजीपूर्वक पाहावे लागेल आणि अभ्यासावे लागेल. चॅनेलवरील बातम्यांनी मनोरंजन करून घ्यावे, अभ्यास करून आपली मते बनवावीत.

एकेकाळी इमरान खान क्रिकेटहिरो इमरान खान होते. नंतर त्यांचे परिवर्तन बदल घडवून आणणारा इमरान खान असे झाले आणि चार वर्षांच्या राजवटीत त्यांना विशेषण लावण्यात आले, ‘टेरर खान’. त्यांच्या चार वर्षांच्या काळात दहशतवादी गटांकडून लष्करावर ४०० हून अधिक हल्ले झाले. लष्करी शस्त्रे पळविण्यात आली. असंख्य जवान ठार झाले आहेत. प्रार्थना स्थळांवर दहशतवादी हल्ले होत असतात. ख्रिश्चन चर्चवर नाताळच्या काळात हल्ला होऊन असंख्य लोक मारले गेले. दहशतवाद कमी करण्यासाठी इमरानने काही केले नाही. दहशतवादी काम हेच अल्लाचे काम आहे, असे त्यांना वाटले असावे. त्यांची राजकीय कारर्किर्द पुन्हा सुरू होणे वाटते तितके सोपे नाही. पाकिस्तानच्या इतिहासात आजीमाजी पंतप्रधानांचे काय होते, हे आपण वाचले आहे. इमरानच्या नशिबी काय आहे, हे पाकिस्तानातील एखादी गोळीच सांगू शकते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.