‘क्रॅश लँडिंग’नंतर पुन्हा ‘टेक ऑफ’?

    11-May-2023   
Total Views |
pilot

आता पुन्हा एकदा सचिन पायलट हे ‘टेक ऑफ’ करण्यास निघाले आहेत. राजस्थान विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असतानाच, पायलट यांनी पुन्हा एकदा गेहलोत यांना लक्ष्य करण्यास प्रारंभ केला आहे. हे करताना यावेळी त्यांनी गेहलोत यांच्या काँग्रेसमधील निष्ठेवरच शंका घेतली आहे.

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा सचिन पायलट यांनी काँग्रेसमध्ये बंड करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यापूर्वीदेखील बंडाचा प्रयत्न करून आपले राजकीय विमान अन्यत्र ‘लॅण्ड’ करण्याचा प्रयत्न पायलट यांनी केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात पायलट डरकाळ्या फोडत होते. मात्र, अनुभवी गेहलोत यांनी पायलट यांच्या डरकाळ्यांमधील हवा काढून घेतली होती. त्यानंतर मग गांधी कुटुंबाने मध्यस्थी करून त्यांच्या विमानाचे ‘क्रॅश लँडिंग’ करविले होते. त्या ‘क्रॅश लँडिंग’नंतर पायलट यांना त्यांचे समाधान करविण्यासाठी काही अधिकार दिल्याचे गांधी कुटुंबाने भासविले होते आणि त्यामुळे पायलटदेखील तेव्हा गप्प झाले होते. मात्र, तेव्हापासून गेहलोत यांनी पद्धतशीरपणे पायलट यांचे पंख कापण्यास प्रारंभ केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सचिन पायलट हे ‘टेक ऑफ’ करण्यास निघाले आहेत. राजस्थान विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असतानाच, पायलट यांनी पुन्हा एकदा गेहलोत यांना लक्ष्य करण्यास प्रारंभ केला आहे. हे करताना यावेळी त्यांनी गेहलोत यांच्या काँग्रेसमधील निष्ठेवरच शंका घेतली आहे.

काँग्रेसमधील ज्या गटांनी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने राजस्थानमध्ये एकतेचा झेंडा रोवला होता, तेच गट आता राहुल गांधींच्या माऊंट अबू दौर्‍यात एकमेकांच्या विरोधात आहेत. सचिन पायलट यांनी दौर्‍याच्या दिवशीच सोनिया गांधींऐवजी गेहलोत यांच्या नेत्या वसुंधरा राजे या असल्याची टीका केली आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आता प्रथमच उघडपणे सांगितले आहे की, २०२० साली काँग्रेसमधील अनेक आमदारांना राजस्थानचे नेतृत्व बदलायचे होते. हे सांगून पायलट यांनी पुन्हा एकदा राजस्थानचे नेतृत्व करण्याची इच्छा जाहीर केली आहे. यापूर्वीदेखील ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये राहुल गांधी हे राजस्थानसाठी आपल्या नेतृत्वाची घोषणा करतील, अशी पायलट यांनी अपेक्षा होती. मात्र, तेव्हा त्यांनी धीर धरण्याचे सांगण्यात आले होते.

त्याप्रमाणे पायलट यांनी तसे केलेही, मात्र आता निवडणूक तोंडावर आली असताना गेहलोत यांच्याच नेतृत्वाखाली ती लढविली जाणार, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पायलट यांनी आता गेहलोत सरकारने माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचारावर कारवाई न करण्याचा मुद्दा पुढे आणला आहे. अर्थात, राजस्थानच्या राजकारणामध्ये वसुंधरा राजे आणि गेहलोत यांचे सख्य कधीही लपून राहिलेले नाही. आपापले उपद्रवमूल्य कायम राखण्यासाठी हे दोन्ही नेते एकमेकांना पद्धतशीरपणे सहकार्य करत असल्याचे सांगितले जाते.

भ्रष्टाचाराविरोधात पायलट यांनी आता पाच दिवसांची ‘जनसंघर्ष यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांच्या ‘जनसंघर्ष’ पदयात्रेवरून काँग्रेसमध्ये गदारोळ सुरू झाला आहे. पायलट गट या यात्रेस याला भ्रष्टाचाराविरुद्धचे आंदोलन म्हणत आहे, तर गेहलोत यांच्या गटाने पायलट गटावर पक्षशिस्त मोडल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच्या मीडिया आणि ‘पब्लिसिटी सेल’चे अध्यक्ष पवन खेडा यांनी सचिन पायलट यांच्या यात्रेची खिल्ली उडवली आहे, असे असले तरी पायलट यांच्या या यात्रेमुळे काँग्रेसला किमान ३५ जागांवर फटका बसेल, असा दावा पायलटसमर्थक करत आहेत. राजस्थानच्या १२ जिल्ह्यांमध्ये सुमारे ३५ विधानसभा मतदारसंघ आहेत. जेथे गुज्जर मतदारांचा चांगला प्रभाव आहे. हे १२ जिल्हे भरतपूर, धौलपूर, करौली, सवाई माधोपूर, जयपूर, टोंक, दौसा, कोटा, भीलवाडा, बुंदी, अजमेर आणि झुंझुनू आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत गुज्जरबहुल जागांवर काँग्रेसने १२ उमेदवार उभे केले होते, त्यापैकी सात उमेदवार विजयी होऊन विधानसभेत पोहोचले.

बसपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले जोगिंदर सिंग अवाना यांनीही दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सचिन पायलट यांनी ‘जनसंघर्ष यात्रा’ काढल्याने अजमेर जिल्ह्यातील विधानसभा जागांवर काँग्रेसला थेट फटका बसणार आहे. जिल्ह्याच्या बाह्य भागातील विधानसभा जागांचे अधिक नुकसान होणार आहे. नशिराबाद, मसुदा, पुष्कर, बेवार, केकरी आणि किशनगड या जागांवर पक्षाला थेट फटका बसणार आहे. या विधानसभा जागांवर काँग्रेस नेते सचिन पायलट यांची प्रचंड क्रेझ आहे. गुज्जरबहुल भाग असल्याने पायलट यांच्या ‘जनसंघर्ष यात्रे’त नशिराबाद आणि मसुदा विधानसभा मतदारसंघातील लोक सर्वाधिक प्रमाणात सहभागी होत आहेत.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला असून फडणवीस-शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालाद्वारे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय अपरिपक्वता अतिशय सुमार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, ठाकरे यांनी स्वेच्छेने बहुमत चाचणीस सामोरे न जाताच राजीनामा दिला आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा पदावर कसे बोलावणार; हा सवाल सरन्यायाधीशांनी सुनावणीवेळीदेखील केला होता आणि आता निकालामध्येही त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासारखे कथित राष्ट्रीय नेते मार्गदर्शकपद असतानाही ठाकरे यांना असा सल्ला कोणी दिला, हा प्रश्न उपस्थित होतो.

हा पराभव ठाकरे यांच्याप्रमाणेच पवार यांचाही आहे. कारण, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर आपण ‘किंगमेकर’ असल्याचे ते भासवत होते. महाराष्ट्र सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई संपली असून आता राजकीय लढाईस प्रारंभ होणार आहे.
त्याचवेळी नितीश कुमार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मुंबईमध्ये भेट घेऊन भाजपविरोधी आघाडीची चाचपणी केली आहे. चंद्राबाबू नायडू, के. चंद्रशेखर राव आणि ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता नितीश कुमार यांना तिसर्‍या-चौथ्या आघाडीचे नेतृत्व करण्याची खुमखुमी निर्माण झाली आहे. मात्र, त्यासाठी बेभरवशाचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची साथ घेऊन नेमके काय साध्य होणार आहे, हे येत्या काही महिन्यातच स्पष्ट होईल.

आता उद्या कर्नाटक विधानसभेचाही निकाल जाहीर होणार आहे. प्रारंभ काँग्रेसला सोपी वाटणारी निवडणूक प्रथेप्रमाणे काँग्रेसनेच वाह्यात वक्तव्ये करून कठीण केली. त्यानंतर मतदानोत्तर कल चाचणीमध्ये आता संमिश्र कल दिसला असून पुन्हा एकदा ‘जेडीएस’ला महत्त्व प्राप्त होणार असल्याचे दिसते. निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यास खर्गे यांच्यापेक्षाही राहुल गांधी यांचे अपयश अधिक ठळक होणार आहे, विजय मिळाल्यास काँग्रेसला ती संजीवनी ठरेल. त्याचवेळी भाजपसाठीदेखील ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण, याद्वारे वर्षअखेरीस होणार्‍या निवडणुकांची रणनीती ठरणार आहे. त्याचवेळी भाजपचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांची जवळपास अखेरची निवडणूक आहे, त्यामुळे तेदेखील सर्वशक्तीनिशी मैदानात उतरले आहेत. भाजपनेही गुजरातप्रमाणेच येथेही सर्वशक्तीनिशी प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोड शो विशेष ठरले होते, त्याचप्रमाणे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाहदेखील कर्नाटकमध्ये सक्रिय होते. कर्नाटकचा विजय भाजपच्या दक्षिण भारतातील राजकारणासदेखील बळ देणारा ठरणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.