एम. सिंगारवेलू आणि पहिला कामगार दिन

Total Views |
 
M. Singarvelu
 
 
दि. 1 मे, 1923 या दिवशी एम. सिंगारवेलूंनी मद्रास (चेन्नई) शहरात दोन भव्य कार्यक्रम केले. या दोन्ही कार्यक्रमात त्यांनी 1 मे या कामगार दिनाचं महत्त्व सांगून, कामगारांची अस्मिता असणारा लाल बावटा फडकावला आणि आपण आज ‘लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान’ या पक्षाची स्थापना करीत आहोत, अशी घोषणा केली.
 
'मेदिनी’ हा संस्कृत शब्द आहे. मेदिनी म्हणजे पृथ्वी. मेदिनीपती म्हणजे पृथ्वीपती किंवा राजे लोक धर्माचं योग्य आचरण करोत. म्हणजे मेघ नियमित जलवर्षाव करतील आणि ही मेदिनी सतत सस्यश्यामला म्हणजे भरपूर धान्य पिकल्यामुळे श्यामल दिसणारी, अशी होईल, अशा प्रकारच्या प्रार्थना आपल्या प्राचीन काव्यांमध्ये भरपूर आहेत.
 
युरोप खंडात मे महिन्याचा पहिला दिवस हा साधारणपणे वसंत ऋतूची सुरुवात मानला जातो. त्यामुळे अर्थातच तिथे आनंद, उल्हास, जल्लोष यांचा उत्सवी दिवस म्हणून 1 मे या दिवसाला ’मे डे’ म्हणतात. याचं मराठी भाषांतर होतं ’मे दिवस’ किंवा ’मे दिन!
 
मराठीतले एक ख्यातनाम कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांच्या एका कादंबरीतल्या नायकाला 1 मे या दिवशी मुलगी होते. म्हणून तो तिचं नाव ठेवतो ’मेदिनी.’ म्हटलं तर मेदिनी-पृथ्वी, म्हटलं तर मे-दिनी जन्मलेली. मराठी-इंग्रजी शब्द एकत्र करून साधलेला मजेदार श्लेष अलंकार.
 
युरोपच्या सांस्कृतिक परंपरेला मे दिन आणि आधुनिक पश्चिमी सामाजिक-औद्योगिक इतिहासातला मे दिन हे मात्र पार वेगळे आहेत. वेगळे बनले आहेत. सांस्कृतिक मे दिवस हा आनंदाचा, उत्साहाचा, उत्सवाचा दिवस असतो. म्हणूनच दि. 1 मे, 1886 या दिवशी अमेरिकेतल्या शिकागो शहरात काही कामगार नेत्यांनी एक जाहीर सभा आयोजित केली होती. दि. 1 मे ते 4 मे, 1886 पर्यंत सभा शांततापूर्ण मार्गाने होत राहिल्या. दि. 4 मे, 1886च्या सभेने मात्र एकदम हिंसक वळण घेतलं. कुणीतरी एक क्रूड हातबॉम्ब पोलिसांवर फेकला. मग पोलीस आणि निदर्शक यांच्यात जोरदार गोळीबार झाला आणि अनेक लोक ठार झाले. अमेरिकेच्या, पाश्चिमात्य जगाच्या किंवा एकंदरीतच आधुनिक जगाच्या इतिहासातला हा पहिला औद्योगिक हिंसाचार. शिकागो शहरातल्या ‘हे मार्केट’ चौकात ही रक्तरंजित घटना घडली. म्हणून तिला ’हे मार्केट इन्सिडन्स’ असेच नाव पडलेले आहे.
1757 ते 1857 हे शतक साधारणपणे औद्योगिक क्रांतीचं शतक मानलं जातं. युरोप खंडात, त्यातही विशेषत: ब्रिटनमध्ये आणि अमेरिकेत भराभर अनेक वैज्ञानिक शोध लागत गेले. अनेकांनी या वैज्ञानिक झपाट्याचं वर्णन करताना म्हटले की, सृष्टीदेवता जणू या संशोधकांवर प्रसन्न झाली आणि तिने आपल्या भांडारातली रहस्यं त्यांच्यासमोर खुली केली. या शोधांमुळे शेती आणि माणसांनी हातांनी करण्याचे व्यवसाय मागे पडले आणि माणसांनी यंत्रांद्वारे करण्याचे व्यवसाय पुढे आले. म्हणजेच कारखानदारी वाढली आणि ’मास स्कूल प्रॉडक्शन’- यंत्रांदारे मोठ्या प्रमाणावर वस्तूनिर्मिती सुरू झाली.
 
यातून कारखानदारांनी माणसांना म्हणजेच कामगारांना थोड्या वेतनात जास्तीत जास्त राबवून घेण्याचे प्रकार सुरू झाले. यालाच नंतर मार्क्सने ’शोषण’ असा शब्द वापरला. कारखानदाराने स्त्री-पुरुष-मुलं-म्हातारे अशा कोणला व्यक्तीला किती श्रमाचं काम द्यावं, म्हणजे मुलांना, म्हातार्‍यांना वा स्त्रियांना जरा हलक काम द्यावं, जास्त श्रमाचं काम तरुण पुरुषांना द्यावं, असे कोणतेही नियमच तयार झालेले नव्हते. कामगारांना दिवसाचे किती तास काम द्यावं? जेवणाची सुट्टी, साप्ताहिक सुट्टी घ्यावी की न द्यावी? किती श्रमांना किती वेतन द्यावं? अशा कोणालाही प्रश्नांवर कोणतीही उत्तरं तयार झालेलीच नव्हती. कारण, कारखानदारी उद्योगधंदे ही संकल्पनाच इतकी नवी होती की, कोणत्याही शासकीय व्यवस्थेने तिच्याबद्दल काही विचारच केला नव्हता. त्यामुळे कारखानदार कामगारांना गुरांसारखे राबवून घेत. 12 तास-14 ताससुद्धा फटके मारून कामं करून घेण्याच्या घटना घडलेल्या आहेत. पण, मग हळूहळू यावर विचार झाला आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी आणि 12 तास कामाची वेळ, असं निश्चित झालं. कमी अधिक फरकाने ते सर्व औद्योगिक देशांमध्ये लागू झालं. 12-12 तासांच्या दोन पायांमध्ये कामगार काम करू लागले.
पण, कामगारांना ते अपुरं वाटू लागलं. दि. 1 मे, 1886 रोजी शिकागोमध्ये जमलेल्या कामगार निदर्शकांची मागणी होती - ’आठ तास काम, आठ तास आराम, आठ तास व्यक्तिगत वा अन्य काम.’ थोडक्यात एका कार्य दिवसात आठ तासांच्या वर काम असता कामा नये, अशी त्यांची मागणी होती.
 
ही अमेरिकेतली 1886 ची गोष्ट आहे हं. म्हणजे या काळात साम्यवादी पक्षाचा संस्थापक कार्ल मार्क्स ’दास कपिताल’ हे साम्यवाद्यांचं बायबल चार खंडात छापून जगाच्या रंगमंचावरून अंतर्धानसुद्धा पावला होता. दुसरा संस्थापक फ्रेडरिक एंगन्स अजून जीवंत होता. पण, साम्यवादाचा प्रभाव अमेरिकेन तर सोडाच, युरोपातही काडीमात्रसुद्धा नव्हता. म्हणजे शिकागोतले कामगार हे कोणत्याही महान, जगाचा उद्धार करणार्‍या, शोषित-वंचितांच्या वगैरे राज्यव्यवस्थेसाठी भांडत नसून ’आठ तास काम’ या माणुसकीच्या न्याय्य तत्वासाठी भांडत होते.
 
पण, यांच्यामध्ये काही अराजकतावादी घुसले होते. दि. 1 मे, 1886 ते दि. 4 मे, 1886च्या संध्याकाळपर्यंत निदर्शनं, सभा अगदी शिस्तीत आणि शांततेने पार पडत होत्या. 4 मे लासुद्धा सभा जवळपास संपलीच होती. अनेक श्रोते तर सभेतून निघून घराच्या अर्ध्या वाटेवर पोहोचलेसुद्धा होते. तेवढ्यात कुणीतरी पोलिसांवर कूड हँडग्रेनेड म्हणजे साध्या डायनामाईटपासून बनवलेला बॉम्ब फेकला आणि बघता-बघता ’हे मार्केट चौक’ पोलीस आणि निदर्शकांच्या रक्ताने लाल झाला.
 
पुढे 1894 साली अमेरिकन केंद्र सरकारने 1 मे हा दिवस अधिकृतपणे ’कामगार दिन’ म्हणून घोषित केला. तोपर्यंत अमेरिकेच्या 50 पैकी 30 प्रांतांनी आधीच आपापल्या प्रांतात त्यांना ’कामगार दिन’ म्हणून मान्यता दिलेली होती. परंतु, या घटनेमुळे युरोपातल्या कोणत्याही देशाने वा अमेरिकने मार्क्सवादाच्या तत्वज्ञानाकडे वाटचाल सुरू केली, असं घडलं नाही.त्या-त्या देशांमध्ये समाजवादी पक्ष किंवा कामगार पक्ष होतेच. ते आपापल्या देशातल्या कामगारांचं आणि खुद्द आपल्या देशाचंही हित जपूनच वाटचाल करीत होते.
 
वेगळं घडलं ते रशियात. तिथे प्रथम 1898 साली ’रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी’ स्थापन झाली. मग 1903 साली तिच्यातून ’बोल्शेव्हिक पार्टी’ हा व्लादिमीर लेनिनचा कडवा मार्क्सवादी पक्ष निघाला. सुरुवातीला त्यांंनी मारच खाल्ला. रशियन शेतकरी आणि कामकरी दोघांनाही या बुजगावण्या लोकांपेक्षा झारच प्रिय होता. पण, 1914 साली महायुद्ध सुरू झालं. त्यात आक्रमक जर्मनांनी रशियाचा दारुण पराभव केला. रशियन जनता डळमळली. बोल्शेव्हिकांनी ती संधी साधली आणि शेतकरी-कामकरी यांच्या नावावर सत्ता अक्षरश: हडपली. ही घटना ऑक्टोबर 1917ची. तिथपासून पुढे साधारण 1920-22 सालापर्यंत बोल्शेव्हिकांनी खुद्द झार, झारचे निष्ठावंत सरदार, लोकशाहीवादी नेते या सर्वांची सरळ कत्तल उडवली आणि सत्तेवर घट्ट पकड बसवली. हा शोषित-वंचित कष्टकरी जनतेचा कौल आहे, असे मनोरम चित्र त्यांनी बाहेरच्या जगासमोर उभं केलं.
 
बोल्शेव्हिकांच्या ’शोषित-वंचितांचं राज्य’ या संकल्पनेनच इतकं काही मोहक आकर्षण होतं की, देशोदेशींचे राजकारणी, नेते, विचारवंत मोठ्या अपेक्षेने रशियाकडे पाहू लागले. त्यात लोकमान्य टिळकसुद्धा होते. जॉर्ज बर्नाड शॉ आणि विल ड्युरांटसुद्धा होते. पण, टिळक हे अखेर टिळक होते. ते अतिशय सावध होते. भारावून वगैरे गेलेले नव्हते. इंग्रजांशी लढायला कामगार वर्ग हे एक फार मोठे संघटित क्षेत्र आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. पण, 1920 साली टिळक गेले. संघटित भाणि जागृत कामगार क्षेत्राला राष्ट्रीय विचारधारेत ठेवायला नंतरचं नेतृत्व पुरेसं समर्थ ठरलं नाही. परिणामी, पुढच्या पाचच वर्षांत म्हणजे 1925 साली भारतात ’कम्युनिस्ट पार्टी’ची स्थापना झाली. याची सुरुवात दि. 1 मे, 1923 या दिवशी तत्कालीन मद्रास (आता चेन्नई) शहरात लाल बावटा फडकावून झाली. म्हणजे कम्युनिस्टांचा लाल बावटा सर्वप्रथम भारतात फडकल्याला 100 वर्षं झाली. तो ज्यांनी फडकावला त्यांचं नाव मलयपुरम् किंवा एम. सिंगारवेलू. सिंगारवेलू हे अगदी मागास अशा मच्छीमार समाजात जन्मले. खूप कष्टाने ते पुढे आले. उत्तम वकील बनले, मद्रास इलाख्यातल्या काँग्रेस पक्षासाठी यांनी खूप काम केलं. परंतु, त्यांच्या कामाचा मुख्य भर हा विविध उद्योग, कारखाने यांच्यातल्या कष्टकरी वर्गाचं संघटन करणं, शेतकर्‍यांचे प्रबोधन करणं यावर होता. म्हणजे जसे सरदार पटेल हे गुजरातमधल्या शेतकर्‍यांचे नेते होते, तसेच सिंगारवेलू हे मद्रास प्रांतातल्या शेतकरी-कामगारांचे नेते होते. त्यांचं राजकारण हे बैठकीतलं नव्हे, तर मातीतलं होतं आणि अशा नेत्याला साम्यवाद्यांच्या कष्टकर्‍यांच्या राज्याचं आकर्षण वाटलं, तर नवल नव्हतं.
 
दि. 1 मे, 1923 या दिवशी एम. सिंगारवेलूंनी मद्रास (चेन्नई) शहरात दोन भव्य कार्यक्रम केले. एक मद्रास उच्च न्यायालयासमोर आणि दुसरा ट्रिप्लिकेन मध्ये. ट्रिप्लिकेन म्हणजे तिरूवल्लीकेनी. या दोन्ही कार्यक्रमात त्यांनी 1 मे या कामगार दिनाचं महत्त्व सांगून, कामगारांची अस्मिता असणारा लाल बावटा फडकावला आणि आपण आज ’लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान’ या पक्षाची स्थापना करीत आहोत, अशी घोषणा केली. मात्र, हा पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची शेतकरी-कामकारी आघाडी म्हणूनच कार्य करेल, असेही स्पष्ट केले.
 
या वेळेपर्यंत मानवेंद्रनाथ रॉय वगैरे भयंकर (!) बुद्धिमान मंडळी खुद्द रशियात जाऊन लेनिन वगैरे नेत्यांना भेटून आलेली होती. त्यांना काँग्रेसच्या ओंजळीने पाणी प्यायचं नव्हतं. त्यांना रशियासारखीच क्रांती वगैरे घडवून थेेट सत्ता हाती घ्यायची होती. पण, भारत म्हणजे रशिया नव्हे आणि ब्रिटिश सरकार म्हणजे झार नव्हे. अतिशय सावध असलेल्या इंग्रजांनी अनेक साम्यवादी बडबड्या-गडबड्यांना अटक केली आणि 1924 सालचा कानपूर कटाचा खटला उभा केला.
 
या सगळ्याचा परिणाम आणि काँग्रेस नेतृत्वाने सिंगारवेलूंसारख्या राष्ट्रीय वृत्तीच्या पण श्रमिकांच्या हिताकडे जास्त लक्ष देणार्‍या नेत्यांना नीट वागणूक न दिल्याचा परिणाम म्हणून अखेर दि. 26 डिसेंबर, 1925 या दिवशी कानपूर मुक्कामी ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ स्थापन झाली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.