उत्तरेत मोर्चेबांधणी...

    20-Apr-2023   
Total Views |

Lok Sabha Election Strategy

लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे नेतृत्व कोण करणार, याविषयी ‘गांधी’गोंधळ आहे. अनेक पक्ष काँग्रेसच्या छत्राखाली येण्यास अजिबात अनुकूल नाहीत. त्याचवेळी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्यास काही पक्षांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे भाजप पूर्ण ताकदीने पुढे सरसावला आहे. तेथे नेतृत्वाबाबत कोणताही संभ्रम नाही. पक्षातील मोठ्या नेत्यांपासून ते छोट्या नेत्यांपर्यंत मोदी हा एकमेव चेहरा असल्याचे त्यांना माहीत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात तरी विरोधी पक्षांना फार वाव असल्याचे दिसत नाही.

सध्या सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष कर्नाटककडे लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकची निवडणूक महत्त्वाची आहेच. मात्र, सत्तेचा रस्ता जाणार्‍या उत्तर प्रदेशकडेही लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे. या राज्यातील अगदी लहानात लहान निवडणूकदेखील प्रत्येक राजकीय पक्ष गांभीर्याने घेत असतो. सत्ताधारी भाजपचे केंद्रीय नेतृत्व तर उत्तर प्रदेशला नेहमीच महत्त्व देत आले आहे. सध्या उत्तर प्रदेश परिवर्तनाच्या मार्गावर आहे. एकीकडे माफियागिरीचा होत असलेला अंत आणि दुसरीकडे वाढणारे औद्योगिकीकरण, यामुळे उत्तर प्रदेश राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.

राज्यात मुळापासून रुजलेली आणि अन्य राजकीय पक्षांनी जोपासलेली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे धोरण अतिशय स्पष्ट आहे. योगी आदित्यनाथ हे काय करू शकतात, याची चांगलीच जाणीव आता तेथील उरलेले माफिया आणि त्यांच्या मालकांनाही झाली आहे. मुळात राजकीय यशासाठी माफिया पाळण्याची गरज नसल्याने योगी आदित्यनाथ हे धडाकेबाज निर्णय घेऊ शकतात. योगींच्या या भूमिकेमुळे केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर अन्य राज्यातील नागरिकांमध्येही योगी यांच्याविषयी विश्वास आणि आत्मियता वाढीस लागली आहे. योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदाची ही दुसरी कारकिर्द आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये तब्बल १८३ गुन्हेगारांना चकमकीमध्ये ठार करण्यात आले आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी आता आणखी ६० जणांची नवी ‘हिटलिस्ट’ जारी केल्याचे समजते. यावरून योगी आदित्यनाथ यांच्यापुढील आव्हान किती मोठे आहे, हे लक्षात येते. मात्र, एकाचवेळी कायदा आणि सुव्यवस्था सुधरवून आणि त्यानंतर राज्यास गुंतवणूकस्नेही बनविण्याचे आव्हान योगी आदित्यनाथ यांनी लिलया पेलल्याचे दिसून येते.

उत्तर प्रदेश हे २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच २०२४ सालीही महत्त्वाचे ठरणार आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा मोठे यश प्राप्त करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या उरल्यासुरल्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपाच्या आझमगढ या बालेकिल्ल्यापासून प्रारंभ केला आहे. यावेळी त्यांनी सपासह बसपालाही आव्हान दिले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ काशी येथे गेले होते. यानंतर अमित शाह यांचा उत्तर प्रदेश दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.

आझमगढमध्ये शाह यांनी हरिपूर संगीत महाविद्यालयाची पायाभरणी केली. भूमिपूजनानंतर एका कार्यक्रमात त्यांनी सपा आणि बसपावर याशिवाय कौशांबी येथील एका सभेलाही गृहमंत्र्यांनी संबोधित केले. यामध्ये त्यांनी घराणेशाही आणि जातीवादाचे राजकारण भाजपने संपुष्टात आणल्याचे ठासून सांगून काँग्रेसला लक्ष्य केले. शाह यांचा हा दौरा म्हणजे भाजपच्या २०२४ सालच्या रणधुमाळीचा प्रारंभच असल्याचे दिसून येते. आझमगढमधील हरिपूर संगीत महाविद्यालयाच्या पायाभरणीनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. आझमगढमधून दहशतवाद संपवण्याचे श्रेय त्यांनी योगींना दिले. शाह यांनी लोकांना आठवण करून दिली की, हे तेच आझमगढ आहे जे देशभरात दहशतीचे केंद्र होते. आज तिथे संगीत महाविद्यालयाची पायाभरणी होत आहे. त्यामुळे परिवर्तन केवळ भाजपच करू शकते, असे त्यांनी सांगितले. यावरूनही आगामी काळात भाजप राज्यात अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे नेतृत्व कोण करणार, याविषयी ‘गांधी’गोंधळ आहे. अनेक पक्ष काँग्रेसच्या छत्राखाली येण्यास अजिबात अनुकूल नाहीत. त्याचवेळी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्यास काही पक्षांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे भाजप पूर्ण ताकदीने पुढे सरसावला आहे. तेथे नेतृत्वाबाबत कोणताही संभ्रम नाही. पक्षातील मोठ्या नेत्यांपासून ते छोट्या नेत्यांपर्यंत मोदी हा एकमेव चेहरा असल्याचे त्यांना माहीत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात तरी विरोधी पक्षांना फार वाव असल्याचे दिसत नाही. उत्तर प्रदेशात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धामधूम सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम उत्तर प्रदेशातून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. सहारनपूरमध्ये योगींच्या पहिल्या रॅलीची तयारी सुरू आहे. योगी यांच्यासह अन्य नेत्यांच्या जाहीर सभा आणि कार्यक्रमांना अंतिम रूप देण्यात पक्ष गुंतला आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान योगी राज्यातील सुमारे दोन तृतीयांश जिल्ह्यांमध्ये पोहोचणार आहेत. २०१७च्या महापालिका निवडणुकीत भाजपने १६ पैकी १४ महापालिका जिंकल्या होत्या.

यावेळी शाहजहानपूरसह १७ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महानगरपालिकांबरोबरच नगरपालिका आणि नगर पंचायतींमध्येही मोठा विजय मिळवण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सर्व महापालिकांसह इतर मोठ्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. योगी यांच्यासमोर राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचा विजयी सिलसिला सुरू ठेवण्याचे आव्हान असताना, बुधवार, दि. १० मे रोजी होणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांना ‘स्टार प्रचारक’ म्हणूनही मोठी मागणी आहे. असद यांच्या चकमकीनंतर राजकीय गदारोळ सुरू असताना योगींच्या सभांसाठी उमेदवारांची मागणी वाढली आहे. दुसरीकडे काँग्रेससह विरोधी पक्षांनी जातीय जनगणनेच्या मुद्द्यास हवा देण्यास प्रारंभ केला आहे. काँग्रेसने ज्या पद्धतीने जातीय जनगणनेची मागणी केली, त्यावरून ते आपली रणनीती बदलून देशातील जातींची संख्या शोधू इच्छिणार्‍या प्रादेशिक पक्षांच्या पाठीशी उभी असल्याचे स्पष्ट होते. जातीय जनगणनेची मागणी घेऊन प्रादेशिक पक्षांना एकत्र आणणे काँग्रेसला शक्य होईल की नाही हे काळच सांगेल. मात्र, प्रदीर्घ काळ सत्तेत असताना काँग्रेसला जातगणना करण्याची गरज भासली नाही आणि आता अचानक तो मुद्दा हाती घेतल्याने यामागे देशात पुन्हा जातविषयक गदारोळ निर्माण करण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी रास्त शंका उपस्थित होते.

काँग्रेसने जातीय जनगणनेची मागणी करण्यामागे मोदी आडनावाची बदनामी करण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना बसलेला फटका तर कारणीभूत नव्हे ना, अशी शंका येते. कारण, राहुल गांधी यांनी मोदी आडनावाची बदनामी करून समस्त ओबीसी समाजाला लक्ष्य केल्याचा भाजपचा आरोप चांगलाच अडचणीत आणणार असल्याची जाणीव आता काँग्रेसजनांना झाली आहे. त्यातच राहुल गांधी यांची दोषमुक्ती करण्याची याचिका सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारीच फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आता उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. उच्च न्यायालयात नेमका काय निकाल लागणार, हे कोणासही सांगता येणार नाही आणि निकाल काहीही लागला तरीही भाजपने राहुल गांधी हे ओबीसी समुदायाचा द्वेष करतात, असा प्रचार अतिशय आक्रमकतेने करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेससाठी अतिशय संवेदनशील परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.