भारताची महासत्ता म्हणून वाटचाल होत आहे. येत्या काही वर्षांतच आर्थिक महासत्ता म्हणूनही भारत उदयास आलेला असेल. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत ‘हिंदू फोबिया’ असल्याचे मान्य करण्यात आले आहे. पहिल्यांदाच असे घडले आहे. पुढील वर्षी तेथेही निवडणुका आहेत. म्हणूनच की काय...
अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने हिंदू फोबियाचा निषेध केला आहे. प्रतिनिधी सभेने याबाबतचा ठराव मंजूर केला. त्याबद्दल ते कौतुकास प्राप्त आहेत. अटलांटातील फोर्सिथ काऊंटीमधील प्रतिनिधी लॉरेन मॅकडोनाल्ड आणि टॉड जोन्स यांनी हा ठराव मांडला होता. ‘हिंदू फोबिया’ हा अस्तित्वात असून, त्याचा निषेध करणारे जॉर्जिया हे पहिलेच अमेरिकी राज्य ठरले आहे. म्हणजेच जगात ‘हिंदू फोबिया’ हा अस्तित्वात असल्याचे, पहिल्यांदाच मान्य झाले आहे. तो आहे, असे गृहीत धरले, तर हिंदूंच्या विरोधात घटना घडतात, अत्याचार होतात, त्यांच्यावर अन्याय होतो, हेही मान्य केल्यासारखे झाले. बरे झाले! अमेरिकेनेच हे मान्य केले. भारतातील केरळ, पश्चिम बंगाल किंवा तामिळनाडू येथे अशा प्रकारचा ठराव मांडला गेला असता, तर केंद्रात भाजपचे सरकार आहे, म्हणून हिंदूंना बळ मिळाले, असा कांगावा केला गेला असता. या राज्यात हिंदूंच्या विरोधात सर्वाधिक घटना घडत असूनही, त्याकडे संबंधित राज्ये दुर्लक्ष करतात, याचाही कोणी विचार केला नसता. म्हणूनच अमेरिकी राज्याने असा ठराव करणे, हे सोनाराने कान टोचल्यासारखे झाले. हिंदू विरोधात अपप्रचार वाढत असून, समाज माध्यमांवरील द्वेषयुक्त संदेश हिंदू धर्मीयांसाठी कसे धोकादायक ठरत आहेत, असे या अहवालात दाखवण्यात आले आहे.
चुकीच्या माहितीमुळे हिंदूद्वेष वाढीस लागला असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. जगभरातील हिंदू मंदिरांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांनंतर आता हिंदूंच्या सुरक्षेबाबत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून कॅनडा ते ऑस्ट्रेलियापर्यंत हिंदू मंदिरांच्या तोडफोडीच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. अमेरिकेतही अशा तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. म्हणूनच ‘हिंदू फोबिया’ असल्याचे मान्य होणे अतिशय गरजेचे होते. हिंदू समाज बहुसंख्येने जगभरात विखुरलेला आहे. हिंदू धर्मीय शंभराहून अधिक देशांमध्ये वास्तव्यास आहेत. अमेरिकेत हिंदू धर्मीयांनी उत्पादन, ऊर्जा, शैक्षणिक, आरोग्यसेवा, संशोधन, माहिती तंत्रज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. गेल्या अनेक दशकांपासून ते तेथे वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांना हिंसाचाराच्या घटनांना सामोरे जावे लागते, हे कोणीही मान्य करत नव्हते. २०२१ मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा ऑक्टोबर महिना हा ‘हेरिटेज मंथ’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. अनेक अमेरिकी राज्यांनी यासाठीची अधिसूचना काढली. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव, दसरा तसेच दिवाळी हे हिंदू धर्मीयांचे महत्त्वाचे सण साजरे होतात. म्हणूनच तेथील हिंदू संघटनांनी या महिन्याला ‘हेरिटेज मंथ’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
योगापासून ते अन्न, सण ते दान, नृत्य ते संगीत आणि अहिंसा ते तत्त्वज्ञान या हिंदू पद्धतींचा अमेरिकेतील प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम झाला आहे, हे मान्य केले गेले. हिंदू धर्मीय बहुसंख्येने अमेरिकेत वास्तव्याला आहेत. त्यांच्यासाठी म्हणून गेल्या दिवाळीत ‘व्हाईट हाऊस’मध्येही दीपोत्सव साजरा केला गेला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘व्हाईट हाऊस’मध्ये आमंत्रित केले गेले. त्यांच्यासोबत फराळाचे आयोजन केले गेले. हा बदल सुखावणारा होता. हिंदू धर्मीयांचे अस्तित्व मान्य करून त्यांच्या परंपरांचा सन्मान करणारा हा निर्णय होता. तथापि, अमेरिकी हिंदू समाजाविरुद्ध गंभीर घटना घडत आहेत. हिंदूंचे पवित्र ग्रंथ तसेच त्यांच्या संस्कृतीवर हिंसाचाराचा, दडपशाहीचा आरोप करण्यात येतोय. याची दखल घेणे अमेरिकेला भाग पडले. ‘हिंदू फोबिया’ हा काहींनी द्वेषबुद्धीने समाजात रुजवला. त्याला खतपाणी घातले, हे आता मान्य करण्यात आले आहे. समाजामध्ये द्वेषभावना वाढवणार्या, तसेच भारतीय वंशाच्या नागरिकांच्या विरोधात भेदभाव करण्याच्या काही प्रवृत्तींना रोखण्यासाठी विशेष कायदे, तसेच त्यांच्या अंमलबजावणीची गरज असल्याचे मत व्यक्त होत होतेच.
उद्योगपती जॉर्ज सोरेस याने टूलकिट गँग सक्रिय केल्यानंतर अचानक खलिस्तान चळवळीला चालना मिळते काय, देशविघातक खलिस्तानी समर्थक जगभरात आपले उपद्रव्य दाखवतात, हा योगायोग नक्कीच नव्हता. आजवर केवळ ’मुस्लीम फोबिया’ तसेच ‘ज्यू फोबिया’ असल्याचे मानले जात होते. त्यामुळे या दोन्ही समुदायांना जगभरात सहानुभूतीही मिळत होती. मात्र, बहुसंख्य असूनही, कोणताच उपद्रवमूल्य नसलेला हिंदू समाज वांशिक द्वेषाचा हकनाक बळी पडत होता. त्याच्यावर अत्याचार घडत होते, हे कोणीही मान्यच करायला तयार नव्हते. ते अमेरिकेने मान्य केले. भारत हा महासत्ता म्हणून वेगाने विकसित होत आहे. आर्थिक महासत्ता म्हणूनही तो लवकरच नावलौकिक मिळवेल, यात काहीही शंका नाही. भारतीय वंशाच्या हिंदू धर्मीयांवर अत्याचार होत असतील, तर ते जगातील कोणत्याही देशाला परवडणारे नाही. स्वकर्तृत्वाने आपले अस्तित्व दाखवून देणारे हे भारतीय त्या-त्या देशांच्या विकासात आपले भरीव योगदान देत आहेत. पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘हिंदू फोबिया’ असल्याचा ठराव एक राज्य संमत करते, यातच एक गठ्ठा हिंदू मते कोणाला हातून जाऊ द्यायची नाहीत, हे अधोरेखित होते. भारत बदलतोय, हिंदुत्वाचा केसरी जागा होतोय. इतकेच.