न्यूज चॅनलसाठी काम करणाऱ्या हिंदू तरुणाचे अपहरण!

    13-Apr-2023
Total Views |
pakistan-hindu-akash-ram-kidnapped-from-karachi-works-for-bol-news-channel-as-marketing-head

कराची
: पाकिस्तानमध्ये 'बोल न्यूज' वाहिनीसाठी काम करणाऱ्या आकाश राम या हिंदू तरुणाचे अपहरण करण्यात आले आहे. आकाश बोल न्यूजमध्ये मार्केटिंग प्रमुख म्हणून काम करतो.आकाशच्या आईने हा व्हिडीओ शेअर करून आपल्या मुलाची सुटका करण्याचे आवाहन पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि अपहरणकर्त्यांना केले आहे.

आकाश राम यांचे कराचीतील त्याच्या घराबाहेरून सकाळी ६ वाजता त्याच्या सुरक्षा रक्षक आणि इतर दोन नोकरांसह अपहरण करण्यात आले आहे, अशी माहिती बोल न्यूजने दिली आहे. सिल्व्हर रंगाच्या कारमधून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ही कार याआधी 'बोल न्यूज'च्या कार्यालयाच्या आवारात फिरताना दिसली होती.तसेच या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

बोल न्यूजचे पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी आकाश रामतच्या आईचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आकाशची आई रडत रडत आपल्या मुलांची सुटका करण्याची मागणी करत आहे. तसेच आकाशच्या आई म्हणाली की, “या देशात असे का होते? माझ्या मुलाने या देशासाठी काय केले नाही? त्यांनी नेहमी गरिबांना मदत केली. त्याचा काय दोष?, असा सवाल आकाशच्या आईने पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि अपहरणकर्त्यांना विचारला आहे. त्याचबरोबर माझ्या मुलाचे अपहरण का केले गेले याची मला कल्पना नाही. मला फक्त माझा मुलगा हवा आहे, असे ही आकाशची आई म्हणाली.

पाकिस्तानमध्ये याआधी ही हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. मार्च २०२३ मध्येच तीन अल्पसंख्याकांची पाकिस्तानात टार्गेट किलिंग करण्यात आली होती. ३१ मार्च रोजी पेशावरमध्ये दयाल सिंग नावाच्या व्यक्तीला त्याच्या दुकानात बसलेले असताना गोळ्या घातल्या. बीरबल जेनानी या हिंदू डॉक्टरची २० मार्च रोजी कराचीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दुसरे डॉक्टर धरम देव राठी यांची त्यांच्याच ड्रायव्हरने ७ मार्च रोजी पाकिस्तानातील हैदराबाद येथे हत्या केली होती. डॉ.राठी यांच्या चालकाने धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून खून केल्याचे सांगण्यात आले.