ईशान्यलक्ष्मीचा आर्शीर्वाद

    04-Mar-2023   
Total Views |
narendra modi


ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भाजपसाठी आनंदाचे वातावरण असतानाच, देशाच्या राजकारणातही अनेक संदेश दिले आहेत. २०२३ वर्षातील निवडणुकांची ही सुरुवात होती. कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्येही यावर्षी विधानसभा निवडणुका होतील. त्यानंतर पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजेल. तेव्हा, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर होणार्‍या या विधानसभा निवडणुका आणि त्यांचे निकाल हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण, यातून कोणते राजकीय पक्ष किती पाण्यात आहेत, याची कल्पना येणार आहे.

ईशान्येकडील तीन राज्यांचे निवडणूक निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये भारतीय जनता पक्षाने चमकदार कामगिरी केली आहे. त्रिपुरामध्ये पुन्हा एकदा भाजपला सत्ता प्राप्त झाली आहे, नागालँण्डमध्येही सहजपणे सत्ता येत आहे, तर मेघालयमध्ये पुन्हा एकदा ‘एनपीपी’च्या साथीनेसत्तेत भाजपला वाटा प्राप्त होणार आहे. त्रिपुरातील भाजपचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, राज्याच्या सत्तेतून भाजपला सत्तेवरून घालवण्यासाठी काँग्रेस आणि डाव्यांनी हातमिळवणी केली होती. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचेचे निकालाअंती स्पष्ट झाले. २०१६ पूर्वी ईशान्येकडील एकाही राज्यात भाजपची सत्ता नव्हती. याउलट, आजपर्यंत एकतर युती किंवा स्वबळावर भाजप ईशान्य भारतातील सात राज्यांमध्ये सत्ताधारी आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम आणि मेघालय यांचा समावेश आहे. ईशान्य भारत हा एकेकाळी काँग्रेस आणि डाव्यांचा बालेकिल्ला होता. पण, मागील काही वर्षांत हे चित्र पूर्णपणे पालटले आहे.


 एकेकाळी भाजपला ‘हिंदी पट्टा’ (गाय पट्टा) पक्ष असा टॅग होता, त्याला ‘बनियांचा पक्ष’ असेही म्हणत असत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरुवारी भाजप मुख्यालयात समर्थकांना संबोधित करताना याचा उल्लेख केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अतिशय नेमक्या शब्दात विरोधकांना जोरदार टोला हाणला. ते म्हणाले, “काही लोक मोदींची कबर खोदण्याचा कट रचतात, पण ‘कमळ’ फुलत राहते. ‘मर जा मोदी’ असे बेईमान लोक म्हणतात. मात्र, जनता म्हणते ‘मत जा मोदी.”’ याद्वारे पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या प्रचाराच्या पुढील रणनीतीचे सुतोवाचकेले आहे.

भाजपने त्रिपुरामध्ये गेल्यावेळी मोठा विजय प्राप्त करून डाव्यांसह काँग्रेसला चकीत केले होते. त्यावेळी भाजपचे प्रभारी सुनील देवधर हे केंद्रस्थानी होते. त्यांच्या अचूक नियोजनाद्वारे डाव्यांच्या अनेक दशकांच्या बालेकिल्ल्यास भाजपने भेदले होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी प्रथम विप्लब देब आणि त्यानंतर माणिक साहा यांची नेमणूक करून राज्याला विकासाच्या मार्गावर आणले. एकेकाळी अतिशय दुर्गम असलेल्या या भागात वेगवान पायाभूत सुविधांच्या विकासाला प्रारंभ झाला. यामध्ये सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, व्यवस्थेत असलेले डाव्यांचे सिंडिकेट मोडून काढण्यास भाजपला यश आले. परिणामी पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता प्राप्त झाली आहे.

भाजपचा सलग दुसरा विजय हा स्पष्ट संदेश आहे की, त्रिपुरातील जनतेने काँग्रेस आणि माकपच्या राजकारणास पूर्णपणे नाकारले आहे. भाजपच्या कारभारात त्यांना त्यांचे भविष्य दिसत आहे. भाजपविरूद्ध थेट वैचारिक लढाईच्या पातळीवर डाव्या पक्षांचा तिसर्‍यांदा पराभव झाला. प्रथम, २०१८ मध्ये त्रिपुरामध्ये जेव्हा भाजपने शून्यावरून ३६ जागा प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर दुसर्‍यांदा २०२१ मध्ये बंगालमध्ये डाव्या पक्षांना मोठा तडाखा बसला आणि यावेळी पुन्हा त्रिपुरात माकपला जनतेने नाकारले आहे.

मेघालयात भाजपच्या दोन मुद्द्यांना हवे तसे यश आले नाही. पहिले म्हणजे ख्रिश्चन समुदायामध्ये प्रवेश करणे आणि दुसरे म्हणजे, घराणेशाहीच्या राजकारणाविरूद्ध आक्रमक मोहीम. राज्यातील सर्व जागा लढवून युतीतून बाहेर पडण्याचा फायदा भाजपला मिळाला नाही. अर्थात, मतांच्या वाढलेल्या टक्केवारीचा लाभ आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच प्राप्त होईल.नागालँण्डमध्ये नेफियु रिओ यांच्या नेतृत्वाखालील ‘नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’ (एनडीपीपी) सोबत युती करून यश मिळवले आहे. मेघालयचा विचार करता, भाजप पुन्हा सत्ताधारी सरकारचा भागीदार म्हणून सहभागी होण्यास तयार आहे. ६० सदस्यांच्या विधानसभेत २६ जागा जिंकूनही ‘सीएम’ कोनराड संगमा यांच्या ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ला (एनपीपी) बहुमताची कमतरता आहे. मात्र, तेथेही भाजपसोबत सत्ता स्थापन होणे औपचारिकताच आहे.

 
Karnataka, Telangana, Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh assembly elections

ईशान्येतील निवडणुकीचे संदेश


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ईशान्य भारतात मोठे काम आहे. मात्र, तरीदेखील २०१४ पूर्वी भाजपला तेथे राजकीय यश प्राप्त होत नव्हते. आता मात्र ईशान्येकडील राज्यांमध्ये पक्षाने आपली मुळे घट्ट केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ईशान्येकडे विशेष लक्ष दिले. याठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाची बरीच कामे झाली आणि ज्या ठिकाणी पूर्वी साधे रस्तेही नव्हते तिथे रस्ते कसे बांधले गेले आणि अनेक नवीन रस्त्यांची कामे कशी सुरू आहेत, हेही भाजपने जनतेला सांगितले. गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान मोदींनी ईशान्येकडील राज्यांचे ५० हून अधिक दौरे केले आहेत. आता त्याचा राजकीय फायदाही होताना दिसतो.

 
अलीकडच्या काळात एकापाठोपाठ एक निवडणुकांमध्ये पराभूत होऊन काँग्रेस आपला जनाधार दिवसेंदिवस गमावत चालली आहे. काँग्रेसचा वारंवार पराभव होत असल्याने त्यांची जागा आता अन्य पक्ष झपाट्याने घेत आहेत. तथापि, त्रिपुरातील गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जी भीषण स्थिती गाठली होती, त्यातून ती थोडी सावरली आहे. यावेळी काँग्रेस आणि डाव्यांची युती होती, त्यामुळे काँग्रेसलाही काही जागा मिळाल्या आहेत. मात्र, काँग्रेसची हक्काची मानली जाणारीवनवासी मतदारांची मतपेढी आता भाजप आणि टिपरा मोथा या पक्षाकडे गेली आहे, तर मेघालयमध्ये तृणमूल काँग्रेसने काँग्रेसच्या अडचणीत वाढ केली आहे.

 
भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने अनेक आघाड्या केल्या आहेत. त्रिपुरात डाव्यांशी युती करण्याचा निर्णय असाच होता. मात्र, ही युती यशस्वी झाली नसल्याचे निवडणूक निकालाने सिद्ध केले. काँग्रेसचा असा आघाडीचा प्रयोग यापूर्वीही यशस्वी झालेला नाही. पश्चिम बंगालमध्येही, तृणमूल आणि भाजप यांच्यात थेट लढत असताना, डाव्यांशी युती करून ही लढत तिरंगी बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तोही यशस्वी ठरला नव्हता. त्यामुळे आता कोणताही विचार न करता केवळ भाजपला पराभूत करण्यासाठी आघाडी करून उपयोग नाही, हे काँग्रेसने लक्षात घेणे आवश्यक आहे.

हिमंता बिस्व सरमा यांची रणनीती

 
ईशान्येत भाजप मजबूत असण्याची अनेक कारणे आहेत. या क्षेत्रात पक्षाचा प्रसार करण्यासाठी अतिशय सुयोग्य अशी रणनीती आखण्यात आली. त्याअंतर्गत प्रादेशिक समस्या आणि नेत्यांना प्राधान्य देण्यात आले. हे सर्व अतिशय हुशारीने केले. ‘नॉर्थ-ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स’ (एनईएडी) ची स्थापनाहे त्याचे उदाहरण. त्यानंतर राहुल गांधी यांनी अपमान केल्याने भाजपमध्ये आलेले हिमंता बिस्व सरमा यांचे भाजपच्या ईशान्य विजयातील योगदान खूप मोठे आहे. भाजपने ‘एनईएडी’ची जबाबदारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याकडे सोपविली आहे. मेघालय, नागालॅण्ड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सरमांनी तिन्ही राज्यांचे झझावाती दौरे केले. त्यांनी सर्वप्रथम नेफ्यु रिओ यांना दहशतवादग्रस्त नागालॅण्ड राज्यात दुसर्‍या टर्मसाठी विश्वासात घेतले. त्यानंतर माणिक साहा यांच्या रूपाने ‘डॅमेज कंट्रोल’ कमी करण्यास उपयुक्त असलेला चेहरा शोधण्यात विशेष लक्ष घातले. त्याचप्रमाणे कोनराड संगमा यांनाही पुन्हा विश्वासात घेण्यात सरमा महत्त्वाची भूमिका बजावित आहेत.

अर्थात आव्हानेही आहेतच!


त्रिपुरामध्ये भाजपचेविजयाचे अंतर मागीलवेळपेक्षाकमी होते. टिपरा मोथा, डावे-काँग्रेस आघाडी यांच्यात मतांची विभागणी झाली. त्यामुळे भाजपला सुमारे दहा जागांवर फायदाही झाला आहे. मात्र, टिपरा मोथा स्वतंत्र टिपरालँडची मागणी करत आहे. भाजप ही मागणी कशी हाताळेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, या मागणीस सामोपचाराने हाताळणे शक्य न झाल्यास पुन्हा अराजकी कारवाया वाढू शकतात. मेघालयमध्ये कोनराड संगमा यांना भाजपची मदत घेऊनही बहुमताचा आकडा गाठणे शक्य नसून अन्य प्रादेशिक गटांना सोबत घ्यावे लागणार आहे. नागालॅण्डमध्ये काँग्रेसच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काही जागा जिंकल्या आहेत,रामदास आठवले यांच्या पक्षालाही विजय मिळाला आहे. त्यामुळे नागालॅण्डमध्ये भाजपला अधिक काम करावे लागणार आहे.
 
 
‘अ‍ॅण्टि इन्कम्बन्सी’च्या संकल्पनेस तडा

 
भारतातील प्रत्येक निवडणुकीच्या निकालातून राजकीय संदेश मिळत असतो. तो संदेश नेमकेपणाने समजून घेण्याचा राजकीय शहाणपणा असल्यास विजयाचा फॉर्म्युला अतिशय सहजपणे प्राप्त होतो. ईशान्येकडील तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी सत्ताविरोधी राजकारणाचे म्हणजेच ‘अ‍ॅण्टि इन्कम्बन्सी’चे युग संपत असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. सत्ताधारी पक्षाला आणखी एक संधी देण्यासाठी मतदार आता सज्ज झाले आहेत.विकासाचे काम करूनही निवडणुका जिंकता येतात, या संकल्पनेला तीन राज्यांच्या निवडणूक निकालांनी पुन्हा एकदा पुष्टी दिली आहे. संपूर्ण ईशान्येतील राजकीय स्थैर्यामागे विकासाचा वेग हा सर्वांत मोठा हातभार आहे. पंतप्रधान मोदींनी विकासाचा समावेश निवडणुकीच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात केला आहे. निवडणूक निकालांनी धार्मिक फतव्यांच्या राजकारणालाही धक्का दिला आहे. नागालॅण्डमध्ये भाजप आणि ‘एनडीपीपी’चे नाव न घेता त्यांना मतदान न करण्याचे आवाहन चर्चकडून करण्यात आले होते. मात्र, मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.


एकूणच ईशान्येतील निवडणुकीचे निकाल अतिशय सकारात्मक आहेत. ते सकारात्मक राजकारणाचा संदेश देतात. या निकालांवरून संपूर्ण ईशान्येत भाजपची मजबूत पकड दिसून येते. आसाम, अरुणाचल, मणिपूर आणि त्रिपुरा या सातपैकी चार राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. नागालॅण्ड आणि मेघालय या दोन राज्यात युतीचे सरकार स्थापन होईल. या निकालांनी ईशान्येतून काँग्रेस हद्दपार झाल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस आता प्रादेशिक पक्षांशीही स्पर्धा करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे ईशान्येचे राजकारण भाजपचा उदय आणि काँग्रेसचे पतन याचे द्योतक ठरले आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.