‘हवामानबदलाला’ कोण जबाबदार?

    26-Mar-2023
Total Views |
Who is responsible for 'climate change'?

अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने नुकतेच प्रकाशित केलेल्या हवामान बदला संबंधित एका वैज्ञानिक अभ्यासचा आपण आढावा घेणार आहोत. मानवी क्रियाकलपांमुळे, तीव्र हवामानाच्या घटना कशा वाढल्या आहेत आणि त्यांची ताकद कशी वाढली आहे तसेच या घटना व त्यांचा जागतिक तापमानवाढीशी कसा संबंध आहे, याचा पुरावा मांडला आहे.


२००० च्या दशकाच्या सुरुवातीला, हवामान-विज्ञान संशोधनात एका नवीन अभ्यास पद्धतीची सुरुवात झाली. या अभ्यासाने पूर, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि वादळं यासारख्या हवामानाच्या भीषण घटनांवर मानवी हस्तक्षेपाचे ठसे शोधण्यास सुरुवात केली. ‘एक्सट्रिम इव्हेंट्स एट्रीब्युशन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या, या अभ्यास क्षेत्राने केवळ विज्ञान जगतामध्येच नव्हे, तर प्रसारमाध्यमांमध्येदेखील गती प्राप्त केली आहे. या अभ्यासांमध्ये हवामानबदलाच्या अमूर्त संकल्पनेला, वैयक्तिक विचार आणि मूर्त अनुभवांशी जोडण्याची ताकद होती.
 
अमेरिकेतील जंगलातील आग, भारत आणि पाकिस्तानमधील उष्णतेच्या लाटेपासून ते आशियातील टायफून आणि युकेमधील विक्रमी पावसापर्यंत जगभरातील हवामानाच्या तीव्र घटनांसंबंधी शास्त्रज्ञांनी ४०० हून अधिक प्रमुख शोधनिबंध गेल्या काही वर्षात प्रकाशित केले आहेत. या शोधनिबंधांनी, मानवी क्रियाकलापांमुळे, तीव्र हवामानाच्या घटना कशा वाढल्या आहेत आणि त्यांची ताकद कशी वाढली आहे, तसेच या घटना व त्यांचा ‘ग्लोबल वॉर्मिंग’शी कसा संबंध आहे, याचा पुरावा मांडला आहे. या विश्लेषणामुळे काही अतिशय स्पष्ट निष्कर्ष निघतात.
 
या डेटावरती ‘कार्बन ब्रीफ’च्या टीमने केलेल्या विश्लेषणाच्या आधारे, पुढील निष्कर्ष स्पष्ट होतात. डेटा सूचित करतो की, गेल्या दोन दशकात, उल्लेखनीय अशा ५०४ ‘एक्सट्रिम’ हवामानाच्या घटना घडल्या. यापैकी तब्बल ७१ टक्के घटना (५०४ पैकी ३५८), मानवी हस्तक्षेपाने उद्भवलेल्या हवामान बदलांमुळे अधिक तीव्र किंवा अधिक संख्येत घडू लागल्या आहेत, असे कळते. तसेच, फक्त नऊ टक्के घटना, हवामान बदलांमुळे सौम्य बनल्या आहेत. म्हणजेच, सगळ्या घटना बघता तब्बल ८० टक्के (५०४ पैकी ४०३) घटनांवर मानवाचा प्रभाव दिसला आहे.
 
 
या अभ्यासात शास्त्रज्ञांनी १५२ अतिउष्णतेच्या घटनांचे मूल्यांकन केले. असे दिसून येते की, ९३ टक्के (१५२ पैकी १४०) घटनांवर हवामान बदलांचा प्रभाव आहे व त्यामुळे या अतिउष्णतेच्या घटना तीव्र झालेल्या समजतात. तसेच या अभ्यासात १२६ अतिपर्जन्य घटनांचा अभ्यास केला गेला आहे. यातदेखील ५६ (१२६ पैकी ७१) घटना मानवी क्रियाकलापांमुळे अधिक संभाव्य किंवा अधिक गंभीर झाल्या आहेत, असे समजते. ८१ संपूर्ण दुष्काळी घटनांचा अभ्यास केला असता, मानवी हस्तक्षेप यातल्या ६८ टक्के (८१ पैकी ५५) घटनांना तीव्र करण्यास कारणीभूत असल्याचे आढळून येते. ‘आपण खरोखरच हवामान बदलावर परिणाम करत आहोत का?’ या जुन्या व घिसापिट्या प्रश्नाला आता संपूर्ण विराम देण्यासाठी या अभ्यासाने पुरेसा पुरावा दिला आहे, असे मला वाटते.

हवामान बदलावरील अभ्यास आणि हवामान बदलावरील मानववंशशास्त्रीय अर्थात anthropological परिणामांचा अभ्यास अधिक अचूक झाल्यामुळे या ‘एक्सट्रिम इव्हेंट्स’चे परिणाम अधिक स्पष्ट होत आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘नासा’च्या अभ्यासाने या ज्ञानात भर पडली आहे. शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की आपला ग्रह जसजसा गरम होत जाईल आणि हवामान बदलत जाईल, तसतसे दुष्काळ आणि पूर अधिक वारंवार आणि तीव्र होतील. आता या गोष्टी आधीपासूनच अनेक शास्त्रज्ञ संगत होते, पण तेव्हा ते ठोकताळे होते. आता हा पुरावा आहे. NASA-नेतृत्वाखालील एक नवीन अभ्यास पुष्टी करतो की, मुख्य दुष्काळ आणि ‘प्लुव्हियल पीरियड्स’ अर्थात जास्त पाऊस पाडण्याची वर्षे, म्हणजेच जमिनीवर अतिवृष्टीचा कालावधी, या घटना खरंच जास्त वेळा आहेत व जास्त तीव्रतेने होत आहेत.

 दि. १३ मार्च, २०२३ रोजी ‘नेचर-वॉटर’ या ‘सायंटिफीक जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, दोन NASA शास्त्रज्ञांनी NASA / जर्मन GRACE (ग्रॅव्हिटी रिकव्हरी अ‍ॅण्ड क्लायमेट एक्सपेरिमेंट) आणि GRACE-FO (Follow up) कृत्रिम उपग्रहांच्या२० वर्षांच्या डेटाचे परीक्षण केले, ज्यामुळे भूतकाळातल्या अत्यंत ओल्या आणि कोरड्या घटना आता ओळखल्या जाऊ शकतात. या अभ्यासात, लेखक, रॉडेल बेलिंग ली यांनी २००२ ते २०२१ या कालावधीत तब्बल १०५६ अत्यंत ओल्या आणि कोरड्या घटनांचा अभ्यास केला आहे.

२०१५ ते २०२१ या काळात म्हणजे, आपल्या रेकॉर्डमधील नऊ सर्वांत उष्ण वर्षांपैकी सात वर्षांमध्ये, जगभरातील तीव्र घटना, दर वर्षी कमीत कमी चार ते पाच तरी घडल्याच. याच्या तुलनेत, त्या आधीच्या १३ वर्षांमध्ये प्रतिवर्षी फक्त तीन अत्यंत ओल्या आणि कोरड्या घटना दरवर्षी घडल्या. लेखकांच्या म्हणण्यानुसार, हा डेटा बरोबर माहिती देतो आहे. कारण, ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे जी तापमान वाढ झाली आहे, त्यामुळे दुष्काळात, गरम हवेमुळे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन जास्त बाष्प हवेत मिसळते आणि म्हणून तीव्र पर्जन्याच्या घटनांचे प्रमाणदेखील वाढते. आपण हीच गोष्ट अगदी काही दिवसांपूर्वी अनुभवली. जेव्हा अतिउष्म फेब्रुवारी ने मार्चच्या मध्यात जोरदार पाऊस पडला. तीव्र हिमवर्षाव आणि पर्जन्यवृष्टीच्या घटनांना उत्तेजन देण्यासाठी हीच उबदार हवा कारण बनते. सामान्य माणसासाठी जरी दोन अंश तापमान वाढ जास्त वाटत नसली, तरी जलचक्रावर त्याचे परिणाम मूर्त आहेत, असे मॅट रॉडेल या अभ्यासाचे सह-लेखक आणि ‘नासा’च्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील जलशास्त्रज्ञ म्हणाले.

भारतदेखील या ‘एक्सट्रिम इव्हेंट्स’पासून मुक्त नाही, हे आपण बघत आहोतच. आपण सगळेच हवामानातील फरक पाहत आहोत, ज्यामुळे फेब्रुवारीमध्येच कमाल तापमान वाढ आपण अनुभवली आणि गेल्या काही दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस पडताना बघितला. दुर्दैवाने, जानेवारीच्या अखेरीस याच वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या लेखात केलेल्या अंदाजानुसारच, भारताने १९०१ पासून आतापर्यंतचा सर्वात उष्ण फेब्रुवारी नोंदवला आहे. (भारतात १९०१ मध्ये रेकॉर्ड ठेवण्यास सुरुवात झाली). देशभरात कमाल सरासरी तापमान २९.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अधिक चिंतेची बाब म्हणजे ‘आयएमडी’ (भारतीय हवामान विभाग) आणि इतर हवामान अहवाल असे सुचवतात की, येत्या एप्रिल-मे महिन्यात भारतातील अनेक भागांमध्ये आपल्याला सामान्यपेक्षा तीव्र उन्हाळा जाणवणार आहे. संपूर्ण भारताबरोबरच, हा फेब्रुवारी महिना उत्तर-पश्चिम भारतातही विक्रमी उष्ण ठरला आणि सरासरी तापमान सामान्यपेक्षा तब्बल तीन ते चार अंशांनी जास्त होते. ‘आयएमडी’ने येत्या उन्हाळ्यात देशातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघाताचा इशारा दिला आहे.

नुकत्याच झालेल्या युरोपमधील अभ्यासात असेही आढळले की, युरोपदेखील नोंदवलेल्या इतिहासतल्या दुसर्‍याच सर्वात उष्ण हिवाळ्यातून बाहेर पडत आहे (सर्वात उष्ण हिवाळा २०१९ - २०२०च्या वर्षी नोंदवला गेला होता). शास्त्रज्ञांनी सांगितले की, हवामान बदल तीव्र होत असताना, युरोपमधील डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतील सरासरी तापमान १९९१-२०२० या काळातील सरासरी तापमानापेक्षा तब्बल १.४ अंश सेल्सिअस जास्त होते. ही माहिती, ‘ईयु’च्या ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’ने प्रकाशित केली आहे. डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या सुरुवातीस युरोपमध्ये हिवाळ्यात तीव्र उष्णतेची लाट आली. या काळात फ्रान्सपासून हंगेरीपर्यंतच्या देशांमध्ये विक्रमी-उच्च हिवाळ्याच्या तापमानाची नोंद केली गेली आहे आणि या भागात बर्फाच्या कमतरतेमुळे ‘स्की-रिसॉर्ट’ बंद करण्याची वेळ आली होती. विचार करा, हिवाळ्यात युरोपमध्ये बर्फाची कमतरता! यावर्षी दि. २ जानेवारी रोजी, संपूर्ण युरोपियन प्रदेशात शेकडो तापमानाचे रेकॉर्ड मोडले गेले, ज्यात स्वित्झर्लंडमधील शहर ऑल्टडॉर्फ १९.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
 
उच्च तापमानामुळे वनस्पती आणि प्राण्यांनाही गंभीर धोका निर्माण होतो आहे. कारण, तापमान वाढीमुळे झाडे हिवाळ्यात पालवी दाखवू लागली आहेत आणि प्राणी वेळे आधीच ‘हायबरनेशन’मधून बाहेर पडू लागली आहेत. यामुळे नंतरच्या थंडीमुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. वनस्पती आणि प्राण्यांची ही बदलती जीवनशैली विशेषतः धोकादायक आहे. कारण यामुळे नक्कीच संपूर्ण पर्यावरणीय समतोल बिघडेल आणि अनेक प्रजाती मृत्युमुखी पडतील.
 
थोडक्यात, आपण सर्वांनी या घटनांचे गांभीर्य समजून घेणे आणि आगामी अत्यंत कडक उन्हाळ्यासाठी तयार राहणे महत्त्वाचे आहे. मी असे सुचवू इच्छितो की तुमच्या आजूबाजूला, तसेच तुमच्या घरी कुणी प्राणी-पक्षी असल्यास, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि उन्हाळ्याच्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी रस्त्यावर भटकणार्‍या प्राणी-पक्ष्यांसाठीदेखील जमल्यास थोडेसे पाणी नक्की ठेवा. तुमच्याकडे पुरेसा स्वच्छ पाणीसाठा आहे हे पाहा आणि या उन्हाळ्यात जमेल तितका पाण्याचा अपव्यय टाळा. कारण, या तापमानात पाण्याची टंचाई कधीही जाणवू शकेल. काळजी घ्या आणि स्वस्थ राहा.



-डॉ. मयूरेश जोशी