‘फिडलर ऑन द रुफ’ आणि हाईम टोपोल

Total Views |
 
Fiddler on the Roof
 
 
इथेच हाईम टोपोलचा भाग्योदय झाला. 1967 साली त्याने ‘वेस्ट एंड’वर नवीची भूमिका अशी काही बहारीने उभी केली की, 1994 पर्यंतच्या एकंदर साडेतीन हजार रंगमचीय प्रयोगांमध्ये आणि 1971च्या त्याच नावाच्या चित्रपटातही त्यालाच तवीची भूमिका साकारायला मिळाली.
 
आधुनिक जगात ‘वेस्ट एंड थिएटर्स’, लंडन आणि ‘ब्रॉडवे थिएटर्स’, न्यूयॉर्क ही ठिकाणं, नाटक या क्षेत्रातली जगभरातली सर्वोच्च स्थानं समजली जातात. या दोन्ही ठिकाणांवर हजारो खेळ झालेलं एक लोकप्रिय नाटक म्हणजे ‘फिडलर ऑन द रुफ.’ 1964 साली हे नाटक प्रथम ‘ब्रॉडवे’वर आलं. मग, वेस्ट एंडवर आलं. ते तुफान गाजल्यामुळे अनेक अभिनयसंपन्न नटांनी या नाटकाचा नायक तवी याची भूमिका वठवली. त्यापैकी 3 हजार, 500 पेक्षाही अधिक प्रयोगांमध्ये हाईम टोपोल या नटाने ती भूमिका केली होती. चित्रपटातही त्यानेच ते काम केलं होतं. बुधवार, दि. 8 मार्च रोजी वयाच्या 87व्या वर्षी टोपोल तेल अवीवमध्ये मरण पावला. तो ज्यू होता. 1935 साली जेव्हा तो तेल अवीवमध्ये जन्मला, तेव्हा इस्रायल देश अजून जन्मलाच नव्हता. त्याचा बाप जेकेब टोपोल हा रशियन ज्यू होता. रशियातल्या ज्यू जमातीच्या छळाला कंटाळून तिथले ज्यू लोक संधी मिळेल तसे स्थलांतरित होत असत. 1920 नंतर पॅलेस्टाईन मधला ज्यू नेता डेव्हिड बेन गुरियान याने देशोदेशींच्या ज्यू लोकांना पॅलेस्टाईनमध्ये येण्याचं आवाहन केले.
 
त्यानुसार जेकब टोपोल रशियातून तेल अवीवमध्ये आला. तिथे तो ‘हॅगाना’ या ज्यूंच्या गुप्त संघटनेत काम करू लागला. तिथेच त्याला इमरेला गोल्डमन भेटली. विविध युरोपीय देशांमधून पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित झालेल्या या ज्यूंची स्थिती अतिशय खडतर होती. ही इमरेला गोल्डमन हात शिलाई करून कपडे शिवत असे. म्हणजे कपडे शिवण्याचं मशीनही तिच्याकडे नव्हतं. जेकब आणि इमरेला यांचा मुलगा म्हणजे हाईम. पॅलेस्टाईनमधल्या अरबांना हे उपरे ज्यू तिथे अजिबात नको होते. त्यामुळे ते ज्यू वस्त्यांवर सरळ हल्ले चढवून दंगे करीत. ‘हॅगाना’ किंवा तिच्याचसारख्या ज्यू संघटनांचे कार्यकर्ते अरबांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत. थोडक्यात, आयुष्य उपजीविका कसलीच शाश्वती नव्हती. तरी, त्यात तशा वातावरणात ज्यू लोक आपल्या मुलांसाठी शक्य तितक्या चांगल्या शाळा चालवीत. एवढंच नव्हे, तर शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच त्या मुलांमध्ये विविध विद्या, कला यांचीही जोपासना करण्याचा प्रयत्न करीत. हाईम टोपोल आणि त्याच्या दोन धाकट्या बहिणी असा जीवनसंघर्ष करीत मोठ्या झाल्या. हाईमला खरं म्हणजे ‘कमर्शियल आर्टिस्ट’ बनायचं होतं. पण, त्याच्या शिक्षकांना त्याच्यात अभिनय गुणाची चमक दिसली. त्यांनी त्याला अभिनयकलाच विकसित करण्याचा रास्त सल्ला दिला.
 
हाईम 13 वर्षांचा असताना म्हणजे 1948 साली इस्रायल हा ज्यूंचा स्वतंत्र आणि सार्वभौम देश निर्माण झाला. शहर तेल अवीव ही त्याची राजधानी बनली. नवजात इस्रायल देशाचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियान यांनी एक फार महत्त्वाचा निर्णय घेतला. 18 वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुष नागरिकांसाठी विशेषत: कॉलेज विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लष्करी सेवा सक्तीची केली. त्यानुसार 1953 साली हाईम टोपोल लष्करात भरती झाला. 1956 सालचं सिनाई वाळवंटातलं इजिप्त-इस्रायल युद्ध हाईमने आघाडीवर प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि लढून अनुभवलं. यावेळी कथा- कादंबर्‍या आणि चित्रपटांत दाखवतात तशीच स्थिती झाली होती. नुकतंच लग्न झालंय अजून हळददेखील पुसली गेलेली नाही आणि नवर्‍या मुलाला आघाडीवर बोलावणं आलंय. मग ती नवरी मुलगी जीवाच्या कराराने नवर्‍याला म्हणत्येय, “पहा टाकले पुसूनि डोळे, गिळला मी हुंदका, रणांगणी जा सुखे राजसा, परतून पाहू नका’ अगदी अशीच स्थिती झाली होती. हाईम टोपोलने गेलिया फेंकेलस्टाईनशी लग्न करून फक्त दोन दिवस झाले होते आणि सिनाईमध्ये इजिप्त-इस्रायल युद्ध सुरू झालं. इथे परिस्थितीतला बदल एवढाच होता की, नवरा आणि नवरी दोघांनाही रणभूमीचं आमंत्रण आलं होतं.
 
कारण, दोघंही सैनिकी सेवेत होते. युद्ध काळातही पिछाडीवरच्या छावण्यांमध्ये किंवा प्रत्यक्ष लढाई चालू नसताना सैनिकांना मनोरंजनाची आवश्यकता असतेच. हाईम टोपोल अशा वेळी नकला करी, गाणी म्हणे किंवा छोटी नाटुकली (जी हल्ली हास्यजत्रेमुळे ‘स्किट’ म्हणून प्रसिद्ध आहेत.) सादर करून सहकार्‍यांची करमणूक करीत असे. नंतर त्याने ‘नाहाल’ नावाची सहकारी सैनिकांचा एक गटच स्थापन केला. थोडक्यात, इस्रायली सैन्यांतर्गत नाटक कंपनी काढली. इकडे इस्रायलमध्ये हाईम टोपोलचं आयुष्य असं चाललेलं असताना तिकडे अमेरिकेत वेगळ्याच घडामोडी सुरू होत्या. एका अशा रंगमंचीय प्रयोगाची बीजं पडत होती की, जो प्रयोग ‘ब्रॉडवे’ रंगभूमीवर नवा इतिहास निर्माण करणार होता.
 
आता इथे ‘ब्रॉडवे’ आणि ‘वेस्ट फंड’ यांच्याबद्दल सांगायला हवं. पाश्चिमात्य जगताचा आजचा एकूण इतिहास हा ग्रीकांपासून सुरू होतो. पाश्चिमात्य म्हणून जे काही तत्त्वज्ञान, विचार, संस्कृती, कला, क्रीडा हे सगळं प्रथम ग्रीक साम्राज्य, मग रोमन साम्राज्य आणि मग ख्रिश्चानिटी यांमधून निर्माण होत गेलेलं आहे, असं पश्चिमी पंडित मांडतात, तर तशीच नाटक ही कलादेखील ग्रीकांपासून निर्माण झाली. तुम्हाला आठवत असेल, तर आपल्याकडचे विचारवंत बुद्धिमंत वगैरे लोक आपल्या भाषणांमध्ये लेखांमध्ये अचीलीस, युरिपीड्स, सोफोक्लिस अशी ग्रीक नाटकारांची नावं टाकून भारदस्तपणा आणून श्रोत्या वाचकांना उगीच दबकावून टाकण्याचा प्रयत्न करीत असतात.
 
असो. तर त्या ग्रीक नाट्यलेखकांनंतर नाटक या कलाप्रकाराला फार उच्च दर्जावर नेऊन पोहोचविणारा लेखक म्हणजे विल्यम शेक्सपिअर. तो इंग्रज होता. तो 16व्या शतकात राणी एलिझाबेथ पहिली हिच्या कारकिर्दीत होऊन गेला. त्याच्यामुळे इंग्लंडमध्ये नाटक या कलेला आणि धंद्यालाही एकदम उर्जितावस्था प्राप्त झाली. तत्कालीन लंडन शहराच्या (आज ज्याला ‘सेंट्रल लंडन’ म्हणतात.) पश्चिमेकडे एका पाठोपाठ एक अनेक उत्तम थिएटर्स (आमच्या पब्लिक भाषेत ‘थेटर’) उभी राहात गेली. आजही ती परंपरा टिकून आहे. किंबहुन, परंपरा जपणार्‍या इंग्लिश लोकांनी ती टिकवून धरली आहेत. ‘वेस्ट एंड थिएटर्स’ म्हणजे एक प्रेक्षागृह नसून एक भलीमोठी वस्ती आहे. तिच्यात आज 39 प्रेक्षागृहं आहेत. एखादं नाटक ‘वेस्ट एंड’वर आलं किंवा ‘वेस्ट एंडने एखादं नाटक आणलं’ या वाक्याचा अर्थ असा असतो की ब्रिटिश रंगभूमीवर ते नाटक दाखल झालं. मग ते नाटक कोणत्याही प्रेक्षागृहात सादर झालेलं असो किंवा कोणत्याही कंपनीने ते निर्माण केलेलं असो. तीच स्थिती ‘ब्रॉडवे’ची आहे. अमेरिकेने इंग्लंडविरूद्ध क्रांतियुद्ध करून स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र बनवलेलं असलं तरी एकप्रकारे अमेरिका हे इंग्लडचंच एक्स्टेन्शन आहे.
 
त्यामुळे न्यूयॉर्कचा ‘ब्रॉडवे’ हा विभाग किंवा वस्ती म्हणजे 41 सुसज्ज थिएटर्सचा समुदाय-अमेरिकन भाषेत ‘थिएटर डिस्ट्रिक्ट’ आहे. यापैकी सर्वात जुनं थिएटर ‘ब्रॉडवे’ हे 1681 सालचं. आजची जीर्णोद्धारकेलेली ‘ब्रॉडवे’ची इमारतसुद्धा 1924 सालची म्हणजे 99 वर्षांपूर्वीची आहे. या ‘ब्रॉडवे’ थिएटरमुळे या एकंदर भागालाच ‘ब्रॉडवे डिस्ट्रिक्ट’ हे नाव पडलं. एखादं नाटक ‘ब्रॉडवे’वर आलं, याचा अर्थ ते अमेरिकन रंगभूमीवर आलं असा असतो. झार राजांच्या रशियन साम्राज्यात ‘पेल ऑफ सेटलमेंट’ नावाचा राखीव प्रदेश होता. साधारपणे आजचा पोलंड, लिथुएनिया, युक्रेन, लाटविया या देशांमधला हा भूप्रदेश ज्यू धर्मीय लोकांसाठी होता. ज्यू धर्मीयांनी या प्रदेशाच्या सरहद्दीबाहेर पडता कामा नये, असा झार राजांचा सक्त हुकूम होता. तिथेही ज्यू लोकांना जमीन विकत घेऊन शेती करायला बंदी होती.
 
कारखानदारी नव्हतीच, लष्करी सेवेतही बंदी होती. मग त्या ज्यूंनी करावं तरी काय? तर फुटकळ व्यापार, फेरीवाले, हस्तोद्योग वगैरे करण्याची त्यांना मुभा होती. थोडक्यात, ज्यू लोकांचा आर्थिक उत्कर्ष न होता, ते दरिद्री राहावेत अशी पुरेपूर काळजी घेतलेली होती. त्यातही अनेकदा रशियन गुंडांच्या टोळ्या ज्यू वस्त्यांवर धाड घालून लूटमार करीत, छळ करीत,आगी लावीत, रशियन पोलीस सरळ दुर्लक्ष करीत. या अशा धाड घालण्याच्या कार्यास रशियन भाषेत ‘पोग्रोम’ असा खास शब्दच होता मुळी. या छळाला कंटाळून असंख्य ज्यू लोकांनी अमेरिकेत स्थलांतर केलं. शोलेम आलेचेम हा असाच एक स्थलांतारित ज्यू लेखक होता. तवी गवळी हे एक काल्पनिक पात्र निर्माण करून शोलेमने रशियन साम्राज्यातल्या ज्यूंची केविलवाणी स्थिती, त्यांचा जीवनसंघर्ष चितारणार्‍या काही कथा लिहिल्या. तवी हा एक साधा गवळी आहे. बायको आणि तब्बल सात मुली यांचा ओढगस्तीचा संसार रेटतानाही ज्यू प्रथा, परंपरा जपण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पण, बदलता काळ याच्या कल्पनांना धक्के देत राहतो. तवी निरुपायाने बदलांना मान्यता देत आनंदाने पुढे जात राहतो. अखेरीस झारचे अधिकारी येऊन हुकूम बजावतात-दोन दिवसांत सगळ्यांनी हा गाव रिकामा करा.
 
शोलेम आलेचेमने 1894 ते 1914 या कालखंडात यिडिश भाषेत लिहिलेल्या या कथांवर ’फिडलर ऑन द रूफ’ या नावाचं संगीत नाटक 1964 साली प्रथम ‘ब्रॉडवे’वर आलं. त्यात नवी या नायकाची भूमिका सॅम्युअल मोस्टेल या अमेरिकन अभिनेत्याने केली. तसं पाहिलं तर वर दिलेल्या कथानकात ’ग्लॅमरस’ काहीच नाही. सर्व बाजूंनी गांजून गेलेल्या एका खेडवळ गरीब गवळ्याच्या संगीत आणि विनोद यांची फोडणी असलेल्या साध्यासुध्या कहाणीत अमेरिकन प्रेक्षकांना काय आवडलं? तर यातल्या नाट्यगुणाने यांच्या हृदयाला हात घातला, नाटक ‘ब्रॉडवे’वर हिट झालं.
 
मग आता ते ‘वेस्ट एंड’वर यायलाच पाहिजे. ‘वेस्ट एंड’वर प्रयोग करणार्‍या कंपनीची कुंडली सॅम्युअल मोस्टेलशी जुळेना. इथेच हाईम टोपोलचा भाग्योदय झाला. 1967 साली त्याने ‘वेस्ट एंड’वर नवीची भूमिका अशी काही बहारीने उभी केली की, 1994 पर्यंतच्या एकंदर साडेतीन हजार रंगमचीय प्रयोगांमध्ये आणि 1971च्या त्याच नावाच्या चित्रपटातही त्यालाच तवीची भूमिका साकारायला मिळाली.
 
आता थोडी आपल्याकडची गंमत- 1971 साली निर्माण झालेला ’फिडलर ऑन द रुफ’ चित्रपट आपल्याकडे म्हणजे अर्थातच सगळ्यात आधी मुंबईत 1974 साली लागला. या कालखंडात आपल्या तत्कालीन सरकारचं धोरण हे अरबांच्या दाढ्या कुरवाळण्याचं आणि इस्रायलला शिव्या देण्याचं, असं होतं. मग भारतात असा एक चित्रपट लागलाय की, ज्याचा हिरो इस्रायली आहे, हे अरबांना आवडलं नाही तर? उगाच भानगड नको. म्हणून टोपोल हा नट इस्रायली आहे असे न सांगता रशियन आहे, असे मोघम सांगण्यात आलं. पण, भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा आवडलाच नाही. कारण, पाश्चिमात्य प्रेक्षकांप्रमाणे रशियन ज्यू, त्यांची ससेहोलपट, त्यांचं स्थलांतर ही सगळी पार्श्वभूमी भारतीय प्रेक्षकांना माहितीच नव्हती मुळी. आता या सगळ्या माहितीसह ज्यांना हाईम टोपोलचा अभिनय बघायचा असेल, यांच्यासाठी हा चित्रपट इंटरनेटवर उपलब्ध आहेच.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.