वाढते तापमान, घटते अधिवास

    20-Mar-2023   
Total Views |
snow leopard in himalayas


काही दिवसांपूर्वीच नेपाळमधील बर्फाळ प्रदेशात वाघ आणि बिबट्याचा संचार तेथील पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांच्या निदर्शनास आला. त्यामुळे बर्फाळ प्रदेशांमध्ये अशा प्रकारे वाघ किंवा बिबट्यांचा होणारा वावर याकडे प्राण्यांच्या बदलत्या अधिवासाची खूण या दृष्टिकोनातून संशोधकांनी यावर अभ्यासही सुरू केला. यानिमित्ताने हाच प्रश्न उपस्थित होतो की, वन्यजीवांच्या अधिवासात होणारे हे बदल किती योग्य? किती अयोग्य? आणि त्यामागची नेमकी कारणं तरी काय?

मुख्यत्वे मध्य आशिया आणि भारतीय उपखंडाच्या बर्फाळ प्रदेशात हिम-बिबट्याचा अधिवास आढळून येतो. हिम-बिबट्या म्हणजेच ‘स्नो लेपर्ड.’ प्राधान्याने हिमालयीन पर्वतरांगांमध्ये आढळणारे हे हिम-बिबटे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये समुद्र सपाटीपासून १० ते १२ हजार फुटांवर वास्तव्यास असतात, तर हिवाळ्यामध्ये ते पर्वतरांगांवरुन सहा हजार फुटांपर्यंत खाली येतात. जीवनातील बहुतांश कालावधीत या हिम-बिबट्यांचा अधिवास उंच प्रदेशातच असल्यामुळे त्यांचे मुख्य शिकार क्षेत्रदेखील तिथेच असते. ‘भारल’ आणि ‘आयबेक्स’सारख्या जंगली मेंढ्यांसारखे प्राणी हे हिम-बिबट्यांची प्रमुख शिकार. पण, पर्वतरांगांमधील जंगली प्राण्यांच्या तुलनेत पायथ्याशी असलेल्या पाळीव किंवा फिरत्या जनावरांची शिकार करणे हे तुलनेने सोपे. म्हणून मग शिकारीसाठी भक्ष्यच सापडत नसेल किंवा शिकार सहजगत्या करता यावी म्हणून मग हे हिम-बिबटे पर्वतरांगांवरुन आता खाली मानवी वस्तीत दाखल होऊ लागले आहेत.

 जंगल हेच खरंतर वाघ आणि बिबट्याचे मुख्य अधिवास क्षेत्र. पण, मानवी हस्तक्षेप आणि अतिक्रमणामुळे जगभरातील जंगलक्षेत्र धोक्यात आले. वाढते प्रदूषण, लोकसंख्येचा विस्फोट आणि त्यामुळे उद्भवलेले हवामान बदल यांचाही परिणाम वनक्षेत्रावर झाला. कोळसा व खनिज तेलावर आधारित उद्योगांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे वायू प्रदूषकांचे प्रमाणही वाढले. त्याची परिणती पुढे वाढलेल्या वायू प्रदूषणात आणि जागतिक तापमानवाढीत झाली आणि या जागतिक तापमानवाढीच्या अनेक परिणामांपैकीच एक म्हणजे जैवविविधतेला निर्माण झालेला धोका आणि घटते अधिवास क्षेत्र!

सामान्य जंगल हेच अधिवास क्षेत्र असले तरीही वातावरणीय बदल आणि तापमानवाढीमुळे वाघ आणि बिबट्यांचे उत्तरेकडील थंड प्रदेशाकडे स्थलांतर सुरु असल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे. पण, त्यातही अडचण अशी की, वाघाचे शरीर हे तुलनेने अधिक वजनदार असल्याने पर्वतीय भागात किंवा उंच प्रदेशांमध्ये वाघाला शिकार करणे, हेही अवघड जाऊ शकते. पण, आता वाघ आणि बिबटे या प्रदेशात स्थलांतरित होऊ लागल्यामुळे आपसुकच हिम-बिबट्यांना शिकारीसाठी प्रतिस्पर्धी निर्माण होऊ लागले. मात्र, वाघ-बिबट्या हे पायथ्याच्या प्रदेशात दाखल झाल्यामुळे तेथील प्राण्यांची शिकार आता हिम-बिबट्यांना करता येणार नाही. परिणामी, शिकारीसाठी प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याने हिम-बिबट्यांनी पर्वतीय प्रदेशातील जंगली प्राण्यांच्या शिकारीकडे मोर्चा वळवला. त्याचबरोबर वाघ आणि बिबट्यांचे मानवी वस्तीत घुसखोरीचे प्रमाण वाढल्यामुळे या भागात मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

सामान्यतः वाघ, बिबट्या किंवा हिम- बिबट्या आणि इतर मार्जार कुळातील मोठे प्राणी हे सहसा एकमेकांशी संघर्ष टाळणेच पसंत करतात. त्यामुळे आता वाघ आणि बिबट्यांचे वाढते वास्तव्य हिम-बिबट्यांना विस्थापित करण्यास कारणीभूत ठरेल की काय, अशी शंका वन्यजीव संरक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच तापमान वाढीमुळे जसे वाघ आणि बिबट्या उत्तरेकडे स्थलांतरित होत असल्याचे सांगितले जाते, तसेच हिम-बिबट्यांची संख्याही अधिकाधिक उत्तरेकडे सरकताना दिसते.एकूणच काय तर तापमान वाढीमुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. त्यातच काहीवेळा प्राणी किंवा जैवविविधतेतील इतर घटक वातावरणाशी जुळवून घेतात, तर काही वेळेला ही नैसर्गिक प्रक्रिया यशस्वी होताना दिसत नाही. परिणामी, जैवविविधतेचे चक्र कोलमडते व जैवविविधतेचा र्‍हास होतो. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होईपर्यंत वाट न पाहता, वातावरणातील बदलांचे परिणाम लक्षात घेऊन तत्काळ कृतीच्या दिशेने पाऊले उचलणे हीच काळाची गरज!



समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121