चीनचे भारताविरोधातील ‘मल्टिडोमेन युद्ध’ (भाग-३)

    04-Feb-2023   
Total Views |
China's 'Multidomain War' Against India


२०२३ मध्ये चीन भारताच्या विरूद्ध वेगवेगळ्या प्रकारे, ‘मल्टिडोमेन युद्ध’ लढेल आणि त्याचा एक महत्त्वाचा आयाम असेल माहितीयुद्ध, जे प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून लढले जाईल. अपप्रचार युद्ध, मानसिक युद्ध करून भारतीय जनतेचे मत परिवर्तन करणे, त्याचा मुख्य उद्देश असेल. त्यामुळे या विरोधात भारताने वेळीच सर्तक राहून ठोस पावले उचलायला हवी.


भारतीय जनतेचे मत परिवर्तन करणे

भारतीय सीमाभागावरील चिनी घुसखोरीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करत आहे. अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये झटापट झाल्याचे समोर आले होते. यावरून केंद्र सरकारचे चीन धोरण पूर्णपणे चुकले आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला होता.
याला उद्देशूनच आता परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. एस जयशंकर म्हणाले, “चीनने भारताच्या जमिनीवर १९६२ सालीच घुसखोरी केली होती. हे विरोधी पक्ष सांगणार नाही.” भारत आणि चीन सीमेवर २०१७ साली तणाव निर्माण झाला होता. तेव्हा, राहुल गांधींची चीनच्या राजदूताबरोबर बैठक झाल्याचे समोर आले होते. यावरूनही एस. जयशंकर यांनी राहुल गांधींना टोला लगावला. “जर मला चीनबद्दल काही जाणून घ्यायचं झालं, तर मी चीनच्या राजदूताकडे जाणार नाही. माझ्या देशातील लष्करप्रमुखाकडे जाणार,” असे याविषयी बोलताना एस. जयशंकर यांनी म्हटलं.भारतीय लष्कर चीनशी लडाख सीमेवर लढत आहे, त्याचवेळी भारतीय लष्कर पाकिस्तानशी नियंत्रण रेषेवर दररोजच लढत आहे.

माहितीयुद्ध ३६५ दिवस सुरू!

भारत-चीन सीमेवर जर १९६२ सारखे पारंपरिक युद्ध झाले, तर ते कसे लढले जाईल? चीन भारतीय प्रदेशात आपले सैन्य घुसवेल. पाकिस्तान, काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरही ‘जिहाद’ पुकारण्यासाठी फिदायीन मोकाट सोडेल. त्याला निश्चितच भारतीय लष्कर प्रत्युत्तर देईल. तसे करताना दोन्हीही बाजूंनी प्राणहानी होईल. चीन त्यांची हानी झाल्याचे मान्यच करणार नाही आणि त्यांची नेमकी मनुष्यहानी, भूमिहानी किती झाली, हे समजण्यास आपल्याकरिता तरी काही उपाय नाही. कारण, त्यांच्या बाजूची माध्यमे त्यांच्या संपूर्ण नियंत्रणात आहेत. पाकिस्तानही त्यांची हानी झाल्याचे मान्य करणार नाही. मारले गेलेले लोकही त्यांचे नव्हतेच, असेही म्हणतील. जसे, त्यांनी कारगिल युद्घात केले.

लष्कराने दिलेल्या आकड्यांवर शंका

भारतीय लष्कर आपल्या बाजूची प्राणहानी जाहीर करतील. आता खरे प्रचारयुद्ध सुरू होईल, मानसशास्त्रीय युद्ध सुरू होईल. भारतीय माध्यमांतील एक हिस्सा दिलेल्या आकड्यांवर शंका घेईल, कारण ते चीन वा पाकने घोषित केलेल्या आकड्यांशी जुळत नसतील. काही विरोधी पक्ष, माध्यमांचे भाग, काही कार्यकर्ते चिनी प्राणहानीच्या आकड्यांचे आणि पुन्हा जिंकून घेतलेल्या भूभागाचे पुरावे मागतील. कम्युनिस्ट पार्टी भारतीय विजयास खोटे ठरवेल आणि सांगेल की, हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेले आकडे आहेत. त्यावर त्यांचा विश्वास नाही. काही गैरसरकारी संघटना, माध्यमप्रसार केंद्रे, महाजालावर आधारित नव्या वाहिन्या, गुप्तपणे चीनकडून अर्थसाहाय्यित लोक याकरिता मेणबत्ती मोर्चे काढतील की, सरकार गरीब बिचार्‍या लष्करास चीन-पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात उगाचच लोटून देत आहे.

सामाजिक माध्यम योद्ध्यांचे युद्ध

या गैरसरकारी संघटना, दिवाणखान्यात, सोफ्यावर बसून काम करणार्‍या सामाजिक माध्यम योद्ध्यांचे साहाय्य मिळवतील. त्यांना युद्ध आणि देशाच्या राष्ट्रीय हिताबाबत/स्वारस्यांबाबत कल्पनाही नसेल. ते ’Save the Indian soldier from war, make peace not war, we want jobs, economy first not war, we stand with innocent soldiers' असले ट्विटर हँडल समाजमाध्यांवर सुरू करतील. ते ‘हुतात्मे’, ‘शूर सैनिक’ इत्यादी शब्द वापरणार नाहीत. त्यांचे शब्द ‘निरागस सैनिक’, ‘निरपराध सैनिक कुटुंबीय’ असे असतील. भारत सरकारच युद्धखोर आणि शांतीविरोधी असल्याचे चित्र रंगवणारे जनमत तयार केले जाईल.

देशाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी

या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या भूमिकेस धक्का पोहोचेल आणि पाश्चात्य जगातले चिनी अर्थसाहाय्यित माध्यम योद्धे भारताची प्रतिमा अल्पसंख्याकांविरोधी रंगवू लागतील. पुरावा म्हणून ते भारतातील काही विरोधकांचे भारतीय माध्यमांतील चिनी व पाकिस्तानी प्रेमीकरवी लिहिलेले अहवाल आणि लेख सादर करतील. यामुळे सशस्त्र दलांना युद्ध प्रभावीरीत्या लढणे अवघड होईल. त्या भूमिकेमुळे आपल्या देशांचे/सैनिकांचे मनोधैर्य खच्ची होईल आणि आपल्या सैन्याचा घात होईल.

अर्थसामर्थ्याचा वापर करून प्रचारयुद्धयंत्रणा

चीनने त्यांच्या प्रचंड अर्थसामर्थ्याचा वापर करून, आपल्या देशात एक प्रचारयुद्ध यंत्रणा उभारलेली आहे. काही अवकाशप्राप्त सैनिक, कार्यकर्ते, बुद्धिवंत, उदारमतवादी आणि इतर अनेकांना विकत घेतलेले आहे, जे भारतीय मुद्रित, विजकीय/इलेक्ट्रॉनिक आणि सामाजिक माध्यमांतून; प्रादेशिक, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून चिनी प्रचारास प्रकाशित करतात. काही गैरसरकारी संघटनाही देशात विकासविरोधी कार्यक्रम आणि चळवळी करण्यासाठी विकत घेतल्या गेलेल्या आहेत, जेणेकरून आर्थिक प्रगती थांबेल. देश कायमच आंदोलनामध्ये अडकेल आणि सामान्य जनजीवन विस्कळीत होईल.

अवनती, घातपात आणि मानसिक खच्चीकरणाचे युद्ध कसे हाताळाल?
देशाविरूद्धचे मानसशास्त्रीय माहितीयुद्ध चार पातळ्यांवर लढले जात आहे. यामागचा उद्देश देशाला हेच सांगण्याचा आहे की, चीन आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या खूप समर्थ आहे, म्हणून त्यांच्याशी लढू नका, ते जे म्हणतील ते ऐका. या मानसशास्त्रीय माहिती युद्धाचे लक्ष्य सरकार, सशस्त्र दले, माध्यमे आणि देशाचे सामान्य नागरिक आहेत.मात्र, सरकारला राजनैतिक पातळीवर चीनसोबत बोलणी सुरू करणे भाग पाडण्यात हे युद्ध अपयशी ठरलेले आहे.सशश्त्र दलांचे खच्चीकरण करण्यातही हे युद्ध अपयशी ठरलेले आहे. गलवान, तवांग सेक्टरमधील यांगत्से सीमाभागात लष्कराने दिलेला जशास तसे स्वरूपाचा प्रतिसाद त्यांचे मनोबल सिद्ध करतो. मात्र, माध्यमांचा एक भाग निश्चितपणे अवनत झालेला आहे आणि चीन व पाकिस्तानची भाषा बोलत आहे. त्याचे पर्यवसान काही भारतीय, चीन हे युद्ध जिंकत आहेत व आपले सैन्य ‘बॅकफूट’वर आहे, अशा मताचा झालेला आहे, जे चुकीचे आहे.

 
अपप्रचार युद्धास प्रत्युत्तर

या अपप्रचारयुद्धास आपण कसे प्रत्युत्तर देऊ? आपल्याला अवनतीस गेलेले लोक, गैरसरकारी संघटना ओळखाव्या लागतील, ज्या चिनी प्रचार करत आहेत. त्यापैकी काही त्यांच्या ज्ञात आर्थिक स्रोतांहून अधिक समृद्ध जीवन जगत आहेत. त्यांना देशाबाहेरून पैसा मिळत आहे. त्याचा तपास करावा लागेल. या देशाच्या दंडविधानानुसार त्यांच्यावर कार्यवाही करावी लागेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चीन आणि पाकिस्तानमध्ये आपल्यालाही माहितीचे युद्ध छेडावे लागेल. चिनी माध्यमे माहितीयुद्धापासून संपूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच, चीनमधील समाजमाध्यमांत चीनबाहेरून कुणीही प्रवेश करू शकत नाही. मग चीनविरोधातील आक्रमक माहितीयुद्धास तुम्ही सुरुवात कशी करणार?
 
चीनमधून बाहेर प्रवास करणार्‍यांना लक्ष्य करा

जे देश चीनच्या जुलूमी धोरणाविरुद्ध पाय रोवून उभे राहिले, त्या दक्षिण चिनी समुद्रातील अनेक देशांविरुद्ध चीनने अवलंबलेल्या आक्रमक धोरणाविरुद्धही जग संतप्त आहे. अशा सर्व देशांसोबत आपण युती करून, चीनविरुद्ध संयुक्त, सर्वसमावेशक, माहितीयुद्धाची मोहीम चालवली पाहिजे. आशा आहे की, भारतीय समाजमाध्यमांवरील आणि मुख्य माध्यमांतीलही प्रचारयुद्धास बळी पडणार नाहीत आणि लडाखसारख्या अत्यंत कठीण आणि अवघड क्षेत्रातील सीमांचे संरक्षण करणार्‍या भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे राहतील.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.