राजकीय पक्षांनी निवडणुका लढताना अजिबात गाफील राहता कामा नये, असे सांगताना आपला पक्ष सावध असल्याची सूचक प्रतिक्रिया पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली आणि पक्षात गुणवत्तेनुसारच निवड प्रक्रिया होत राहील, असा गर्भित इशारादेखील आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि अतिमहत्त्वाकांक्षा बाळगणार्यांना देत त्यांनी नेम साधला. सध्या पुण्यात कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांचा ज्वर शिगेला आहे. या निवडणुका घोषित होताच, या दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी आपापल्यापरीने रणनीती आखण्यास सुरुवात केली होती. तथापि, पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व मात्र याबाबत निर्णय योग्यवेळी जाहीर करणार असल्याचे सांगत होते. मात्र, यातून काहीही ध्वनित होत नव्हते. या मतदारसंघात दिवंगत आमदारांनी केलेले कार्य बघता त्यांच्याच कुटुंबीयातील सदस्यांना उमेदवारी मिळायला हवी, ही सर्वसाधारण धारणा केवळ त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांचीच नव्हे, तर सर्वसामान्य मतदारांचीदेखील भावना आहे. मात्र, तरीही बदलत्या राजकीय परिस्थितीचा आणि मतदारांच्या मानसिकतेचा वेध घेत पक्षाने पावलं टाकायला सुरुवात केली. अशाच संधीचा लाभ घेत इच्छुकांनीदेखील आपली महत्त्वाकांक्षा न लपविता पुढाकार घ्यायला सुरुवात केली.त्यातच राज्यातील राजकीय घडामोडीची पार्श्वभूमीदेखील पक्षासाठी लक्षात घेणे गरजेचे असल्याने आणि विरोधी पक्षांची नेमकी काय भूमिका आहे, हे स्पष्ट न झाल्याने या दोन्ही पोटनिवडणुकांची सूत्र सांभाळणार्या चंद्रकांतदादांना नेमका ’नेम’ घेणे भाग पडले आणि गाफील राहायचे नाही, हे त्यांनीच स्पष्ट केले ते बरे झाले. त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जाहीर झाल्यावर पक्ष ही पोटनिवडणूक पुन्हा जोमाने लढविण्यासाठी सज्ज असेल, हे वेगळे सांगायला नको.भाजपचा उमेदवार बाळासाहेबांची शिवसेना, आठवलेंची रिपाइं, शिवसंग्राम तसेच इतर मित्रपक्ष यांच्या पाठिंब्याने रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीतील लोकदेखील सावध झाले आहेत. त्यामुळे एकूणच पुण्यातील या पोटनिवडणुकींमुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रत्येक पक्षाने यासाठी कंबर कसलेली दिसते.
नेम दुसर्या दादांचा...
पुण्यात राजकीय क्षेत्रात खर्या अर्थाने राजकीय ’दादा’गिरी दोन नेते नावाप्रमाणे साजेशी अशीच गाजवत आहेत. भाजपचे चंद्रकांतदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा यात माहीर होत असल्याचे नजीकच्याकाळातील चित्र. कोणे एकेकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवड क्षेत्रात दबदबा असणार्या अजितदादांना आधीसारखी ’स्पेस’ काही या भागात अजून मिळताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचा स्वतःचा राजकीय भूमिकेविषयी प्रचंड संभ्रम झालेला असावा, अशी शक्यता अनेक राजकीय जाणकार आणि धुरीण बोलून दाखवितात.त्यात आजकाल त्यांच्या वक्तव्यांतून ते नेमके कुणावर ’नेम’ साधतात, याचा त्यांच्या कार्यकर्त्यांनाच प्रश्न पडलेला असतो. ते विरोधी पक्षनेते असल्याने भाजपवर आणि विशेषतः बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर टीका करतील असे सामान्यतः अपेक्षित असते. मात्र, अजितदादा अतिशय परखड आणि स्पष्टवक्ते म्हणून देखील ख्यात आहेत. ते कडकधडक बोलून टाकतात तेव्हा त्यांचे मित्रपक्ष असलेल्या नेत्यांच्या ’नाना’ कळा पसरवत असतात. आता अजितदादांनी नेम साधताना पदवीधर निवडणुकीत आमच्या पक्षाच्या शुभांगी पाटील विजयी होतील, असे न सांगता सत्यजित तांबे जिंकतील, असे सांगून मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाच बुचकळ्यात टाकले. त्याचे तीव्र पडसाद नानांच्या कोपरखळीतून उमटलेदेखील. “उद्धव ठाकरेंना आम्ही नेहमी त्यांचे आमदार फुटतील म्हणून सावध करायचो. मात्र, त्यांनी आमच्या पक्षाचा मामला आहे, असे सांगून आमचीच बोळवण केली,” असे विधान करून अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंच्या स्वभावावरच अजितदादांनी साधलेला नेम महाआघाडीतील एकीला सुरूंग तर लावणार नाही ना, अशी शक्यता निर्माण झाली आहे.अजितदादा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील स्थिती, अवस्था काय आहे हे तेच सांगू शकतील, असा त्यांच्याच ’स्टाईल’ने टोमणादेखील हाणून मोकळे झाले. आता यावर काय प्रतिक्रिया तिकडून उमटते हे बघणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
-अतुल तांदळीकर