भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण ‘जी २०’चे अध्यक्षपद भूषवित आहोत, ही संपूर्ण भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे. यात विविध क्षेत्रांचे आपले ज्ञान, वारसा, वैभव व नेतृत्व जगाला दाखविण्याची एक उत्तम संधी या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. यात आर्थिक, बांधकाम क्षेत्र, पर्यावरणातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य, रिसर्च आणि इनोव्हेशन आणि विशेषकरून भारताचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान, संशोधन व उपचार पद्धती जगासमोर आणण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे...
‘जी २०’ मध्ये मला व माझ्या टीमला आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व संशोधन क्षेत्रासंदर्भात महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेपर्यंत जाऊन प्रबोधन, लोकसहभाग आणि जनजागरणाची जबाबदारी देण्यात आली आहे.‘जी २०’ संमेलनात भारत अध्यक्षपद भूषवित असल्याने ‘एस २०’ मध्ये भारताच्या आयुर्वेद, योगोपचार, पारंपरिक उपचार पद्धती, पंचगव्य चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा, नाडी परीक्षण, निसर्गोपचार, होमियोपॅथी आणि इतर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात्मक विषयावर भारताचे ज्ञान जगात कसे सर्वश्रेष्ठ आहे, याची ओळख करून देण्याबाबत खूप मोठी संधी आपणास प्राप्त झाली आहे.
“एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य आणि पर्यावरणपूरक जीवनशैली (life style for environment )या मूळ विचारप्रणालीवर आधारित 'one health' हे ब्रीद महाराष्ट्रात प्रसारित करण्याचे कार्य ‘जी २०’ मेडिकल विंग मार्फत करण्यात येणार आहे.‘जी २०’ संमेलनाचे अध्यक्षपद आणि अमृतकाळ असा योग भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कार्य करण्यासाठी मिळाला आहे, ही भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे. या अनुषंगानेच ’जी २०’ आरोग्य क्षेत्राच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयेे व विश्वविद्यालये यातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल, डेण्टिस्ट, नर्सेस, टेक्निशियन, रेडिओग्राफर-आरोग्यसेवक व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या आरोग्य संशोधन व स्वास्थ्य विषयातील मोहिमेत सहभागी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
याची सुरुवात म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व महाराष्ट्रातील सर्व deemed University या अंतर्गत येणार्या सर्व महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रबोधन कार्य सुरू करण्यात येणार आहे. जगभरात भारतातील ‘कोविड-१९’ची यशस्वीरित्या हाताळणी व सोबतच जगातील सर्वांत मोठी लसीकरणाची मोहीम अभूतपूर्वरित्या चालविणे याबाबी पाहिल्या आहेत. आता या अमृतकाळात जगाला भारताच्या इतर विविध वैद्यकीय उपचार प्रणालींचे महत्त्व पटवून देण्याची योग्य वेळ आणि गरज आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आद्यगुरू धन्वंतरींपासून तर आजतागायत अनेक वर्षांपर्यंत उपचार प्रणाली भारताच्या संस्कृतीत रुजलेल्या आहेत. भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील विविधतेचा भाग म्हणून योगाभ्यास, उपचार, मेडिटेशन, ‘कोविड’ची हाताळणी व संपूर्ण जगाला लस पुरवण्याची कार्यतत्परता जगाने अनुभवलेली आहे. इतिहासाला जवळून बघितल्यास सुश्रुत हे जगातील पहिले सर्जन व चरक हे सर्वात प्राचीन वैद्य भारतात होऊन गेले आहे.
आयुर्वेदातील वात, पित्त, कफ या पद्धतीद्वारे व्यक्तिमत्त्वावर उपचार करणे, याकडे आजही जग कुतूहलाच्या दृष्टीने पाहत आहे. केरळ व हिमालयातील आरोग्य केंद्र असो वा इगतपुरीतील जागतिक विपश्यना केंद्र असो किंवा उत्तराखंड ते काश्मीरपर्यंत असलेले योग उपचार केंद्र असो, या सगळ्यांकडे जग आरोग्याच्या पर्यायी पद्धती म्हणून मोठ्या आशेने पाहत आहे. सोबतच जगातील दुसरी सर्वांत जास्त वापरल्या जाणारी आरोग्य पद्धती, होमियोपॅथीची वास्तविक प्रगती ही भारतातच प्रकर्षाने दिसून येत आहे. असाध्य आजारांना समूळ नष्ट करण्यासाठी होमियोपॅथीतील प्रगतीशील रिसर्चसुद्धा जगाला दिलासा देणारा आहे. ‘जेनेटिक्स’ व ‘एपीजेनेटिक्स’ या जगातील अतिप्रगत पद्धतीबद्दल भारतातच ‘अॅडव्हान्स्ड हेल्थ’मध्ये होत असलेला रिसर्च जगाला आरोग्याचा एक नवीन पर्याय देणारा आहे. या सर्व उत्साहवर्धक निकाल देणार्या आरोग्यपद्धतीमुळे भारत आज जगाच्या नकाशावर ‘मेडिकल टुरिझम’साठी प्रसिद्ध होत आहे. अशा विविध उपचार पद्धतींनी सजलेली भारताची अतिप्राचीन व अतिविकसित वैद्यकीय उपचार पद्धतींचा समागम हा फक्त भारतातच बघावयास मिळतो, हे ‘जी २०’ मार्फत पूर्णसत्य जगासमोर आणले जाईल.
‘जी २०’ संमेलनाचे २०० कार्यक्रम भारताच्या ५० शहरांमध्ये होणार आहेत. यात महाराष्ट्राच्या चार शहरांमध्ये एकूण १४ कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. यात मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर या शहरांमध्ये होणार आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनानुसार ‘जी २०’ मेडिकल रिसर्च टीमद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील १०० वैद्यकीय तज्ज्ञांना सहभागी करवून १३ कोटी जनतेपर्यंत जाऊन सुदृढ आरोग्यविषयक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील ‘जी २०’ आरोग्यविषयक व वैद्यकीय क्षेत्रातील विविध कार्यक्रमांची संपूर्ण धुरा डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे असेल, अशी माहिती नागपूरचे होमियोपॅथी तज्ज्ञ व ‘जी २०’ समिती आरोग्य विज्ञान संशोधन समन्वयक डॉ. रवी वैरागडे यांनी सांगितले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अजित गोपछडे, डॉ. रवी वैरागडे, डॉ. स्वप्निल मंत्री, डॉ. भालचंद्र ठाकरे, डॉ. संगीता अंभोरे, डॉ. उज्वला दहीफळे, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अनुप मरार, डॉ. विंकी रुघवाणी, डॉ. संजीव चौधरी, डॉ. बालासाहेब हरपळे, डॉ. उज्वला हाके, डॉ. प्रीती मानमोडे, डॉ. चंचल साबळे, डॉ. कल्पना गोडबोले, डॉ. मेघना चौगुले, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. रुपाली धर्माधिकारी, डॉ. माधवी गायकवाड, डॉ. सचिन उमरेकर, डॉ. गोविंद भताने, डॉ. रश्मी शुक्ला इत्यादी अथक परिश्रम करीत आहेत.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जी २०’ अध्यक्ष या नात्याने त्यांच्या संपूर्ण जगाच्या महाकुटुंबाला ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या संकल्पनेद्वारे सर्वांगीण व संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील उपचार पद्धतीची प्रचिती आणून देण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक नागरिकांची आहे आणि या सर्वांचा सहभाग आरोग्यपूरक व सुदृढ वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे आहे.
-डॉ. अजित गोपछडे