पुणे : कसबा पेठ पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची झालेली असताना काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या मुजोरीमुळे त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ते उपद्रव करीत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
घंगेकर यांनी मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाचा आरोप करत उपोषणाचे नाट्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज धंगेकरांवर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे. धंगेकर यांनी शेअर केलेल्या फ्लेक्सवरुन थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाधीच पुण्यातील वडगाव भागात धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. याविरोधात पुणे महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने तक्रार दिल्यानंतर आता पोलिसात याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड रोड पोलिस ठाण्यात राहुल मानकर आणि अतुल नाईक यांच्या विरोधात शहर विद्रूपीकरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगाव या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले होते. वास्तविक मतमोजणीला अजून दोन दिवस शिल्लक असूनही धंगेकर यांनी विजयी झाल्याचे बॅनर लावल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.