वाकड्या शेपटीची गोष्ट...

    24-Feb-2023   
Total Views |
 
Congress party
 
आगामी निवडणुकांमध्ये भाजपचे आव्हान पेलताना चुका होणार नाहीत, याचीही काळजी प्रत्येक राजकीय पक्ष नक्कीच घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात, मराठीमध्ये एक म्हण आहे. ती म्हणजे, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. ही म्हण शब्दश: जगणारा एक पक्ष भारतीय राजकारणात आहे, तो म्हणजे गांधी कुटुंबाचा काँग्रेस पक्ष.
 
कसबा निवडणुकीसाठी जवळपास वर्षभराचा कालावधी बाकी आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झालेले असतील. पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक ही भारतासह जगासाठीदेखील महत्त्वाची ठरणार आहे. सलग तिसर्‍यांदा सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, तर किमान सन्मानजनक खासदार निवडून आणण्यासह प्रादेशिक पक्षांना आपले नेतृत्व मान्य करण्यास लावण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे. पुढचे वर्ष राजकीयदृष्ट्या अतिशय धामधुमीचे असणार आहे. मात्र, चालू वर्षदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, या वर्षभरात पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करणार आहे. त्याचप्रमाणे भाजपचे आव्हान पेलताना चुका होणार नाहीत, याचीही काळजी प्रत्येक राजकीय पक्ष नक्कीच घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात, मराठीमध्ये एक म्हण आहे. ती म्हणजे, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. ही म्हण शब्दश: जगणारा एक पक्ष भारतीय राजकारणात आहे, तो म्हणजे गांधी कुटुंबाचा काँग्रेस पक्ष.
 
असे म्हणण्याचे कारण म्हणजे पक्षाचे जरा चांगले चालत असल्यास त्यामध्ये मोडता घालून पक्षाला मतदारांच्या नजरेत खाली कसे आणावे, यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय ते गल्लीस्तरीय नेते चांगलेत तरबेज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्याच्या नादात काँग्रेस पक्षाचे नेते दरवेळी वाहवत जातात आणि जबरदस्त पराभव पदरी पाडून घेतात. अशा उदाहरणांची मालिकाच आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते, त्यावेळी जनतेने काँग्रेसला जबरदस्त तडाखा दिला. पुढे 2013 साली मणिशंकर अय्यर यांनी मोदी हे काँग्रेस अधिवेशनाबाहेर चहा विकू शकतात, असे म्हटले होते. त्यानंतर मग जनतेने 2014 साली काँग्रेसच्या तोंडचे पाणीच पळवले. पुढे लोकसभेत नामदार - कामदार वादात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला चीतपट केले. ‘राफेल’प्रकरणी आरोप करताना ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा काँग्रेसने दिली आणि मोदींनी त्यानंतर देशभरातील चौकीदार - वॉचमन लोकांसोबत संवाद साधून काँग्रेसच्या प्रचारातली हवाच काढून घेतली.
 
अर्थात, जुन्या चुकांमधून सुधारायचे नसल्याने काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पुन्हा तीच चूक केली आहे. अदानी-‘हिंडेनबर्ग’ प्रकरणाचा आधार घेऊन सध्या काँग्रेस केंद्र सरकारवर टीका करत आहे. त्याचा संदर्भ घेऊन काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नरेंद्र ‘गौतमदास’ मोदी असा केला. एका पत्रकार परिषदेत बोलताना अतिशय विकृत पद्धतीने हसत हसत खेरा यांनी पंतप्रधानांचे नाव चुकीचे घेऊन ही टीका केली. खेरा एवढेच बोलून थांबले नाही, तर पुढे जाऊन “उनके पिताजी का नाम दामोदरदास है, लेकीन वो (पंतप्रधान मोदी) काम तो गौतमदास का करते हैं।’ अशीही अत्यंत अश्लाघ्य टिप्पणी केली. त्यानंतर खेरा यांच्याविरोधात आसाममध्ये तक्रार करण्यात आली आणि आसाम पोलिसांनी खेरा यांनी ते काँग्रेसच्या अधिवेशनासाठी रायपूर येथे जात असताना गचांडी पकडून दिल्ली विमानतळावरील विमानातून खाली उतरविले. त्यानंतर प्रथेप्रमाणे खेरा आणि त्यांची ‘इकोसिस्टीम’ थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि अतिशय व्यस्त वेळापत्रक असूनही सर्वोच्च न्यायालयाने खेरा यांच्या याचिकेवर सुनावणी करून त्यांना दिलासा दिला.
 

Congress party 
 
अर्थात, पवन खेरा यांनी बिनशर्त माफी मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांना हा दिलासा दिला आहे. मात्र, या सर्व नाट्याने काँग्रेसच्या प्रचारातील हवा निघून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत वडिलांबद्दल केलेली टीका काँग्रेसला भोवणार आहे, यात शंका नाही. या सर्व प्रकारामुळे काँग्रेसचे रायपूर अधिवेशनही झाकोळले जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुढे होणार्‍या निवडणूक प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या या वक्तव्याचा आपल्या खास शैलीत समाचार घेतील आणि जनमत आणखी काँग्रेसविरोधात जाण्याची काळजी घेतील.
 
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, ही म्हण आणखी एका पक्षाला लागू होते. ती म्हणजे, आम आदमी पक्ष. पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून आम आदमी पक्षाने आपले राजकीय कौशल्य सिद्ध केले आहे. मात्र, पंजाबसारख्या राज्यात आम आदमी पक्षासारखा पक्ष सत्तेत येण्याचे धोकेही अनेकांनी सांगितले आहेत. आम आदमी पक्षाने सत्तेत येण्यासाठी खलिस्तानवाद्यांशी संधान साधल्याचा आरोप अनेकदा केला जातो. आम आदमी पक्ष सत्तेत आल्यानंतर पंजाबमधील स्थिती पाहता, त्यात तथ्य असल्याचा संशय निर्माण होण्यास वाव आहे. त्याचप्रमाणे माझ्या हाती पोलीस खाते द्या, ही केजरीवाल यांची मुख्य मागणी होती. आता पंजाबचे पोलीसखाते हाती आल्यानंतर पंजाबमधील स्थिती पाहता केजरीवाल आणि आम आदमी पक्ष पंजाबची कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.
 
असे म्हणण्याचे कारण म्हणजे, खलिस्तानवाद्यांचे पंजाबमध्ये वाढते प्राबल्य. काही दिवसांपूर्वी खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खुनी हल्ला करण्याची धमकी दिली होती. पंजाबी गायक दीप सिद्धू याच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजितकार्यक्रमात दि. 19 फेब्रुवारी रोजी तो म्हणाला की, “इंदिराजींनीही शिखांना दडपण्याचा प्रयत्न केला होता, काय झाले? त्यामुळे अमित शाह यांनी तसा प्रयत्न करू नये,” अशी धमकी त्याने दिली होती.
त्यानंतर पंजाब पोलिसांनी कारवाई केली. मात्र, त्यानंतर झालेल्या राड्यामुळे पंजाब पोलिसांना पुढे काहीही करता आले नाही. त्याचे कारण म्हणजे सशस्त्र खलिस्तानवाद्यांनी पोलीस स्थानकावर केलेला हल्ला. अमृतपाल सिंग याच्या अटकेच्या विरोधात अमृतसरमधील अजनाला पोलीस स्थानकावर हल्ला झाला. हजारो निहंग शिखांनी तलवारी, बंदुका अशी शस्त्रे घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने कूच केले. यावेळी त्यांनी पोलिसांचे बॅरिकेडिंग तोडून पोलीस ठाण्यात प्रवेश केला. अमृतपालच्या हजारो समर्थकांनी प्रचंड गदारोळ सुरू केला आणि पोलीस ठाणे ताब्यात घेतले. हा प्रकार म्हणजे शक्तिप्रदर्शन असल्याची वल्गना अमृतपाल सिंग याने केली. राजकीय हेतूने त्याच्यावर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. तासाभरात ‘एफआयआर’ रद्द न केल्यास पुढे जे काही घडेल, त्याला प्रशासन जबाबदार असेल, अशीही त्याने धमकी दिली. या प्रकारानंतर हतबल झालेल्या पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांविरोधातील कारवाई मागे घेतली.
 
मात्र, या प्रकारानंतर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे दिसून येते. यापूर्वीच तेथे अमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा आहे. राज्यात जवळपास प्रत्येक तरूण अमली पदार्थांच्या व्यसनात गुंतल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. त्यामुळे एकीकडे अमली पदार्थ आणि दुसरीकडे खलिस्तानवाद्यांचा वाढता जोर, यामुळे पंजाब अतिशय स्फोटक स्थितीकडे वाटचाल करत असल्याची शंका निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि त्यांचे मार्गदर्शक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते. कारण, पंजाबसारख्या सीमावर्ती भागात अंतर्गत शांतता नसेल तर त्याचा फटका राष्ट्रीय सुरक्षेस बसणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.