शाश्वत जीवनशैलीसाठी भारतीय चिंतन

    21-Feb-2023   
Total Views |
Civil 20 Life for Environment
 
यंदाच्या वर्षी भारताकडे ‘जी२०’ चे अध्यक्षपद आहे, त्याअंतर्गत देशभरात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. याचाच भाग म्हणून ‘सिव्हील २०’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘सिव्हील २०’ अर्थात ‘सी२०’ अंतर्गत ‘लाईफ फॉर एनव्हार्नमेंट’ अर्थात ‘पर्यावरणासाठी जीवनशैली’ या शाश्वत विकासाच्या खास भारतीय पैलूस जगासमोर मांडले जात आहे.

एकविसाव्या शतकातील सर्वात मोठ्या कोरोना संसर्गाच्या महामारीतून जग अद्याप सावरलेले नाही. या महामारीमुळे जागतिक पातळीवर अनेक बदलांना प्रारंभ झाला आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून नव्या जागतिक व्यवस्थेची गरज असल्यापासून शाश्वत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची आवश्यकता असल्याचे आता स्पष्टपणे बोलले जात आहे. त्यामुळे जागतिक परिस्थितीचा विचार केल्यास संपूर्ण जग आता एका मोठ्या बदलाच्या अपेक्षेत असून त्याकडे ते झपाट्याने वाटचाल करताना दिसते. यामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही ठिकाणी केंद्रस्थानी आहे तो भारत!

फार दूर जाण्याची गरज नाही, अगदी दोन ते अडीच वर्षांपूर्वी म्हणजे कोरोनापूर्व काळाची परिस्थिती अतिशय वेगळी होती. भारताने नव्या जागतिक व्यवस्थेची गरज असल्याच्या चर्चेस प्रारंभ केला होता. मात्र, जगातील ‘प्रस्थापित’ वगैरे म्हणवणार्‍या देशांनी आपल्याच गुर्मीत त्याकडे शक्य तेवढे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर २०२०मध्येकोरोना महामारीने जगाला तडाखा देण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये जगातील महासत्तांप्रमाणेच भारतासदेखील धक्का बसला. मात्र, भारत या अन्य विकसित देशांपेक्षा त्यातून अतिशय लवकर बाहेर आला. केवळ बाहेरच आला नाही, तर महामारीच्या काळात व्यवस्थेमध्ये अभूतपूर्व बदल घडवून दाखविला, अवघ्या नऊ महिन्यांच्या काळात दोन ‘मेड इन इंडिया’ लसींची निर्मिती केली (त्यातील एक लस तर संपूर्ण भारतीय बनावटीची), देशाची गरज भागवून जगातील अनेक देशांना लसींचा पुरवठा केला, अमेरिकेसारख्या महासत्तेस औषधांचा पुरवठा केला. त्यामुळे भारताचे स्थान एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले. त्यासोबतच युक्रेन-रशिया वादामध्ये भारताने आपले हित जपूनच दोन्ही देशांची संवाद साधला. परिणामी, हा संघर्ष सोडविण्यासाठी भारतानेच लक्ष द्यावे, अशी जागतिक मागणी झाली.
 
आता हे झाले भूराजकीय दृष्टिकोनातून बदल. जगातील सध्याच्या कोरोना- संघर्षमय परिस्थितीमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे संपूर्ण जगाला वळावेसे वाटू लागले आहे. त्यासाठीदेखील जग आता भारताकडे आशेने बघत आहे. कारण, सध्याच्या असुरक्षित जगात भारतीय विचारच शाश्वत आणि पर्यावरणपूरक जीवनशैली देऊ शकतो, याची जगाला खात्री आहे. भारतानेही जगाची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी यंदाच्या वर्षी भारताकडे ‘जी२०’चे अध्यक्षपद आहे, त्याअंतर्गत देशभरात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. याचाच भाग म्हणून ‘सिव्हील २०’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘सिव्हील २०’ अर्थात ‘सी२०’ अंतर्गत ‘लाईफ फॉर एनव्हायर्नमेंट’ अर्थात ‘पर्यावरणासाठी जीवनशैली’ या शाश्वत विकासाच्या खास भारतीय पैलूस जगासमोर मांडले जात आहे. या विशेष कार्यगटाचे उद्घाटन गेल्या आठवड्यात देशाची राजधानी दिल्ली येथे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि ‘लाईफ फॉर एन्व्हायर्नमेंट’ या कार्यगटाचे भारतासाठीचे समन्वयक डॉ. गजानन डांगे यांच्या उपस्थितीत झाले.

यामार्फत येत्या वर्षभरात समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंतर्भाव कसा करावा, याविषयी चर्चासत्रे घेण्यात येऊन भारतीय चिंतनातून प्राप्त होणारे नवनीत जगासोबत सामायिक करण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘लाईफ फॉर एन्व्हायर्नमेंट’ अंतर्गत ’ग्रासरूट इनोव्हेशन अ‍ॅण्ड लाईफ’, ‘फूड अ‍ॅण्ड लाईफ’, ‘युथ अ‍ॅण्ड लाईफ’, ‘फॅशन अ‍ॅण्ड लाईफ’, ‘वॉटर अ‍ॅण्ड लाईफ’, ‘हॅबिटॅट्स अ‍ॅण्ड लाईफ’, ‘वेस्ट अ‍ॅण्ड लाईफ’, ‘इंडस्ट्री अ‍ॅण्ड लाईफ’ आणि ‘एज्युकेशन ऑफ लाईफ’ या विषयांवर वर्षभरात चर्चासत्रे होणार आहेत.

भारतीय तत्त्वचिंतक पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या ‘एकात्म मानव दर्शन’ या तत्त्वज्ञानामध्ये सामर्थ्याविषयी अतिशय नेमक्या शब्दांत म्हटले आहे - ‘’सामर्थ्य हे अनियंत्रित वागण्यात नसून सु-नियमित कृतीत आहे. याच विचारावर ‘सी२०’ मधील ‘लाईफ फॉर एनव्हायर्नमेंट’ हा कार्यगट आधारलेला आहे. हा कार्यगट पुढील वर्षभरात विकास आणि नवनिर्माण हे परस्परपूरक आहेत, अशी मांडणी करणार आहे. त्याचप्रमाणे सध्या विकास हा मानवकेंद्रित आहे. मानवाच्या गरजा वाढविणे आणि त्यांच्या पूर्ततेस विकास संबोधणे, परिणामी त्याची पूर्ती करताना पर्यावरणाचा म्हणजे जल, जमीन, जंगल आणि प्राणिमात्रांच्या र्‍हासाकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच विकास. यास छेद देणारा खास भारतीय चिंतनातून सातत्याने विकसित होणारा विचार मांडला जाणार आहे. हा विचार जगातील सर्वच क्षेत्रांसाठी कसा लागू होतो, हेदेखील सप्रमाण भारत दाखवून देणार आहे.

‘लाईफ फॉर एनव्हायर्नमेंट’ अंतर्गत होणारे विविध कार्यक्रम हे भारतीय पर्यावरणपूर्क जीवनशैली समजून घेण्यासाठी जगाला प्राप्त झालेली उत्तम संधी आहे. भारतीय विचार मानवाला पर्यावरणाच्या केंद्रस्थानी न मानता पर्यावरणाचाच एक भाग मानतो. त्यामुळे भारतीय चिंतनातून पर्यावरण रक्षणासाठी वेगळे काहीही न करता भारतीयांच्या जीवनशैलीलाच पर्यावरणपूरक बनविण्यात आले आहे.भारताने आपल्या आजवरच्या हजारो वर्षांच्या प्रवासामध्ये अनंत संकटे झेलली आहेत. परकीय राजवटीपासून ते परकीय विचारधारेपर्यंत अशा सर्वच संकटांना भारताने तोंड दिले. मात्र, असे होऊनही भारतीय चिंतन आणि त्यापासून सातत्याने विकसित होणार्‍या शाश्वत विचार भारतामध्ये आजही टिकून आहेत. कोणत्याही आव्हानाचा सामना करताना हा भारतीय शाश्वत विचार बळ देत आलेला आहे. त्यामुळे ‘सी२०’ च्या माध्यमातून भारतीय शाश्वत विचार हा जगासाठीदेखील शाश्वत ठरणार आणि जगाला तारणार, हे सिद्ध होणार आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.