हिश्श्याचे बोला...!

    16-Feb-2023   
Total Views |
Upendra Kushwaha is demanding the share of the 'backward' community from Nitish Kumar


बिहारची नाडी ओळखणारे नितीश कुमार आज गलितगात्र होताना दिसत आहे. ज्या लालूप्रसाद यादव यांना २५ वर्षांपूर्वी आव्हान देऊन नितीश नेता झाले होते, त्याच लालूंचा मुलगा आज नितीश कुमार यांच्या डोक्यावर मिरे वाटत आहे. अर्थात, हे चक्र एवढ्यावरच थांबलेले नाही. पटना येथील गांधी मैदानावर ज्या आवेशात नितीश कुमार यांनी ‘अतिपिछडा’ समुदायाचा हिस्सा लालूंकडे मागितला होता, त्याच आवेशात आता उपेंद्र कुशवाह हे नितीश कुमार यांच्याकडून ‘अतिपिछडा’ समुदायाचा हिस्सा मागत आहेत.

स्थळ - गांधी मैदान, पटना, बिहार

दि. - १२ फेब्रुवारी, १९९५
 
बिहारची राजधानी पटना येथील गांधी मैदान खचाखच भरले होते. निमित्त होते ते कुर्मी चेतना रॅलीचे. या रॅलीमध्ये त्याकाळी समाजवादाचा आश्वासक चेहरा असलेले आणि राजकारणामध्ये नवे काहीतरी करू दाखविण्याची उर्मी असलेले नितीश कुमार केंद्रस्थानी होते. लालूप्रसाद यादव यांच्या खास साथीदारांपैकी एक असलेले नितीश कुमार लालूप्रसाद यादव यांच्या अतिपिछडा वर्गाकडे दुर्लक्ष करण्याच्या धोरणामुळे चांगलेच नाराज झाले होते. त्यामुळे लालूप्रसाद यांना आव्हान देण्याचे त्यांनी निश्चित केले होते. संपूर्ण बिहारचे लक्ष त्या रॅलीकडे लागले होते आणि अखेरीस नितीश कुमार यांचे मंचावर आगमन झाले. आगमन होताच समोरचा जनसमुदाय प्रचंड उत्साही झाला आणि त्याचवेळी नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याकडे आपला हिस्सा मागितला. हा हिस्सा म्हणजे बिहारमधील ‘अतिपिछडा’ समुदाय असलेल्या कुर्मी समुदायाचा. “लालूप्रसाद हे केवळ यादव नव्हे, तर आमच्या म्हणजेच कुर्मी-कुशवाह समाजामुळे सत्तेत आले आहेत.

 मात्र, सत्तेत येताच त्यांना आमचा आणि आमच्या हक्कांचा विसर पडला आहे. मात्र, आम्ही आमचे हक्क विसरलो नाही. त्यामुळे आता आम्हाला आमचा हिस्सा मिळायलाच हवा,” अशी गर्जना नितीश कुमार यांनी केली आणि त्या दिवशी बिहारला नवा नेता मिळाला. त्यानंतर नितीश कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी ते विराजमान झालेच, सोबतच राष्ट्रीय राजकारणामध्येही त्यांनी आपले स्थान निर्माण केले.अर्थात, या घटनेनंतर बिहारच्या आणि देशाच्या राजकारणातही अनेक बदल झाले. एकेकाळी पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार यांचे नाव घेतले जात होते. मात्र, २०१४ नंतर त्यांनी आपल्या अनाकलनीय राजकीय निर्णयांमुळे स्वतःचे नुकसान करून घेतले. त्यामुळे बिहारची नाडी ओळखणारे नितीश कुमार आज गलितगात्र होताना दिसत आहे. ज्या लालूप्रसाद यादव यांना २५ वर्षांपूर्वी आव्हान देऊन नितीश नेता झाले होते, त्याच लालूंचा मुलगा आज नितीश कुमार यांच्या डोक्यावर मिरे वाटत आहे. अर्थात, हे चक्र एवढ्यावरच थांबलेले नाही.


Upendra Kushwaha is demanding the share of the 'backward' community from Nitish Kumar


पटना येथील गांधी मैदानावर ज्या आवेशात नितीश कुमार यांनी ‘अतिपिछडा’ समुदायाचा हिस्सा लालूंकडे मागितला होता, त्याच आवेशात आता उपेंद्र कुशवाह हे नितीश कुमार यांच्याकडून ‘अतिपिछडा’ समुदायाचा हिस्सा मागत आहेत. उपेंद्र कुशवाह अगदी स्वच्छ शब्दात म्हणतात की, “कुशवाह समुदाय म्हणजे काही गाजर-मुळा नव्हे की, ज्याला सहजपणे बाजूला करता येईल. आम्ही आमचा हिस्सा मागत आहोत आणि तो आम्हाला मिळायलाच हवा,अशी आमची थेट मागणी आहे.” राजकीय मुद्दा बाजूला ठेवून बघितल्यास समाजवादाचे डिंडीम वाजविणार्‍या या नेत्यांनी ‘अतिपिछडा’ समुदायाचा वापर केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठीच केल्याचे स्पष्ट होते, तर नितीश कुमार यांना आव्हान देऊन उपेंद्र कुशवाह यांनी त्यांची चांगलीच कोंडी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नितीश कुमार यांचे राजकारण नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे, ते स्पष्ट होत नाही. केवळ एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे हा नेता आता प्रचंड गोंधळलेला आहे की काय, अशी शंका.

नितीश कुमार यांनी लालूंकडे हिस्सा मागून पक्ष सोडला होता, उपेंद्र कुशवाह यांनी मात्र पक्षात राहूनच हिस्सा मागितला आहे. त्यामुळे कदाचित ‘बिहारचे एकनाथ शिंदे’ होण्याकडे कुशवाह यांची वाटचाल असू शकते. कुशवाह यांनी येत्या १९-२० फेब्रुवारी रोजी ‘जनता दल युनायटेड’ (जदयु) पक्षाचे चिंतन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये उपेंद्र कुशवाह हे आपल्या समर्थकांसोबत शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.उपेंद्र कुशवाह यांच्या या भूमिकेस आणखी एक पदर आहे, तो म्हणजे ‘जदयु’ची लालूंच्या राष्ट्रीय जनता दलामध्ये विलिनीकरणाची चर्चा. कारण, या चर्चेसही ‘जदयु’मधील अनेक आमदार आणि नेत्यांचा विरोध असल्याचे दिसते. अर्थात, हा विरोध अद्याप जाहीर झाला नसला तरी अंतर्गत खदखद निर्माण झाली आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे दि. १९-२० फेब्रुवारी रोजी होणार्‍या चिंतन शिबिरामध्ये नितीश कुमार यांच्या राजदला शरण जाण्यास विरोध असलेले किती नेते आपल्यासोबत येतात, याचा अंदाज कुशवाह यांना येईल. कारण, संख्याबळ असल्याशिवाय नितीश कुमार यांना आव्हान देणे सोपे नाही, याची जाणीव कुशवाह यांना आहे. त्यामुळे तुर्तास ते चिंतन शिबिरास नेमके किती नेते प्रतिसाद देतील, हे समजेपर्यंत शांत बसले आहेत.

कुशवाह यांच्याकडे पुरेसे संख्याबळ आले, तर ते ‘जदयु’ सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर बिहारमध्येही महाराष्ट्राप्रमाणेच राजकीय उलथापालथ होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, अद्याप तरी कुशवाह यांनी ‘जदयु’ पक्षावर हक्क सांगितलेला नाही. मात्र, ‘जदयु’ हा पक्ष शरद यादव यांचा होता; हे सांगण्यासही ते विसरत नाहीत. त्याचप्रमाणे २०२५ सालची विधानसभा निवडणूक तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची नितीश कुमार यांच्या घोषणेविषयीदेखील त्यांनी नाराजी बोलून दाखविली आहे. पक्ष सातत्याने कमकुवत होत असताना नितीश कुमार पक्षास बळकटी द्यायचे सोडून तेजस्वी यादवांच्या मागे का पळत आहेत, असाही सवाल ते विचारतात.नितीश कुमार यांनी कुशवाह यांच्या बंडास फार महत्त्व दिलेले नाही ते आणि त्यांचे विश्वासू ललनसिंह यांनी कुशवाह यांचे पक्ष सोडणे गृहीतच धरले आहे. मात्र, पक्षाने उपेंद्र कुशवाह यांना विधान परिषद आमदारकीसह पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष बनविले, याची आठवण ते करून देतात. मात्र, संसदीय मंडळाचे अध्यक्ष बनविणे ही केवळ फसवणूक होती, असा पलटवार कुशवाह यांनी केले आहे. कारण, पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे केवळ नितीश कुमार यांच्याकडेच आहेत. त्यामुळे संसदीय मंडळ हा एक फार्स असल्याचा कुशवाह यांचा दावा आहे.
 
बिहारमध्ये यादव मतपेढीनंतरची दुसरी मोठी मतपेढी म्हणजे कुशवाह समुदाय. या समुदायास केंद्रस्थानी ठेवून नितीश यांनी १९९५ पासून यशस्वी राजकारण केले. नितीश कुमार यांनी यादव-कुशवाह-मुस्लीम-दलित अशी जोड देऊन विजयाचा हमखास फॉर्म्युला तयार केला होता. त्यासाठी त्यांनी राजदच्या हक्काच्या दलित-मुस्लीम मतपेढीस आपल्याकडे वळविले होते. मात्र, राज्यातील बदलत्या समीकरणांनुसार आता राजदने पुन्हा यश प्राप्त करून आपली मतपेढी मजबूत करण्यास प्रारंभ केला आहे. दलित मतदारांचा विश्वास आपल्याकडे वळविण्यात चिराग पासवान सज्ज झाले आहेत, अशा परिस्थितीत नितीश कुमार यांच्याकडे हक्काची असलेली कुशवाह मतपेढीसही उपेंद्र कुशवाह धक्का देण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांची बिहारच्या राजकारणावरील पकड कधी नव्हे, ती एवढी सैल झाल्याचे दिसून येत आहे. ही स्थिती आणि काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेत निर्माण झालेली स्थिती, यात बर्‍यापैकी साम्य आहे. त्यामुळे आता उपेंद्र कुशवाहदेखील ‘जदयु’मध्ये बंड करून नितीश यांना धोबीपछाड देतात का, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.



 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.