भारताची ‘महाराजा’ डिप्लोमसी

    15-Feb-2023   
Total Views |
Air India to buy 470 planes from Airbus, Boeing


रशिया-युक्रेन संघर्ष, रशियाने अमेरिकेसह युरोपला डोळे दाखविणे, चीनची वाढती दादागिरी, ब्रिटनमध्ये आर्थिक-सामाजिक अराजकतेची स्थिती अशा बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताचे स्थान अतिशय महत्त्वाचे बनले आहे. त्याची चुणूक ‘एअर इंडिया’ने ‘एअरबस’ या फ्रेंच आणि ‘बोईंग’ या अमेरिकन कंपनीकडून एकूण ४७० विमाने विकत घेण्याच्या करारात दिसून आली. त्यामुळे भारताची ही ‘महाराजा’ डिप्लोमसी अतिशय महत्त्वाची ठरावी.

'टाटा समूहा’चे सर्वेसर्वा जेआरडी टाटा यांच्या अतिशय प्रिय अशा ‘एअर इंडिया’चे सरकारीकरण पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात करण्यात आले होते. त्यानंतरही ‘एअर इंडिया’चा ‘महाराजा’ आपल्या दिमाखात कार्यरत होता. हा ‘महाराजा’ सर्वच भारतीयांच्या अभिमानाचा होता. मात्र, कालांतराने या ‘महाराजा’ची चमक निघायला लागली. कारण, सरकारी लालफितशाहीने या ‘महाराजा’ला चांगलेच जखडून टाकले होते. पुढे तर परिस्थिती एवढी बिकट झाली की, ‘महाराजा’ हा पोसण्यास जड झालेला पांढरी हत्तीच बनला. बेसुमार वाढलेले कर्ज आणि तुलनेने कमी उत्पन्न, यामुळे ‘महाराजा’ची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुन्हा आपल्या जुन्या पालकांकडेच म्हणजेच ‘टाटा’ समूहाकडेच ‘महाराजा’ची मालकी गेली. ही घटनादेखील भारतीयांसाठी पुन्हा अभिमानाची ठरली. आता ‘महाराजा’ पुन्हा एकदा आपल्या जुन्याच दिमाखात कार्यरत झालाय. आता तो केवळ विमान वाहतुकीचे प्रतीक राहिला नसून भारताच्या बदलत्या सामर्थ्यासही दर्शविण्यास तो सज्ज झाला आहे.
 
‘एअर इंडिया’ने आपल्या विमानांच्या ताफ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आपली क्षमता वाढविण्यासाठी ‘एअर इंडिया’ला ४७० विमानांची गरज होती. त्यासाठी ‘टाटा’ समूहाची फ्रान्सची ‘एअरबस’आणि अमेरिकेची ‘बोईंग’ या दोन आघाडीच्या विमान कंपन्यांसोबत चर्चा सुरू होती. चर्चा सकारात्मक झाली आणि ‘एअर इंडिया’ने फ्रान्सच्या ‘एअरबस’कडून २५० अमेरिकेच्या ‘बोईंग’कडून २२० विमाने खरेदी करण्याचा सौदा पक्का झाला. ‘एअरबस’सोबतचा करार होत असताना त्यास ‘टाटा’ समूहाच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित होते. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या ‘बोईंग’सोबत करार झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला. यामुळे हा केवळ दोन कंपन्यांमधील करार न राहता, त्यास बदलत्या जागतिक परिस्थितीची किनार आपोआपच प्राप्त झाली आहे. अर्थात, आपल्याकडे उद्योगपतींना सरसकट ‘नफा ओरबाडणारे शेठजी’ असे संबोधणार्‍या ‘आंदोलनजिवी जमाती’स या कराराचे महत्त्व समजून घेण्याची गरज अर्थातच वाटणार नाही. मात्र, या दोन करारांमुळे भारताचे आंतरराष्ट्रीय राजकारणासह ’महासत्ता’ म्हणविणार्‍या देशांच्या अर्थकारणामध्येही महत्त्व वाढणार आहे. भारताच्या स्थानात होणारा हा बदल देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात घडत असल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त होते.

‘एअर इंडिया’-‘एअरबस’ कराराविषयी फ्रान्सचे पंतप्रधान मॅक्रॉन यांनी केलेले ट्विट अतिशय बोलके ठरावे. ते म्हणतात, “ ‘एअरबस’ आणि टाटा सन्सदरम्याच्या करारामुळे भारत-फ्रान्सच्या रणनितीक संबंधांच्या नव्या पर्वास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स आणि फ्रान्सच्या औद्योगिक जगतावर विश्वास ठेवला, यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.”‘एअरबस’सोबतच्या कराराचा लाभ केवळ फ्रान्सलाच होणार नसून तो शेजारच्या ब्रिटनलाही होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्याविषयी दिलेली प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची ठरते. ते म्हणाले, “ ‘एअर इंडिया’, ‘एअरबस’ आणि ‘रोल्स रॉयस’ यांच्यातील ऐतिहासिक करारामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेस मोठी गती प्राप्त होणार आहे. यामुळे देशातील उत्पादन केंद्र अधिक मजबूत होईल, त्याचप्रमाणे यामुळे चांगल्या पगाराच्या नोकर्‍यांसह रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठीच्या माझ्या अजेंड्यास बळ प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनमधील ‘एअरोस्पेस’ क्षेत्रामध्ये हजारो रोजगार यामुळे निर्माण होणार आहेत. भारत २०५० सालापर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. त्यामुळे भारतासारख्या शक्तीसोबत व्यापारी संबंध घनिष्ठ झाल्यास जागतिक पातळीवर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेस विविध संधी प्राप्त होतील,” अशी प्रतिक्रिया सुनक यांनी दिली आहे.

‘एअर इंडिया’-‘बोईंग’ या दुसर्‍या कराराचा लाभ अमेरिकेस होणार आहे. कराराविषयी ’व्हाईट हाऊस’तर्फे अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, “ ‘एअर इंडिया’ ‘बोईंग’कडून २०० हून अधिक अमेरिकन बनावटीची विमाने विकत घेणार आहे. या करारामुळे अमेरिकेतील ४४ राज्यांमध्ये दहा लाखांहून अधिक रोजगार प्राप्त होतील. विशेष म्हणजे, या रोजगाराच्या संधी चार वर्षांची पदवी न घेतलेल्यांनाही प्राप्त होणार आहेत. या करारामुळे अमेरिका-भारत आर्थिक सहकार्य अधिक घट्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सहकार्य अधिक मजबूत करण्यावर आणि जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिका सज्ज आहे,” असेही निवेदनात म्हटले आहे.
 
एका भारतीय कंपनीने केलेल्या कराराविषयी जगातील तीन प्रमुख देशांचे पंतप्रधान-राष्ट्राध्यक्ष यांनी दखल घेणे, केवळ दखलच नव्हे, तर भारताने केलेल्या या करारामुळे आमच्या देशात रोजगार निर्माण होईल, आमच्या देशास आर्थिक स्थैर्य लाभेल आणि भारताने आमच्यावर विश्वास दाखविणे यासाठी आभार मानणे; हे चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत नेमका कोठे उभा आहे, याचे स्पष्ट निदर्शक आहे. एकेकाळी परदेशी कंपन्यांसोबत करार केल्यानंतर ते देश जणूकाही आम्ही भारतावर उपकारच केले, अशा तोर्‍यात वावरताना भारताने बघितले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जगातील प्रमुख आर्थिक आणि राजकीय शक्तींसोबत, त्यांच्या विकासात योगदान देणार्‍या भारताच्या डिप्लोमसीची ही ‘महाराजा’ स्टाईल अतिशय खास ठरते!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.