होय, हे शक्य आहे!

    14-Feb-2023
Total Views |

Ozone
 
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीबाबत क्वचितच आपल्याला चांगली बातमी मिळते. वाईट बातम्यांच्या या ओघात, सकारात्मक राहणे कठीणच! परंतु, या दुष्टचक्रातून वाट काढत, मानवाने पर्यावरण सुधारणांच्या दृष्टीने केलेल्या सकारात्मक कामांकडेदेखील लक्ष दिले गेले पाहिजे. याचाच एक भाग म्हणजे, गेल्या महिन्यात वातावरणातील ओझोन थर पुन्हा भरून निघत असल्याचे वृत्त समोर आले. अनेक दशकांच्या ‘रासायनिक ‘फेजआउट्स’ आणि जागतिक सामूहिक कृतीनंतर, 2040 पर्यंत बहुतेक ओझोन थर पूर्णपणे पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.
 
ओझोन थर हा आपल्या ग्रहाच्या वातावरणाचा अत्यावश्यक भाग. हा थर सूर्यापासून अतिनील (UV) किरणे शोषून घेण्यास जबाबदार आहे. या हानिकारक किरणांना आपल्यापर्यंत आणि आपल्या सभोवतालच्या जमिनीपर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंधित करतो. यामुळे त्वचेच्या कर्करोगापासून पीक उत्पादनात घट होण्यापर्यंतचे परिणाम होतात. या थराच्या नुकसानाचा मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावरही परिणाम होतो. ओझोन थराने प्रदान केलेल्या पुरेशा संरक्षणाशिवाय, संपूर्ण अन्न जाळे आणि परिसंस्था नष्ट होण्याचा धोका असतो.
 
विविध मानवी यंत्र सामग्रीतून ‘क्लोरोफ्लोरोकार्बन्स’ (सीएफसी) आणि इतर ओझोन कमी करणार्‍या पदार्थांचा अनियंत्रित वापर हळूहळू ओझोन थर नष्ट करत होता. सामान्यतः वापरल्या जाणार्‍या या ‘इन्सुलेशन’, ‘स्प्रे कॅन’ आणि ‘एअर कंडिशनर’ यांसारख्या उत्पादनांमधून हे वायू उत्सर्जित होतात. हे हरितगृह वायू तापमानात वाढ होण्यास हातभार लावतात आणि त्याचवेळी ओझोन थराला नुकसान करतात. हवामान संकटाशी लढा देताना यामुळे होणारी तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसची लक्ष्य मर्यादा राखणे कठीण होते. परंतु, योग्य नियमांमुळे या (सीएफसी) तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ होण्यापासून रोखले गेले आहे. सर्वप्रथम ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेचे संशोधक जोनाथन शँकलिन यांनी 1985 मध्ये, ओझोनच्या थरात एक छिद्र शोधून काढले. 2000 पर्यंत ते छिद्र आणखीन वाढत गेले. पण, जगाने एकत्रितपणे पाऊले उचलली आणि छिद्र हळूहळू दुरूस्त होऊ लागले तेव्हा प्रभावित भागात अतिनील विकिरण कमी तीव्र झाले. पण, जर असे झाले नसते, तर 2050 पर्यंत हा ओझोन थर पूर्णपणे नष्ट होण्याचे शास्त्रज्ञांचा अनुमान होते. यामुळे संपूर्ण पृथ्वीची परिसंस्था मोडकळीस आली असती, शेती कोलमडली असती आणि अनुवांशिक दोष अधिकाधिक प्रचलित झाले असते. त्यामुळे, वेळेत पाऊले उचलणे गरजेचे होते.
 
ओझोन थराची पुनर्प्राप्ती लक्षणीय का आहे, ते जाणून घेऊया. हवामानबदलाच्या नकारात्मक बातम्यांच्या प्रसारामुळे भविष्याचा अंदाज बांधणे कठीण होते. परंतु, याविषयी उपाययोजना करणे अवघड आहे, पण अशक्य नाही, हेच आपल्याला यातून दिसते. हवामान संकट ही एक बहुआयामी समस्या आहे. यासाठी नावीन्यपूर्ण उपाय आवश्यक आहेत. जेव्हा ओझोन छिद्राचा शोध लागला, तेव्हा शास्त्रज्ञ, सरकार आणि धोरणकर्ते यांनी त्वरित एक धोरण विकसित करण्यास सुरुवात केली. या धोरणानुसार, ‘सीएफसी’ वायू आणि त्याच्या प्रभावाचे संपूर्ण प्रमाण अज्ञात होते. तरीही ओझोन थराला आणखी नुकसान होणार नाही, याची खात्री करण्यासाठी ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’ स्वीकारण्यात आला.
 
1987 साली या विषयात कार्यरत शास्त्रज्ञांनी पुढे 20 वर्षांनी काय होईल, हे पाहण्यासाठी वाट पाहिली नाही. या उलट त्यांनी ठरवले की, ओझोन कमी करणार्‍या पदार्थांच्या संभाव्य परिणामांमुळे ‘सीएफसी’ प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वेळेवर, महत्त्वाकांक्षी आणि समन्वित प्रयत्न आवश्यक आहेत. ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’च्या रणनीती आणि यशाचा अभ्यास आपण भविष्यातील कायद्याची निर्मिती करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे, इतर हवामानबदल रोखण्यासाठी कारवाई आतापासून सुरू करण्याची गरज आहे. यातून आपल्याला असे लक्षात येते की, आपण सर्वांनी आपल्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल अधिक जागरूक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आजच्या अनेक गंभीर समस्यांवर एकच गुरूकिल्ली म्हणजे जागतिक कृती होय, हेच सिद्ध होते.
- उमंग काळे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.