अ‍ॅन्ड्रूयू थाडियस - इंजिनिअर, आर्किटेक्ट, योद्धा, समाजसुधारक

Total Views |

andrew thaddus


अमेरिकेच्या पूर्वेला अटलांटिक महासागराच्या तटावर न्यूयॉर्क हे जगप्रसिद्ध शहर आहे. हे आपल्याला माहीतच आहे. न्यूयॉर्क शहराच्या उत्तरेला साधरण ८० किमी अंतरावर ‘वेस्ट पाईंट’ ही विख्यात लष्करी शाळा आहे. १८०२ साली ही शाळा स्थापन झाली. म्हणजे आता तिला २२० वर्षे उलटून गेली आहेत. या शाळेतून प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेला विद्यार्थी अमेरिकेच्या भूदलात ‘लेफ्टनंट’ या अधिकारी श्रेणीतल्या पहिल्या पायरीवर दाखल होतो. गेल्या दोनशे-सव्वा दोनशे वर्षांत या शाळेतून असंख्य लष्करी अधिकारी बाहेर पडले आणि त्यांनी पहिल्या नि दुसर्‍या महायुद्धासह जगभरची अनेक रणांगणं गाजवली. जगभरच्या जुन्या आणि नव्या प्रत्येक लढाईचा, त्यातल्या उभय पक्षांच्या डावपेचांचा, हारजितीचा, हत्यारांचा अगदी सूक्ष्म अभ्यास ‘वेस्ट पाईंट मिलिटरी अकादमी’त अखंड चालू असतो. हडसन नावाच्या नदीच्या तीरावर अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी ६,५०७ हेक्टर्स एवढ्या परिसरावर ही अकादमी पसरलेली आहे. ते एक लोकप्रिय असं पर्यटनस्थळदेखील आहे. गुप्तता आमि सुरक्षा सांभाळून अकादमीचे काही भाग सर्वांना बघण्यासाठी खुले आहेत. पाश्चिमात्त्य पर्यटक ज्याप्रमाणे ‘कॅसिनो’त जाऊन जुगार खेळतात, तसेच ‘वेस्ट पाईंट अकादमी’लाही आवर्जून भेट देतात. अमेरिकेच्या प्रचंड लष्करी सामर्थ्याची चुणूक पाहतात. आपल्याकडचे किती लोक जातात? कल्पना नाही. माझ्या परिचितांपैकी एकानेही मला अजून तरी असं उत्तर दिलेलं नाही की, आम्ही स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, एम्पायर स्टेट बिल्डिंग, कॅसिनो नाईट क्लब याप्रमाणे ‘वेस्ट पॉईंट अकादमी’लाही भेट देऊन आलो. विचार करा. तुम्ही जर आगामी काळात कधी न्यूयॉर्कला गेलात, तर ‘वेस्ट पाईंट’ला भेट देण्याचं ठरवता येईल तुम्हाला.

या अकादमीच्या ठिकाणी पूर्वी ‘वेस्ट पाईंट’ याच नावाचा किल्ला होता. अमेरिका ही मूळ ब्रिटिशांची वसाहत होती. साधारण 100 वर्षांनी अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेल्या मूळच्या इंग्रजच असणार्‍या गोर्‍या लोकांच्या मनात आपण स्वतंत्र राष्ट्र आहोत, ब्रिटनची वसाहत नव्हे, अशी अस्मिता निर्माण झाली. त्यांनी जनरल जॉर्ज वॉशिंग्टन या सेनापतीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनविरुद्ध सशस्त्र युद्ध पुकारलं. हीच ती प्रख्यात अमेरिकन राज्यक्रांती. हे क्रांतियुद्ध सन १७७५ ते १७८३ असं आठ वर्षं चालू होतं. पण, अमेरिकन क्रांतिनेते युद्ध पूर्ण होईपर्यंत थांबले नव्हते.

दि. ४ जुलै, १७७६ या दिवशी त्यांनी घोषित करून टाकलं की, आम्ही स्वतंत्र आणि सार्वभौम आहोत. या कालखंडात आपल्याकडे माधवराव पेशव्याच्या अकाली मृत्यूमुळे (सन १७७२) मराठेशाही हादरली होती नि नाना फडणवीस-महादजी शिंदे हर प्रयत्ने करून मराठी अंमल पुन्हा बसवण्यासाठी झगडत होते. राघोबादादा स्वतःला पेशवेपद मिळावं म्हणून नको-नको त्या उचापती करण्यात मग्न होता. इंग्रजांच्या तावडीतून अमेरिका निसटत होती. पण, भारतात इंग्रजांचा पाय दर दिवसागणिक बळकट होत होता.

असो. तर वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध लढायला पार पोलंड देशामधून एक तरुण माणूस आला. त्याचं नाव होतं अ‍ॅन्ड्रूयू थाडियस बोनाव्हेंचर क्रोझिस्को. तुम्ही युरोप खंडाचा नकाशा पाहिलात, तर असं दिसेल की रशिया आणि प्रशिया (म्हणजे आजचा जर्मनी) यांच्या मध्ये युक्रेन, बेलारूस, पोलंड, एस्तोनिया, लात्विया असे अनेक छोटे-मोठे देश आहेत. यातला पोलंड हा देश गेल्या दोन महायुद्धांमध्ये फारच दुर्दैवी ठरला. रशिया आणि जर्मनी या दोन्ही अतिमहत्त्वाकांक्षी राष्ट्रांच्या भीषण टकरावामध्ये बिचार्‍या पोलंडची पुन्हा-पुन्हा फाळणी झाली. पुन्हा-पुन्हा राखरांगोळी झाली. या पोलंड देशातल्या एका खानदानी उमराव घराण्यात दि. १२ फेब्रुवारी, १७४६ या दिवशी थाडियस कोझिस्को याचा जन्म झाला. या वेळेस आपल्याकडे नानासाहेब पेशवे शाहू छत्रपतींच्या आज्ञेने राज्याची घडी बसवत होते. त्यांचे बाप पेशवे बाजीराव आणि काका चिमाजी अप्पा यांनी हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्यात रूपांतर केलं होतं. पण, आता त्या साम्राज्याचं सु-राज्य, उत्कृष्ट प्रशासन बनवण्याची कामगिरी अवघ्या २६ वर्षांच्या नानासाहेबांवर येऊन पडली होती. 

थाडियस कोझिस्कोने आपल्या बापाप्रमाणेच लष्करी पेशा स्वीकारायचं ठरवलं. प्राथमिक शिक्षण पोलंडमध्येच पूर्ण करुन तो पॅरिसमध्ये दाखल झाला. आता ज्याप्रमाणे पोरं उच्च शिक्षणासाठी इंग्लंमध्ये ‘ऑक्सफर्ड’-’केंब्रिज’ किंवा अमेरिकेत ‘हार्वर्ड’-‘कोलंबिया’-‘येल’ इत्यादी विद्यापीठांमध्ये जातात, तशी त्यावेळची युरोपातली होतकरु पोरं लष्करी उच्च शिक्षणासाठी पॅरिसला आणि नौकानयन विषयातल्या उच्च शिक्षणासाठी लंडनला जात असत.

थाडियस कोझिस्कोने लष्करी उच्चशिक्षण म्हणजे विविध हत्यारं चालवणं, घोडेस्वारी, नेमबाजी, तलवारबाजी, सैनिकी व्यूहरचना इत्यादी विषयांत तर प्रावीण्य मिळवलंच, पण आज ज्याला सैनिकी अभियांत्रिकी-‘मिलिटरी इंजिनिअरिंग’ असं म्हटलं जातं, त्यात विशेष प्रावीण्य मिळवलं. यात विविध प्रकारचे भूभाग, नद्या, समुद्र, डोंगर, दलदली, जंगल यांचं सर्वेक्षण करणं, त्याचे उत्तम नकाशे बनवणं, मोक्याच्या ठिकाणी बुरुज, ठाणी, किल्ले, पूल, रस्ते, सांडवे, कालवे बांधणं, सैन्याच्या तळासाठी अनुकूल ठिकाणं, तळी, तलाव, पाणवठे हेरून त्यांचा योग्य बंदोबस्त ठेवणं, अशा रचनात्मक कामांसह यासर्व सोयी शत्रूच्या हाती लागू नयेत म्हणून जरुर पडल्यास त्या अल्पावधीत उद्ध्वस्त करणं, अशा विध्वंसक कार्यासह अक्षरश: अगणित काम येतात. आजही काम करण्यासाठी जगभरच्या प्रत्येक भूदलात ‘मिलिटरी इंजिनिअरिंग’ हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे, पण कोझिस्कोच्या काळात असं नव्हतं. सगळ्यांना सगळी कामं आली पाहिजेत, असा दंडक होता. कोझिस्को हे सगळं तर शिकलाच, पण एवढं कमी की काय म्हणून चित्रकला पण शिकला, त्यातही त्याने चांगलं प्रावीण्य मिळवलं.

अशा रीतीने एक चमकदार अधिकारी म्हणून पोलिश (पोलीस नव्हे) म्हणजे पोलंडच्या लष्करात प्रवेश केलेल्या थाडियस कोझिस्कोने पोलंडचा राजा स्तानिस्लाव याच्यासाठी रणांगण गाजवायला सुरुवात केली. त्या काळात पोलंड आणि लिथुएनिया यांचं मिळून एक राज्य होतं. त्यांच्या रशियाशी कायमच लढाया सुरु असत. रशियन सम्राज्ञी कॅथरिन-द-ग्रेट राज्यावर होती. या महत्त्वाकांक्षी राणीला पोलंड गिळायचा होता. कोझिस्कोने अनेक लढायांमध्ये आपल्या अप्रतिम डावपेचांनी आपल्यापेक्षा तिप्पट संख्येच्या रशियन सैन्याचा सडकून पराभव केला.


पण, पोलिश राजा स्तानिस्लाव हा कच्चा हिमतीचा निघाला. त्याने कॅथरिनशी शांततेचा तह केला. थाडियस कोझिस्को फार नाराज झाला.

तेवढ्यात त्याला त्याचा फे्रंच मित्र पिअरी बुमार्झे याच्याकडून खबर मिळाली की, अमेरिकन क्रांतिकारकांनी ब्रिटिश स्वामित्वाविरूद्ध बंड पुकारलं असून तिथे घनचक्कर लढाया सुरू आहेत नि फ्रान्सने अमेरिकन क्रांतीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. जुलै १७७६ मध्ये कोझिस्को अमेरिकेत गेला. तिथे पिअरी बुमार्झेमुळेच बेंजामिन फ्रँकलिन त्याचा मित्र बनला. आता बेंजामिन फ्रँकलिन हा अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या उद्गात्यांपैकी एक होता. तो राजकारणी होता, मुत्सद्दी होता, लेखक होता, प्रकाशक होता, मुद्रक होता, संशोधक होता आणि शास्त्रज्ञही होता. फ्रँकलिन आणि कोझिस्कोची भलतीच गट्टी जमली. पण, कोझिस्कोचा विशेष असा की, अभ्यासिका आणि प्रयोगशाळेतल्या बौद्धिक पांडित्याइतकाच त्याला प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये रस होता. रणांगणावर स्वतः जाण्यासाठी तो अतिशय उतावीळ होता. अखेर मे १७७७ मध्ये त्याला फोर्ट टिकोंडेरोगा इथल्या सैन्य तुकडीत ‘कर्नल’ या पदावर नेमण्यात आलंं आणि मग कोझिस्कोच्या सैनिकी डावपेचांनी अमेरिकन क्रांतिकारक सेनापती वारंवार चकित होत राहिले. एखादा नदीकाठ, एखादा डोंगर, एखादं दलदलयुक्त खाजण पाहताच क्षणी तो सांगायचा, “इथे बुरूज उभारा. इथे चांगला मजबूत किल्ला उभारा. इथे तोफांचा मोर्चा उभा करा. इथे तोफांसह घोडदळाचीही शिबंदी ठेवा. इथे पक्का उंच पूल उभारा. इथं होड्या-तराफेएकमेकांना जोडून तात्पुरता पूल उभारा. त्या अमक्या दिशेने ब्रिटिश सेना येणार, त्यासाठी त्या तमक्या उंचावल्यावर फक्त चार तोफा लावल्यात तरी पुरे.” एखाद्या भविष्यवेत्याप्रमाणे कोझिस्कोचे सगळे अंदाज, सगळी निरीक्षणं अचूक ठरायची.

अशाच धावपळीत कोझिस्कोने प्रथम हडसन नदीच्या तीरावर ‘वेस्ट पॉईंट’ इथे एक मजबूत लष्करी ठाणं उभारलं. पुढे १७७८ ते १७८० अशी दोन वर्षं तिथेच मुक्काम ठोकून त्याने तिथे एक बुलंद, बेलाग किल्लाच उभारला. खुद्द सर्वोच्च सेनापती जनरल जॉर्ज वॉशिंग्टनसह तमाम सेनापती कोझिस्कोवर निहायत खूश होऊन गेले. त्या काळातच तो सर्वोत्कृष्ट किल्ला होता.

१७८३ मध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्घ संपलं. खरंतर तो अमेरिकेत कायमचा राहू शकला असता. पण, त्याला लढण्याची फार खुमखुमी होती. तो पोलंडला परतला आणि पोलंड-लिथुएनिया, रशिया, प्रशिया, ऑस्ट्रिया, फ्रान्स यांच्या लढाया नि राजकारणांमध्ये पुन्हा रंगून गेला. असंख्य पदव्या, पदकं, सन्मान आणि कौतुक यांचा त्याच्यावर वर्षाव होत राहिला. एक बाबतीत कोझिस्को त्याच्या समकालीन सरदारांपेक्षा तर पुढे होताच, पण त्याचा मित्र बेंजामिन फ्र्रँकलिन याच्याही पुढे होता. त्याने पोलंडचा राजा आणि सरदार मंडळींसमोर असा प्रस्ताव मांडला की, आपल्या राज्यातल्या शेतकरी आणि ज्यू लोक यांना आपण दुय्यम नागरिक बनवलं आहे, ते रद्दबातल करा. त्यांना आपल्यासारखेच नागरी हक्क द्या.

रशिया आणि प्रशियाविरुद्घ लढण्यासाठी त्यांनाही आपल्याबरोबर घ्या. बेंजामिन फ्रँकलिनने स्वातंत्र्याचा उद्घोष केला, पण त्याच्या स्वत:च्या मालकीचे अनेक काळे गुलाम होते. कोझिस्कोने फ्र्रँकलिनला म्हटलं की, त्यांना गुलामगिरीतून मुक्त कर आणि अन्य गोर्‍या नागरिकांइतकेच हक्क दे. पोलिश सरदार मंडळीच नव्हे, तर बेंजामिन फ्रँकलिनसुद्धा कोझिस्कोचं म्हणणं मान्य करू शकला नव्हता. सन १७८९ साली सुप्रसिद्ध फ्र्रेंच राज्यक्रांती झाली. नंतरच्या अनागोंदीतून नेपोलियन बोनापार्ट या अगदी सामान्य जनतेतून पुढे आलेल्या नेत्याचा उदय झाला. पुढे नेपोलियन आणि कोझिस्कोची भेट झाली. पण, त्यांचं जमलं नाही. कारण, कोझिस्कोला खरोखरचं सामान्य जनतेचं राज्य येईल, असं वाटत होतं. नेपोलियनला सामान्य माणसांच्या नावाआड स्वत:च राजा बनायचं होतं.

१५ ऑक्टोबर १८१७ या दिवशी वयाच्या ७१व्या वर्षी थाडियस कोझिस्को मरण पावला. त्यापूर्वी त्याने आपल्या शेतीवाडीवरच्या सर्व कुळांना समान हक्क दिले. म्हणून आजही पोलंडमध्ये त्याला ‘प्रिन्स ऑफ पीझंटस्-शेतकर्‍यांचा राजा’ म्हणून ओळखतात. १८०२ साली कोझिस्कोने बांधलेल्या ‘वेस्ट पॉईंट’ किल्ल्यात आणि परिसरात अमेरिकन सरकारने लष्करी अकादमी सुरू केली. एकेकाळच्या ‘प्रभात चित्रपट स्टुडिओ’च्या जागी भारत सरकार ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ उभी करू शकतं. मग एखाद्या बुलंद किल्ल्याच्या परिसरात एखादी लष्करी अकादमी का नसावी?
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.