मावळत्या वर्षात हॉटेल उद्योगाला ‘अच्छे दिन’

    28-Dec-2023   
Total Views |
 hotel
 
२०२२-२३ या आर्थिक वर्षी हॉटेल उद्योग बर्‍यापैकी सावरला आहे. त्यानिमित्ताने मावळत्या वर्षातील हॉटेल उद्योगाच्या कामगिरीवर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख...
 
भारतीयांमध्ये गेल्या वर्षभरातही पर्यटनासाठी प्रचंड उत्सुकता दिसून आली. परिणामी, कोरोना काळात प्रचंड मंदीत गेलेला हॉटेल उद्योग २०२२-२३ या आर्थिक वर्षी देखील बराच सावरला आहे. तरीही कोरोनापूर्वी २०१९ साली या व्यवसायाचे जे आर्थिक व्यवहार होते व खोल्यांच्या बुकिंगचे प्रमाण होते, ती पातळी मात्र या उद्योगाने अजून गाठलेली नाही.
 
संघटित क्षेत्रातील हॉटेल उद्योगांत साधारणपणे भारतभर दोन लाख ‘ब्रॅण्डेड‘ खोल्या आहेत. यापैकी सरासरी ६३ ते ६५ टक्के खोल्यांचे बुकिंग या आर्थिक वर्षी झाले. २०२२च्या तुलनेत यात पाच टक्के वाढ झाली असली तरी २०१९च्या तुलनेत एक ते दोन टक्के घट आहे. २०१९ व २०२२च्या तुलनेत हॉटेल उद्योगाने दर वाढविले आहेत. चांगल्या ब्रॅण्डच्या हॉटेलमध्ये चालू वर्षी खोलीचा दर दिवसाला ७ हजार, २०० ते ७ हजार, ४०० रुपये इतका होता. २०१९च्या तुलनेत यात २२ टक्के वाढ झाली आहे, तर २०२२च्या तुलनेत २० टक्के वाढ झालेली आहे. हॉटेल व्यवसायात २०१९च्या कॅलेंडर वर्षी म्हणजे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ५ हजार, ८५० कोटी रुपयांचे व्यवहार झाले, तर जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ४ हजार, ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाले. डिसेंबरमध्ये व्यवहारांत फार मोठी वाढ झाली. तारांकित हॉटेलच्या हॉटेल बुकिंगचे प्रमाण २०१९च्या तुलनेत यंदाचे प्रमाण २.९ टक्क्यांनी कमी असून, २०२२च्या तुलनेत जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ३.४ टक्के वाढ आहे.
 
विदेशी पाहुणे फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात आले पाहिजेत व भारतीयांनी परदेश पर्यटन करण्यापूर्वी, पूर्ण भारत बघून घ्यायला पाहिजे, ही आपल्या अर्थव्यवस्थेची गरज आहे. २०२२ मध्ये संघटित हॉटेल उद्योगात ९ हजार, ९०० नव्या खोल्यांची भर पडली होती, तर जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत १२ हजार, ४०० नव्या खोल्यांची भर पडली. यापैकी ६० टक्के खोल्या ‘टिअर ३’ विभागात सुरू झाल्या, तर ‘टिअर २’ विभागात ३४ टक्के नव्या खोल्या कार्यरत झाल्या. ‘टिअर १’ विभागात नव्या खोल्यांची तितकीशी गरज नाही. कारण, येथे बरीच हॉटेल्स आहेत व त्यांच्यात फार मोठी स्पर्धा आहे.
 
या वर्षीच्या ११ महिन्यांत जास्तीत जास्त बुकिंग दिल्ली शहरात झाले. त्यानंतर क्रमाने हैदराबाद, बंगळुरु, मुंबई व नंतर चेन्नई असा क्रमांक लागला. या मोठ्या शहरांतल्या हॉटेलमध्ये कंपन्यांच्या पत्रकार परिषदा, त्यांच्या बैठका, उद्योगांच्या परिषदा, प्रदर्शने इत्यादी उपक्रम होत असतात. परिणामी, महानगरांतील हॉटेल्समध्ये पैशाचा ओघ चालूच राहतो. गोव्यातील हॉटेलच्या खोल्यांचे दर महाग असून, गोव्यात या कॅलेंडर वर्षात हॉटेल उद्योगात आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. गोव्यात सध्या ९०० हॉटेल खोल्या आहेत.
 
भारतात मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय लोकांच्यात ‘डेस्टिनेशन मॅरेज’च फार मोठ फॅड आलं आहे आणि ही ‘डेस्टिनेशन वेडिंग’ जास्तीत जास्त गोव्यातच होतात. यामुळे गोव्यात सध्या सर्वत्र ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी, रिसॉर्टचे बांधकाम फार मोठ्या प्रमाणावर प्रत्येक तालुक्यात सुरू आहे. या वर्षीच्या ११ महिन्यांत हॉटेल उद्योगात फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. कोणत्याही उद्योगात गुंतवणूक वाढणे, हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हितकारक असते. याने अर्थव्यवस्थेला चालना मिळते. रोजगार वाढतात. या उद्योगात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत २ हजार, ५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. २०२२च्या तुलनेत हॉटेल क्षेत्राच्या गुंतवणुकीत २५० टक्के वाढ झाली. २०२२ या उद्योगातील गुंतवणुकीचे प्रमाण ५८० कोटी रुपये इतके होते.
 
 
भारतात २०१९ मध्ये हॉटेलच्या खोल्या बुकिंगचे प्रमाण सरासरी ६५ ते ६७ टक्के होते. खोलीचा सरासरी दर ५ हजार, ९०० ते ६ हजार, १०० रुपये होता, तर प्रत्येक उपलब्ध खोलीमध्ये सरासरी उत्पन्न ३ हजार, ७५० रुपये ते चार हजार रुपये इतके होते. २०२२ मध्ये खोल्या बुकिंगचे सरासरी प्रमाण ५९ ते ६१ टक्के होते. खोलीचा सरासरी दर हजार ते ६ हजार, २०० होता, तर प्रत्येक खोलीमागे सरासरी उत्पन्न ३ हजार, ५०० ते ३ हजार, ७०० रुपये होते, तर जानेवारी-नोव्हेंबरमध्ये खोल्याचे सरासरी बुकिंग ६३ ते ६५ टक्के होते. खोल्यांचा सरासरी दर ७ हजार, २०० ते ७ हजार, ४०० रुपये होता, तर खोलीमागे उत्पन्नाचे सरासरी प्रमाण ४ हजार, ६०० ते ४ हजार, ८०० रुपये होते.
 
प्रत्येक खोलीच्या उत्पन्नामध्ये झालेली अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत विविध शहरांत टक्केवारीत वाढ पुढीलप्रमाणे - दिल्ली ५७, हैदराबाद ४३, चेन्नई ३९, मुंबई ३७, बंगळुरु ३३, पुणे २४ व गोवा १८ हॉटेल उद्योगात २०१९ मध्ये ५ हजार, ८४४ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती, तर २०२२ मध्ये हे प्रमाण घसरुन ५८१ कोटी रुपयांची झाली होती, तर २०२३ च्या पहिल्या ११ महिन्यांत याचे प्रमाण २०५० कोटी रुपये इतके होते.
 
‘युपीआय’मुळे भारतात अर्थक्रांती
भारतातत ‘युपीआय’ने व्यवहार करता येतात. या व्यवहारांत प्रत्यक्ष कॅश द्यावी किंवा घ्यावी लागत नाही, हे प्रत्येकालाच आतापर्यंत माहीत झालेले असणार. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (युपीआय) ही प्रणाली खूप सरल व सोपी आहे. ही प्रणाली वापरण्यासाठी आपले बँकेतले खाते ‘युपीआय’ मोबाईल अ‍ॅप्लिकेशनशी जोडावे लागते यातून ‘सीमलेस फंड राऊटिंग’द्वारे पटकन पाठवता येतात. ‘युपीआय’ हा निधी हस्तातरांचा पर्याय. ‘युपीएस’ कार्यान्वित होण्यापूर्वी ‘आरटीजीएस’, ‘एनईएफटी’ तसेच ‘आयएमपीएस’चा प्रणालीद्वारे निधी हस्तांतरण करता येते होते. २०१६ मध्ये ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन’च्या स्थापनेनंतर ‘युपीआय’ पद्धती आले.
 
‘युपीआय’द्वारे सध्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात. गेल्या सप्टेंबर महिन्यात ‘युपीआय’द्वारे १०.५६ अब्ज व्यवहार झाले. या व्यवहारांचे मूल्य साधारणपणे १५.८० लाख कोटी रुपये इतके होते. यात व्यक्ती ते व्यापारी स्वरुपाचे व्यवहार करता येतात. भारतात रोखीत व्यवहार कमी होत असून डिजिटल एनपी व्यवहार वाढत आहेत. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. ‘एनपीसीआय’च्या अहवालानुसार, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये ‘फोन पे’ या अ‍ॅपद्वारे सुमारे पाच अब्ज (एकूण व्यवहारांच्या ४७ टक्के) गुगल पेद्वारे ३.८ अब्ज तर ‘पेटीएम’द्वारे १.५ अब्ज व्यवहार झाले.
 
‘युपीआय’ व्यवहार किंवा पेमेंटसाठी वेगळे बँक खाते वापरावे. ‘युपीआय’साठीच्या बचत खात्यात जास्त पैसे ठेवू नयेत. जेवढे आवश्यक असतील, तेवढेच पैसे ठेवावेत. ‘युपीआय’ म्हणजे खर्च. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे करावे. ‘युपीआय’चा पिन क्रमांक थोड्या महिन्यांनी बदलत राहावा. परिणामी दुसरी कोणी व्यक्ती त्यातून व्यवहार करू शकणार नाही. मोबाईल फोनद्वारे ‘युपीआय’ व्यवहार करीत असाल तर शक्यतो मोबईल दुसर्‍याच्या हातात देऊ नका. ‘युपीआय’द्वारे कोणते व्यवहार करायचे व कोणते करायचे नाहीत हे निश्चित ठरवा. एकापेक्षा अधिक बँका एकाच ‘युपीआय’ क्रमांकाला संलग्न करू नका.
 
 
‘युपीआय’ प्रणाली ही नक्कीच अर्थक्रांती आहे. या प्रणालीमुळे लोकांची जीवनशैलीच बदलून गेली आहे. पूर्वीच्या काळी लोक पाकिटात आवश्यक रक्कम ठेवूनच बाहेर पडत. आता फक्त मोबाईल घेऊन बाहेर पडतात. छोट्या छोट्या दुकानदारांकडे, व्यापार्‍यांकडे अगदी रेल्वे स्टेशनवर बुटपॉलिश करण्यार्‍यांकडेही क्यूआर कोड असतात, त्याने छोट्यात छोट्या रकमेची अगदी सहज पेमेंट करता येते. ‘रिलायन्स’ कंपनीने ‘जीओ’ची जाहिरात करताना ‘दुनिया अपनी मुठ्ठीमे’ हे ब्रीदवाक्य वापरले होते. हेच ब्रीदवाक्य खरोखरच डिजिटल युगात वास्तववादी ठरले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.