तरी ‘प्रकाश’ पडेल का?

    27-Dec-2023   
Total Views |
Dr. Saviera Prakash Minority communities in Pakistan


पाकिस्तानमधील धर्मांधांना वाटत असते की, पाकिस्तान जगाच्या उदयापासून स्वतंत्र संस्कृती असलेला देश आहे. तसेच भारत हा पाकिस्तानचा इतिहास आणि संस्कृतीचा भाग. तिथल्या अभ्यासक्रमात असेच शिकवलेही जाते. मात्र, आता डॉ. सवीरा प्रकाशने म्हटले आहे की, “भारत आणि पाकिस्तानची संस्कृती सभ्यता एकच आहे. तसेच नरेंद्र मोदी हे खूप कणखर नेते आहेत. भारत खूप प्रगतिशील आहे आणि पाकिस्तानपेक्षा विकासाच्या बाबतीतही भारत पुढे आहे.” अर्थात, भारतापासूनच जन्मलेला पाकिस्तानरुपी जमिनीचा तुकडा हा भारताच्या संस्कृतीपासून वेगळा नाही, हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण, या सगळ्या परिक्षेपात डॉ. सवीरा प्रकाशने असे म्हणणे, याला अनेक महत्त्वाचे कंगोरे आहेत. कारण, डॉ. सवीरा या पाकिस्तानच्या खैबरपख्तुनख्वा भागातली नागरिक असून, पुढील वर्षी होणार्‍या पाकिस्तानच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून त्यांनी नामांकन दाखल केले आहे. विशेष म्हणजे, सवीरा या हिंदू आहेत.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समाज म्हणजे हिंदू, शीख आणि ख्रिश्चन समाजाची स्थिती खूपच दयनीय. हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण करून बलात्कार करणे, जबरदस्तीने निकाह करणे आणि त्यांचे धर्मांतरण करणे या गोष्टी पाकिस्तानमध्ये सामान्य. तसे पाहायला गेले, तर पाकिस्तानमध्ये हिंदू महिला काय आणि मुस्लीम महिला काय, सगळ्याच महिलांची परिस्थिती अत्यंत दयनीय. ‘ऑनर किलिंग’ आणि घरगुती हिंसा या गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानच्या महिलांचे जीवन नरकच बनले आहे. अशा पाकिस्तानमध्ये डॉ. सवीरा प्रकाश या हिंदू महिलेने सत्तेमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहणे, त्यासाठी प्रयत्न करणे हे खूप महत्त्वाचे. कारण, हिंदू स्त्री म्हणजे केवळ अत्याचार करण्यासाठीच, असे तेथील समीकरण असताना, डॉ. सवीरा प्रकाश या एका हिंदू स्त्रीने सत्ताधारी बनण्याचा प्रयत्न केला आहे. सवीरा यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानमध्ये नुसत्या मंदिरांवरच हल्ले होत नाहीत, तर इथे मशिदीवरही हल्ले होतात. डॉ. सवीरांचे हे म्हणणे पाकिस्तानच्या अस्वस्थ आणि अस्थिर समाजकारण, राजकारणाच्या स्थितीचे द्योतक. राजकारणात का आलात, यावर डॉ. सवीराचे म्हणणे आहे की, “देशातील अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राजकारणात आले आहे.” सवीरांचे हे म्हणणे ऐकून वाटते, एकटी सवीरा पाकिस्तानच्या धर्मांधांचे मत बदलू शकेल का?

पाकिस्तानमध्ये एक सवीरा सत्तेत आली, तर बाकीचे सत्ताधारी लोकशाही पद्धतीने तिच्या मतांचा, विचारांचा आदर करतील का? बहुमत जर धर्मांधांचे असेल, तर एकटी सवीरा त्यांच्यासमोर स्वतःच्या न्याय-हक्कासाठी लढू शकेल का? तिचे म्हणणे कितीही खरे असले, तरी पाकिस्तानची बहुसंख्य धर्मांध जनता तिचे विचार पचवू शकेल का? दुर्दैवाने याचे उत्तर नाही, हेच आहे.तेथील राजकारणात टिकून राहण्यासाठी, सवीराला एकगठ्ठा अल्पसंख्याकांची मतं मिळवावी लागतील. बरं, ही मतं एकगठ्ठ्यांनी जरी मिळाली, तरी समोरच्या मुस्लीम उमेदवाराला मत देणारे, हिंदू महिलेला हरवण्यासाठी वाटेल, ते करणारच करणार! आपल्या भारतातही काही ठिकाणी हे आपण पाहिले आहे. जर मुस्लीमबहुल परिसर असेल आणि तिथून गैरमुस्लीम व्यक्ती निवडणुकीला उभी राहिली, तर मुस्लीम उमेदवाराला जिंकवण्यासाठी, त्या परिसरातील बहुसंख्य मुस्लीम हिरीरीने मतदान करतात.

अपवादही आहेच म्हणा. इटली, फ्रान्स आणि लंडन अगदी अमेरिकेमध्येही हेच आहे. मुस्लीम बहुसंख्य भागात सत्ताधारी मुस्लीम व्यक्तीच बनते. त्यामुळे डॉ. सवीरा यांना पाकिस्तानमध्ये निवडणुकीमध्ये जरी उमेदवारी मिळाली, तरी त्यांचे निवडून येणे, हे मोठे कौशल्य ठरणार आहे. त्या पाकिस्तानमध्ये सत्ताधारी बनल्या, तरीसुद्धा त्यांच्यासारख्या विचारांचे लोक त्यांच्यासोबत सत्तेत गेले, तरच पाकिस्तानचे चित्र पालटणार आहे; कारण गुणवान, धनवान याच बरोबर लोकप्रियतादेखील गरजेचे आहे. पाकिस्तानमधल्या हिंदू डॉ. सवीरा प्रकाश यांना तसे समर्थन पाकिस्तानमध्ये मिळेल का? भविष्यात पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांचे जीवन बदलले का?



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.