‘ऑपरेशन विजय’

Total Views |
the operation by the Military of India that led to the capture of Goa

दि. १९ डिसेंबर १९६१ या दिवशी पोर्तुगीजांनी पांढरे निशाण फडकवले. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युअल अँटोनिओ वसालो इ सिल्वा याने त्या दिवशी रात्री ८.३० वाजता भारतीय सेनापतींसमोर शरणागतीच्या करारावर सही केली. गोवा मुक्त करून, भारतीय संघराज्यात दाखल करण्याच्या, या लष्करी कारवाईचे सांकेतिक नाव होते-‘ऑपरेशन विजय.’ गोवा मुक्ती दिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख...
 
दि. १७ डिसेंबर १९६१. भारतीय सेना गोव्यात घुसल्या. बिग्रेडियर सगातसिंग यांच्या नेतृत्वाखाली लष्कराची १७वी इन्फन्ट्री डिव्हिजन उत्तरेकडून गोव्यात घुसली. राजधानी पणजी आणि जवळचे मार्मागोवा बंदर जिंकणे, हे तिचे लक्ष्य होते. पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या धर्मांध आणि क्रूर राजवटीचा शेवट अगदी जवळ येऊन ठेपला.

पार्श्वभूमी

जुलै १४९७ मध्ये पोर्तुगालच्या रेस्तेल बंदरातून निघालेला वास्को-द-गामा हा दर्यावर्दी मे १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनार्‍यावरच्या केरळमधल्या कालिकत बंदरात पोहोचला. कालिकत हे पोर्तुगीजांनी ‘कोळिकोड’ या मूळ नावाचे केलेले भ्रष्ट रूप. जसे मुंबईचे बॉम्बे तसेच! तेव्हा जे पोर्तुगीजांचे पांढरे पाय भारताला लागले, ते कायमचेच. पांढरे पाय अशासाठी की, त्यांना नुसताच व्यापार करायचा नव्हता, तर धर्मप्रसार आणि राज्यप्रसार हा त्यांचा खरा हेतू होता. त्यामुळे कोळिकोडच्या ज्या समुद्रिन (भ्रष्ट पोर्तुगीज नाव झामोरिन) राज्याने त्यांचे स्वागत केले, त्यांना व्यापारासाठी जागा, सोयी-सवलती दिल्या, त्याचेच राज्य त्यांनी दगाबाजीने हडप केले. मग जेझुईट पाद्य्रांनी केरळात बाटवाबाटीचा कहर करून सोडला.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोळिकोडवरून उत्तरेकडे सरकत, मिळतील तितकी ठिकाणे हाताखाली घालण्याची त्यांची धडपड सुरूच होती. त्यातच १५१० साली अल्फलान्सो-द-अल्बुकर्क या अत्यंत शूर आणि तितक्याच क्रूर पोर्तुगीज सेनापतीने विजापूरच्या आदिलशहाकडून गोवे जिंकून घेतले.

जसे उत्तर आणि दक्षिण कोकणचे शिलाहार राजघराणे, तसे गोव्यात कंब राजघराणे. या कलाप्रिय, विद्याप्रिय, पराक्रमी कदंब राजांनी गोव्यात मोठ्या हौसेने सुंदर-सुंदर मंदिरे उभारली होती. पोर्तुगीजही कलाप्रिय होते. शिल्पकला आणि चित्रकला त्यांनाही आवडायची. पण, ती त्यांच्या धर्माची असली तरच. इथे सगळी हिंदू कला होती. त्यामुळे त्यांनी अल्पावधीत गोव्यातली ६०० हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करून टाकली. गावेच्या गावे बाटवणे, बाटण्यास नकार देणार्‍यांना जीवंत जाळणे वगैरे त्यांच्या आधुनिक युरोपीय लीलाही मोठ्या हौसेने सुरू झाल्या.

आदिलशहा, निजामशहा, मुघल आदि मुसलमान सुलतान पोर्तुगीजांना म्हणत ‘फिरंगी.’ त्यामुळे मराठीतही तोच शब्द रूढ झाला. पुढे तर इंग्रजांनाही त्याच शब्दाने ओळखले जाऊ लागले. जे हबशांचे राज्य ते ‘हबसाण’, तसे फिरंग्यांचे राज्य ते ‘फिरंगाण.’

शिवछत्रपती, शंभूछत्रपती आणि बाजीराव-चिमाजी अप्पा यांनी हे फिरंगाण नष्ट करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पण, फिरंगी हे अत्यंत चिवट, कजाख आणि जहांबाज लढवय्ये होते. त्यामुळे मराठ्यांनी त्यांचा बराच मुलुख जिंकला, चिमाजी अप्पांनी वसई-साष्टी प्रांतातून त्यांना कायमचे हाकलून दिले, तरी त्यांची सत्ता पूर्ण नष्ट झाली नाही. मात्र, मराठ्यांच्या भीतीने त्यांचे बाटवाबाटवीचे उद्योग बरेच नियंत्रणात आले.

पुढे इंग्रजांनी सगळा भारतच जिंकला. पण, त्यांच्या युरोपातल्या राजकारणाच्या सोयीनुसार त्यांनी भारतातली फ्रेंच आणि पोर्तुगीज यांची चिमूटभर सत्ता चालू ठेवली. १९४७ साली इंग्रज भारत सोडून चालते झाले. आणखी पाच-सात वर्षांत फ्रेंचांनीही गाशा गुंडाळला; पण पोर्तुगीज गोवा-दमण-दीव-दादरा-नगर हवेली हा प्रदेश सोडून निघून जायला तयार होईनात.

आंदोलने

यावेळी खुद्द पोर्तुगालमध्ये प्रजासत्ताक लोकशाही सरकार होते. पण, ही लोकशाही मूल्ये गोव्याला लागू करायला, ते तयार नव्हते. पोर्तुगीज पंतप्रधान डॉ. अँटोनिओ डी ऑलिव्हिएरा सालाझार हा अत्यंत साम्राज्यवादी मनुष्य होता. १९४८ साली भारताचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने विलीन करून टाकली. हैद्रराबादचा निजाम जेव्हा पाकिस्तानात विलीन होण्याच्या वल्गना करू लागला, तेव्हा सरदारांनी पोलीस कारवाई करून, हैदराबादचा निकाल लावून टाकला. सरदार आणखी जगले असते, तर कदाचित गोवा प्रश्न ही सुटला असता. पण...

पोर्तुगालने गोवा प्रदेश भारतीय संघराज्याच्या हवाली करावा, या भारताच्या राजकीय प्रस्तावाला डॉ. सालाझार यांनी उत्तर दिले की, “गोवा ही आमची वसाहत नसून, तो आमच्या पोर्तुगाल देशाचाच भाग आहे आणि आम्ही जेव्हा गोवा जिंकून घेतला, तेव्हा भारतीय प्रजासत्ताक असे काही अस्तित्वातच नव्हते. तेव्हा आम्ही गोवा त्यांच्या स्वाधीन करण्याचा प्रश्चच येत नाही.”

राजकीय दळण

थोडक्यात, सालाझार हा प्राणी ’लातों के भूत’ या वर्गातला होता. पण, ‘लातों के भूत बातों से नही मानते’ या व्यावहारिक शहाणपणाचा भारताच्या सर्वोच्च राजकीय नेतृत्वापाशी संपूर्ण अभाव असल्यामुळे १९५० पासून १९६० पर्यंत वाटाघाटी, मुत्सेद्दगिरी, निषेध, खलिते व गैरराजकीय दळण दळणे चालू होते. या काळात गोवा स्वतंत्र व्हावा, भारतात यावा, या तीव्र इच्छेने गोव्यातले स्थानिक लोक आणि गोव्याबाहेरचे देशभक्त हे जोरदार आंदोलने उभी करत होते. पोर्तुगीज राजवट अत्यंत अमानुषपणे आंदोलकांना बदडून काढीत होती.

अखेर भारत सरकारला जग आपल्याला हिंसावादी, शांतता त्यागून युद्धखोरी करणारे इत्यादी विशेषणे बहाल करेल, ही भीती बाजूला ठेवून, लष्करी कारवाईचा निर्णय घ्यावाच लागला.

युद्ध

राजकीय नेतृत्वाकडून लष्करी कारवाईची हिरवी झेंडी दाखवली जाताच, भारतीय सैन्यदलाच्या सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जयंतनाथ चौधरी यांनी लष्कराची १७वी इन्फन्ट्री डिव्हिजन रिंगणात उतरवली. वायुदलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख एअर व्हाईस मार्शल पिंटो यांनी गोव्याची हवाई नाकेबंदी केली. दि. १८ डिसेंबरला वायुदलाच्या १२ कॅनबेरा विमानांनी गोव्याच्या दाभोळी विमानतळावर अचूक बॉम्बफेक करून, धावपट्टी उद्ध्वस्त करून टाकली.

पोर्तुगाल ही आता इतिहास काळातल्याप्रमाणे नाविक शक्ती उरलेली नसली, तरी त्यांना समुद्रमार्गे बाहेरून मदत मिळू शकते, हे लक्षात घेऊन, भारतीय नौदलाने ’आयएनएस विक्रांत’सह आणखी १७ युद्धनौका कारवाईत उतरवून, गोव्याची समुद्री नाकेबंदी पक्की करून टाकली. गोव्याचा गव्हर्नर वसालो इ सिल्वाने लिस्बनला ही सगळी माहिती कळवली. यावर डॉक्टर सालाझारने त्याला उत्तर पाठवले की, ”पोर्तुगाल शरणागती पत्करूच शकत नाही. आमचे लढवय्ये आणि दर्यावर्दी एकतर विजेते असतील किंवा मृत असतील. आमच्या राष्ट्राची परंपरा आणि उज्ज्वल भविष्य याकरिता त्याग हाच एकमेव रस्ता आहे.” भारतीय सैन्यदल आणि गोव्यातील पोर्तुगीज सैन्यदल यांचे एकंदर बलाबल पाहता, सालाझारचा हा सल्ला म्हणजे शुद्ध आत्मघातकी वेडेपणा होता. पण, आता वसालो इ सिल्वा यालाही पर्याय नव्हता.

दि. १७ डिसेंबर १९६१ रोजी सकाळी ९.४५ला ब्रिगेडियर सगातसिंग यांच्या नेतृत्वाखाली १७वी इन्फन्ट्री डिव्हिजन गोव्याच्या उत्तर आणि ईशान्य सीमांमधून आत घुसली. या सैन्य विभागाच्या ‘५० पॅरा ब्रिगेड’ या तुकडीने राजधानी पणजीचा रोख धरताना, तीन तुकड्या केल्या. ’२-पॅरा मराठा’ या पलटणीने उसगावमार्गे फोंड्याकडे कूच केले. ’१-पॅरा पंजाब’ या तुकडीने बन बाणस्तरीमार्गे पणजीचा मोहरा धरला, तर ’२-शीख लाईट इन्फन्ट्री’ या तुकडीने थिवी या ठाण्याकडे रोख धरला.

पोर्तुगीज सैन्याने प्रतिकाराचा तिखट प्रयत्न केला; पण मनुष्यबळ, सामग्री, रणकौशल्य या सर्वंच बाबतीत भारतीय सैन्य निःसंशय होते. दि. १८ डिसेंबरपासून पोर्तुगीज सैन्य माघार घेऊ लागले. माघार घेताना पूल उडवून देणे वगैरे डावपेच त्यांनी पद्धतशीरपणे केले. पण, भारतीय सैन्याच्या तांत्रिक क्षमतेसमोर ते निष्प्रभ ठरले. दि. १९ डिसेंबरच्या सकाळी सातव्या घोडदळ तुकडीने आग्वादचा प्रसिद्ध किल्ला जिंकला. दि. १९ डिसेंबरच्या सकाळी ७.३० वाजता पणजीवर भारताचा ध्वज फडकला. ब्रिगेडियर सगातसिंग यांच्या हुकूमाप्रमाणे भारतीय सैनिकांनी आपली पोलादी शिरस्त्राणे उतरवून ठेवली आणि पॅराशूट रेजिमेंटचे सन्मानचिन्ह असलेल्या तांबड्या बॅरेट टोप्या परिधान केल्या. ‘तुमच्याशी लढायला आता आम्हाला शिरस्त्राणांची गरज नाही,’ असा हा संकेत होता.

या अवधीत सालाझारने सिल्वाला संदेश पाठवला की, “आमच्या राज्यातल्या सर्व वास्तू स्फोटाने उद्ध्वस्त करा. गोव्यात आम्ही उभी केलेली एकही इमारत या भारतीयांच्या हाती लागू देऊ नका.’ हा आदेश मात्र सिल्वाने सरळ नाकारला. ‘’पूर्वेत (म्हणजे भारतात) आम्ही जे उभे केले आहे, ते मी नष्ट करणार नाही,” तो म्हणाला. त्याच रात्री ८.३० वाजता त्याने शरणागतीच्या करारनाम्यावर सही केली. ४५१ वर्षांची पोर्तुगीज राजवट संपली.

गोव्यात आणि गोव्याबाहेर विजयाचा प्रचंड जल्लोष झाला. गोवा हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला आणि १७व्या इन्फन्ट्री डिव्हिजनचे मेजर जनरल कँडेथ यांनाच ‘मिलिटरी गव्हर्नर’ म्हणून कार्यभार सोपवण्यात आला. शिवछत्रपती, शंभूछत्रपती आणि पेशवे यांनी पाहिलेले, देवभूमी गोमंतकाच्या मुक्तीचे स्वप्न त्यांच्यानंतर सव्वादोनशे वर्षांनी प्रत्यक्षात उतरले. पांढर्‍या पायाचे फिरंगी बुडाले! हिंदुस्थान बळावले! आनंदवनभुवन झाले!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.